News Flash

आयुष्य घडवणारी माणसं

तो घरातून पळून आलेला, शिक्षण असून नोकरी नाही. शेवटी भिकेचा कटोरा प्रत्यक्ष हाती आला असताना त्याला भेटले ‘शकील बदायुनी’ नि मिळालं एक वळण,

| January 11, 2014 07:12 am

तो घरातून पळून आलेला, शिक्षण असून नोकरी नाही. शेवटी भिकेचा कटोरा प्रत्यक्ष हाती आला असताना   त्याला भेटले ‘शकील बदायुनी’ नि मिळालं एक वळण, पुढे याच भिकाऱ्याला लग्नाची मागणी घालणारी मुलगी भेटली नि आयुष्याचा तो टर्निग पॉइंट ठरला.. पुढे तर आचार्य अत्रे, महंमद रफी भेटले आणि आयुष्याचं सोनं झालं..  वाचकांनी पाठवलेल्या उदंड ‘यू-टर्न’ अनुभवातला हा ह्रदयस्पर्शी  अनुभव..
मी एक सामान्य निसर्गचित्रकार. १९५२ साली मी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालो. लहानपणापासून चित्रकलेचे वेड. चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जावे ही माझी महत्त्वाकांक्षा. पण घरात या गोष्टीला विरोध मग मी सर्वाची नजर चुकवून मुंबईत पळून आलो. मुंबईत माझे ना नातेवाईक ना मित्रमंडळ. सर जे.जे. स्कूल ऑप आर्टच्या डीनना भेटून मी प्रवेश मिळविला. त्यांना वस्तुस्थिती सांगितल्यावर मला एका कर्मचाऱ्याच्या खोलीत राहण्याची परवानगी मिळाली.
क्रॉफर्ड मार्केटसमोरील ‘हॉटेल सदानंद’मध्ये मासिक २० रुपयांवर ‘हॉटेल पोऱ्या’ची नोकरी मिळवली. साडेसहा वर्षे राबराबून मी जी.डी. आर्ट व आर्ट मास्टर या पदविका संपन्न केल्या. आता मला कलाशिक्षकाची चांगली नोकरी मिळेल म्हणून ‘हॉटेल पोऱ्या’ची नोकरी सोडून दिली. कित्येक ठिकाणी अर्ज केले पण नोकरी मिळाली नाही. माझ्या जवळचे सर्व पैसे संपले. जवळजवळ वर्षभर मी बेकार होतो. खिशात पैसे नसल्याने जेवणाची आबाळ होऊ लागली. तणाव वाढत गेला. झोप उडाली. फक्त नैराश्य. निरुपाय होऊन मी आर्ट स्कूलच्या कर्मचाऱ्याने दिलेला वाडगा हातात घेऊन मी भीक मागू लागलो. मोहंमद रफींची जुनी गाणी मी बेसूर आवाजात जमतील तशी म्हणू लागलो. एके दिवशी एका माणसाने १ आणा माझ्या वाडग्यात टाकला. मी त्यांना लवून नमस्कार करून ‘थँक यू व्हेरी मच’ म्हणालो. तसे ते थांबले. माझ्याकडे टक लावून पाहत माझी विचारपूस केली. मी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘चल माझ्या बरोबर माझ्या मामीच्या घरी.’ मामीला सांगितले, ‘या भिकाऱ्याच्या पोराला रोज १ भाकरी व कालवण दे.’ तिने होकार दिला. तेवढय़ात एका कागदावर काही ओळी लिहून ते मला म्हणाले, ‘या ओळी तू पाठ कर. याची चालही मी देईन’ त्या आशयघन ओळी वाचून मी त्यांना विचारले, ‘सर या ओळी तुम्ही लिहिल्यात? आपलं नाव काय?’ ते उत्तरले, ‘मी शकील बदायुनी’ मी अवाक झालो. हे अर्थपूर्ण गाणे मी महंमद अली रोडपासून कामाठीपुरा, चोर बाजार, गुलाल वाडी, गोल देऊळ ते जेकब सर्कलपर्यंत म्हणत असे. मला भीक चांगली मिळू लागली..
शकील बदायुनी मला ‘देवदूत’च भेटले. आयुष्याला एक वळण मिळालं. त्यानंतर मी रोज लोकलमध्ये रफींची गाणी म्हणत दिवस काढत होतो. त्यातून नोकरीचा शोधही चालूच होता. नंतर पुढे एकदा अचानक साक्षात मोहंमद रफी यांची भेट झाली. मी हे इतिवृत्त सांगितले. त्यांचे डोळे पाणावले. रफीजी म्हणाले, शकीलने मला याबाबत सांगितले. माझ्याही डोळय़ांतून आनंदाश्रू वाहू लागले.
 एके दिवशी एका मुलीने मला एका डब्यातून शिरा दिला. तो शिरा वाडग्यात घालून मोकळा डबा तिला दिला, तर घेताना ती म्हणाली, ‘हा डबा आपण वापरू.’ मला काहीच समजेना. ती माझ्याजवळ आली व म्हणाली, ‘मला तुमच्याशी काही बोलायचे आहे, मला तुमच्याशी संसार करायचा आहे.’ मी म्हणालो, ‘तू वेडी तर नाहीस ना! मी भिकारी- मला घरदार नाही. तुझ्यासारखी नोकरी नाही! फुकट पश्चात्ताप होईल तुला! उगाच माझी थट्टा करू नकोस. पण ती ऐकेचना. ‘तू माझ्यासारखी सुट्टीच्या दिवशी भीक मागशील?’ तिने होकार दिला. मला तिची ‘टेस्ट’ घ्यायची होती. मी म्हणालो, ‘उद्या आहे रविवार! तू येथे ये व उद्या दिवसभर आपण भीक मागू.’ दुसरे दिवशी ती एक झोळी घेऊन माझ्याजवळ आली व माझ्या गाण्याला साद देऊ लागली. जेकन् सर्कलजवळ येताच एका वृद्ध बाईने मला बोलावले. मला विचारले, ‘ती पोरगी कोण?’ मी म्हणालो, ‘माझी भावी पत्नी!’ यावर तिने चिडून मला दरडावले, ‘त्या पोरीला वर आण. तुला काही लाजलज्जा आहे का? तरुण मुलीला भीक मागायला लावतोस? तू एकटा भीक माग ना. उद्यापासून ही पोरगी माझ्याजवळ राहील. समजलं!’ तिने एका गृहस्थाला फोन करून सांगितले की, ‘या दोघांना गिरगावात नेऊन आपल्या बाहेरच्या रूममध्ये ठेव. मी संसाराची भांडी घेऊन येईन.’ त्या गृहस्थाने आम्हा उभयतांना गाडीत घालून गिरगावात श्रीजी बिल्डिंगमध्ये नेले. थोडय़ा वेळाने त्या बाईही आल्या. बाहेरची रूम स्वच्छ करून दिली. संसाराला भांडी दिली, कपडे दिले. पुढे आमचे लग्नही लावून दिले. ती वृद्ध बाई म्हणजे त्या वेळची प्रसिद्ध अभिनेत्री ‘प्रतिमा देवी’! माझी पत्नी, कला माझ्या आयुष्यात आली तो माझ्या आयुष्याचा टर्निग पॉइंट होता. माझा संसार सुरू झाला.
पण अजून काही वळणे बाकी होती. आयुष्याला अर्थ देणारी.. एके दिवशी वरळी सीफेसवर काही सी स्केचेस करीत होतो. ती बघून एके दिवशी एक आलिशान गाडी माझ्याजवळ आली व त्या ड्रायव्हरने मला, ‘साहेब तुला बोलवीत आहेत,’ असे म्हणून मला घेऊन गेले. ते साहेब म्हणजे ‘आचार्य अत्रे!’ त्यांनी फोन करून मुंबईतील ‘सेंट पीटर्स’ स्कूलमध्ये एका चुटकीसरशी जॉब दिला व रात्री ‘मराठा प्रेस’मध्ये मला आर्टवर्क करण्याची संधी दिली. काही दिवसांनी टाइम्समधल्या ओव्हर सीज कॉलममधल्या ‘व्हिज्यूलायझर कम आर्टिस्ट’ची  जाहिरात वाचून मला गल्फमध्ये नोकरी मिळाली. अगदी ‘दिल से’ काम करून २५ वर्षे मी गल्फमध्ये नोकरी केली. भरपूर पैसे मिळविले. नैराश्यावर मात करून आतापर्यंत ४३ चित्रप्रदर्शने भरविली. मोहंमद रफी माझ्या एका चित्रप्रदर्शनाला आले. त्यांना माझ्या वर्षांॠतूच्या चित्रांत त्यांचा आवडता राग ‘मल्हार’ दिसला व त्यातून आमची मैत्री वाढत गेली.
माझे ४० वर्षांपूर्वीचे एक स्वप्न असे की, माझ्या मातृभूमीत कोल्हापूरला एक स्वत:ची आर्ट गॅलरी करायची ते स्वप्न आज साकार झाले आहे. माझे वय आज ७९ आहे. आज मला ‘नाईफ पेंटिंग’ शिकवणाऱ्या लँग हॅमर गुरुजींच्या स्मरणार्थ मुंबई व कोल्हापूर येथे विनामूल्य घेत असतो. ते टाइम्स ऑफ इंडियाचे कला दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे १५ वर्षे शिक्षण घेऊन मी माझी शिदोरी सांभाळली आहे. नैराश्यावर मात करून व अथक संघर्ष करून मी आज ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार’ म्हणून नावारूपाला आलो! धन्य ते माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर भेटलेले माझे गुरुजी व  थोर लोक की, ज्यांनी माझ्या कलेचे सोने केले!    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 7:12 am

Web Title: people who shapes life
टॅग : Life
Next Stories
1 ज्येष्ठांचा सेफ झोन
2 चला शिकू या इंटरनेट!
3 जगण्याचा मूलभूत अधिकार
Just Now!
X