14 December 2019

News Flash

सेवायज्ञ

समाजकार्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करणाऱ्या, स्वत:चे ६० लाख रुपये निधी म्हणून देणाऱ्या, तसेच मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी अखंड

| June 20, 2015 12:05 pm

समाजकार्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करणाऱ्या, स्वत:चे ६० लाख रुपये निधी म्हणून देणाऱ्या, तसेच मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी अखंड श्रमदान करणाऱ्या सुनीता व मधुकर देवधर यांच्या सत्पात्री दानाविषयी..

‘माझ्या आयुष्याला नवं वळण देणारा दिवस.. ४ जून १९६२. याच दिवशी माझं माझ्या शाळेशी (मुलुंडमधील पुरंदरे हायस्कूल) नातं जडलं. मुख्याध्यापक पायगावकरसर आणि बर्डेबाई यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली मी cr11घडत गेले. चिमुकल्या सुनीलच्या अकाली मृत्यूच्या डोंगराएवढय़ा दु:खातून सावरायला शाळेनेच हात दिला. तेव्हाच ठरवलं की यापुढचं आयुष्य जगायचं ते परिस्थितीमुळे ज्यांच्या चेहऱ्यावरचं हसू लोपलंय अशा जिवांना फुलवण्यासाठी..’’ गेली ५० वर्षे ‘कमी तिथे आम्ही’ हा वसा घेऊन काम करणाऱ्या सुनीता देवधरबाई सांगत होत्या.
बाईंच्या सेवाकार्याला त्यांचे पती मधुकर देवधर यांनी तनमनधनाने साथ दिली, देत आहेत. या पतीपत्नीच्या आयुष्याचं सार दोन वाक्यात सांगायचं तर ते असं सांगता येईल.. ‘जेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक सामाजिक संस्थांना संपन्न करण्यासाठी त्यांनी समाजातील दानशूरांना साकडं घातलं. मात्र जेव्हा त्यांच्याकडे पैसा आला तेव्हा दुसऱ्यांकडे मदत मागण्याआधी स्वत:चा (घसघशीत) वाटा त्यांनी पुढे केला. विविध लोकोपयोगी कामांसाठी गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जमा केलेल्या निधीने एक कोटी रुपयांचा आकडा पार केलाय तर त्यांच्या वैयक्तिक दानाने ६० लाख रुपयांची वेस ओलांडलीय. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी जे श्रमाचं दान दिलंय, देत आहेत त्याला तोड नाही. संस्था व कार्यकर्ते उभे करणारी माणसं अशी या उभयतांची ओळख आहे.
देवधर पतीपत्नी दोघंही मूळचे पुण्याचे. लग्नानंतर १९६१ साली देवधरांच्या नोकरीच्या निमित्ताने ते मुलुंडकर झाले. बी.ए., बी.एड. ही पदवी असल्याने बाई पुरंदरे हायस्कूलमध्ये लागल्या तर मधुकररावांनी पेंट टेक्नॉलॉजीमध्ये एम.एस्सी. केल्याने विविध ठिकाणचा अनुभव घेऊन ठाण्यात स्वत:ची इंडस्ट्री सुरू केली आणि नंतर आपला व्यवसाय मॉरिशस, श्रीलंका, आफ्रिका या देशांपर्यंत वाढवला. बाईंनी शिक्षिकेपासून मुख्याध्यापकपदापर्यंत सर्व स्तरांवर काम करून १९९५ मध्ये याच शाळेतून निवृत्ती घेतली.
बाईंच्या समाजकार्याची मुहूर्तमेढ शाळेतच रोवली गेली. शाळेच्या मागेच असणाऱ्या विठ्ठलनगर झोपडपट्टीतील दहावीमधील मुलाला बाईंनी अनेक वर्षे इंग्रजी व समाजशास्त्र हे विषय एक पैसाही न घेता शिकवले. मुलुंडमधील सर्व माध्यमांच्या शाळांतील ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर प्रशिक्षण वर्ग आयोजित करून आपल्या शाळेत त्याच्या स्पर्धा घेतल्या. ५० वर्षांपूर्वी पुरंदरे शाळेची इमारत तशी मोडकीतोडकीच होती. अशावेळी बाईंनी त्यांचे कौटुंबिक मित्र भाऊसाहेब केळकर (एस.एच. केळकर कंपनीचे मालक) यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी ३ लाख रुपये (त्यावेळी) बिनव्याजी दिले, ज्यामुळे शाळा धट्टीकट्टी झाली. हे पैसे फेडण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी फंड उभारायचं ठरलं तेव्हाही घरोघर जाऊन लाखो रुपये जमविण्यात बाईंचा मोठा हात होता. त्यांच्या या नि:स्वार्थी योगदानामुळे आज पुरंदरे हायस्कूल मोठय़ा दिमाखात उभं आहे.
१९७२ मध्ये बाई ‘इनरव्हील क्लब’ या सेवाभावनेतून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्त्री संघटनेच्या सदस्य झाल्या आणि त्यांचं काम सुरूच राहिलं. कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी मुलुंड (सेंटर) क्लबने सुरू केलेल्या निर्मलादेवी जैन मेडिकल सेंटरला त्यांनी ३ लाख रुपये दिले आणि ‘सुनील मधुकर देवधर रोगनिदान केंद्र’ सुरू झालं. २०/२२ वर्षांपूर्वी मुलुंड जिमखाना आकार घेत असताना गरीब व होतकरू खेळाडूंना वाजवी फीमध्ये सराव करता यावा यासाठी त्यांनी दिलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या देणगीतून ‘सुनीता मधुकर देवधर टेबल टेनिस हॉल’ उभा राहिला. जिथे आज अनेक खेळाडूंचं प्रशिक्षण सुरू आहे. १९८०-८१ ला बाई मुलुंड क्लबच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांनी जी कामं केली त्यातलं एक म्हणजे झोपडपट्टय़ांमधील एक ते पाच वर्षांच्या मुलांना कुपोषणाने आलेला रातांधळेपणा घालवण्यासाठी केलेले ‘ए’ व्हिटॅमिनच्या डोसचं वाटप. सहा महिन्यांनी एकदा याप्रमाणे साडे तीन हजार मुलांसाठी हे अभियान दोन वर्षे सुरू होते.cr17
२००३-०४ या वर्षी बाईंची जिल्हा अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. चर्चगेट ते विरार आणि सी.एस.टी. ते बदलापूर या परिसरातील (इनरव्हील ३१४ डिस्ट्रिक्ट) ४६ क्लबचं नेतृत्व करताना त्यांनी सर्व सभासदांना बरोबर घेऊन अनेक उपक्रम यशस्वी केले. त्यातील वानगीदाखल हे काही – कुष्ठरोग निवारण समिती, नेरे पनवेल येथे प्रौढ साक्षरता, शिवण, महिला सरपंच शिक्षण या विषयातील प्रशिक्षण केंद्र सुरू झालं, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या प्रकल्पांतर्गत शांतिवनात बांध बांधून पावसाचं पाणी जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली. याच ठिकाणच्या आदिवासी मुलींसाठी बांधलेल्या आश्रमशाळेच्या इमारतीचं नूतनीकरण करून तो परिसर सोलर लाईट्सनी उजळून टाकला. २२ आदिवासी जोडप्यांचे विवाह लावून दिले. अशा अनेक छोटय़ा मोठय़ा कामांचा हा २५ लाख रुपयांचा प्रकल्प केवळ २ महिन्यात पूर्ण केल्याबद्दल इंटरनॅशनल इनरव्हील प्रेसिडेंट लेडी आयलन हरसंट व जॉन हरसंट यांनी ३१४ डिस्ट्रिक्टच्या सेवाकार्याचं तोंडभरून कौतुक केलं. पुढे प्रकल्प प्रमुख या नात्याने बाईनी दरवर्षी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
कोणत्याही प्रकल्पासाठी पैसा उभा करताना आधी स्वत:चा हिस्सा घालायचा, अहवाल तयार करायचा आणि मगच इतरांकडे मागणी करायची ही शिस्त लावून घेतल्याने सुनीताबाई आहेत ना, मग डोळे मिटून पैसे द्या, हा विश्वास निर्माण झाला. वरील तत्त्वाला अनुसरून बाईनी रोटरीच्या ‘सेव्ह द चाईल्ड’ या जागतिक स्तरावरील प्रकल्पाला ५० हजार डॉक्टर्सचं योगदान दिलं. जो न्याय दारी तोच घरी. म्हणूनच त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या बाईना चार वर्षांपूर्वी जेव्हा कर्करोगाने गाठलं, तेव्हा देवधरबाईनी केलेल्या दोन लाख रुपयांच्या मदतीने पुन्हा उभं राहाता आलं.
देवधर पतीपत्नीनी ज्या संस्थांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं त्यांची नावं अशी.. सार्वजनिक शिक्षण संस्था, मुलुंड विद्यासंस्कार, एस.एच. वझे इंग्रजी शाळा, लोकमान्य इंग्रजी शाळा, पुरंदरे हायस्कूल, नाइट कॉलेज, रोटरी क्लब ऑफ मुलुंड, रोटरी स्कूल फॉर डेफ, व्ही.जी. वझे कॉलेज, मुलुंड व ऐरोली येथील महाराष्ट्र सेवा संघ, यासाठी त्यांना मुलुंड परिसरातील सार्वजनिक जीवनाचा चालताबोलता शब्दकोश असं म्हटलं जातं.
‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ या संस्थेचं नवी मुंबईत सांस्कृतिक केंद्र व्हावं यासाठी ऐरोली गावात इमारत बांधायची ठरलं तेव्हा म्हणजे १९९८ मध्ये मधुकर देवधर अध्यक्ष होते. त्यांनी दिलेल्या २५ लाख रुपयांच्या देणगीतून हा प्रकल्प आकाराला आला. त्यावेळी ऐरोलीत मुख्यत्वे कामगार वस्ती होती. स्त्रियांना तर सुधारणांचा वारादेखील नव्हता. त्यांच्या सर्वागीण प्रगतीची धुरा देवधरबाईंनी उचलली आणि त्यासाठी ‘मैत्री’ या मुक्त व्यासपीठाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गेली १० वर्षे सातत्याने चालू असलेल्या वेगवेगळय़ा उपक्रमांमुळे इथल्या स्त्रियांमध्ये एवढा बदल झालाय की पूर्वी नाव सांगतानासुद्धा कचरणाऱ्या या बायका आता इंटरनेटवरून हवी ती माहिती शोधू लागल्यात.
शाळकरी मुलांसाठी केवळ दीडशे रुपयांत दहा दिवसांचं संस्कारशिबीर हा मैत्री संघटनेचा आणखी एक विशेष उपक्रम. यासाठी तर एकदा बाईनी एका कुंभाराला त्याच्या भल्यामोठय़ा चाकासह बोलावून मुलांना मडकी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवलं होतं. ऐरोलीतील या सांस्कृतिक केंद्राची दखल नवी मुंबई महानगरपालिकेनेही घेतली आणि १७ सेक्टरमधील त्या चौकाचं म.बा. देवधर चौक असं नामकरण करण्यात आलं.
गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड आणि अंधांसाठी काम करणारी नॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संघाच्या जागेत दहावी नापास वा अभ्यासात खंड पडून मागे पडलेल्या अंध मुलांसाठी नियमित अभ्यासवर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाची धुराही मुख्यत्वे बाईंच्या अंगावर आहे. याच वर्षांपासून सेवा संघाने सुरू केलेल्या सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कारासाठीची आर्थिक सोयही बाईंनी त्यासाठी दिलेल्या २ लाख रुपयातून करण्यात आलीय.
वरवर पाहिलं तर बाई कडक वाटतात, पण आतून कमालीच्या मृदु आहेत, याचं हे एक बोलकं उदाहरण- मधुकर देवधर रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असताना बाईना अनेकदा त्यांच्याबरोबर बैठकांसाठी ताजमहाल हॉटेलात जावं लागे. यासंबंधी शाळेचे शिपाई व ऑफिस स्टाफ यांच्यात मागून चर्चा चाले. हे समजल्यावर एकदा बाई त्यांना म्हणाल्या, ‘तुम्हाला बघायचं आहे का ताज? मी घेऊन जाते.’ बोलण्याप्रमाणे एके दिवशी बाई खरंच त्या सात-आठ जणांना ताजमध्ये जेवायला घेऊन गेल्या. तिथे मॅनेजर पदावर काम करणारा बाईंचा विद्यार्थीच निघाला. त्याने संपूर्ण हॉटेल आतून बघण्याची व्यवस्था केली. त्यावेळी म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वी बिलावरचा दहा हजार रुपयांचा आकडा पाहून मंडळी हबकूनच गेली.
असंच एकदा दहावी अ ची वर्गशिक्षिका असताना बाईनी आपल्या वर्गात सहज म्हटलं की जर आपल्या वर्गाचा १०० टक्के रिझल्ट लागला तर माझ्याकडून पार्टी, तीही हॉटेलमध्ये. त्यावेळी म्हणजे ४५ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये खाण्याचं कोण कौतुक! मुलांनी खरोखरच बावनकशी यश मिळवलं आणि बाईनींही शब्दाला जागून आपल्या ५० विद्यार्थ्यांना मुलुंडच्या सुप्रसिद्ध विश्वभारती हॉटेलात नेलं. त्या लकी बॅचची मी एक विद्यार्थिनी. त्या दिवशी आम्ही सर्व जमिनीपासून चार बोटं वर तरंगत घरी आलो. आज इतक्या वर्षांनंतर लेखणीच्या माध्यमातून गुरुऋण अंशत: का होईना, पण फेडण्याची संधी मिळाली यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता?
संपदा वागळे -waglesampada@gmail.com

First Published on June 20, 2015 12:05 pm

Web Title: philanthropy of sunita and madhukar deodhar
Just Now!
X