05 August 2020

News Flash

सूक्ष्म अन्नघटक : फॉस्फरस जीवनाचे ‘फ्लायव्हील’

‘फिलॉसॉफर्स स्टोन’ म्हणजे ज्याचा स्पर्श कुठच्याही धातूला झाला की त्या धातूचे सोन्यात रूपांतर होते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नितीन पाटणकर

ग्रीक पुराणकथांमध्ये फॉस्फरस ही शुक्रताऱ्याची देवता किंवा पृथ्वीवर पहिला प्रकाश आणणारी देवता असा उल्लेख येतो. लॅटीन वाङ्मयात मात्र फॉस्फरस हे ल्यूसिफर किंवा सतानाचे नाव आहे. हेनिंग ब्रँड नावाचा एक केमिस्ट जर्मनीमधील हँबर्ग इथे राहात होता. काचा बनवण्याच्या कारखान्यात उमेदवारी करत असताना त्याचे एका श्रीमंत मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर त्याने नोकरी सोडली आणि त्याच्या आवडत्या संशोधनाकडे वळला. त्याचे स्वप्न होते ‘फिलॉसॉफर्स स्टोन’ शोधून काढण्याचे.

‘फिलॉसॉफर्स स्टोन’ म्हणजे ज्याचा स्पर्श कुठच्याही धातूला झाला की त्या धातूचे सोन्यात रूपांतर होते. आपल्याकडचा परीसच तो. या शोधकार्यात त्याला लक्षात आले, की युरिन आणि सोने यांच्या रंगात खूप साम्य आहे. त्याने बायकोची आणि तिच्या मत्रिणींची युरिन साठवायला सुरुवात केली. त्याने अशी १५०० गॅलन युरिन जमा केली अशी नोंद आहे. मग त्याने ती उकळवायला सुरुवात केली. काही तास उकळल्यानंतर लालबुंद घट्ट रस तयार झाला. थंड होताच तो काळा पडला. मग त्याने काळा खडा, नवीन लालबुंद युरिन सिरपमध्ये उकळवून त्याचे डिस्टिलेशन केले. तयार झालेला पदार्थ हवेशी संपर्क येताच आपला आपण पेटला. त्याने या पदार्थाला ग्रीक मायथॉलॉजीमधील फॉस्फरस किंवा लाइट बेअरर या देवाचे नाव ठेवले.

फॉस्फरसला ‘सतानाचे अपत्य’ असेही म्हटले जाते. कारण हा अंधारात चमकतो, अचानक पेट घेतो. त्याच्या आधी बारा मूलद्रव्यांचा शोध लागला होता, फॉस्फरस हा तेरावा. तेरा आकडा अशुभ, सतानाचा क्रमांक मानतात. निसर्ग खरा आणि एकमेवाद्वितीय ‘अल्केमिस्ट’ आहे. असा हा ज्वालाग्रही फॉस्फरस आपल्या पेशींच्या आवरणाचा (सेल मेंब्रेन) अणि गुणसूत्रांचा अविभाज्य भाग आहे. हाडांचे स्वास्थ्य म्हटले की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आठवतात. पण कॅल्शियम हाडांमध्ये स्थिरावून हाडांना दृढता येण्यासाठी कॅल्शियमचे फॉस्फरसबरोबर लग्नच व्हावे लागते, (नुसती लिव्ह इन रिलेशनशिप नाही, थेट लग्न – संयुग बनून). तसेच आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ग्लुकोज किंवा फॅटी अ‍ॅसिड्स यांचे विघटन होऊन. ‘साखर जळते किंवा चरबी जळते.’ असे आपण सहज म्हणून जातो. जळणे म्हटले, की लगेच ऑक्सिजन डोळ्यांसमोर येतो. शरीरात तापमान न वाढवता, ऊर्जा मोकळी करण्यासाठी ऑक्सिजनच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व हे फॉस्फरसला आहे. ‘फॉस्फोरायलेशन’ या शीर्षकाखाली अनेक रासायनिक प्रक्रिया होत असतात, ज्यामुळे आपण ऊर्जा प्राप्त करतो. आपल्या शरीरातील ‘अ‍ॅसिड आणि बेस’ यांचा तोल हा जितक्या काटेकोरपणे सांभाळला जातो तितका कठोर काटेकोरपणा इतर कुठल्याच प्रक्रियेच्या बाबतीत सांभाळला जात नाही. या अ‍ॅसिड आणि बेसचे मापक आहे ‘पीएच.’ (पावर ऑफ हायड्रोजन ऑर पीएच). हे सतत ७.४ या पातळीवर स्थिर ठेवले जाते. हे ठेवण्याच्या कामात फॉस्फरस महत्त्वाची भूमिका वठवतो.

सूक्ष्म अन्नघटकांबद्दल विचार करताना या घटकांची कमतरता का भासते, त्याचे परिणाम काय आणि ती दूर करण्यासाठी काय खावे याचा प्रामुख्याने विचार केला जातो. लग्न झाल्यानंतर सुनेला नवऱ्याला, सासरच्या लोकांना काही कमी पडत नाही ना याची सतत चिंता असते. लग्न जुने झाले की नवऱ्याला सतत चिंता असते की बायकोला काही कमी पडत नाही ना. म्हणजे संसारात सतत कुणाला तरी सारखी चिंता असते ‘कमी पडत नाही ना’ ही. अशांचे नशीब हे ‘लोह किंवा कॅल्शियम नशीब’ असते. बहुतेक सूक्ष्म अन्नघटकांबद्दल ‘कमी नाही ना’ ही चिंता असते. काही नशीबवान लोक असतात ज्यांना ही चिंता कधीच पडत नाही. त्यांचे नशीब हे ‘फॉस्फरस नशीब’ असते. बहुतेक सर्व अन्नपदार्थात फॉस्फरस मुबलक असतो, त्यामुळे या सूक्ष्म अन्नघटकाची कमतरता भासत नाही.

कुणी अन्न-पाणी वर्ज्य केले आणि तेसुद्धा अनेक दिवसांसाठी तर किंवा फार क्वचित आढळणारा दोष, ज्यामध्ये किडनीतून फॉस्फरसला गळती लागते; अशा टोकाच्या स्थितीत फॉस्फरस कमी पडू शकतो. यामधून बाहेर येताना जर अन्न ( फॉस्फरस कमी झाल्याने भूक मरते आणि खावेसे वाटत नाही किंवा औषधाद्वारे फॉस्फरस मिळाला नाही तर मात्र हाडे ठिसूळ राहतात आणि हाता-पायाला सतत मुंग्या येत राहतात. आपल्या बहुतेक अन्नपदार्थातून जो फॉस्फरस मिळतो त्याचे रक्तातील प्रमाण नियंत्रणात राहते, कारण जास्तीचा फॉस्फरस किडनीतून बाहेर फेकला जातो. फॉस्फरस कमी पडला तर त्याचे आतडय़ांतून शोषण वाढण्यासोबत किडनीतून गळती थांबवली जाते. त्यामुळे किडनीचे काम कमी झाले तरच फॉस्फरसचे प्रमाण वाढते. पॅराथायरॉइड नावाच्या ग्रंथीचे काम कमी पडले तरी रक्तातील फॉस्फरसचे प्रमाण वाढते. वाढलेल्या फॉस्फरसमुळे हृदयावर परिणाम होतो. तज्ज्ञांना खरी भीती आहे ती आपण जे अनेक प्रकारचे तयार अन्न किंवा प्रक्रिया केलेले अन्न खातो त्यातून मिळणाऱ्या फॉस्फरसबद्दल. फॉस्फरस हा अन्नामध्ये काय काम करतो त्याची यादी बघू या.

अन्नामध्ये फॉस्फरस वापरला जातो तो कधी आम्ल (अ‍ॅसिड) किंवा कधी अल्क (बेस) अशी दोन्ही रूपे धारण करू शकतो असा ‘संतुलक’ (बफर) म्हणून. रसवाही (सीक्वीस्ट्रॅन्ट), रसगंधधारी (फ्लेवर), शीतरोधक (क्रायोप्रोटेक्टंट), श्लेष्मवाही (जेल अ‍ॅक्सलरंट), पांगारक (डीसपरसंट), अवक्षेपक (प्रीसीपीटंट), सुवाहक (फ्री फ्लो एड), भारितकणवाही (आयन एक्स्चेंज). फॉस्फरस हा आमाग्री (लिवनिंग एजंट) म्हणून केक, कुकीज, पॅनकेक, वॅफल्स आणि डोनट्समध्ये वापरतात. ओलधारी (मेंटेनिंग हायड्रेशन) म्हणून मीट, पोल्ट्री आणि सी-फूड पदार्थामध्ये वापरतात. वाफ स्वरूपात दूध नेऊन ते पुन्हा जलरूपात आणताना त्याची वाहकता वाढवण्यासाठी फॉस्फरसचा वापर होतो. डबा किंवा बाटलीबंद पदार्थाची, रसांची चव बिघडू नये म्हणून फॉस्फरस वापरतात. या व अशा अनेक ठिकाणी फॉस्फरसचा वापर होतो. या सर्व पदार्थातून फॉस्फरस हा अशा स्वरूपात असतो की जो सहज शोषला जातो. नैसर्गिक पदार्थातील फॉस्फरस शोषला जाण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त असते.

किडनीची कार्यक्षमता कमकुवत झाली तर रक्तातील फॉस्फरसचे प्रमाण वाढून हृदयविकार होतात हे ठाउक होतेच. म्हणूनच किडनीच्या रोगात फॉस्फरस तपासतात आणि फॉस्फेट बाईंडर म्हणजे फॉस्फरस शोषणास प्रतिबंध करणारी औषधे वापरतात. त्यामुळे रक्तातील फॉस्फरसचे प्रमाण मर्यादित ठेवायला मदत होते. हे उपाय खरे तर लुटुपुटुचेच ठरतात. एकदा का किडनीची कार्यक्षमता एका मर्यादेच्या खाली घसरली, की डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट हेच उपयोगी पडतात. चिंता आहे ती तयार अन्न पदार्थातून जो अतिरिक्त प्रमाणात फॉस्फरस मिळतो त्याची. यावर अनेक तज्ज्ञांनी लेख लिहिलेत, आपली निरीक्षणे नोंदवलीत. विज्ञानाच्या कसोटय़ांवर उतरणारे ठोस निष्कर्ष काढता येतील इतका विदा (डेटा) उपलब्ध नाही. तरीही त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे दुर्लक्ष करण्याजोगी नाहीत.

आतडय़ांचे कर्करोग, हृदयविकार किंवा एकूणच मृत्युदर हा असा तयार पदार्थ सेवन करणाऱ्यांच्यात अधिक असतो. या मार्गाने येणारा फॉस्फरस हा अनेक संप्रेरकांच्या कार्यात बाधा आणू शकतो. फॉस्फरसमुळे खाद्यपदार्थाचे गुणवर्धन झाले नाही तरी त्याचे रसवर्धन (अ‍ॅडिक्शन पोटेंशियल) वाढते. हे सर्व विचारात घेतले तर नैसर्गिक पदार्थातील फॉस्फरस टाळता येत नसेल तरी तयार, दीर्घ आयुर्मान (लाँग शेल्फ लाइफ) लाभलेले, पॅकबंद, बाटलीबंद, दिसायला दिमाखदार आणि हाताळायला सहज, चवीला चटकदार असे पदार्थ किती प्रमाणात खायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

फॉस्फरस हा सृष्टीतील जीवनाचे ‘फ्लायव्हील’ आहे. शरीरात जी ऊर्जा साठते ती फॉस्फेटमध्येच. फॉस्फेटला पर्याय नाही. सॅनिटेशनची सोय उपलब्ध नव्हती त्या काळात, म्हणजे अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत मानव किंवा प्राणी यांच्या मला उत्सर्जनातून फॉस्फेट रिसायकल होत होते. सॅनिटेशनचा शास्त्रोक्त वापर करून इंग्लंडमध्ये अनेक रोगांना आळा घालणाऱ्यांपैकी एका शास्त्रज्ञाने या फॉस्फरसच्या रिसायकिलगबद्दल काय लिहिले आहे बघा, ‘सायन्स आफ्टर हॅविंग लाँग ग्रॉप्ड अबाऊट, नाऊ नोज दॅट द मोस्ट फेक्युन्डेटिंग अ‍ॅण्ड द मोस्ट इफिकॅसियस ऑफ फर्टिलायजर्स इज ह्य़ुमन मॅन्यूर. द चायनिज, लेट अस कनफेस इट टू अवर शेम, न्यू इट बिफोर अस. नॉट अ चायनीज पीजन्ट गोज टू टाउन विदाउट ब्रिंगिंग बॅक विथ हिम, अ‍ॅट द टू एक्स्ट्रीमीटीज ऑफ हिज बाम्बू पोल, टू फूल बकेट्स ऑफ व्हॉट वुई डेसिग्नेट अ‍ॅज फिल्थ. थँक्स टू ह्य़ुमन डंग, द अर्थ इन चायना इज अ‍ॅज यंग अ‍ॅज इन द डेज ऑफ अब्राहम. चायनीज व्हीट यिल्ड्स अ हन्ड्रेड फोल्ड ऑफ द सीड.’ (ह्य़ुगो – १८६२)

आज रिसायकल होणाऱ्या फॉस्फरसऐवजी पृथ्वीतून मिळणाऱ्या फॉस्फरसचा प्रचंड उपसा चालू आहे. मानव जात जर नष्ट होणार असेल तर फॉस्फरस क्रायसिस हे मोठे कारण असेल. ग्लोबल वॉर्मिगपेक्षाही हा मोठा पण जाणिवेत नसलेला प्रश्न आहे.

सुप्रसिद्ध केमिस्ट आणि विज्ञान कथा लेखकांचे गुरू आयझॅक अ‍ॅसिमॉव यांनी म्हटले आहे, ‘लाइफ कॅन मल्टिप्लाय अनटिल ऑल द फॉस्फरस हॅज गॉन अ‍ॅण्ड देन देअर इज अ‍ॅन इनएक्झोरेबल हाल्ट विच नथिंग कॅन प्रिवेंट.’

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 12:14 am

Web Title: phosphorus flywheel of life food component abn 97
Next Stories
1 विचित्र निर्मिती : हुबेहूब
2 ‘मी’ची गोष्ट : मी, एक राजहंस!
3 सृजनाच्या नव्या वाटा : लोकभाषेतलं सकस शिक्षण
Just Now!
X