‘‘आज बी बुत्ती बांदली आन् दगुड फोडाया निघाले. आमी सा म्हयनं घराभायर. मंग साळा नाय काय नाय. पोरंबी अशीच वाऱ्यावर! आमच्या बंजारा समाजातले पुरुष बी दगुडच फोडत्यात. रात्री दारू ढोसत्यात आन् आमाला मारमार मारत्यात. रोज भांडाण! रोज तमाशा! गरोदरपणात बी बाळात होईस्तवर दगुड फोडायचं.’’ लमाण समाजातील चांदुबाईचं हे दगडाचंच जिणं.

आ ज आमुशाचा दिवस! दर म्हयन्याला अमुशा येती. तो आमचा सनाचा दिवस! पहाटं चारला उठली. चूल पेटवली. आमच्या पालाच्या भायेर बक्कळ जागा हाये तिथं! चुलीवर पत्र्याचा डिब्बा ठेवीला. डब्बा निस्ता काळामस झालाया. त्या फुटस्तोवर पानी त्यातच तापवायचं. थंडी लय पडलीया. कांबळं न्हाय पांघरायला. मालक भायेरच झोपलाय पोटाशी पाय घिऊनशान. काल रातच्याला ढोसलीय. ती अजून उतारली न्हाय.
आज सकालीच दगुड घिऊन गाडी आलीया. लवकर आवरायला हवं. आमुशाला काम न्याय करत आमी. पण आता गाडी आली म्हंजी काम करावंच लागल. मिश्री लावाया घेतली आन  कमळी, गेलाबाय समद्यांना साद घातलीया. पटापटा भायेर निघाल्या समद्या! मंग पान्याचं डबरं उचललं आन् रानात संडासला निगालो. भायेर निस्ता काळोखमीट्ट! रानात सापकिरडू, पायाखाली येत कां काय हेच भ्या मनात! तसंच गेलो समद्या रानांत! मंग ऐकदा का सुव्र्यानारायन वर आला का आमाला संडासला नाय जाता येत.
संडासच्या डबऱ्यातल्याच पाण्यानं मिश्रीचं त्वांड धुतलं. हित पानी कुटं मिळतं? हबशीवरून चार हंडं मिळत्यात. तेवढंच पानी पुरवायचं. आमाला ना गाव न शिव. गावाभायर वस्ती आमची! आमची पालं तर येवढी लहान! त्यातच शेणानं सारवून चूल बांदायची. येक मोठ्ठी ट्रंक हाय कोपऱ्यात. तिच्या मंदी समद्यं सामान हाय. आता सामान म्हंजी सा-सात म्हयन्याचं तांदूळ, गूळ, साकर, जवारं. समद्य! कपडय़ाचा डाग येगळा! तरी आता पयल्यासारकं घागरा, चोली नाय घालत आमी! आमची माय, मायची डोकरी तसली कापडं घालायची. म्हंजी आरसं लावलेल्या घेरवाला घागरा आन् त्यावर तशीच चोळी! वर रंगीत फडका, डोस्कं बांदायला! कानात लय लांब बाल्या, क्येसांत अडकविलेले मोठमोठं झुंबरं, हातभर पांढऱ्या, लाल काचेच्या बांगडय़ा, गळय़ांत कवडय़ा आन् शिंपल्यांच्या माळा..
आमी दिलं सोडूनशान ते सगळं! फकस्त डोस्क्याला येक पटकूर बांधतुया.. दगड फोडताना ऊन लय भाजतया म्हूनशान! पण त्ये ऐवढं डाग अंगावर घालूनशान डगरी फोडाया जमल व्हय? म्हून आता निसता परकर, लांब पोलका घालतो! बस्स!
आगं बया! ही पोरगी का अशी पोटावर हात घिऊनशान हुबी हाय पाला भायर? कां ग लहानु प्वॉट दुखाया लागलं का काय? बस इळभर हिथ. तुला संडासला जायचंय? चल नदीवर. तुला चालवल न्हवं? न्हाय तुजं दिस भरत आलेत म्हून इचारलं. पोटुशी हायस न्हवं! चल मी बी नदीवर आंगुळ करती. चल माझ्या संग!
 दोगीबी नदीवरनं आलो. चूल पेटवली. भाकरी-भात शिजवला. पालाभायर ल्हाना खड्डा केला. तिथं पिठ टाकलं. त्यावर कुकू टाकलं. खड्डय़ात शेकोटी केली. मंग त्या शेकोटीची आन् चुलीची कुकू व्हाऊनशान पूजा केली. आन् दलियाचं गोड करूनशान समद्या पालावर प्रसाद वाटला. आज अमुश्या न्हवं? त आमी सगळय़ा अशी शेवालालची पूजा करतुया. शेवालाल आमच्या जातीतला. लमाण! दगुड फोडता फोडता गायबच झाला! तवा धरनं दर अमुशाला आम्ही पूजा करतो त्याची! जिथं कुटं आम्ही असतो तिथं!
आता बगा आम्ही गेले सा म्हयनं, पुणं, कोंढवा, हंडीवाडी, खडकवासला असे पालं बांदून फिरतोया. आमच्या मुकादमासंग! पाऊस लागला का जानार आमी आमच्या गावाला.. इजापूरला. थितं आमची डोकरी हाय. माय आन् बाप.. सा मधली चार पोरं त्यांच्याजवळ ठिऊनशान निगालो. आता पावसात तिथं गवत काडनार, गुडघाभर पान्यात हुब राहूनशान श्येतीची काय बाय कामं करनार. आणि दीपवाळीला परत घर सोडून, पोराबाळांना सोडून मुकादमासंग निगणार.. जगायला भायर पडणार!
गेल्या साली पोरीला भायेर काडायला तीन लाख लागलं. तिच्या लग्नात हुंडा, भांडी-कुंडी समदं दिलं. आता असा खर्च निगतोच न्हवं.. नायतर पावसाळय़ात पोट भराया बी पैका लागतो. मंग मुकादम आमाला खर्ची देतो. मंग पाऊस सरला की आमी, त्याला जिथं काम मिळंल तिथं जातो त्याच्या संगं दगुड फोडायला. मंग साताठ म्हयनं उचल घ्येतलीय त्याची फ्येड करत ऱ्हायचं. ती फ्येडस्तवर पाऊस येतोच का पुन्नांदा उचल घ्यायाची.. पुन्नांदा फ्येडत ऱ्हायाचं..
चला. ट्रालीतून मोठं दगुड बदाबदा पडल्येत. आता आमचं मालक आन् बाकी सगळे गडी निघू दगुड फोडायला. सहासात किलोचं दगड हातोडय़ानं फोडत्यात गडी! मंग दोन-चार किलोवाले दगुड आमी फोडायला घ्येतो. मालकाला च्या दिली. पान्यात कालवून भाकरी दिली. पोरांनाबी आन् मालकाला बी! आनं मी निंगाले!
‘माय तू जाऊ नग कामाला!’ लहानु.
‘आग बाय. मी हितच हाय वस्तीवर! तुला दुकाया लागलं का किशाला पाठव मला बोलवाया! आज बी खाडा लावला मुकादमानं तर शंभर रुपयं रोजीचं मिळत्यात त्ये बी जातल! मंग रातच्याला तुमच्या प्वॉटात काय घालू? हे समुरचं दगुड?’
लय वंगाळ वाटलं, पोटुशी पोरीला सोडताना! पन प्वॉट जाळाया हवं ना? घरांतली प्रस्थिती लय ब्येकार? बापानं पंदरा वर्षांची असताना लगीन करून दिलं. बापाची शेतीवाडी काय नाय! आमी सा भयनी. येक भाव. दिवसभर शेरडं चरायला जायचं. नायतर गवत कापाया जायचं! दर वर्साला बापाला प्वार व्हायचं. मायचं बाळतपण घरात! तवा कुटलं डागतर आन दवाखाना! मलाबी सा पोरं झाली. समदी बाळातपणं घरात! दगुड घ्यायचा. नाळ ठेचायची. तिसऱ्या दिवशी तान्हं प्वार पोटाशी बांधायचं आन् दगुड फोडाया जायचं! आजपोतुर कंदी काय बी झालं नाय! शेवालालची किरपा!
आज बी बुत्ती बांदली आन् दगुड फोडाया निघाले. आमी सा म्हयनं घराभायर. मंग साळा नाय काय नाय. पोरं बी अशीच वाऱ्यावर! आमच्या बंजारा समाजातले पुरुष बी दगुडच फोडत्यात. रात्री दारू ढोसत्यात आन् ती चडली का आमाला मारमार मारत्यात. आगदी पोटुशी बाईला बी सोडत न्हाय. रोज भांडाण! रोज तमाशा! गरोदरपणात बी बाळात होईस्तवर दगुड फोडायचं. मंग कदी कदी प्वार आंत फिरत नाय. मंग दगडावर टेकायचं. परत उठायचं आन् कुदळ, फावडं उचलायचं! गपगुमान दगुड फोडायला लागायचं. उगा मुकादमानं बगितलं तर!
जिंदगीभर दगुड फोडून पाय फाटलत. दगडाची कपची उडते डोळय़ांत! त्यानं डोळय़ांत फूल पडलया. दिसत बी नाय. पण पोट तर जाळाया पायजे न्हवं!
दिसभर दगुड फोडून घरला आल्ये. शेण-मातीने घर सारवलं. बटाटं आन् वांग्याची भाजी-भाकरी क्येली आन् त्येवढय़ात लहानु गडाबडा लोळाया लागली. म्या वळखीलं ही आता बाळत व्हईल. चूल पेटवली आन् पानी तापत ठिवलं. पन लय वरडाया लागली. अख्खी वस्ती दाराभायर जमा झाली. काय बी सुचंना मला! लहानुचं कापडं भिजलया रक्तानं! प्वार गुरावानी वराडतीय!
शेवालाल.. शेवालाल माज्या पोरीचा जीव वाचव रंऽ गावातलं कोन बी आमच्या वस्तीकडं येत न्हाय.. आमाला कोन बी इचारीत न्हाय.. वस्तीबी गावाभायर. पोरीला दवाखान्यात न्याया हवं.. प्वॉर गपगार पडलीया.. शेवालालऽ
दारांत सावली दिसतीया.
‘कोन हाय जनु!’
‘मी.. मी सुलोचना! तुझ्या लेकीचा आवाज ऐकला रस्त्यावर..’
‘व्हय. प्वार अडलीया!’
‘घाबरू नगस. ते पानी पी! मी अम्बीफाटय़ा वरूनशान ‘जनसेवा फाऊंडेशन’च्या हास्पिटलची गाडी मागवलीय. ती बघ आलीच गाडी!’
त्ये लोकांनी माझ्या लहानुला गाडीत घातलं, दवाखान्यात नेलं. दोन तासांनी पोरीची सुटका झाली आन् पोरगा झाला!
डोस्क्यावर ऊन घिऊन, रगताचं पानी करून दगुड फोडाया आनीक येक लमाणाचं प्वार जन्माला आलं!    
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com