उमा बापट – umaajitbapat@gmail.com

आपल्या आयुष्यातले बदल बरोबर ‘यूझर मॅन्युअल’ घेऊन येत नाहीत. बदल घडल्यानंतर ‘इंटर्नशिप’ करून थोडी तयारी करायलाही अनेकदा वेळ नसतो. मात्र आधीपासूनच नियोजन करून पूर्वतयारी करण्याची सवय अंगी बाणवली तर कोणत्याही बदलाला सामोरं जाताना आवश्यक असलेली पूर्वसज्जता नक्की साध्य करता येते.

‘‘मला बाळ होईपर्यंत मी कोणतंही तान्हं बाळ कधीही हातात घेतलं नव्हतं. रोहितला मात्र त्याची सवय होती. त्यानं बहिणीच्या बाळंतपणात त्याच्या आईला आपणहून मदत केली होती. त्यामुळे तो अजिबात घाबरत नाही आमच्या बाळाला घ्यायला.’’ नुकतीच आई झालेली रश्मी मैत्रिणीला सांगत होती. बाळांना खायला द्यायला भाताची पेज कशी बनवायची हेसुद्धा नवीन पालकांना हल्ली सांगावं लागतं, एक डॉक्टर मैत्रीण तिचा अनुभव सांगत होती.

आज बारावीनंतरच्या शिक्षणाची पूर्वतयारी आठवी-नववीपासूनच सुरू होते.  महाविद्यालयीन शिक्षण आणि दैनंदिन जगणं असे भिन्न कप्पे काहींनी करून टाकले आहेत. अभियांत्रिकीचं शिक्षण घेताना जे वाहन वरुण वापरतो त्याची काळजी घ्यायला वरुणचे वडीलच तत्पर राहिले. मनालीची परीक्षा जवळ आली असेल तर आजीची औषधं आणायला तिला वेळ होणार नाही, हे तिच्या घरानं मान्य करून टाकलं आहे. जीवन शिक्षणाचे अनुभव देणं वरुण आणि मनालीसारख्या काही घरांतून दुय्यम झालं. मनाली आणि वरुणची आयुष्यातली पुढची अवस्था जगण्यासाठी आवश्यक अशी पूर्वतयारी राहून गेली का?  शिक्षणासाठी आर्थिक नियोजन तर त्यांच्या पालकांनी प्राधान्यानं केलं, पण त्याचबरोबर जबाबदार माणूस म्हणून जगायला काही सवयी वेळच्या वेळी लागल्याचा फायदा असतो. मनाली आणि वरुणचे आई-बाबा लहानपणी ज्या कुटुंबात वाढले त्या काळी मनुष्य घडणीच्या संस्कारांची सहजता रोजच्या जगण्यातच होती. आपल्या नव्या पद्धतीच्या कुटुंबात ही रचना निसटून गेली, हे त्यांना कदाचित जाणवलं नसेल.

जसं शाळेतली आधीची इयत्ता ही पुढच्या इयत्तेची एका अर्थानं पूर्वतयारी असते, तसं आयुष्यात नवा टप्पा सुरू होण्यापूर्वी त्याबाबत शारीरिक, मानसिक, वैचारिक, सामाजिक, जेव्हा लागणार असेल तेव्हा आर्थिक नियोजन आणि पूर्वतयारी केल्याचा सकारात्मक परिणाम तो टप्पा पूर्णार्थानं जगताना होऊ शकतो. जी मुलं छोटय़ा कुटुंबात वाढली, एखादं भावडं, किंवा कधी एकुलती एक म्हणून ती घरात एकेकटी खेळली. नातेवाईक, विस्तारित कुटुंबं फारशी जवळपास नव्हती, त्यामुळे कुणी पाळणाघरात, तर कुणी सांभाळणाऱ्या मावशींबरोबर मोठी झाली. शाळा, छंदवर्ग, शिकवण्या, स्पर्धा अशा चाकोरीत आणि धावपळीच्या विश्वात वावरली. माझी खोली, माझा अभ्यास, माझ्या मित्रमैत्रिणी अशी ज्यांची वर्तुळं ‘मी’भोवती फिरली, अशी काही मुलं आता पालक झाली. स्वाभाविकपणे गृहस्थी सांभाळताना काहीशी गोंधळली. एक चक्र पूर्ण झालं. आता चाक उलटं फिरवणं तर शक्य नाही.

वरच्या उदाहरणातल्या रश्मीनं स्वत:शीच विचार केला, ‘‘मी जर आमच्या घरात कधी लहान बाळ अनुभवलंच नाही, तर त्यात माझी चूक काय? मूल नावाच्या अद्भुत निर्मितीच्या वेळी ना लिखित पुस्तक (‘मॅन्युअल’) हाती येतं, ना माणसाच्या आयुष्यातल्या पुढच्या टप्प्याची तयारी करून घेताना कुणी प्रात्यक्षिक परीक्षेचा सराव घेतं. मला आठवतं, मी लहान असताना मावशीला बाळ झालं. आई जायची तिच्या मदतीला. पण नातेवाईकांकडे जाण्यासाठी माझा कोणताच शिकवणीचा वर्ग तिनं मला कधी चुकवू दिला नाही. सुटीच्या दिवशी बाबा माझी विज्ञान स्पर्धेची तयारी करून घायचा. ते सगळं आवडायचं मला, पण आता जाणवतं की काही गोष्टी सुटून गेल्या. मी काय करू शकते आता माझं मूल वाढवताना?, आई म्हणून नव्यानं शिकताना?,’’ रश्मीचा विचार सुरू झाला. अभ्यासू आणि नियोजन आवडणारी रश्मी स्वत:शीच पुटपुटली, ‘‘पूर्वतयारी!’’ तिला एकदम नवीन दालन खुलं झाल्यासारखं वाटलं. सुरुवातीला स्वत:चं बाळ घ्यायला बिचकलेली रश्मी पुढे मात्र डगमगली नाही. मुलाला खायला देण्यासाठी नवीन पदार्थ शिकण्यापासून, चांगली गोष्टीची पुस्तकं शोधणं, शाळेत घालायच्या पुरेसं आधी शाळांबाबत स्वत:ची जागरूकता वाढवणं अशा अनेक गोष्टी ती करू लागली. त्यासाठी अनेक लोक तिच्या मदतीला आले. कधी तिच्या मुलापेक्षा दोन-तीन र्वष मोठी मुलं असलेले  शेजारीपाजारी, तर कधी अगदी तिच्या शाळेतली कित्येक वर्षांत न भेटलेली मैत्रीण, कधी वर्तमानपत्रातले लेख, इंटरनेटवरची माहिती, तर कधी पालक कार्यशाळा. या सगळ्यामुळे जणू तिनं तिच्या ‘पालक’ या भूमिकेचा पाया स्वत: रचला. आवश्यक ते नियोजन करून वेळेत पुरेशी तयार राहिले तर येईल त्या परिस्थितीला मी तोंड देऊ शकते, हा विश्वास तिला कायम साथ देत राहिला.  मुलाला वाढवताना त्याचा अभ्यास आणि घरातल्या कामांत त्याचा योग्य तो सहभाग हे एकमेकाला धरून राहील असा सर्वतोपरी प्रयत्न ती करत गेली. शालेय यशाइतकंच नातेवाईकांशी संबंध जोडण्याचं मोल आपल्या वागण्यातून तिनं मुलापर्यंत पोहोचवलं.

वेगवेगळ्या वयात आणि वेगवेगळया भूमिकेत नियोजन आणि पूर्वतयारीच्या बहुविध छटा बघायला मिळतात. शशांकला घरचे सारखे विचारायचे, ‘‘तू कुणी मुलगी पसंत केली आहेस का?’’ तो नाही म्हणायचा. घरच्यांचं म्हणणं होतं, की आम्ही तुझ्यासाठी मुलगी शोधतो. त्याला तर तो मुळीच तयार नसायचा. ‘मी लग्न करायला अजून तयार नाही,’ एवढंच त्याचं म्हणणं असायचं. शेवटी विवाहपूर्व समुपदेशनाची मदत घेतल्यानं शशांक नेमकेपणे विचार मांडू शकला. समीरचा लहान भाऊ चेतन छोटा असताना त्याला बारीकसारीक गोष्टींत सल्ला विचारायचा. त्याच्या मागे-मागे असायचा. बघता-बघता चेतन मोठा झाला. आपला अभ्यास कसा सांभाळायचा, आईशी वाद झाला तर कसं जुळवून घ्यायचं, हे तो स्वत:चं स्वत: निस्तरू लागला. समीरला हा बदल पचायला वेळ लागला. चेतन मोठा होताना आपलं नातं आता बदलेल, याचा अंदाज बांधायला जणू समीरची पूर्वतयारी अपुरी पडली. महेश हा विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक. मुलांच्या शंका तो नक्की सोडवू शकायचा. पण जसजसं इंटरनेट, पुस्तकांची उपलब्धी वाढत गेली, तसतशी वर्गातली काही मुलं बराच पुढचा अभ्यास करून महेशच्याही कल्पनेपलीकडचे प्रश्न विचारू लागली. मुलांच्या वाचनाचा वेग ज्या गतीनं वाढेल तसं आपण सज्ज राहिलं पाहिजे, हे महेशला लवकरच उमगलं.

मानसशास्त्रात सज्जता (‘रेडीनेस’) अशी एक संकल्पना आहे. विकास होताना व्यक्तीची त्यासाठीची सज्जता ही ‘पूर्वआवश्यकता’ असते. ही सज्जता मानसिक, शारीरिक, आर्थिक वेगवेगळी असू शकते. सज्जतेचं नियोजन आणि पूर्वतयारी याचा परस्पर संबंध आहे. धाकटं भावंडं होण्याआधी पाच वर्षांचा अद्वय सुटवंग होईल यासाठी विकासनं पूर्वतयारी केली. अद्वयच्या खोलीची रचना त्याला वस्तू सहज घेता येतील असं नियोजन करून बदलली. आई दवाखान्यात जाईल, छोटं बाळ आपल्या घरात येईल, अद्वय तेव्हा कसं गाणं म्हणू शकतो, चित्र काढू शकतो, अशी कल्पना देत घरात होणाऱ्या स्थित्यंतरासाठी अद्वयच्या मानसिक सज्जतेला सुरुवात केली. पृथा आठवीपासून सायकलवरून शाळेत जाणार असं घरात ठरल्यावर पूर्वतयारी नि सराव म्हणून सातवीच्या शेवटी आठवडय़ातून एकदा ती सायकलवरून शाळेत जायला लागली. अशी कौशल्यांची सज्जतापण गरजेची असते.

घरातल्या सगळ्यांचे बाहेरचे व्याप बघता बघता वाढत गेले. आता इच्छा असली तरी बागकाम, बाजारहाट करायला हाताशी कोणी नसणार हे वेळीच ओळखून शैलानं घरी कामाला येणाऱ्या राधाबाईंच्या बंडय़ाला योग्य तो पगार देऊन मदतीला बोलवायला सुरुवात केली. एकटीनं सगळं ओढलं की विनाकारण चिडचिड होण्याआधीच शैला ते नियोजनामुळे टाळू शकली. श्रीधरनं निवृत्तीआधी एका अनाथाश्रमात स्वयंसेवी काम कसं करता येईल यासाठी भेट देऊन तयारी सुरू केली. प्रमिलानं स्वयंपाकघर ही अनेक र्वष कर्मभूमी मानली, पण सून येणार म्हटल्यावर तिच्याच स्वयंपाकघरात अलिप्तपणानं वावरायचा सराव ती मुलाच्या लग्नाआधीपासून जाणीवपूर्वक करू लागली. जीवनाच्या रंगभूमीवर उत्तम भूमिका निभावताना नियोजनानं केलेली पूर्वतयारी तर हवीच!

तरुण वयात आर्थिक गुंतवणूक, तर उतारवयात गरजा कमी करून वार्धक्यातल्या पैशांची तजवीज. कधी शरीर कमवून तंदुरुस्ती, तर नंतर वेळीच पथ्य पाळून आरोग्य राखण्यातली सावधानता. उमेदीत प्रयत्नांची शिकस्त करून गाठलेलं यश ही व्यावसायिक बेगमी, तर कुठे थांबायचं हे नेमकं उमगून आवरतं घेतलेलं कार्यक्षेत्र. बदलत्या अवस्थेत अविरत येणाऱ्या नव्या आव्हानांसाठी नियोजित पूर्वतयारीचा ओवूया पक्का धागा निरामय घरटय़ाच्या विणीत!