04 March 2021

News Flash

बाईमाणूस?

खेडं जगलं आहे फक्त बाईच्या श्रमावर आणि बाईच्याच भरवशावर. पण हे कळणार कधी?

|| राजन गवस

खेडं जगलं आहे फक्त बाईच्या श्रमावर आणि बाईच्याच भरवशावर. पण हे कळणार कधी? कोणास? आजही तिला माणसात जमा धरायला कोणीच तयार नाही. आज खेडय़ात डुईवर भारा घेऊन चालणारी बाईच आहे. काखेत कळशी घेणारी बाईच आहे. रांधणारी, उष्टं खरकटं काढणारी बाईच. चौकात चर्चा करणारी मात्र माणसं आहेत. त्यांच्या दृष्टीने खेडय़ात कष्टकरी उरला नाही, शेतमजूर मिळत नाही, शेती धोक्यात आली पण ‘आजवर ही शेतीभाती, गावगाडा बाईनंच चालवत आणला.’ असं म्हणायला कुणाची जीभ उचलत नाही. ती माणसात जमा कुठं होती? कसे मोजायचे तिचे श्रम? आणि तिला कसे म्हणायचे माणूस?

‘औताला बल आणि घराला बाई, घट्ट पाहिजे, तरच संसार!’ गावगाडय़ात, खेडय़ापाडय़ात सगळे जणच हे वाक्य सतत घोकत असतात. औताला बल घट्ट तर औतपाणी, शेतीभाती, नाहीतर काहीच खरं नाही. तसंच घरातील बाई घट्ट असली तर संसार, तीच धड नसली तर कसला संसार? ऐकायला, उच्चारायला बरं वाटतं वाक्य. पण डोक्यात घुसलं की आपणच आतल्या आत बेचन व्हायला लागतो.

बलाचं आणि बाईचं जगणं सारखंच? बलाचं सगळं जगणं मालकाच्या मर्जीवर. त्यानं घातला तर पोटाला चारा. त्यानं ठेवलं उपाशी तर तक्रार कोणाकडे करायची? त्याच्या मेहनतीला मोजमापच नाही. त्यात मालकाचा चाबूक सतत उगारलेला. बाईचं तरी दुसरं काय? बलाला किमान ‘वळवा’ टाकायचं स्वातंत्र्य. आलाच खराशीला तर बल बसकण मारू शकतो. फारतर म्हणतील, बशाबल! हाणतील दोन-चार चाबकाचे फटकारे पण बाईला तितकंही स्वातंत्र्य नाही. ती २४ तास कामाला जुंपलेली. पण तिच्या श्रमाची नोंद नसते कोणाजवळ. उलट सगळ्यांच्याच तोंडात, ‘बाईला असतं काय काम?’ चूलमूल, धुणीभांडी, संपलं बाईचं आयुष्य. बलाला पोळ्याच्या दिवशी तरी विश्रांती. बाईनं ‘विश्रांती’ हा शब्दच उच्चारायचा नाही अशी ही सगळी व्यवस्था. आता शेतात ट्रॅक्टर आलं, मिनी ट्रेलर आला. बलांना थोडातरी विसावा. काही ठिकाणी तर बलच हद्दपार व्यवस्थेतून. बाई मात्र तशीच जुंपलेली व्यवस्थेला, घराला, गोतावळ्याच्या घाण्याला!

हे सगळं आजच मनात यायला कारण सखू आजी. आळीची ना वळीची. नात्याची ना गोत्याची. पण गावात सगळ्यांच्या तोंडात तिचं नाव. गावात कोण बाळंतीण झाली, सखू आजी हजर. कोण गचकलं तर सगळ्या तयारीला सखु आजीच लागायची. सूप आणा, लोटकं आणा, राजिगरं आणा या सगळ्या सूचना तिच्याच. भांडण-तंटय़ात एकदम सत्याच्या बाजूनं. लांडी-लबाडी खपायची नाही तिला. भलेभले रस्ता चुकवून जायचे तिचा. गावात पहिल्यांदा खंदाडी घातली तिनं. औतावर उभी राहिली वाघिणीसारखी. गावात नांदायला आली तर सासू तिला मोजून वाढायची आणि बाहेर जाताना भाकरी कुलपात ठेवायची. सखु आजी वस्ताद. एका हिसक्यात नागोश्यासह कुलूपच काढून फेकायची. सकाळी पाचपासून कामाला जुंपून घ्यायची. रात्री मध्यान्हीला भांडीकुंडी आटोपून मोकळा श्वास घ्यायची. ती गेली तेव्हा तिच्यावर एक बारीक टिपण लिहिलं कुठल्यातरी वर्तमानपत्रात. तेच आलं अभ्यासक्रमात. कुठल्यातरी पाठय़पुस्तकात. शिकवणारे गृहस्थ विचारत होते, ‘‘खेडय़ापाडय़ात अशा बाया असतात का? अनाकलनीय.’’ एकदम चक्रावलोच. म्हटलं, ‘‘यात अनाकलनीय काय? ती बाई जशी जगत होती तशीच्या तशी मांडलीय शब्दात.’’ तर विचारायला लागले तिसरंच काहीतरी. मग हे वर्गात काय शिकवत असतील असं मनात आलं काहीकाही. प्रचंड वैताग. मनात आलं आपल्याला तरी कुठं समजलीय गावगाडय़ातील बाई? आपल्या भोवती वावरते, आपल्या समोर खपते, हाडाची काडं करते, झिजून-झिजून मरून जाते. आपल्याही ध्यानात आलंच नाही तिचं जगणं.

गावगाडय़ात सगळीच व्यवस्था पुरुषकेंद्रित. सगळेच व्यवहार पुरुषांच्या हातात. जत्राखेत्रा असो की लगीन वऱ्हाड; सगळ्याचा मानकरी पुरुष. पालखी उचला नाही तर तिरडी उचला, खांदेकरी पुरुषच. गावचं ग्रामदैवत पुरुष असो अथवा स्त्री, क्षेत्रपाल दैवत पुरुष असो अथवा स्त्री, पुजारी मात्र पुरुषच. पाटीलकी असो नाहीतर गावकी, ती असते पुरुषाच्याच नावानं. गावगाडा म्हटला की, मनात रुतून बसतो पुरुषच. बाईला अवसरच नाही. कुठल्याही व्यवस्थेत. म्हणजे गावगाडा पुरुषांचाच असतो. बाई या साऱ्यांपासून कितीतरी मल दूरवर. जिवंत वावरत असूनही तिच्या अस्तित्वाची कोणतीच खूण नाही गावात. गावात असतात फक्त तुळजाई, म्हाळसाई इत्यादी इत्यादी देवता. शेतीभातीचा तारणहार फक्त पुरुषच. गुराढोरांचा सांभाळ करतात फक्त पुरुषच. दुखतं खुपतं ते फक्त पुरुषालाच. मग बाई कुठे असते गावगाडय़ात? घरात पुरुष, रानात, देवळात, जमावात, सणात, उत्सवात सगळीकडे फक्त पुरुष आणि पुरुषच. सहज कुठल्याही खेडय़ात, वाडीत, वस्तीत, नात्यात सहज हाक मारून विचारावं, कोण आहे घरात? तर घरातील बाईच सांगते, ‘मान्सं नाही घरात.’ ‘मग बाई तू कोण?’ हा प्रश्न आपल्यालाही पडला नाही. त्या बाईला पडणं दूरच. खेडय़ापाडय़ातल्या, वाडय़ावस्तीतल्या बाया आपल्याला माणूस का म्हणत नसतील? कोणाला विचारावं? कोण सांगेल नेमकं उत्तर?

त्र्याण्णव वर्षांची आई घरात आहे. साठ वष्रे तिच्या सोबत घालवली. कळायला लागल्यापासून दिनक्रम ठरलेला. भगटायला उठायची. चुलीतली राख काढून चूल भानुशीला पोतेरा. हळदी कुंकवाच्या पाच ठळक टिकल्या. मग चूल पेटवली की धगधगत्या चुलीसमोर पाच पन्नास भाकरी. भानुशीवर कोरडय़ा-बिरडय़ास कडखोपडय़ाचा कचरा काढता काढता आंघोळीच्या चुलीवर भलामोठा हंडा त्याला जळणबिळण. त्यातच चिरणं-खुडणं आलंच. ते आवरता-आवरता खुराडय़ाच्या कोंबडय़ा, शेरडं-करडं बाहेर बांधणं. त्यांचं सगळं आवरलं की गोठय़ात घुसणं. पाच-पंचवीस बुट्टय़ा शेण. त्यांच्या गोवऱ्या थापल्या, की घरातली मंडळी उठलेली असायची. त्यांचं हवं नको. तोवर शाळेला जाणाऱ्या काटर्य़ाचा धुडगूस. ताक करा, लोणी काढा. तोवर एखादा उपटसुंभ यायचाच घरात, ‘‘काय वहिनी चहापाणी झालं का?’’ त्यांना चहा करणं आलंच. अशात सगळ्यांचं जेवणखाणं, भांडय़ांचा ढीग. कपडय़ांची ही थप्पी. माणसं गेली शेताकडं त्यांच्या दुपारच्या जेवणाची बांधाबांध. एका बुट्टीत जेवणखाण. त्यावरच्या बुट्टीत धुणी. विहिरीवर धुणी पिळली की शेताच्या बांधावर गेल्या गेल्या शेत काम सांगायला उभं असायचं. वेचणी-बोचणी, बांध ओढणं-बांध टोकणणं, भांगलणीला बसा. सगळा जमलेला पालापाचोरा काढून टाका. कोळपं धरा, कोळपं ओढा, माणसं जेवायला बसली वाढणं-काढणं. पुन्हा पदर खोचून माणसांबरोबर कामाला. या सगळ्या श्रमाची नोंद कोणी घेतली कुठल्या पुस्तकात?

शेतातून घरात आलं. माणसं निवांत. आई चुलीत आयुष्य जाळत. तितक्याच भाकरी, तितक्याच भांडय़ांचा ढिगारा. सगळे घोरायला लागले तरी तिच्या भांडय़ांचा खणखणाट. आई झोपते कधी? उठते कधी कळलेच नाही. आयुष्यात तिचे हातपाय थकेपर्यंत घर चालवलं, घर वाढवलं, घर जगवलं कुणी? आहेर-माहेर बघितलं तिनं. लेकीबाळींची बाळंतपणं, सासरमाहेरही सांभाळलं तिनं. गोतावळा वाढवायचा, गोतावळा सांभाळायचा तिनंच. देवदेवस्की, रीतीभाती, सणउत्सव यात मरमर मरायचं तिनं. कुणाला ठेच लागली, कुणाला ताप आला, कोण अंथरुणाला डसलं तिनंच विचारायचं हवं-नको. तिला अंथरुणावर पडायची मुभाच नव्हती तिच्या आयुष्यात. दुखलं-खुपलं सोसायचं. अतीच झालं तर रांगत-घसटत तिनंच निस्तरायचं. आजार माणसांना. तिला त्याचीही बंदीच, अघोषित. ती माणसात जमा कुठं होती? कसे मोजायचे तिचे श्रम? आणि तिला कसे म्हणायचे माणूस?

गावच्या गल्लीत, पारावर बसावं तर अलीकडे एकच चर्चा. आता गावात शेतीचं काही खरं नाही. ज्याच्या घरात चार माणसं राबणारी आहेत त्याची शेती. माणसामाणशी श्यात-भात करायचं दिवस गेलं. माणूस मिळायला तयार नाही. या पिवळ्या कार्डानं घोळ केला. महामूर धान्य मिळायला लागलं रेशनला. निम्मं विकायचं, निम्म खायचं. कशाला लागतंय राबायला. माणसाला माणूस मिळायला तयार नाही. त्यात या पावसाचं असं. येईल याचा भरवसा नाही. तगणार कसं खेडं? श्रमकरी, कष्टकरी माणसं रोडावत चालली गावात. यात पुन्हा शिकल्या-सवरल्यांची भर. त्यांना गोठय़ाचा उंबरा माहिती नाही की शेतीचा बांध. फक्त गावातल्या चकाचक रस्त्यावरून फिरणारी, मिरवणारी ही पिढी घरच्यापेक्षा धाब्यावर, पानपट्टीवर आणि तालुक्यावर यांचा वावर. घरातल्या काडीला मदत नाही. यांच्याच उठबशीत निम्मा जीव जातो बाईचा.

शेतीभातीत नवी यंत्रं आली; यांनी माणसाचं काम हलकं केलं, बलाला हद्दपार केलं, पण बाईचं काम मात्र अधिकच वाढवून ठेवलं. ट्रॅक्टरचे पाने, नटबोल्ट जपून ठेवायचे बाईने, मोटारीच्या वायरी, घरातील विजेच्या साहित्याची देखभाल करायची बाईनेच. खताच्या पिशव्या, औषधाच्या बाटल्या कडखोपडा शोधून त्याची उस्तवार लावायची बाईनं. कोणत्याच यंत्रानं बाईचं जगणं केलं नाही सुसह्य़. फाटलंतुटलं, मोडलंधाडलं, फुटलंबिटलं तर सगळ्याला जबाबदार बाईच. यात्राजत्रा आली, सणवार आला घराचं सारवण काढायचं तिनंच. वाकळाचादरी नदीला नेऊन आपलंही आयुष्य धुऊन काढायचं, तुडवून काढायचं नदीच्या पाणोठय़ावर. आत्ता गावात गवताची पेंडी डोक्यावरून आणणारा पुरुष दिसणारच नाही कुठल्या खेडय़ात. टू-व्हीलरच्या पाठीमागे गवताचा भारा बांधून सुसाट धावत असतात मोटरसायकली. ज्यांच्याकडं वाहन नाही त्यांनी पाण्याच्या गाडय़ात रचलेली असते पेंडी. बाईच फक्त चालत असते अनवाणी. दळणकांडप, बी-बिबवाळा, कुळी-नांगर तिनंच सांभाळायचा अडगळीत. दारात गप्पा मारणाऱ्यांची मजुरीवर चर्चाच चर्चा. आता माणसाला पगार तीनशे, बाईला मात्र दीडशे. म्हणजे माणसापेक्षा बाई निम्मेच राबते असे गृहीत. श्रमाच्या मोजणीत कुठेच नाही बाईला झुकते माप. सगळ्या पुरुषकेंद्री चर्चा. यात बाईला कोणी जमेतच धरायला तयार नाही. ती आहे जशी पूर्वी होती तशीच आजही.

खेडं जगलं आहे फक्त तिच्याच श्रमावर आणि तिच्या भरवशावर. पण हे कळणार कधी? कोणास? आजही तिला माणसात जमा धरायला कोणीच तयार नाही. आज खेडय़ात डुईवर भारा घेऊन चालणारी बाईच आहे. काखेत कळशी घेणारी बाईच आहे. रांधणारी, उष्टं खरकटं काढणारी बाईच. चौकात चर्चा करणारी मात्र माणसं आहेत. त्यांच्या दृष्टीने खेडय़ात कष्टकरी उरला नाही, शेतमजूर मिळत नाही, शेती धोक्यात आली पण आजवर ही शेतीभाती, गावगाडा बाईनंच चालवत आणला असं म्हणायला कुणाची जीभ उचलत नाही.

बाईचे श्रम, बाईचे दु:ख, बाईची ओढाताण विचारात घ्यायला बाईही तयार नाही. या दुहेरी शोषणाचा विचार मुक्तीवाल्या बाया तरी कधी करणार? खेडय़ापाडय़ातील बायाबापडय़ांचं जगणं आणि शहर, निमशहरातल्या, महानगरातल्या बायांच्या जगण्यात कैक मलाचं अंतर आहे. अशा या बाईचा विचार करणारा कोणीच शिल्लक असू नये हे खरं दु:ख आहे. शहरात जगणाऱ्या, वावरणाऱ्या माणसाला बाई टीव्हीच्या स्क्रीनवर, ऑफिसातील मॉनिटरवर, मंत्रालयातील डेस्कवर, चित्रपटाच्या पडद्यावर, जाहिरातीतील मजकुरावर दिसते गोंडस प्रिय वस्तू. पण खेडय़ापाडय़ातल्या राबणाऱ्या, रापलेल्या बाईचा चेहरा कुठंच दिसत नाही या साऱ्यात. तिला माणूस म्हणवणाऱ्या व्यवस्थेचा शोध कधी लागेल का? या प्रतीक्षेत ती आजही आहे आमच्या-तुमच्या एकविसाव्या शतकात.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:03 am

Web Title: poor women in village india mpg 94
Next Stories
1 विकासाची ‘प्रांजळ’ जिद्द
2 वाटेवरच्या काचा वितळताना..
3 कळ्या जपताना..
Just Now!
X