18 September 2020

News Flash

कविता लिहितो म्हणून मी आहे

आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही.

| November 20, 2015 01:32 pm

‘‘आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ, निसर्ग मला सुंदर वाटतो, परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानोरांप्रमाणे मी निसर्गकविता लिहिलेली नाही. जी काही थोडी फार सृष्टी माझ्या कवितेत आलेली आहे ती खिन्न-व्याकूळ किंवा हिंस्र-अमानुष अशी आहे. यांत निसर्गसौंदर्याचा प्रत्यय नाही. सृष्टीचा (त्यात मानवी जगतही आलेच) आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्याभोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते यांतून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी,’’ सांगताहेत प्रसिद्ध ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके.
१९ ६०च्या आसपास माझ्या कविता नियतकालिकांतून येऊ लागल्या होत्या; परंतु ‘सत्यकथे’च्या  मे १९६६च्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘योगभ्रष्ट ’ या दीर्घ कवितेने माझी खरी ओळख झाली. ती मला झाली तशी माझ्या समकालीन वाचकांना, कवींना झाली. ‘योगभ्रष्ट ’ हे माझे पहिले अधिकृत स्वरूपाचे कवितात्म विधान होते. १९६४ साली मी एम.ए.ची परीक्षा देऊन घरी आलो आणि ती कविता लिहू लागलो. त्या वेळचा माझा, आमच्या पिढीचा जो कल्लोळ होता तो त्या कवितेच्या रूपाने व्यक्त झाला. स्वत:चे जगणे, वाचन आणि अवतीभवती घडत असलेल्या घटना यांचे एक रसायन त्या कवितेतून व्यक्त झाले. ही कविता मी कित्येक दिवस लिहीत होतो. एक प्रकारे ती त्या वेळची माझी तारखा नसलेली रोजनिशी होती.
उद्ध्वस्त मन:स्थितीत गावी परतलो
कशातच मन लागत नाही
अंतरात सगळा वणवा पेटलेला
अंतर्बाह्य़ उन्हाळा
छातीच्या मध्यातून अंगभर ज्वाळा

योगभ्रष्ट’च्या या सुरुवातीच्या ओळींतून त्या वेळची माझी मानसिक अवस्था लक्षात येते. मी असे मानतो की, कवीची शारीरिक, मानसिक, आत्मिक प्रस्फुरणे त्याच्या कवितेतून उमटत असतात. ती वैयक्तिक असतात, तशीच सामाजिकही असतात. आपण समाजात असतो, त्यामुळे कोणतीही वैयक्तिक घटना सामाजिक होते आणि याउलटही घडते. त्यामुळे मराठी समीक्षेत व्यक्तिगत जाणीव आणि सामाजिक जाणीव असे जे वर्गीकरण केले जाते ते मला मुळीच मान्य नाही. शिवाय साहित्यात व्यक्त झालेला कोणताही अनुभव, अगदी तो खूपच खासगी असला तरी, अंतिमत: सामाजिक होतो. समाजाने निर्माण केलेली भाषा आपण स्वीकारलेली असते, तिच्यासोबतच आणि तिच्यामधूनच अनेक गोष्टी आपल्यापर्यंत चालत आलेल्या असतात. असे असूनही व्यक्ती अताíकक वागू शकतात; विचारांच्या, वर्तनांच्या तोपर्यंतच्या नमुन्यांच्या बाहेर जाऊ शकतात. कवीदेखील भाषेच्या आणि कवितेच्या रूपबंधाच्या बाबतीत अशीच काही घडामोड करत असतात. ही घडामोड नेहमीच कवितेला समृद्ध करणारी असते असे नाही. प्रचलित विचाराच्या पलीकडे जाणारा विचार अभ्यासातून,  परिश्रमातून, निदिध्यासातून आलेला असतो. अनावर आवेगी, प्रचंड उद्रेकी चित्रे काढणाऱ्या जॅकसन पोलाकच्या डोक्यात विचार आणि मनात भावना होत्याच.
मी कविता लिहितो म्हणजे नेमके काय करतो याचे उत्तर वर आलेलेच आहे. मी माझ्या विचारांना, भावावस्थांना व्यक्त करतो. व्यक्त करणे, होणे ही माझी गरज असते. कधीकधी मला भाषेशी खेळावे असेही वाटते. अर्थात भाषा निरंग, निर्वकिार नसल्यामुळे तिच्यातून माझ्या मनोवस्था व्यक्त होतातच. ‘योगभ्रष्ट’ या संग्रहातलीच एक छोटी कविता देतो:
कमळे फुलली. काळी कमळे फुलली.
घोडा पळाला. काळा घोडा पळाला.
चार घोडे रथाला जोडले.
चार काळे घोडे काळ्या रथाला जोडले.
मी हजार कमळे देवाला वाहिली.
मी हजार काळी कमळे काळ्या देवाला वाहिली.
दिवस मावळला.
काळा दिवस मावळला

मुळात ही व्याकरणाच्या पुस्तकातली वाक्ये आहेत. मी काय केले? काळी, काळा, काळे, काळ्या ही विशेषणे जोडून पुन्हा ती वाक्ये लिहिली. अर्थात हा नुसती भाषा-क्रीडा राहिली नाही. शेवटच्या ओळीतले प्रश्नचिन्हही अर्थपूर्ण झाले.
एखादी कविता लिहून पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो, तर एखादी झर्रकन लिहून होते, नंतर तिच्यात काही बदल करावा असेही वाटत नाही. पूर्वी टंकलेखन यंत्रासमोर आणि नंतर संगणकासमोर बसून मी तत्काळ कविता लिहिलेल्या आहेत. डोक्यात काही तरी चाललेलेच असते. ते कागदावर उतरण्यासाठी थांबलेले असते. पाखरांचा थवा हलकेच उतरावा तसे हे होते, की कुणी तरी गोळीबार केल्यामुळे पटापट पाखरे खाली कोसळावीत तसे होते हे मला सांगता येत नाही.
तरीदेखील आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ, निसर्ग मला सुंदर वाटतो. झाडे, फुले, पाने, नद्या, डोंगर, पाऊस, बर्फाच्छादित शिखरे. सुंदर दृश्ये पाहताना मलाही आनंद होतो; परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानोरांप्रमाणे मी निसर्गकविता लिहिलेली नाही. जी काही थोडी फार सृष्टी माझ्या कवितेत आलेली आहे ती खिन्न-व्याकूळ किंवा िहस्र-अमानुष अशी आहे. या सृष्टीत दगडी गुलाब आहेत, पिकलेल्या केसांचा घोगरा सूर्य आहे, ठरीव बाराखडीत कूकणारी पाखरे आहेत, जंगली बलासारखा चंद्र आहे, समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोडय़ासारखा आहे. यांत निसर्गसौंदर्याचा प्रत्यय नाही; परंतु कलासृष्टीत अशा प्रतिमा येत असतात. व्हिन्सेंट वॉन गॉगची पिळवटलेली झाडे, कोसळून खाली पडेल असे तारकाखचित आकाश प्रसिद्धच आहे. सृष्टीचा (त्यात मानवी जगतही आलेच) आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्याभोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते यातून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी. त्यात काही संस्कारांची भर पडत असावी- साहित्यकृती, पेंटिंग्ज, चित्रपट, तत्त्वज्ञान इत्यादी. मला आपल्याभोवतीचे मानवी जग सतत समजून घ्यावे असे वाटत असल्यामुळे वर्तमानपत्रे, राजकीय-आíथक विश्लेषणे, चळवळींची माहिती यांचीही भर पडते. हे सगळे संस्कार होत असताना मला लिहावेसे वाटते. लिहिणे ही माझ्या बौद्धिक आणि भावनिक क्रियांची निष्पत्ती असते.
लिहिणे या क्रियेत आपण एकटेच असतो. इतर बहुतेक क्रियांमध्ये इतरांचा सहभाग असतो. पेंटिंग करताना एकटेपणा असतो; परंतु भित्तिचित्रासारखे मोठे काम करताना सहकारी असतात. शिल्पकृती घडवतानाही असे एकटेपण असते, मात्र शिल्पसमूह घडवताना विविध सहायक असतात. नाटक, चित्रपट या गोष्टी तर समूहाशिवाय अशक्यच आहेत. सादरीकरणाच्या कलांमध्ये सतत रसिकांची उपस्थिती गृहीत धरली जाते. लिहिणे या क्रियेत तुम्ही असता, समोर कागद किंवा संगणकाचा पडदा असतो. लिहिणे ही या प्रकारे अत्यंत एकाकीपणात घडणारी कृती आहे. त्यामुळे कदाचित कविलोक समूहाला किंवा तूला उद्देशून बोलत असतात. काही वेळा मीच्या ऐवजी तूचा प्रयोग केला जातो. उदाहरणार्थ,माझ्या नटासाठी पाश्र्वसूचना या कवितेतील तू हा मीच आहे. अर्थात मी म्हणजे वसंत आबाजी डहाके नव्हे.
सर्वच कविता आत्मचरित्रात्मक नसतात. काही कवितांची आधारभूमी आत्मचरित्रात्मक असते. त्यामुळे कवितांमधून कवीचे आत्मचरित्र शोधले जाते. ते ठीकच आहे; परंतु अशा प्रयत्नांतून खऱ्या अर्थाने कवीचे लौकिक आत्मचरित्र फारसे हाती लागत नाही. कादंबऱ्यांमधून कादंबरीकारांचे, कथांमधून कथाकारांचे, नाटकांमधून नाटककारांचे आत्मचरित्र सहसा शोधले जात नाही. ते कवितांतून शोधले जाते, कारण कवितेतील   मी.  हा मी आणि कवी यांना एकरूप मानले जाते. इतर साहित्य प्रकार, इतर कला प्रकार यांच्याहून कविता हा वेगळा साहित्य/कला प्रकार ठरतो. त्याचे हे कारण असावे. ती कविचरित्राशी, मीशी, कवीच्या स्वशी घट्ट बांधलेली असते अशीच सर्वसामान्यपणे वाचकांची जाणीव असते. दुसरे इतर सर्व साहित्य/कला प्रकार वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, तर कविता आत्यंतिक रीतीने आत्मनिष्ठ असते. (चित्रकलेत एक्स्प्रेशनिस्ट आणि इम्प्रेशनिस्ट कलावंतांच्या चित्रांमधून त्यांच्या मनोवस्था व्यक्त झालेल्या आहेत.) मला जेव्हा हे जाणवले तेव्हा अस्वस्थपणे मी आतल्या आत प्रतिकार करू लागलो. आत्मचरित्र जितके पुसता येईल तेवढे पुसायचे, निखळ वस्तुनिष्ठ अनुभव व्यक्त करायचा, त्यासाठी अकाव्यात्म, गद्यानुसरण करणारी भाषा वापरायची असे मी मनात ठरवू लागलो. असा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे माझ्या कवितांमधील मीमधून, स्वमधून आत्मचरित्रात्मक अंश डोकावतात. भाऊ समर्थ, प्रभाकर कोलते, नितीन दादरावाला यांच्या चित्रांमध्ये वरच्या रंगस्तराखाली आणखी अनेक रंगांचे स्तर लपलेले आहेत असे जाणवते, तसाच हा काहीसा प्रकार. अर्थात पेंटिंगसारखी कविता अमूर्तनाकडे जाऊ शकत नाही. भाषेत सतत वास्तवाचा निर्देश होत राहतो. भाषेच्या साहाय्याने भ्रामक वास्तव रचता येते. कल्पनारम्य वास्तव निर्माण करता येते. एखादी रचना अनेक अर्थच्छटा व्यक्त करू शकते; परंतु संपूर्णपणे अर्थमुक्त होऊ शकत नाही. तिच्यात कवीची वृत्ती, दृष्टी भिनलेली असते.
एखाद्या कवीची जगण्याची वृत्ती कशी आहे, त्याची जीवनाविषयीची दृष्टी काय आहे यांवर त्याची कविता काय स्वरूपाची असेल हे ठरते. बोरकर, पाडगावकर यांना आनंदयात्री म्हटले जाते. मर्ढेकरांना निराश मानवतावादी, तर मुक्तिबोधांना आशावादी मानवतावादी. ही वर्णने तंतोतंत खरी असतील असे नाही. त्यांच्या कवितांवरून वाचकांना तसे वाटते. काही कवींचा दृष्टिकोन द्वंद्वात्मक असू शकेल. माझा तसा असावा.
कविता सुचते म्हणजे नेमके काय होते या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. कविता आतल्या आत असतातच. त्या बाहेर यायच्या असतात. एखादा शब्द, एखादी प्रतिमा, एखादे दृश्य, एखादे वाक्य अशी काही निमित्ते असतात. शिवाय सारखे काहीना काही मनात साचत चाललेले असते. वाचकांचा पत्रव्यवहार ही कविता तर सरळ सरळ वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रव्यवहारातून सुचली. प्रतिवादी ही कविता महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाच्या वर्तनावरून सुचली. त्यांच्या बाह्य़त: विक्षिप्त वागण्यामधून मला राजकीय दृष्टीने स्किझोफ्रेनिया झालेल्या नागरिकाचे दर्शन झाले. काळा राजकुमार ही कविता पॉल क्लीच्या चित्रावरून सुचली. नारायणराव पेशवे यांच्याविषयीच्या कविता खाडिलकरांचे भाऊबंदकी नाटक शिकवताना सुचत गेल्या. बलाचा मृत्यूमधला बल एका संध्याकाळी शिरजगाव बंड येथे रस्त्यात दिसला. अशी काही निमित्ते झाली. लहान आकाराच्या कविता लवकर लिहून होतात, दीर्घ कवितांना अधिक वेळ लागतो. दिवसच्या दिवस त्यात जात असतात. ओस झाल्या दिशा, सर्वत्र पसरलेली मुळं, योगभ्रष्ट, काळा राजकुमार, अदृष्टाचं काव्यशास्त्र, कावळे, प्रश्न, पातं आणि अलीकडची आख्यान- या सरळ सरळ दीर्घ रचना आहेत. त्या मनात येण्याची आणि कागदावर उतरण्याची प्रक्रिया जरा वेळ घेणारीच होती. दीर्घकवितेचा पस मोठा असतो. त्या लिहून झाल्यावर बरे वाटायला पाहिजे होते; परंतु काही तरी राहून गेल्याची, अपूर्णतेची जाणीव नेहमीच होते.
आपल्याला येणारे अनुभव हे गद्य वा काव्यात्म नसतात. ते अनुकूल-प्रतिकूल, सुखदु:खात्म, हवेहवेसे किंवा नकोनकोसे असतात. हे अनुभवदेखील वेगवेगळ्या पातळ्यांवरचे असतात. बसची किंवा कुठल्याही गोष्टीची वाट पाहाणे यांतही वेगवेगळ्या परी असतात, मग अन्य अनुभवांविषयी आपण कल्पना करू शकतो. भय, लज्जा, शोक, किळस हे गडद अनुभव असतात. आल्हादक, आनंददायक अनुभवही असतात. संगीत ऐकताना, पेंटिंग पाहताना होणारा आनंद. समाजातल्या जवळच्या, दूरच्या व्यक्तींच्या वागण्यातून मिळणारा आनंद. कधी चिडचिडेपणाचाही अनुभव आपण घेतच असतो. या सगळ्यांमधून कवितेचे द्रव्य साचत जाते. मग ते कोणत्या तरी प्रतिमेतून शब्दरूप घेते. एकदा उत्तराखंडमध्ये वाटचाल करत असताना रस्ता खचला, दरड कोसळली. मागे जाता येत नव्हते, पुढेही. मग त्या रस्त्यावरच्या बटाटय़ांची पोती साठवलेल्या एका खोपटात आश्रय घेतला. जवळच यमुना नदी होती. पूल होता. त्या पुलावर बसून किती तरी वेळ आम्ही ट्रेकर्स गप्पा करीत होतो. केव्हा तरी सगळेच बोलायचे थांबले. रिमझिम पाऊस पडत होता. खालच्या नदीच्या  पाण्याचा आवाज. आसमंतात केवळ पाण्याचा आवाज, बाकी काही नाही. अनुभव अगदी साधाच होता, पण हा एक विलक्षण अनुभव आहे असे वाटले होते. काही काळाने मी कविता लिहिली. त्यात म्हटले होते:
यमुनेवरच्या पुलावर मध्यरात्री
आम्ही ऐकतो हजारो वर्षांपासून वाहणारं
भूत-वर्तमान-भविष्याचं गाणं
वरचं शुष्क कवच गळत जातं
आणि आम्ही लांबवत नेलेला
याच जन्मातला पुनर्जन्म
होतो साक्षात
मी लिहितो. लिहिणे हे माझे काम आहे असे मला वाटते किंवा ती माझी सवय आहे किंवा गरज आहे. कवी, लेखक, कलावंत आपल्या आतून तंतू काढून कोळ्याप्रमाणे निर्मितीचे जाळे निर्माण करतात. त्यात कधी तरी परम अर्थ गवसेल याची ते वाट पाहात असतात असे रूपक मला आत्ता सुचले! ते असो.
देकार्तने, मी विचार करतो म्हणून मी आहे असे म्हटले होते. अस्तित्ववाद्यांच्या मते, मी आहे म्हणून मी विचार करतो. मी म्हणतो, मी आहे म्हणून मी कविता लिहितो आणि मी कविता लिहितो म्हणून मी आहे. हे दुसरे वाक्य अधिक बरोबर आहे. कविता लिहिणे किंवा एकूण लिहिणे थांबले तरी मी कदाचित असेनच, पण ते असणे म्हणजे काय असणे आहे!

‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील
शनिवारी (१० ऑगस्ट)
ज्येष्ठ अभिनेते
दिलीप प्रभावळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2013 1:01 am

Web Title: poetist vasant abaji dahake
टॅग Chaturang
Next Stories
1 अश्रूंची होती फुले
2 स्तनदा मातेसाठी आधार गट
3 गांधीजींची पट्टशिष्या
Just Now!
X