11 August 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : युद्धभूमीवरील १८ वर्षे..

फोटो जर्नलिस्ट लिंडसी अडारिओ गेली १५ वर्षे युद्धभूमीवरचं छायाचित्रण करते आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रज्ञा शिदोरे

pradnya.shidore@gmail.com

फोटो जर्नलिस्ट लिंडसी अडारिओ गेली १५ वर्षे युद्धभूमीवरचं छायाचित्रण करते आहे. ती म्हणते की ‘माझं फोटो जर्नलिस्ट म्हणून काम आहे ते, ज्या ठिकाणी युद्ध सुरू नाही अशा जगाला युद्धाची भयावहता दाखवणं. वाचकांना या फोटोमधून तिथलं वास्तव कळायला हवं.’ अशी युद्धभूमी ‘टिपताना’ आत्तापर्यंत तिचं दोनदा अपहरण झालं आहे. पहिल्यांदा २००४ मध्ये इराकमध्ये तर २०११ मध्ये लिबियामध्ये. जगातल्या ५ सर्वोत्तम ‘कॉन्फ्लिक्ट फोटोग्राफर्स’ पैकी एक असणाऱ्या लिंडसीविषयी..

फोटो काढायला किंवा काढून घ्यायला आवडत नाही, अशी माणसं सध्या तरी दुर्मीळच! माझ्या आजीला तिचे फोटो काढलेले अजिबात आवडायचे नाहीत. खूप मिनतवाऱ्या करून ती एखादा फोटो काढायची परवानगी द्यायची. त्यामुळे ती फोटोमध्ये कायम चिडलेली दिसायची. तिचा पहिला प्रश्न असायचा, ‘‘माझं छायाचित्र कोणाला आणि का बघावंसं वाटेल?’’ तिचं म्हणणं, ‘‘माझा कुणी फोटो काढत असेल तर कुणीतरी माझ्यापासून काहीतरी हिरावून नेल्याची भावना निर्माण होते. आपला फोटो आपण तिथे नसताना कोणी पाहणं म्हणजे आपल्या खासगी, जपलेल्या भावना कुणीतरी उघडय़ावर पाडल्यासारखं मला वाटतं. मी तेव्हा, त्या प्रतिमेत जशी दिसते, तशी कायम नसते ना, मग लोकं ही प्रतिमा बघून माझ्याबद्दल चुकीचा ग्रह करून घेतील.’’ ती तिच्या विचाराशी ठाम असायची. त्यामुळे कौटुंबिक फोटोंसाठी तिच्या मनाची खूप तयारी करून घ्यायला लागायची. तिच्या त्या ‘‘सतत फोटो-फोटो नको गं, आत्ता आहोत तसे छान राहू – गप्पा मारू ना.’’ या वाक्यामागे एवढा विचार दडलेला होता. आताच्या भाषेत विचार केला तर तिला ‘मिस-रिप्रेझेंटेशनची’ भीती होती.

माझ्या आजीला अमेरिकी विचारवंत, लेखिका, चित्रपट निर्माती, सुझन सॉंताग यांचं मत नक्की पटलं असतं. सॉंताग यांनी १९७१ मध्ये ‘न्यूयॉर्क रिव्हू ऑफ बुक्स’ या नियतकालिकात एक लेखमाला प्रकाशित केली. यामध्ये त्यांनी छायाचित्रणाला अतिशय वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ‘ऑन फोटोग्राफी’ या पुस्तकामध्ये या विषयावर विस्तृत लेखन केलं आहे. थोडक्यात मांडायचं झालं तर, ‘‘छायाचित्र कधीच संपूर्ण चित्र दाखवत नाहीत; किंबहुना बरंचंस चित्र लपवत असतात. त्यामुळे छायाचित्रांवर अवलंबून राहिलं तर आपल्याला कधीच पूर्ण सत्य कळत नाही, कळतं ते अपुरं, काही मोजक्या लोकांच्या सोयीचं सत्य. त्यामुळे छायाचित्रांकडे बघताना कायम सत्य किंवा वास्तवाचा आग्रह सोडून पाहायला हवं. छायाचित्रापेक्षा ते छायाचित्र कोणी आणि कोणत्या हेतूनं टिपलं आहे हे पाहण्याचा प्रयत्न प्रेक्षकांनी केला तर आपल्याला त्या प्रतिमेमागचं सत्य समजायला मदत होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. सध्याच्या ‘सेल्फी’ आणि ‘इन्स्टाग्राम’च्या दुनियेत, आपल्यावर दर मिनिटाला हजारोंच्या संख्येने धडकणाऱ्या या प्रतिमांचा असा साद्यंत विचार करायला आपल्याला वेळच नाहीए.

‘‘तू छायाचित्रकार का झालीस,’’ असं फोटो जर्नलिस्ट लिंडसी अडारिओला विचारलं असता ती म्हणाली, ‘‘मी छायाचित्र काढते कारण मला जगाला बरंच काही सांगायचं आहे, आपण राहतो त्यापेक्षा अनेक लोक अतिशय विषम परिस्थितीमध्ये कसे जगत असतात, हे  जगाला दाखवायचं आहे. हे सत्य सर्वाना सांगणं महत्त्वाचं आहे, कारण मी सांगितलं नाही, तर त्यांची सुखं-दु:खं, आशा-आकांक्षा जगाला कळणारच नाहीत.’’ लिंडसी म्हणते की तिच्या कामाची सुरुवात ‘माणसं समजून घेण्यापासून’ झाली. छायाचित्रण हे त्याचं एक माध्यम आहे. वयाच्या २३ व्या वर्षी वडिलांकडून काही पैसे उधार घेऊन तिने एक कॅमेरा विकत घेतला आणि तिच्या फोटोग्राफीची सुरुवात झाली. लिंडसी गेली १५ वर्षे युद्धभूमीवरचं छायाचित्रण करते आहे. ती म्हणते की माझं फोटो जर्नलिस्ट म्हणून काम आहे ते, जिथे युद्ध सुरू नाही अशा जगाला युद्धाची भयावहता दाखवणं. आणि तेही अशा प्रकारे की वाचकाला त्याचा भाग बनता येईल. वाचकांनी माझे फोटो बघून ‘अरेरे वाईट झालं’ असं म्हणून किंवा शिसारी येऊन पटकन पान उलटावं, असं मला अजिबात वाटत नाही. वाचकांना या फोटोमधून तिथलं वास्तव कळावं, असं मला वाटतं. त्यामुळेच तिने काढलेली अफगाणिस्तानमधल्या शाळेत जाणाऱ्या मुली किंवा तिथल्या रोजच्या आयुष्यातील घडामोडींची छायाचित्रं वाचकांच्या मनात कायमची ठसतात, आणि साहजिकच ते जग लांबचं कुठलं तरी न राहता प्रत्येकाला ‘आपलं’ जग वाटतं. सध्या लिंडसी जगातल्या ५ सर्वोत्तम ‘कॉन्फ्लिक्ट फोटोग्राफर्स’पैकी एक गणली जाते. २००९ मध्ये तिला अफगाणिस्तानमधील युद्धामुळे तेथील स्त्रियांवर झालेल्या परिणामांचं छायाचित्रण करण्यासाठी ‘मॅकार्थर शिष्यवृत्ती’ मिळाली होती. त्याच वर्षी पाकिस्तानातील वजिरीस्तानमधल्या तिच्या कामासाठी तिला ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या पत्रकारांबरोबर ‘पुलित्झर’ पारितोषिकही मिळालं होतं.

२००९ ते २०११ ही दोन वर्षे ती आणि लेखिका सारा कोर्बेट या दोघी ‘नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकातर्फे ‘भारतातील पाऊस’ या विषयावरचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात आल्या होत्या. त्या दोघींबरोबर मी लिंडसीची साहाय्यक म्हणून काम करत होते. आमच्याबरोबर महाराष्ट्रातला ग्रामीण भाग, दुष्काळ, पाणी या विषयाच्या तज्ज्ञ म्हणून विनिता ताटकेही होत्या. लिंडसी पहाटे ५ ते दुपारी ११ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ७ या वेळेत महाराष्ट्रातल्या विविध भागांमधली ‘दुष्काळ’भूमी टिपायची. आठवडा झाल्यावर मला पूर्ण थकलेली बघून ती हसत म्हणाली होती, ‘‘आणि मला सुट्टीवर आल्यासारखं वाटतंय!’’ महाराष्ट्रातला दुष्काळ, शेतीचे प्रश्न या विषयी बोलताना अर्थातच विषय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आला. त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्येही त्याची जोरदार चर्चा सुरू होतीच. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्येही बातम्या येत होत्या. त्यामुळे लिंडसीच्या फार विचित्र मागणीला आम्हाला सामोरे जावे लागले. तिला अशा घरी जायचं होतं, ज्यांच्या घरातल्या शेतकऱ्याने नुकतीच आत्महत्या केली आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे ‘‘जर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या प्रेतयात्रेला जाता आलं तर सर्वात उत्तम!’’ तिचं म्हणणं एका अर्थी खूप खरं होतं, ती एक पत्रकार-छायाचित्रकार म्हणून या घटनेकडे तिऱ्हाईतासारखी बघू शकत होती. या ‘वॉर फोटोग्राफर’ला मृत्यू नवीन नव्हता. पण आम्हाला ही मागणी चक्रावून टाकणारी वाटली.  तिने मला स्षष्टच सांगितलं, ‘‘तुला जमणार नसेल लोकांना विचारायला तर सोडून दे. यामुळे कदाचित आपल्याला आपल्या लेखातल्या सर्वात बोलक्या छायाचित्राला मुकावं लागेल आणि तुला खरी गोष्ट लोकांपुढे कधीच ठेवता येणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे तुझं मन तुला कायम खात राहील हेही लक्षात ठेव’’. तिच्या म्हणण्यानुसार ‘खऱ्या पत्रकाराने एकदा कॅमेरा गळ्यात अडकवला की त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊनही त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहायचं असतं.’ सुदान, अफगाणिस्तानमधल्या युद्धांमध्ये काम केलेल्या या छायाचित्रकाराची ही वाक्यं. या तिच्या मागणीमुळे माणुसकी आणि कार्यतत्परता याबद्दलचं माझ्या मनातलं द्वंद्व काही त्यावेळी मिटलं नसलं तरी आम्हाला आमच्या लेखासाठी सर्वात बोलकं छायाचित्र मात्र मिळालं.

२०१५ मध्ये ‘वर्ल्ड प्रेस फोटो फाऊंडेशन’तर्फे एक पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार जगातील सर्व ‘छायाचित्र पत्रकारांपैकी (फोटो जर्नलिस्ट) केवळ १५ टक्के स्त्रिया आहेत. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कामाची ठिकाणं. कुठे युद्धासारखं मानवनिर्मित संकट तर कुठे नैसर्गिक संकटं उभी. हे सगळं सांभाळत काम करण्याची हिंमत अजून तरी खूप कमी स्त्रिया दाखवताना दिसतात. याबरोबरच, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी एक स्त्री असल्यामुळे अनेक वेळा संधी डावलल्या जातात, असंही या पाहणीमध्ये मांडलं आहे. पण लिंडसीचा अनुभव थोडं वेगळं सांगतो. ती म्हणते की मी एक स्त्री असल्यानेच माझ्यासाठी अनेक संधी निर्माण होतात. या विषयी तिनं तिचं पुस्तक, ‘इट्स व्हॉट आय डू – अ फोटोग्राफर्स लाईफ ऑफ लव्ह अँड वॉर’ यामध्ये बरंच काही लिहिलं आहे. त्यामधला तिचा एक अनुभव खूपच बोलका आहे. २००८ मध्ये ‘तालिबान’ या विषयावर काम करत असताना, त्यांना तालिबानचा कमांडर हाजी नामदार याला भेटायची संधी मिळाली. त्यांची अट एकच होती, की ते कोणत्याही अन्य बाईला भेटणार नाहीत. म्हणून लिंडसी तिचा ‘न्यूयॉर्क टाईम्स’मधला सहकारी पत्रकार डेक्सटर फिल्कीन्सची पत्नी बनून त्या ताफ्यात सामील झाली. तिच्याकडे कॅमेरा असणं हा केवळ योगायोग आहे, असं सांगण्यात आलं होतं. त्या प्रसंगात लिंडसीचं केवळ असणं हीच मोठी गोष्ट होती. या प्रसंगाची तिची छायाचित्रंही हेच सांगत होती. या ‘स्टोरी’साठी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या टीमला ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळाला होता.

लिंडसी सांगते की अमेरिकेसारख्या देशात जन्मल्यामुळे मला अणि माझ्यासारख्या अनेकांना, बऱ्याच गोष्टी या आपसूकच मिळत गेल्या. डोक्यावरचं छप्पर, पोषक अन्न, काही किमान दर्जाचं शिक्षण, नोकरीची संधी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या आयुष्याबद्दल स्वत: निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य! पण आज जगात असे अनेक लोक आहेत की जे पराकोटीचा अन्याय सहन करत आहेत. मुख्य म्हणजे आज जगातल्या अर्ध्याहून अधिक स्त्रिया अशा आहेत, ज्यांना यापैकी एकही गोष्ट हवी असेल तर त्यांना पराकोटीचे कष्ट घ्यावे लागतात. युद्ध असो की इतर कोणतंही संकट, तिथल्या स्त्रिया आणि लहान मुलांना त्याचा फटका सगळ्यात आधी बसतो. एक स्त्री असल्याने मला इतर स्त्रियांशी बोलण्याची संधी सहज मिळते. म्हणूनच मला माझ्या कामाच्या माध्यमातून अशा स्त्रियांना मदत करायची आहे.

१८ वर्षे युद्ध ‘टिपल्या’वरही ‘मी मानवतेबद्दल आशावादीच आहे.’ असं ती म्हणते. आज जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे. तिथले लोक रोज तोफांचा आवाज ऐकत जगतात तरीही भविष्याबद्दल आशावादी आहेत, तर मी का निराश होऊ ? तो हक्कच मला नाही. माझं काम आहे ते या युद्धात होरपळलेल्या लोकांचा आशावाद इतर जगातील लोकांसमोर ठेवणं. म्हणूनच वैयक्तिक आयुष्यातील टीकेकडे ती दुर्लक्ष करते. ती म्हणते की ‘एक पत्नी म्हणून मी चांगली नाही, एक आई म्हणून माझ्या मुलांना मी वेळ देत नाही,’ वगैरे टोमणे मी ऐकले आहेत. माझं आयुष्य कसं जगावं हे मला सांगण्याचा अधिकार त्यांना आहे, असं या लोकांना वाटतं याचं मात्र मला हसू येतं.

युद्धभूमी ‘टिपताना’ आत्तापर्यंत एकदा नाही तर दोन वेळा तिचं अपहरण झालं आहे! पहिल्यांदा २००४ मध्ये इराकमध्ये तर २०११ मध्ये लिबियामध्ये. ती म्हणते, की ‘कॉन्फ्लिक्ट फोटोग्राफर्स’ वा जगातले विविध संघर्ष टिपणारे हे फोटोग्राफर जणू अधाशी असतात आणि म्हणूनच ते जगाला वास्तव दाखवू शकतात. हे वास्तव दाखवण्याच्या गडबडीत तिथल्या स्थानिकांचा रोष ओढवून घेतात. २०११ मध्ये लिबिया ‘कव्हर’ करतानाही असंच काहीसं झालं असावं, असं तिला वाटतं. म्हणूनच तिला आणि तिच्या बरोबरच्या ४ पत्रकारांना गद्दाफीच्या गुंडांनी ताब्यात घेतलं. त्यातला एक पत्रकार मारला गेला. पण लिंडसी काही दिवसांनी त्यांच्या तावडीतून सोडवली गेली.

मागच्या वर्षी लिंडसी काही कामानिमित्त पुण्यात आली होती, तेव्हा तिला भेटायचा पुन्हा योग आला. त्या आठवडाभरात, अपहरण झाल्यावर तुला काय-काय वाटलं, असं विचारता ती म्हणाली, ‘‘एकदा अशी वेळ आली जेव्हा मला वाटलं की मी आता यातून वाचणार नाही. तेव्हा मी आजवर केलेल्या कामांची यादी डोळ्यासमोर आणली. एवढय़ा वर्षांत मला भेटलेल्या, युद्धाला तोंड देत आशावाद जपणाऱ्या अनेक स्त्रिया आठवल्या. त्यांच्या तुलनेत माझ्यावर काहीच अत्याचार झालेले नाहीत, असं मी स्वत:ला सांगितलं आणि माझी समजूत काढली. त्याही परिस्थितीत आशावादी असण्याचं आणखी एक कारण होतं, माझं नुकतंच लग्न झालं होतं, आणि मला हे पक्कं माहीत होतं की मला मूल हवं आहे. आणि आई झाल्याशिवाय मी काही मरणार नाही’’

आपण स्वत: जगतो की मरतो, हे माहीत नसताना, त्या युद्धभूमीवर नवनिर्मितीची आस ठेवून, जगण्यासाठी जिद्द गोळा करणारी लिंडसी.. जगभरातल्या अनेक स्त्री छायाचित्र-पत्रकारांना प्रेरणा देणारी!

जगभरातील स्त्रिया विविध क्षेत्रात मोठी कामगिरी बजावू लागल्या, यश मिळवू लागल्या, अधिकार पदावर पोहोचल्या..

या गोष्टीलाही साधारण १०० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. याचे पडसाद आपल्या समाजात नक्कीच पडले आहेत. बदल घडण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. त्याचा नेमका परिणाम प्रत्येक क्षेत्रात कसा होत गेला आणि कसा होत आहे, राज्यात, देशात आणि परदेशात.. ‘यत्र तत्र सर्वत्र’ संचार करणाऱ्या या स्त्रीशक्तीमुळे स्त्रीच्या जगण्यात आणि समाजात नेमके काय बदल झाले, स्त्री- पुरुष या भेदाऐवजी माणूसपणाच्या दिशेने आपण जाणार आहोत का, याचा उहापोह करणारं सदर दर पंधरवडय़ाने.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:05 am

Web Title: photojournalist lyndsey addario yatra tatra sarvatra chaturang abn 97
Next Stories
1 गद्धे पंचविशी : माणूस शिकण्याचे वेड
2 #फोबो निर्णयपंगुत्व?
3 गर्जा मराठीचा जयजयकार : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
Just Now!
X