|| सिद्धी महाजन

प्लॅस्टिक सूप. अर्थात फेकून दिलेल्या प्लॅस्टिकमुळे होणारं समुद्राचं प्रदूषण.  समुद्री परिसंस्थेचा जीव हळूहळू गुदमरवून टाकत पर्यावरणाचा समतोल ढासळण्यासाठी ते कारणीभूत होतं. हे प्लॅस्टिक सूप समुद्री जीव, वनस्पती यांचा श्वास कोंडून टाकतं. लिली प्लॅट या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला प्लॅस्टिकचा हा भस्मासुर खुपायला लागला आणि त्यातून प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा, पुनर्वापर वाढावा, यासाठी या युवा दूतानं चळवळच सुरू केली. त्याविषयी..         

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?
Have you been drinking water from a plastic bottle
पाणी नव्हे, तुम्ही प्लास्टिक पिताय! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी हानिकारक; संशोधनातून धक्कादायक माहिती स्पष्ट

गोष्ट आहे २०१४ मधली. नेदरलँड म्हणजेच डच लोकांच्या देशातली. गोष्ट लहानग्या लिली प्लॅट हिची आणि तिच्या आजोबांची. जेमतेम सहा वर्षांची ती छोटी मुलगी आजोबांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असे.  एकदा ही आजोबा-नातीची जोडगोळी रस्त्यावरून चालली होती. चालता-बोलता आजोबांना नातीकडून अंकमोजणी करून घेण्याची हुक्की आली. मात्र मोजायचं काय?

‘‘आपण मोजायचंय रस्त्यावर, इकडेतिकडे पडलेलं प्लॅस्टिक.’’ आजोबा उद्गारले.

मग अंकमोजणीला सुरुवात झाली. त्यांनी प्लॅस्टिकची मोजदाद करायला सुरुवात केली. मोजण्याबरोबर ते प्लॅस्टिक उचलतही होते. दहा-पंधरा मिनिटं चालल्यावर त्यांनी एकूण मोजलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा आकडा पडताळून बघितला, तो काय, दहा मिनिटांच्या रस्त्यावर इतस्तत: पडलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा आकडा तब्बल ९१ एवढा भरला होता.

‘‘आजोबा, एवढं प्लॅस्टिक येतं तरी कुठून आणि जातं तरी कुठे?’’ लहानग्या लिलीनं बालसुलभ कुतूहलानं विचारलं.

‘‘ते येतं तुझ्या-माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून. अन् ते कुठेही जात नाही बाळ, इथे आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गातच साचून राहातं.’’ आजोबांनी सांगितलं.

‘‘मग इतक्या वर्षांत त्याचा इथे भला मोठ्ठा डोंगर दिसायला हवा होता. ते अदृश्य झालं की काय?’’ लिलीनं विचारलं.

‘‘अदृश्य नाही काही! जमिनीवर जे काही प्लॅस्टिक फेकून देण्यात येतं, ते शेवटी समुद्रच पोटात घेतो. या प्रक्रियेला काही दिवस, काही महिने किंवा काही वर्ष लागू शकतील, पण अंतिमत: त्याचं बनतं प्लॅस्टिक सूप! आणि हे सूप खाण्यायोग्यच काय, बनवण्याच्याही लायकीचं नसतं!’’

‘‘ प्लॅस्टिक सूप?’’

छोटय़ा लिलीच्या कानात हा शब्द बराच वेळ ऐकू  येत राहिला. आजोबांकडून अधिक माहिती जाणून घेताना तिला ‘प्लॅस्टिक सूप’ म्हणजे नक्की काय ते समजलं. प्लॅस्टिक सूप म्हणजे फेकून दिलेल्या प्लॅस्टिकमुळे होणारं समुद्राचं प्रदूषण. चार्ल्स मूर या समुद्रशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका नाविकानं ही संज्ञा रूढ केली. अगदी सगळं प्लॅस्टिक यात येतं. मासेमारी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिक जाळ्यांपासून ते सूर्यप्रकाशामुळे विघटित होत जलस्त्रोतांसाठी हानिकारक बनणाऱ्या प्लॅस्टिकच्या कणांपर्यंत सर्व प्रकारचं प्लॅस्टिक हे प्लॅस्टिक सूप तयार होण्यासाठी कारणीभूत ठरतं. हे प्लॅस्टिक सूप समुद्री जीव, वनस्पती यांचा श्वास कोंडून टाकतं. समुद्री परिसंस्थेचा जीव हळूहळू गुदमरवून टाकत पर्यावरणाचा समतोल ढासळण्यासाठी कारणीभूत होतं. जागोजागी विखुरलेलं प्लॅस्टिक प्राण्यांना अन्नासमान भासल्यामुळे भुकेलेले प्राणी ते खातात. त्याचे भयंकर परिणाम त्यांच्या शरीरावर अन् शेवटी मिश्राहारी माणसांवरही होतात.

हे जाणून घेतानाही तिच्या छोटय़ाशा जीवाला वेदना होत होत्या. तेव्हापासून लिलीनं स्वत:ला एकच छंद लावून घेतला. हाती बाहुल्या आणि  खेळणी न घेता, प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी पिशवी धरली, ग्लोव्हज् चढवले. वयाच्या सातव्या वर्षी जिकडेतिकडे पडलेलं प्लॅस्टिक गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी तिनं एका मोहिमेला सुरुवात केली, जिचं नाव होतं, ‘लिलीज् प्लॅस्टिक पिकअप’. या मोहिमेतर्गत जागोजागी फेकून दिलेलं प्लॅस्टिक ती उचलू लागली. त्याचं योग्य ते वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करू लागली. आज लिलीनं अशा प्रकारे इकडेतिकडे फेकून दिलेल्या एक लाख प्लॅस्टिकच्या वस्तू गोळा केल्या आहेत आणि त्या पुनप्र्रक्रिया करण्यासाठी केंद्रात जमा केल्या आहेत. ती प्लॅस्टिकचा वापर कमी करून पर्यावरण संरक्षण करण्याचा धडा थेट आपल्या कृतीतूनच देते. ठिकठिकाणी साचलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याची छायाचित्रं टिपून तिनं ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून लोकांसमोर ठेवली. अनेक शेतकऱ्यांनी तिला पत्रं पाठवली, ज्यात त्यांनी प्लॅस्टिक खाऊन प्राण गमावलेल्या त्यांच्या गुरांच्या कहाण्या तिच्यासमोर मांडल्या होत्या. तर काही लोकांनी तिला डार्विनचे नियम ऐकवले. त्यांच्या मताप्रमाणे जे प्राणी जगण्यासाठी योग्य आहेत, जे प्राणी प्लॅस्टिकला अन्न समजून खात नाहीत, तेच या निसर्गाच्या रहाटगाडग्यात टिकून राहातात.

‘‘मानवनिर्मित आपत्तीजनक गोष्टीसाठी निसर्गाला आणि त्याच्या नियमांना वेठीस धरणं अजिबात योग्य नाही.’’ लिली अशांना ठासून सांगते. ‘‘एकदा एखादी गोष्ट आपल्या रोजच्या जगण्यातील सवयींमध्ये बाधा आणते, असं आढळल्यास मानवाला तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली आहे. पण त्याच्या मानवनिर्मित वस्तूंनी सजलेल्या बाह्य़ आवरणात, त्याच्या रक्तमांसाने बनलेल्या मानवी शरीरात, निसर्गातील पदार्थानी बनलेलं अन् त्यावर पोषण झालेलं एक हिरवं हृदय वसलं आहे, हे त्यानं लक्षात घेतलं पाहिजे.’’

प्लॅस्टिक निर्मूलनासाठीच्या कामाची दखल घेऊन ‘प्लॅस्टिक पॉल्युशन कोएलिशन’ या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या समूहानं लिली प्लॅट हिला जागतिक युवा दूत म्हणून घोषित केलं. हा समूह प्लॅस्टिक प्रदूषण हटवण्यासाठी काम करणाऱ्या तब्बल ७५ देशांतील १२०० हून अधिक संस्था, व्यावसायिक, विचारवंत आणि नेते यांनी बनला आहे. २०१९ मधील ‘आंतरराष्ट्रीय इको हिरो अवॉर्ड’ही तिला प्रदान करण्यात आला.

सप्टेंबर २०१९ मध्ये, लिलीच्या पर्यावरण संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीच्या विरोधात स्वीडिश संसदेच्या बाहेर ग्रेटा थनबर्गनं केलेला निषेध तिनं पाहिला. त्यातून तिला प्रेरणा मिळाली आणि तिनंही शाळेत न जाता ग्रेटाबरोबर संपावर जाण्याचा निर्णय घेतला. युरोपियन युनियनमधील हरित वायूचा सर्वात मोठा उत्सर्जक म्हणून नेदरलँडस् हा देश ओळखला जातो. आक्र्टिक प्रदेशात वेगानं वितळणाऱ्या बर्फामुळे वाढणाऱ्या समुद्रपातळीचा फटका या देशाला बसतो आहे. त्यामुळे इथे जागृती निर्माण करण्याचं महत्त्व ओळखून ग्रेटा थनबर्गही लिली प्लॅटच्या नेदरलँडस्मधील संपात सामील झाली. या दोघींनाही ब्रुसेल्समध्ये आमंत्रित केलं गेलं, जिथे त्या युरोपियन संसदेच्या बाहेर हवामान बदलावर काढल्या गेलेल्या रॅलीत सहभागी झाल्या. तेव्हापासून लिली प्लॅट दर शुक्रवारी वातावरण बदलाच्या संकटाविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी आणि सरकारच्या धोरणांविरोधात निदर्शनं करण्यासाठी सरकारी आस्थापनांच्या बाहेर संप करते, धरणं धरते. कधी कुणी सोबती मिळाले तर, नाहीतर एकटय़ानंच ती ही जबाबदारी पार पाडत असते. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ‘वर्ल्ड यूथ फोरम’मध्ये इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी लिलीचा सन्मान केला. डॉ. जेन गुडॉल यांच्यासमवेत या परिषदेतील एका चर्चासत्रातही तिनं भाग घेतला होता.

थोडाफार अभ्यास करताच, वर्षांनुवर्ष निसर्गातून संतुलन साधल्या गेलेल्या जैवसाखळीत एक प्लॅस्टिकचा कणही कसा हाहाकार माजवू शकतो, हे तिच्या चांगलंच ध्यानात आलं. समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या आणि एका हॉट एअर बलूनमध्ये गुरफटल्या गेलेल्या एका माशाला पाहून मनात कणव दाटून आली आणि तिनं बलूनच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी पालिकेचा सतत पाठपुरावा केला. पण हे घडवून आणताना पर्यावरण संवर्धनासाठी जनमानसात असलेल्या अनास्थेचा पावलोपावली अनुभव तिला येत गेला. केवळ स्थानिक स्तरावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा असे अनुभव तिला आले. युरोपियन संसदेनं हवामान संकटावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग येथे परिषद आयोजित केली होती. तिथे सहभागी सदस्यांसाठी ७५१ जागा राखीव ठेवल्या गेल्या होत्या. पण ऐनवेळी मात्र केवळ २८ राजकारण्यांनी तिथे आपली उपस्थिती दाखवली. त्यातील फक्त तीनच राजकारण्यांनी लिली आणि इतर छोटय़ा मंडळींचं म्हणणं ऐकलं. ‘‘आपल्याकडे ‘प्लॅनेट बी’ नाहीये. आपल्याकडे आहे, ती ही एकुलती एक पृथ्वी, जिच्यावर आढळणारं वातावरण विश्वात अन्य कुठे सापडेल याची खात्री नसताना आपण किती बेजबाबदारपणे तिच्यावर आढळणाऱ्या नैसर्गिक स्त्रोतांचा उपभोग घेत आहोत..’’ लिली तिच्या अनेक कार्यक्रमांमधून हे सत्य कळकळीनं सांगू पाहाते. तिची ‘क्लीन अप’ मोहीम आता जगभरातील २७ देशांपर्यंत पोहोचली आहे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तिनं स्वत:चे ‘प्लॅस्टिक पिकअप बांबू सेट’  विकसित केलेत. नॉर्वे येथे प्लॅस्टिक व्हेल परिषदेला हजेरी लावण्यासाठी, प्लॅस्टिक प्रदूषणाबद्दल राजकारण्यांशी विचारविनिमय करण्यासाठी तिनं जगभर प्रवास केला. अनेक देश पालथे घातले. समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी हातभार लावला. म्हणूनच तरुणाईला मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी तिनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत लिलीच्या आजोबांनी एक मत तिला ‘भेट’ दिलं आणि एक अनोखा पायंडा पडला. जगातील अधिकांश निर्णयप्रक्रिया जुन्या पिढीच्या हातात आहे, जे आपल्या वर्षांनुवर्ष रुजलेल्या कल्पनांपासून दूर जाण्यास नाखूश आहेत. बदलण्यास तयार नाहीत. भविष्य त्या तरुण पिढीचं आहे, ज्यांच्यासाठी ते घडणार आहे अन् जे ते उपभोगणार आहेत. त्यांच्या हाती निर्णय घेण्याची क्षमता सोपवल्यास साऱ्यांना आपली जबाबदारी खऱ्या अर्थानं समजून येईल. म्हणूनच हा छोटासा बदल सर्वात महत्त्वाचा आहे. बदलातूनच नवं भान जागवलं पाहिजे, तरच अंकमोजणी शिकताना आजूबाजूच्या समस्यांकडे डोळसपणे पाहणाऱ्या अनेक लिली तयार होतील.. बदलाला सुरुवात करतील!

उद्याच्या सुरक्षित आणि स्वच्छ पर्यावरणाची ही नांदी असेल!

snmhjn33@gmail.com