News Flash

ल्हादिनी

रवीनं जेव्हा अ‍ॅनासाठी कविता गायली, तेव्हा अ‍ॅना एकदम हळवी झाली. आतून हलूनच गेली ती. म्हणाली, ‘‘कवी, मी मृत्युशय्येवर असले तरी तुझं हे गीत ऐकल्यावर पुन्हा

| August 2, 2014 01:04 am

रवीनं जेव्हा अ‍ॅनासाठी कविता गायली, तेव्हा अ‍ॅना एकदम हळवी झाली. आतून हलूनच गेली ती. म्हणाली, ‘‘कवी, मी मृत्युशय्येवर असले तरी तुझं हे गीत ऐकल्यावर पुन्हा जिवंत होऊन उठून बसेन.’’ स्तुतीची ही अनोखी रीत रवीच्या मनातळच्या मनाला स्पर्शून गेली़  अ‍ॅना त्याची बाहय़ जगातली, घराबाहेरची पहिली निर्मळ चाहती होती. त्याच्या रूपाची चाहती. त्याच्या कवितेची चाहती. त्याच्या अर्धस्फुट प्रतिभेला स्त्रीच्या उत्फुल्लतेचा झालेला तो पहिला उत्कट स्पर्श होता.
म त्री म्हणजे काय, याची नीटशी जाणीवही नसण्याच्या काळात भेटलेल्या एखाद्याचा किंवा एखादीचा सहवास अगदी जिवंतपणे त्यातल्या लहान लहान संवेदनांच्या उमटणीसकट आठवत राहतो. तो शब्दांमधून झरतो. तो विचारांमधून वाहतो. पुरुष म्हणजे काय किंवा स्त्री म्हणजे काय, हे ज्या ज्या वेळी मन-बुद्धी समजून घेते, त्या त्या वेळी तो सहवास समजुतीपाशी अतिशय ताजेपणानं आणि सुंदरपणानं प्रकट होतो. रवींद्रनाथ ठाकुरांसारख्या एखाद्या महापुरुषाचं जीवन समोर ठेवून खरोखरच असं म्हणता येतं.
रवींद्रनाथांचं घर भलंथोरलं प्रचंड होतं. साठ-सत्तर माणसं घरात वेगवेगळ्या नात्यांनी वावरत असायची. देवेंद्रनाथांच्या पंधरा मुलांमधला रवी चौदावा होता. घरात सख्खी बहीण-भावंडंच बारा-तेरा. त्यांची मुलं होती. भावांच्या बायका होत्या. राहते नोकरचाकर होते. पाहुणे होते, आश्रित होते. या सगळ्यांमध्ये रवी होता. घर कलासक्त होतं. घरातली माणसं वाचत होती, लिहीत होती, वाजवत होती, गात होती, नाटकं करत होती. ‘भारती’ हे घरातल्या प्रतिभावंतांनी सुरू केलेलं नियतकालिक होतं. जोडासांको थिएटर म्हणजे या घरानंच सुरू केलेलं घरातल्या मंडळींच्या रंगमंचीय आविष्कारासाठीचं नाटय़कंेद्र होतं. रवीभोवती सर्व प्रकारे कला रसरसून बहरत होती. तोही कविता रचू लागला होता, थोडाफार गाऊ लागला होता, लिहू लागला होता, नाटकात काम करू लागला होता. तरीपण तो अंतर्यामी लाजाळू आणि काहीसा बुजरा असाच तरुण होता. संगीत आणि तत्त्वज्ञान, नाटक आणि साहित्य यांच्याशी त्याची खूप गाढ ओळख होत होती; पण बाहेरच्या समाजात मोकळेपणानं मिसळण्याची त्याला सवय नव्हती.
रवीचे एक मोठे भाऊ म्हणजे सत्येंद्रनाथ ठाकूर. आय.सी.एस. झालेले ते पहिले भारतीय होते. सत्येंद्रनाथ एकीकडे रवीच्या प्रतिभागुणांनी प्रसन्न होते, पण त्याची उदासी त्यांना आवडत नव्हती. शिवाय ते इंग्रज उच्चपदस्थांमध्ये वावरणारे होते. नव्या जगातल्या आधुनिक स्त्री-पुरुषांच्या मेळाव्यांत सफाईदारपणे आणि आकर्षक रीतीने सहभागी होणारे होते. रवीजवळ त्याचीच उणीव होती. देखणा होता रवी. खूपच देखणा. प्रतिभाशाली होता. बुद्धिमान आणि विचारी होता; पण संकोची होता, लाजाळू होता. इंग्लंडला जाऊन काही करायचं, काही बनायचं असेल, तर एका अंतर्मुख, स्वत:त मिटलेल्या तरुणाचं रूपांतर एका तरतरीत, रुबाबदार, आकर्षक तरुणामध्ये होणं आवश्यक होतं. इंग्लंडला जाण्यापूर्वीचे काही दिवस हाती होते. सत्येंद्रनाथांना आठवण झाली ती त्यांच्या महाराष्ट्रीय स्नेहय़ांची. आत्माराम पांडुरंग तर्खड यांची. आत्माराम पांडुरंग हे महाराष्ट्रातल्या पहिल्या पहिल्या वैद्यकीय पदवीधरांपैकी एक होते. ते पेशानं डॉक्टर, वृत्तीनं सुधारक आणि कृतीनं समाजसेवक होते. त्यांचे बंधू म्हणजे प्रख्यात व्याकरणकार दादोबा पांडुरंग. हे दोघेही बंधू मुंबईच्या सार्वजनिक जीवनात पुढाकार घेणारे होते.
त्या वेळी माणेकजी कर्सेटजी यांनी अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स स्कूलची स्थापना केली होती. या शाळेत पारशी आणि इतर मुलींच्या तुलनेत हिंदू मुली अगदी बोटांवर मोजण्यासारख्या होत्या. आत्मारामांच्या तीनही मुली या शाळेत शिकत होत्या. मेरी कार्पेटरसारखी स्त्री-शिक्षणाची पुरस्कर्ती आणि समाजसेविका मुंबईत रेव्हरंड डॉ. विल्सन या इंग्रज गृहस्थांना भेटायला गेली असताना आत्माराम पांडुरंग आपल्या तीन मुलींसह तिथे आलेले तिने पाहिले. तिला त्यांच्या मुली फार नेटका पोशाख केलेल्या, उत्तम रीतिरिवाज असणाऱ्या, इंग्रज माणसांमध्ये सहजपणे वावरणाऱ्या, चौकस आणि हुशार अशा वाटल्याची नोंद तिनं केली असल्याचं श्री. बा. जोशी यांनी संशोधनपूर्वक त्यांच्या एका लेखात नोंदवलं आहे.
या तीन मुलींपैकी एक म्हणजे अन्नपूर्णा. तिलाच आना किंवा अ‍ॅना म्हणत. ती अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूलमधून शिकली आणि नंतर पुण्याला राहून एका ख्रिश्चन बाईकडे – मिसेस मिचेल यांच्याकडे – तिनं इंग्रजीचं विशेष शिक्षणही घेतलं. आत्माराम पांडुरंगांचं सुशिक्षित स्त्रीचं कल्पनाचित्र तिच्यात प्रत्यक्ष झालं होतं, असं त्यांच्या स्नेहीपरिवारालाही वाटत असे. या तर्खड कुटुंबात रवीला महिन्याभरासाठी राहायला पाठवण्याचा सत्येंद्रनाथांनी निर्णय घेतला. इंग्रजी रीतिभातींशी परिचित अशा तर्खड मुलींबरोबर रवी राहिला तर तो इंग्रज शिष्ट समाजात कसं वावरायचं ते शिकेल, मुलींच्या सहवासात त्याचा बुजरेपणा थोडा कमी होईल आणि स्त्रियांशी वागण्याचे संकेतही त्याला ठाऊक होतील, असा विचार करून सत्येंद्रनाथांनी रवीची रवानगी मुंबईला केली होती.
रवी आत्माराम पांडुरंगांच्या घरी आला आणि कल्पना नसललं एक वेगळंच जग त्याला दिसलं. एका सुविद्य, सुसंस्कृत अशा कुटुंबाचं जग. या जगात जोडासांकोच्या हवेलीचं ऐश्वर्य नव्हतं आणि खानदानी रीतिरिवाजांचं साम्राज्य नव्हतं. घरी शिकवायला येणारे गुरुजी नव्हते. हे जग स्वत:मध्ये आधुनिकतेचं वारं खेळवणारं जग होतं. उच्छृंखल नव्हतं, पण मुक्त होतं. सहजता, डौल आणि मोकळीक यांचा सुखद अनुभव देणारं होतं. कुटुंबातली मुलं-मुली परदेशात शिकून आली होती. त्याचा परिणाम कुटुंबातल्या माणसांच्या परस्परसंबंधांवरपण झाला होता. ती साधी मोकळीक रवींद्रासाठी नवी होती.
आणि नवं होतं अ‍ॅनाचं जवळ येणं. ती रवीपेक्षा थोडी मोठीच होती, पण त्याच्याशी तिने लगेच मैत्री केली. महाराष्ट्रातून विलायतेला जाणाऱ्या पहिल्यावहिल्या स्त्रियांपैकी बहुधा तीही एक होती. तिला रवीशी- एका तरुण मुलाशी- बोलण्यात कसला संकोच नव्हता. अ‍ॅनाला रवी आवडला. तो आवडण्यासारखाच तर होता. सोळा-सतरा वर्षांचा तरुण मुलगा. ऐश्वर्यसंपन्न घरात वाढलेला. थोडा लाजराबुजरा, पण बुद्धिमान, संवेदनशील चेहऱ्याचा, देखणा तरुण.
आणि अ‍ॅना! पंचाहत्तर वर्षांचं आयुष्य सरल्यानंतर मावळतीच्या उन्हात बसलेल्या रवींद्रनाथांनी आपल्या स्नेही आणि अभिभावक अशा निकटवर्ती माणसांजवळ अन्नपूर्णेच्या आठवणी सांगितल्या आहेत. जीवनाचा निरोप घेण्याचा काळ फार दूर नसताना भावजीवनाच्या तरुण बहरातल्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या आहेत. अर्थात त्या सांगण्यामागे एक अभिजात संयम आहे. ‘छेलेबेला’ या त्यांच्या आत्मकथेतही त्यांनी एखाद्या कवितेसारखा तिचा सहवास आठवला आहे. अ‍ॅना ‘श्री’मती होती, रूपवती होती, कलावती होती आणि बुद्धिमतीही होती. जोडीला तिच्याजवळ एक डौल होता. चातुरी होती आणि निव्र्याज अशी माधुरीही होती. तरुण अ‍ॅनाभोवती रुंजी घालणारा मित्रमैत्रिणींचा मोठा परिवार असला तर नवल नव्हतं. तिनं रवीला आपल्या मैत्रीच्या मृदू हातांनी ओढून जवळ केलं.
त्याला उमलवणं हे तर तिचं कामच होतं. त्यानं सर्वामध्ये मिसळावं, असा तिचा आग्रह होता. ती त्याला बोलतं करून पाही. तो उदास दिसला, की त्याला खुलवण्याची धडपड करी. त्याची हलकी थट्टा करत राही. तो आनंदी असला, की त्याला कविता म्हणण्याचा, कविता गाण्याचा आग्रह करी. तिला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ आणि तिची मोकळी स्नेहभावना तिच्या वागण्या-बोलण्यातून थुईथुई नाचत राही. रवी मात्र प्रतिसादाच्या बाबतीत मिटलेलाच होता. स्त्री-सहवासाविषयीची त्याची अनभिज्ञता आणि त्याचा संकोच त्याला वेढूनच होता. त्याच्या तरुणपणाला तिची साद ऐकू येत होती. हृदयात अननुभूत ऊर्मी उमटत होत्या; कवितेला हळुवार जागवीत होत्या. प्रत्यक्ष सहवासात तो मिटून होता, तरी आतून नवख्या जाणिवांनी उमलून येत होता.
रवींद्रनाथांनी एका नाजूक प्रसंगाची आठवण सांगितली आहे. अ‍ॅना एकदा रवीच्या खोलीत आली, तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंधार-उजेडाच्या काठावर रवी एकटाच कलकत्त्याच्या आठवणीत बुडाला होता. ती वेळ तशीच असते. एकटं, उदास करणारी. रवी तसाच व्याकूळ झाला होता. बंगालच्या त्याच्या घरामधली दृश्यं त्याला पुन्हा दिसत होती. जवळची माणसं आठवत होती. त्यांचे आवाज ऐकू येत होते. गंगेची खळखळ जाणवत होती.
तेव्हा अ‍ॅना आली. छाया-प्रकाशाच्या विलक्षण मिसळणीतून ती आली. त्याच्या खोलीत आली आणि त्याच्या पलंगावर जवळजवळ त्याला बिलगूनच बसली. त्याचं एकटं बसणं आणि उदास असणं तिला कळलं. ‘‘काय झालं तुला? जगाची चिंता करतोस की काय?’’ तिनं थट्टा केली. रवी गोंधळला. ती म्हणाली, ‘‘चल, आपण टग ऑफ वॉर खेळू.’’ म्हणजे रस्सीखेच खेळतात तसा खेळ. एकमेकांचे हात धरून त्यांनी परस्परांना खेचलं खरं; पण अ‍ॅना अगदी सहज हरली आणि रवीकडे खेचली गेली. रवी मात्र एखाद्या अजाण मुलासारखा मुग्ध राहिला. काहीच न करता गोंधळून तसाच. तिच्या कृतीचा अर्थ त्याला नीट उमजला नाही.
एक दिवस ती आली अन् म्हणाली, ‘‘रवी, तुला एक सांगते. एखादी इंग्रज मुलगी झोपेत असली आणि तिचा हातमोजा एखाद्या तरुणानं पळवला तर त्याचं बक्षीस म्हणून त्याला त्या मुलीचं चुंबन घ्यायचा अधिकार मिळतो बरं का!’’ आणि मग गप्पा मारता मारता ती आरामखुर्चीतच झोपून गेली. तिचे हातमोजे तिनं शेजारीच काढून ठेवले होते. ती उठली तेव्हाही ते तिथेच होते. जागच्या जागी सुखरूप.
‘अमंग द ग्रेट्’ नावाचं दिलीपकुमार रॉय यांचं एक पुस्तक आहे. परदेशांमधल्या मुक्कामात रवींद्रनाथांशी झालेली त्यांची दीर्घ संभाषणं त्यांनी या पुस्तकात नोंदवली आहेत. त्या संभाषणांमध्ये अ‍ॅनाचा विषय निघाल्यावर रवींद्रनाथ फार कोमलतेनं बोलले आहेत. तिला आठवताना त्यांनी तिच्यासाठी दोन विशेषणं वापरली आहेत. ‘चार्मिग’ आणि ‘डिलाइटफुल’. या दोहोंचं रसायन म्हणजे अ‍ॅना. संस्कृत विशेषण वापरायचं तर तिला म्हणता येईल- ‘ल्हादिनी.’
अ‍ॅना ल्हादिनीच होती. तिला ज्या गोष्टीबद्दल कौतुक वाटावं अशी रवीकडे एकच गोष्ट होती- कविता. रवीला निदान त्या वेळी तरी तसंच वाटत होतं. त्याच्याकडे तिच्यासारखं शिक्षण नव्हतं. शिष्ट समाजात मोकळेपणानं वावरण्याचं कौशल्य नव्हतं. त्याच्याजवळ होती फक्त कविता. शिवाय त्याला आणखी एक देणगी मिळालेली होती- रूपाची देणगी. त्याचा देखणेपणा त्याच्या संकोचासकट फार हवासा वाटणारा होता. अ‍ॅना त्याला म्हणाली होती, ‘‘रवी, तू कधी दाढी वाढवू नकोस हं! तुझ्या रेखीव चेहऱ्याच्या रेषा त्यामुळे झाकल्या जातील. तू माझं एवढं म्हणणं ऐकायलाच हवंस.’’
पुढच्या आयुष्यात रवीनं ते ऐकलं नाही. उलट, दाढी हीच त्याच्या व्यक्तित्वाची एक भारदस्त खूण झाली. त्याला ऋषितुल्यता देणारी खूण. त्यानं दाढी वाढवली, पण अ‍ॅनानं दाढी न वाढवण्याविषयी केलेली सूचना तो कधी विसरलाही नाही. त्यानं तिला नाव दिलं होतं- ‘नलिनी’. एकदा तिनं म्हटलं, ‘‘तू कवी आहेस ना? मग मला एखादं नाव दे ना छानसं!’’ आणि रवीनं तिला ‘नलिनी’ म्हटलं. त्याच्या ‘कविकाहिनी’ या कथाकवितेतली नलिनी. कवीला जिच्यापाशी स्वत:चं जीवननिधान सापडलं, ती नलिनी. रवीनं अ‍ॅनाला कविकाहिनीची सगळी कथाकल्पना ऐकवली होती. ती कविताही ऐकवली होती. अ‍ॅनाला बंगाली फारशी समजत नव्हती; पण ती कविता तिला बरीचशी पाठही झाली होती. ‘शुन नलिनी, खोल गो ऑखि’ असं एक पद होतं, त्यानं तिच्यासाठी गायिलेलं. ‘नलिनी, उघड नयनपापणी.. तुझ्यासाठी तुझा रवी आला आहे. आता डोळे तर उघड!’
रवीनं जेव्हा अ‍ॅनासाठी ही कविता गायली, तेव्हा अ‍ॅना एकदम हळवी झाली. आतून हलूनच गेली ती. म्हणाली, ‘‘कवी, मी मृत्युशय्येवर असले तरी तुझं हे गीत ऐकल्यावर पुन्हा जिवंत होऊन उठून बसेन.’’ स्तुतीची ही अनोखी रीत रवीच्या मनातळच्या मनाला स्पर्शून गेली़ अ‍ॅना त्याची बाह्य़ जगातली, घराबाहेरची पहिली निर्मळ चाहती होती. त्याच्या रूपाची चाहती. त्याच्या कवितेची चाहती. त्याच्या अर्धस्फुट प्रतिभेला स्त्रीच्या उत्फुल्लतेचा झालेला तो पहिला उत्कट स्पर्श होता.
पुढे तिच्याविषयी दिलीपकुमार रॉय यांच्याशी बोलताना रवींद्रनाथांचा चेहरा पालटत गेला. ते बोलता बोलता थांबले. त्यांचा तोवर चाललेला नर्म विनोद थांबला. एक प्रकारच्या गूढ, स्निग्ध भावनेनं त्यांचा चेहरा झाकोळला. मनात जाग्या होणाऱ्या कोवळ्या आठवणींनी त्यांचा स्वर मृदू केला. हा बदल टिपत रॉयबाबूंनी त्यांचं पुढचं बोलणं नोंदवून ठेवलं. ते म्हणाले, ‘‘तिच्या भावनांना प्रतिसाद देण्याचं सामथ्र्य माझ्याजवळ नव्हतं; पण मी तिला कधी विसरलो नाही. तिच्यासंबंधी कधी हलकंसलकं बोललो नाही आणि तिच्या भावनेला एखादं स्वस्त नाव देऊन तिचा कधी अपमानही केला नाही.’’
अ‍ॅनानं रवींद्रनाथांची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टीच घडवली. घराबाहेर प्रथमच पडल्यावर बाहेरच्या मोठय़ा जगात त्यांना जवळून भेटलेली ती पहिली स्त्री होती. तिनं त्यांना स्त्रीच्या तरुणपणाचं एक लोभस दर्शन घडवलं. नाना दडपणांनी गुदमरलेला या देशातला स्त्री-पुरुष संबंध तरुण रवीला माहीत होण्याआधीच अ‍ॅनाच्या रूपानं त्याला स्त्रीशी एक निकोप मैत्रीचं नातं निर्माण करण्याची संधी मिळाली आणि ती संधी जरी त्याला पुरेशी जाणिवेनं घेता आली नाही, तरी तिचं मोल त्याला आयुष्याच्या अखेपर्यंत हळूहळू कळून आलं.
अ‍ॅना आणि रवींद्रचा सहवास अवघा महिन्या-दीड महिन्याचा. पुन्हा ते कधी भेटले नाहीत, भेटू शकले नाहीत. फार लवकर तिचं आयुष्य संपलं. १८९१ साली कलकत्त्याच्या ‘वामाबोधिनी’ पत्रिकेच्या अंकात तिच्यावर एक मृत्युलेख प्रसिद्ध झाला होता. त्यात तिचा मोठाच गौरव केला गेला आहे. तिला गायन-वादनात गती होती. मराठीबरोबरच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि पोर्तुगीज भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. त्या काळच्या देशी-विदेशी वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून ती लेखन करत होती.  
अ‍ॅना हृदयानं भारतीय होती असं म्हटलं, ते या अर्थानं. तिच्या त्या हृदयात रवींद्रनाथांना शेवटपर्यंत एक विशेष जागा होती. या पत्राखाली तिची सही- तिचं नाव आहे ते ‘लोटस फ्लॉवर’ असं. ‘नलिनी’ हे तिला रवीनं दिलेलं लाडाचं नाव तिनं अखेपर्यंत वापरलं. त्याच नावानं लेखन केलं.
अ‍ॅना अकाली गेली. ती गेली तेव्हा तिनं नुकती पस्तिशी ओलांडली होती. काही भरीव, एकसंध कार्य तोवर तरी तिच्याकडून झालं नाही. त्या काळातल्या सुशिक्षित आणि बुद्धिमान स्त्रियांमध्ये तिचं नाव महाराष्ट्रानं आवर्जून कधी घेतलेलं नाही. तिचं स्मरण चिरंजीव राहील ते रवींद्रनाथांची, त्यांच्या कवितेची भाविनी- पहिली भाविनी म्हणून. त्यांची ‘नलिनी – द लोटस फ्लॉवर’ म्हणून. रवींद्रनाथांवर बंगालमध्ये झालेल्या विविधांगी लेखनात अ‍ॅनाविषयीही लिहिलं गेलं आहे. विस्तारानं लिहिलं गेलं आहे. त्यांच्या कवितेत वारंवार येणाऱ्या ‘नलिनी’चा सौंदर्यवेधही घेतला गेला आहे. त्यांच्या ‘भग्नहृदय’ नाटकाची नायिका नलिनी आहे आणि त्यांची पत्नी विवाहापूर्वी जी भवतारिणी होती, ती विवाहानंतर ‘मृणालिनी’ म्हणजे ‘नलिनी’च आहे. रवींद्रचरित्राचे आणि रवींद्रसाहित्याचे असे अन्वय बंगाली अभ्यासकांनी सूक्ष्मपणे जुळवून पाहिले आहेत.
रवींद्रनाथांच्या आठवणींची, त्यांच्याशी झालेल्या साक्षात संभाषणांची जोड या अन्वयाला आहे. अ‍ॅनाच्या मृत्यूची वार्ता रवींद्रनाथांना कळली होती की नव्हती? माहीत नाही. त्यांच्या हृदयात त्या वेळी काय काय हलून गेलं असेल? माहीत नाही. तिनं त्यांचं आंतरजीवन स्नेहभावनेनं उजळून टाकलं. तो प्रकाश त्यांच्या मनातून शेवटपर्यंत मावळला नाही.
असं वाटतं, की अ‍ॅना हे खरं तर केवळ तरुण रवीलाच नव्हे, तर जीवनाला उत्सुकतेनं सामोरं जाणाऱ्या कुणालाही उमलवणारं, त्याच्या क्षमतांना जागवणारं, त्याला जगाविषयी, जगण्याविषयी उत्कंठित आणि उल्हसित करणारं एक स्त्रीरूप आहे. ती एक चैतन्ययुक्त, मधुर अशी जीवनप्रेरणाच आहे. तिची तशीच आठवण रवींद्रनाथांना राहिली होती. म्हणून तर आपल्या प्रौढवयात आपलं पोरवय (छेलेबेला) आठवताना त्यांनी लिहिलं आहे-
‘आमच्या या जुन्या वडाच्या पानाफांद्यांवर येऊन परदेशी पाखरं कधीकधी घरटी बांधतात. त्यांच्या पंखांचं नर्तन आपल्या ओळखीचं होतं न होतं, तोच ती उडूनही जातात, पण त्यांनी आपल्यासोबत रानावनांमधले अनोखे सूर मात्र आणलेले असतात. आपल्या जीवनप्रवासातही असंच घडतं. अज्ञात दिशेनं येऊन कोणी तरी देवता आपल्याला आपल्या आत्म्याची भाषा ऐकवते आणि आपल्या हृदयाचं वैभव अमर्याद करते. ती न बोलावताच येते आणि आपण जेव्हा तिला बोलावू लागतो, तेव्हा अंतर्धान पावते; पण जाता जाता आपल्या जीवनाच्या धाग्यांवर ती फुलांची अशी नक्षी विणून जाते, की आपल्या दिवस-रात्रींना कायमची धन्यता लाभते.’
ही धन्यता रवींद्रनाथांच्या दिवस-रात्रींना अ‍ॅनामुळे मिळाली; म्हणून अ‍ॅना त्यांची ल्हादिनी झाली, चिरंजीविनी झाली़.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:04 am

Web Title: poem for friendship
टॅग : Friendship Day
Next Stories
1 निखळ मैत्रीची चाळिशी
2 हिलींग
3 तिची-माझी मैत्री
Just Now!
X