03 June 2020

News Flash

सुत्तडगुत्तड : वर्तमानाचा ऑक्टोपस

माझ्याभोवतीचे लोक फार इदरकल्याणी. त्यांच्या डोक्यात कधी काय येईल काहीही सांगता येत नाही

(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

सामान्य दीन-दलितांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुराच्या घरात उगवणारच नाही नेतृत्व असं म्हणावं तर कधीकाळी अठराविशे दारिद्रय़ातूनच उभी राहिली लढाऊ नेतृत्वाची फळी. आजचे बहुतेक ज्येष्ठ नेते त्यातलेच. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, झगडत-झगडत प्रस्थापित झालेले; पण त्यांच्याच मेंदूत हे घराणेशाहीचे विषाणू घर करून कसे बसले? वेगळा विचार करणारा औषधालाही सापडू नये, म्हणजे काय? कशी उगवत गेली ही विषवल्ली? वर्तमानाचा ऑक्टोपस आणि गटांगळ्या खाणारी सामान्य माणसं. त्यांना विकत घेण्याची आततायी स्पर्धा.

माझ्याभोवतीचे लोक फार इदरकल्याणी. त्यांच्या डोक्यात कधी काय येईल काहीही सांगता येत नाही. कधीकधी आपल्याला पारच आतून हादरवून टाकतात. त्यांना कोणीच खिजगणतीत धरत नाही. हुसकावून लावतात कुत्र्यासारखे. कारण ती सामान्य माणसं असतात.

पण सामान्य माणसाशिवाय कुणाचं चालतं का कधी? त्यांच्याच जिवावर आणि छाताडावर उडय़ा चाललेल्या असतात सर्वाच्या. ते बिचारे जगण्याच्या लढाईत हतबल होऊन निकराची झुंज देत असतात, अगतिक होत असतात. तरीही जगण्याशी दोन हात करतच असतात. अशातही त्यांच्या मेंदूत, नेणिवेत भाकरीशिवाय जीवघेण्या झटापटीशिवाय बरंच काय-काय चाललेलं असतंच. ते कधी व्यक्त करतात, कधी न व्यक्त करताच मरून जातात.

आमचे जानी दोस्त. वयाची साठी पार केलेले. आमच्यासारखेच वेगवेगळ्या चळवळीत जाजम उचला, लोटून काढा, चहा आणून द्या, कप धुऊन टाका असले उद्योग करणारे. पडेल ती कामं इमानेइतबारे केली. त्या वेळी आम्हा सर्वाना वाटायचं, उद्या क्रांती होणारच. आमचे दिवस बदलणार. नवा सूर्य उगवणार. शोषित समूहाच्या हाती सत्ता येणार. मग सगळीकडे आनंदीआनंदच.  हे असं वाटणं, जगणं आपसूक उगवलेलं होतं अशातला भाग नाही. कर्मवीर अण्णा कधीकाळी म्हणायचे, ‘‘माझ्या दाढीच्या केसांइतकी रयतेची पोरं शिकली की इथे रयतेचं राज्य येणार.’’

अण्णा इथं रयतेचा वटवृक्ष सोडून निघून गेले. त्या वटवृक्षाखाली रयतेची पोरं शिकली. तीच रयतेची शत्रू झाली. विधानभवनात रयतेची पोरं, सरकारी कचेरीत, शाळा, महाविद्यालयं, संस्था, बँका, दवाखाने, पोलिसात, व्यवसायात, कंपनीत, मॉलमध्ये, कॅफेमध्ये, इंटरनॅशनल कंपनीत, आय.टी. सेलमध्ये, रेल्वेत, एस.टी.त, विमानात, वडापमध्ये, सगळीकडे बहुजन समाजाचीच पोरं. निरपून-निरपून रक्त पिताहेत रयतेचं. आपण काय करतोय हे कळतच नाही त्यांना. इतकी बधिर, भ्रमिष्ट, बेफिकीर, निर्दयी अवलाद जन्मली कशी?

ज्यांनी जाजमं उचलली, लोटून काढलं, क्रांती होणार म्हणून बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या, लाठय़ा खाल्ल्या, तुरुंग बघितले. त्या साऱ्यांना आलेले वैफल्य. त्यांना जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. असा आमचा अगतिक साथी नेहमीच येतजात असतो. वेळी-अवेळी अस्वस्थही करत असतो. कालच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यावर हातात एक भलीमोठी यादी घेऊन माझ्यासमोर बसला. किंचित फट सापडल्यावर त्यानं यादी वाचायला सुरुवात केली – ती उमेदवारांची यादी होती. त्याला थांबवतच म्हटलं, ‘‘यादी मला पाठ झालीय. आता तू यातल्या कुणाचा प्रचार करणार तेवढं सांग.’’ तर त्यानं पुन्हा प्रतिप्रश्नच केला. ‘‘कुणाचा करू सांग?’’ मग त्याच्यासमोर माझी उसनी विद्वत्ता पाजळायला सुरुवात केली. मला थांबवतच त्यानं सुरू केलं, ‘‘भातं शेतात कुजाय लागली, सोयाबीनला मोड फुटलेत, भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच कुजून गेल्या, मिरचीनं कधीच मान टाकली, नागलीची कणसं कडसारात पुन्हा उगवाय लागली, उसाचा चोथा झालाय, बांधावरच्या बी-बिवाळ्याचं शेण होऊन गेलंय. पावसानं तर जन्माचा इदोसच करायचं ठरवलंय. त्यात या नात्यागोत्याच्या निवडणुका.’’ त्याचे डोळे आग ओकत होते. शरीराची कंपनं सहज जाणवत होती.

त्याच्या म्हणण्यात होतं तरी काय? सगळा हंगामच गेला कुजून. त्यात या निवडणुका. हा याचा मुलगा, तो त्याचा मुलगा, त्याचा व्याही, चुलता, पुतण्या, नातू, मामा, बहीण, साडू, मुलगी, नात, चुलती, मावशी, जावई, नातजावई, बायको सगळे एकाच गोतावळ्यातले. इकडेतिकडे अल्याडपल्याड या पक्षात त्या पक्षात. ज्यांची शेतं भरभरून पिकलीत चोहीकडं. या राज्यात बाकी कुणाच्या बायका बाळंतच झाल्या नाहीत की काय? कशाला हव्यात निवडणुका? सरळ आपल्या राज्याचा सातबारा या गणगोतावळ्याच्या नावावर करून टाकून विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने, सोसायटय़ा, दूध संघ, नगर परिषद यांच्या नावे करण्यात आली आहे असे स्टँप पेपरवर महाराष्ट्रातल्या जनतेने लिहून द्यायला काय हरकत आहे? निवडणुकीचा खर्च वाचेल, सामान्य कार्यकर्त्यांची नाही होणार तानपट. मारामाऱ्या, पळवापळवी, गरळ ओका, गटारात लोळा, डोकी फोडा, रक्त सांडा, अश्रुधूर, लाठीमार, धरपकड, खूनखराबा.

यात सापडलेली पोरंटोरं यांच्या गोतावळ्यातील कधीच नसतात. ती असतात आमच्या वाडीवस्तीतली, झोपडपट्टीतली, फार तर आपल्या गल्लीबोळातली. पिचतात न्यायालयात, पोलीस स्टेशनात. त्यांच्या गोतावळ्यात मात्र सुरू असते दिवाळी, फटाक्यांची आतषबाजी. माध्यमांच्या निवेदकांची, विश्लेषकांची चालू असते टिवटिव. जनता समाजकंटकांनी वेठीस धरली आहे, इत्यादी इत्यादी. ज्याच्या त्याच्या आयटी सेलमध्ये भक्त मंडळी लिहीत असतात अक्राळविक्राळ, चवचाल, घाणेरडय़ा, विकृत पोस्ट समाजमाध्यमातून. आमच्या पोराबाळांनी फक्त रक्त ओकून मरून जायचं. यांनी पाठवलेल्या पोस्ट्स फॉरवर्ड करायच्या, किंचाळायचं आणि पुन्हा भाकरीच्या शोधात दिकोपाल व्हायचं. असं बोलणारे खूपच भेटतात. वैतागतात, उदास होतात. पुन्हा आपल्या चक्रात रुतत जातात. गल्लीत, गावात, तालुक्यात, जिल्ह्य़ात, राज्यात सगळ्या ठिकाणचं चित्र सारखंच.

बक्कळ लुबाडून जमवलेल्या संपत्तीच्या जोरावर शेंबडी पोरंही होऊन जातात साहेब. कुशाग्र बुद्धीची, अमाप जनसंपर्क असणारी, समूह नेतृत्वाचे बलदंड गुण असणारी सामान्याची पोरं जाजमं उचलण्यातच आयुष्य उधळून देतात वाऱ्यावर. आतून भयंकर संतापतात, वैतागतात. मनातल्या मनातच काय काय ठरवतात. पुन्हा हताश होऊन जाजमं उचलायचा कार्यक्रम सुरू करतात. बदलणारच नाही, असंच चालू राहणार, अशी मनाची समजूत घालता घालता कुठे तरी अमरावतीत-कोल्हापुरात-डहाणूमध्ये एखादा अपवाद उगवतो. मनाला फुटायला लागते पालवी. तोवर पुन्हा तेच. ऊनसावलीचा खेळ. खराशीला येऊन जातं आयुष्य. कुठली क्रांती आणि कुठलं काय?

सामान्य दीन-दलितांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुराच्या घरात उगवणारच नाही नेतृत्व असं म्हणावं तर कधीकाळी अठराविशे दारिद्रय़ातूनच उभी राहिली लढाऊ नेतृत्वाची फळी. आजचे बहुतेक ज्येष्ठ नेते त्यातलेच. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, झगडत-झगडत प्रस्थापित झालेले; पण त्यांच्याच मेंदूत हे घराणेशाहीचे विषाणू घर करून कसे बसले? वेगळा विचार करणारा औषधालाही सापडू नये, म्हणजे काय? कशी उगवत गेली ही विषवल्ली? वर्तमानाचा ऑक्टोपस आणि गटांगळ्या खाणारी सामान्य माणसं. त्यांना विकत घेण्याची आतातायी स्पर्धा. कोण एक चुरा मटन, शिप्पीभर दारूत खरेदी करतोय, कोण माणशी दोन-पाच हजार रुपये फेकून विकत घेतोय. आपण काय विकतोय आणि काय विकत घेतोय हे कोणाला न कळावे असे भीषण वर्तमान. शिक्षित, उच्चशिक्षित, विद्यापीठात उच्चपदस्थ असणाऱ्या लोकांच्या बायका हजार-दोन हजार रुपयांच्या नोटा घेण्यासाठी हपापलेल्या. वर्तमानपत्रातून छापून येते, सोशल मीडियावर फॉरवर्ड होते, चॅनेलवाले ओरडून सांगतात हा लोकशाहीचा जल्लोष सुरू. इतकी बधिरता.

पण आपण करतोय तो विचार चुकीचाच, असंही म्हणणारे भेटले. त्यांचा बिनतोड युक्तिवाद. ‘आज निवडणूक लढवणारा कोणता गृहस्थ शेतात भांगलाय गेला होता? घाम गाळत होता? कष्टाचे पैसे वाटतो आहे कोण? मग पैसे घेणे अनैतिक कसे? आमचेच लुबाडलेले पैसे आमच्याच दारात फेकत सुटलेल्या लोकांना प्रश्न तरी विचारायचे कशाला? नकार तरी का द्यायचा?’ अशा युक्तिवादावर बोलणार तरी काय? सगळंच संपून गेलंय आपल्या आतलं. हिंस्र श्वापदांनी घेतलाय आपला ताबा. आपण फक्त भक्ष्य म्हणून उरलोय. माणूसपण कधीच संपवून टाकलंय साऱ्यांनी. भक्ष्य म्हणून उरलेल्या सामान्य माणसानं सरावैरा धावत जीव मुठीत धरून जगणं वाईट कसं म्हणता येईल? सामान्य माणूस वाचला तरच व्यवस्था बदलण्याची शक्यता. असलं काय-काय उगाच सुरू असतं मेंदूच्या आतबाहेर. प्रचंड शक्तिपात होऊन अगतिक झालेलो असतो आपण. मेंदूचं खोबरं. जगण्याची इच्छाच उडून जाते.

..तेव्हा आठवतात सदाशिव दादोबा मंडलिक. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले. सामान्य माणसाचे प्रतिनिधी.. वडील कोरडवाहू शेतकरी. ‘श्रम हेच जीवन’ असं मानणाऱ्या घरात जन्मलेले सदाशिव दादोबा मंडलिक अनेक वेळा आमदार, मंत्री, खासदार. तालुक्याची संपूर्ण राजकीय चौकटच अशी घडवली, की या तालुक्यात कोणत्याही पक्षाला प्रचार कुठं करायचा, हाच प्रश्न. प्रत्येक घर शिक्का मिरवतच उभं असतं. हा मंडलिक गटाचा किंवा त्यांच्या विरोधी गटाचा. घर फुटण्याची शक्यता नाही. विचार बदलण्याची तर शक्यताच नाही. जगतील गटासाठी, मरतील गटासाठी. तडजोड अमान्य. पक्षांतर तर केवळ अमान्य. महाराष्ट्रातील अपवादात्मक उदाहरण. जातपात, राजकीय पक्ष इत्यादी इत्यादी सारंच हद्दपार. अशा मंडलिक साहेबांचे खंदे कार्यकत्रे आमचे सहकारी व चळवळीतील मित्र

डॉ. आनंद वास्कर. ते मंडलिक साहेबांचे कधीकाळचे स्वीय सचिव. त्यांच्यामुळे आमचा मंडलिक साहेबांचा परिचय. त्यांच्या बोलण्यात सतत मंडलिक साहेब.

एकदा भल्या पहाटे म्हणजे चक्क ५ वाजता त्यांनी मला झोपेतून उठवलं. म्हणाले, ‘‘कोल्हापूरला जायचंय.’’ आम्ही काय सडेफटिंग. पाच-दहा मिनिटांत त्यांच्याबरोबर रस्त्याला. आम्ही कागल सोनाळी गावात दाखल. तिथे मंडलिक साहेबांचे आणखी एक कार्यकत्रे, बी. एस. पाटील, ते वाटच बघत थांबलेले. आमच्या मोटारसायकली कोल्हापूरच्या दिशेने धावायला लागल्या. त्या वेळी मंडलिक साहेब पेठेत राहत असत. त्यांच्या दारात पोहोचायला सकाळचे ८ वाजलेच. घराचं दार कार्यकर्त्यांसाठी चोवीस तास उघडंच असायचं. आम्ही बठकीच्या खोलीत जाऊन टेकलो. समोर वर्तमानपत्रांचा ढीग.

आम्ही एकेक वर्तमानपत्र पालथी घालत असतानाच साहेब तयार होऊन आले. उठून नमस्कार-चमत्कार झाले. साहेब बसता बसताच म्हणाले, ‘‘बोला आनंदराव, काय काम काढलं?’’ हे स्वाभाविकच. वास्कर त्यांचे जिवाभावाचे. मी तर अंग चोरून. वास्करांनी

बी. एस. पाटलांकडे नजर टाकली. ते तर एकदम मान टाकून बसलेले. साहेबांसमोर कोण बोलणार? बराच वेळ स्तब्धता. पुन्हा साहेबांचा आवाज. ‘‘बोला, आनंदराव.’’ शेवटी वास्करांनी धाडस जमवले. म्हणाले, ‘‘साहेब, आता जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होत आहेत.’’ साहेबांनी भुवया उंचावून बघितलं. म्हणाले, ‘‘मग तयारी झालीय की नाही?’’ साहेबांचा उलटा प्रश्न. वास्करांनी मान हलवत म्हटलं, ‘‘साहेब, आम्ही म्हणतोय, या इलेक्शनला निढोरी मतदारसंघातून..’’ वास्कर थांबले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. साहेब गंभीर. म्हणाले, ‘‘काय झालं? तुमच्यापैकी कोणी लढणार का?’’ सर्व जण स्तब्ध. शेवटी वास्कर म्हणालेच, ‘‘निढोरी मतदारसंघातून राजूला उभं करा, असं लोकांचं मत आहे.’’ राजू म्हणजे साहेबांचा मुलगा संजय मंडलिक. आजचे कोल्हापूरचे खासदार. साहेबांचा चेहरा क्षणातच लालबुंद झाला. पहिल्यांदा तीनचार कोल्हापुरी शिव्या हासडल्या. मग म्हणाले, ‘‘आनंदराव, तुम्ही त्यानं अभ्यास करावा, चांगलं शिकावं, ज्ञान मिळवावं असं सांगायचं सोडून निवडणूक लढवाय सांगाय आलाय. मास्तर आहात का कसाई?’’ सगळे गप्पगार! नंतर अर्धा तास साहेब फक्त शिव्याच देत होते. त्यांच्या डोळ्यांत रक्त उतरलं होतं.

आपण चुकलोय, हे वास्करांच्या लक्षात आलं होतं; पण शिव्या खाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साहेब बोलत होते, ‘‘त्याला नीट परीक्षा द्यायला सांगा. चांगले मार्क्‍स हवेत, असंही सांगा. त्याला माझा पाठिंबा; पण तुम्ही दुसरंच सांगाय आलाय. म्हणे, राजूला निवडणुकीला उभं करा आणि कार्यकत्रे काय झोळी घेऊन भीक मागत फिरू देत? त्यांनी माझ्यासाठी काय खस्ता खाल्ल्यात हे ठाऊक आहे का तुम्हाला?’’ साहेबांचा प्रश्न. अशात चहा घेऊन नोकर आला. तर साहेबांनी त्याला थांबवलं आणि आम्हाला बिनचहाचंच हाकलवून लावलं. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांला त्यांनी उभारी दिली. कधी जातपात, धर्म बघितला नाही. उलट अल्पसंख्याक हसन मुश्रीफांना राज्याच्या नेतृत्वात अधोरेखित केलं. काळ पालटला. वर्तमानाचा भोवरा गरगरून उलटा फिरला. भोवतालच्या गरगरत्या वर्तमानानं मंडलिक साहेबांनाच अगतिक केलं; पण ते हतबल झाले नाहीत. परिस्थितीला शरण मात्र निश्चित जावं लागलं; पण आतली जनसामान्या विषयीची तळमळ कधीच कमी होत गेली नाही.

अगतिकतेवर मात करून, परिस्थितीला शरण जाऊन, मुलाला राजकारणात उभं करावं लागलं. ते त्यांनी केलंही; पण मनातली बोच. सामान्य कार्यकर्त्यांविषयीची आस्था शेवटच्या श्वासापर्यंत अखंडच राहिली. मनात खंत ठेवून त्यांना जावं लागलं. अक्राळविक्राळ, भयावह, भेसूर झालेल्या परिस्थितीनं त्यांना बदलवलं. ती परिस्थिती आज इतकी विकोपाला गेली की, कुठं काही धूसरही दिसण्याची शक्यता नाही. सामान्याला संपवणारे आवाज आता गगनाला भिडले आहेत. आकाशच फाटलं आहे. ठिगळ लावायचं तरी कुठं आणि कोणी?

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 4:12 am

Web Title: political royalty suttadguttad rajan gavas abn 97
Next Stories
1 सरपंच! : सर्वसमावेशक विकासगाथा
2 आभाळमाया : मर्मबंधातली ठेव ही!
3 दुर्गा पुरस्कार.. प्रेरणेची प्रकाशबीजं
Just Now!
X