18 November 2019

News Flash

शिक्षण सर्वासाठी : पोतराजाची मुले नापास?

पुण्यात, खडी मशीन चौकाजवळ पोतराज समाजाची एक वीस-पंचवीस घरांची लहानशीच वस्ती आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रजनी परांजपे

पोतराज वस्तीत आम्ही पहिल्यांदा शिरलो ते २०१२-१३ मध्ये. ‘स्कूल ऑन व्हिल्स’च्या बसमध्ये चौदा-पंधरा मुलांचा तास दोन तासांचा वर्ग सुरू झाला. पण मुले नियमित शाळेत येईनात. मंगळवार, शुक्रवार देवीचे वार, कमाईचे दिवस आणि मुले नसतील तर कमाई कमीच होणार हे ठरलेले. त्यातच फेब्रुवारी महिना उजाडला आणि वस्ती तेथून उठली. पोतराज मंडळी या हंगामामध्ये चिंचा तोडण्याचे आणि फोडण्याचे काम करतात हेही परंपरेनेच चालत आलेले. पण मुलांच्या शिक्षणात त्याने खंड पडतो आणि नित्यनियमाने तसा तो पडतच राहणार त्याचे काय?

पुण्यात, खडी मशीन चौकाजवळ पोतराज समाजाची एक वीस-पंचवीस घरांची लहानशीच वस्ती आहे. पोतराज म्हणजे ‘कडकलक्ष्मी.’ लहानपणी रस्त्याने जाता-येताना, थोडा वेळ का होईना; पण ‘कडकलक्ष्मी’ बघितली नाही असा माणूस विरळाच. कमरेपासून गुडघ्यापर्यंतचे शरीर झाकलेले, रंगीबेरंगी कापडाचा स्कर्ट असावा तसे काहीतरी कमरेला गुंडाळलेले. बाकी अंग उघडेच. कपाळ कुंकवाने भरलेले, पायात खणखणीत आवाज करणारे चाळ, अंग तेल लावल्याप्रमाणे तुकतुकीत. हातात एक भयंकर वाटणारा आसूड आणि ढोलकीच्या तालावर काहीतरी बोलत बोलत त्याचा स्वत:लाच मारत सपकन काढलेला आवाज. ऐकताच माणूस दचकून एकदम समोर बघणारच. बरोबर कपाळावर मळवट भरलेली, डोक्यावर टोपली घेतलेली, टोपलीत कडकलक्ष्मीचा फोटो नाहीतर मूर्ती ठेवलेली. नवरा आसूडाचे फटके ओढत असताना त्याला गळ्यात अडकवलेल्या ढोलकीचा ताल धरणारी बाई -आणि हे थरारनाटय़ थांबल्या थांबल्या गर्दीत मिसळून चवल्या-पावल्यांची कमाई करणारी मुले असा तो एकंदर नटसंच!

पोतराजांचे दैवत ‘कडकलक्ष्मी.’ पोटापाण्याचा व्यवसाय नवरा-बायको आणि मुले मिळून करायचा. अंगाला न लागता जोरदार आवाज काढून आसूडाचे फटके मारून घेणे हे धंद्यातले कौशल्य. कमाई बऱ्यापैकी होत असावी. कडकलक्ष्मीच्या नावाने प-पका टाकणारी, दानधर्म करणारी माणसे असतातच. पोतराज, वासुदेव, कडकलक्ष्मी, नंदीवाले अशी मंडळी लहानपणी पुष्कळ भेटलेली. अजूनही अधून-मधून रस्त्यात दिसतात, पण त्यांच्याकडे आपण सामान्य माणसे म्हणून कधी बघितलेले नसते. म्हणजे ही कुठून येतात, कुठे जातात, काय जेवतात, खातात, शाळेत जातात का, शिकतात का असे प्रश्न त्यांना बघून सहसा आपल्या मनात येत नाहीत.

पोतराज वस्तीत आम्ही पहिल्यांदा शिरलो ते २०१२-१३ मध्ये. आमच्या ‘एकेक मूल  मोलाचे’ या नागरिक अभियानाचा भाग म्हणून. ‘एकेक मूल मोलाचे, एक नागरिक अभियान’, हा प्रकल्प आम्ही सुरू केला तो नोव्हेंबर २०११ मध्ये. २०१५ पर्यंत जगभरातील सर्व शाळाबाह्य़ मुले शाळादाखल झालेली असली पाहिजेत, असा एक संकल्प युनायटेड नेशन्स (यूएन)कडून जाहीर झाला. आपल्याकडून जमेल तसा हा संकल्प सिद्धीस नेण्याचा आपण प्रयत्न करावा, या हेतूने संपूर्ण पुण्यात ‘शाळाबाह्य़’ मूल राहणार नाही या उद्देशाने काम सुरू केले. पद्धतशीरपणे कानाकोपऱ्यात वसलेल्या वाडय़ा-वस्त्यांचा तपास सुरू केला. त्या तपासातच मिळालेल्या निरनिराळ्या वस्त्या, तेथे भेटलेली माणसे, त्यातून आलेले अनुभव यातूनच ‘सर्वासाठी शिक्षण’ हे दोन शब्द हिमालयाचे शिखर सर करण्याइतकेच अवघड आहेत हे लक्षात आले.

तर, पोतराज वस्तीत आम्ही शिरलो. येथल्या झोपडय़ा पुष्कळशा इतर ठिकाणच्या झोपडय़ांसारख्या, निळ्या-पिवळ्या प्लास्टिक कापडांनी झाकलेल्या पण आतून जरा प्रशस्त, चांगल्या सारवलेल्या, स्वच्छ कोपऱ्यात कडकलक्ष्मीचा देव्हारा, भांडीकुंडी नीटनेटकी मांडलेली, पाणी, वीज वगैरेची टंचाई तशीच असली तरी मुले माणसेही तुलनेत नीटनेटकी आणि स्वच्छ राहणारी. वस्तीत शिरलो आणि घराघरांत जाऊन मुले शाळेत जातात का याची चौकशी सुरू केली, पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळेना. उत्तरे जेवढय़ास तेवढी, वरवर सकारात्मक पण नुसते बोलण्यापुरतेच.

पण तेवढय़ात एका आजोबांनी आम्हाला कानमंत्र दिला. ‘‘बायांनो, आमचे सरपंच आहेत. ते सांगतील तसेच आम्ही करतो. सरपंचांना भेटा. त्यांनी सांगितले तर सर्व वस्ती गोळा होईल. नाहीतर एकजणही तुमच्याकडे लक्ष देणार नाही.’’ आणि झालेही तसेच. वस्तीत एकहीजण शिकलेला नव्हता. सरपंचाचे घरही त्याला अपवाद नाही. मुले शाळेत घालावीत, त्यांना शिकवावे, हा विचारही केलेला नाही. मुलांचे ‘धंदेशिक्षण’ तर घरच्याघरी आणि वस्तीतल्या वस्तीत होतच होते. पण वरचेवर भेटून, निरनिराळया गोष्टींचे दाखले देऊन, मुलांना निदान आमच्या गाडीत तरी तास दोन तास पाठवा इथपर्यंत सरपंचांच्या मनाची तयारी केली. मग वस्तीवर पालकांची बैठक घेतली. सरपंचांनी हिरवा झेंडा दाखवला. आणि ‘स्कूल ऑन व्हिल्स’च्या बसमध्ये चौदा-पंधरा मुलांचा तास दोन तासांचा वर्ग सुरू झाला. सरपंचांची नातही वर्गात दाखल झाली. मुले स्वच्छ येत. वर्गामध्ये स्थिर बसत. शाळापूर्व तयारीचे हे दोन टप्पे वगळून शिकवायला सुरुवात करता आली.

चौकापासून कॉर्पोरेशनची शाळा जवळच आहे. मुलांची शाळेत नावेही घातली आणि रस्ता रहदारीचा म्हणून मुलांना शाळेपर्यंत नेण्या-आणण्यासाठी वाहतुकीची सोयही केली. एवढे करूनही मुले नियमित शाळेत येईनात. धंद्याचे दिवस तर ती गैरहजरच असणार हे ठरलेले. मंगळवार शुक्रवार देवीचे वार, कमाईचे दिवस आणि मुले नसतील तर कमाई कमीच होणार हे ठरलेले. तरीही बसच्या वर्गात मुले बऱ्यापैकी हजर असत. कारण बसची वेळ त्यांच्या सोयीने मागेपुढे करता येई. एकूण प्रगती होती. थोडे स्थिरावल्यासारखे वाटत होते तोच फेब्रुवारी महिना उजाडला आणि वस्ती तेथून उठली. म्हणजे झोपडय़ा जागेवरच होत्या. घरातली वृद्ध माणसे, सरपंचसुद्धा वस्तीवरच होते, पण तरुण मंडळी बायकामुलांसकट तेथून हललेली. हा हंगाम चिंचांचा. उसाचा हंगाम, विटांचा हंगाम हे ऐकलेले, पण चिंचाचाही हंगाम असतो हे प्रथमच कळले. त्याप्रमाणे पोतराज मंडळी या हंगामामध्ये चिंचा तोडण्याचे आणि फोडण्याचे काम करतात हेही परंपरेनेच चालत आलेले. असो बिचारे. पण मुलांच्या शिक्षणात त्याने खंड पडतो आणि नित्यनियमाने तसा तो पडतच राहणार त्याचे काय?

हंगाम साधारण मेअखेर होईपर्यंत चालतो. पावसाळ्यांपर्यंत मंडळी मुक्कामाला परत येतात. शाळा परत चालू होते. वयात आल्या की मुली शाळा सोडतात. मुलगे चवथी-पाचवीपर्यंत पोहोचली की शाळा सोडतात. गेली पाच सहा वर्षे हे चक्र चालू आहे. नवीन मुलांना शाळाभरती करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागत नाहीत. एवढे सोडले तर शिक्षण म्हणावे असे फारसे घडत नाही. मुले साक्षर होतात, पुस्तके वाचू शकतात. पण वसुदेवाच्या पेल्याप्रमाणे तेथपर्यंत पोहोचतात तो शाळा सुटते. पहिल्या वर्षी हे आम्हाला माहीत नव्हते. सरपंचांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या नातीला तिची शाळा चालू राहावी म्हणून मागेच ठेवले होते. त्यांनी सांगितले की टोळी सध्या सासवडात आहे. पण सासवडलाच राहील असे नाही. चिंचेची काही मोठी मोठी शेते किंवा मळे नसतात. झाडे शेताच्या बांधांवर, इकडे-तिकडे विखुरलेली असतात. त्यामुळे हंगामभर एका ठिकाणी राहणे नसते. एकीकडचे काम संपले की दुसरीकडे जायचे. ठेकेदार असतोच. अंगावर पैसेही घेतलेले असतात. तसे म्हटले तर एकेका टोळीची हिंडण्याची ठिकाणेही बऱ्यापैकी ठरलेली असतात. पण कुठल्या जागी किती दिवस ते मात्र किती दिवस काम चालेल त्यावरच ठरते.

उसतोडणी कामगारांचेमध्येही अशा टोळ्यांनी हिंडणारी मंडळी असतात. एका जागी कमीत कमी पाच सहा महिने राहणारे निराळे. त्यांच्यासाठी आपण त्यांनी स्थलांतरित ठिकाणच्या शाळातून जावे अशी व्यवस्था करू शकतो. पण सतत स्थलांतर करणाऱ्यांची अडचण पोतराजांच्या मुलांसारखीच. जवळपासच्या शाळातून जायचे म्हटले तरी कसे आणि किती दिवस हाच मुख्य प्रश्न. मुले तर सगळीकडे आहेत आणि असणारच; पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. एकाच्या अंगाचा कपडा दुसऱ्याला बसेल असे नाही. पण सर्वाना कपडे तर हवेतच. ते त्या त्या मापाने कसे शिवायचे याचे उत्तर सापडेपर्यंत ‘सर्वासाठी शिक्षण’ हे केवळ कागदावरच राहणार यात शंका नाही. आणि हेच समाजाचं आणि पर्यायाने राज्याचे, देशाचे नुकसान आहे.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

First Published on June 22, 2019 1:01 am

Web Title: potraj school on wheels bus rajni paranjape abn 97
Just Now!
X