डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

शरीराची रोगप्रतिकारशक्ती हा गहन विषय आहे. आरोग्याच्या बाबतीतला आपला दृष्टिकोन, त्यानुसार घडणारं वर्तन, आपण जे खातो ते अन्न, आजूबाजूचं वातावरण, शरीराची मूळची जनुकीय घडण, अशा किती तरी गोष्टी रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. ‘करोना’नं जगभर दहशत पसरवल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे अन्नपदार्थ, पेयं, औषधं घेण्याचं पेवच फु टलं. अशा खाद्यपदार्थाबाबतच्या सामान्यांना गोंधळात टाकणाऱ्या अनेक जाहिराती हल्ली पाहायला मिळतात. या विषयातला आपला गोंधळ दूर करायचा असेल तर आधी रोगप्रतिकारशक्ती काम कसं करते. ती कशी वाढवता येते हे जाणून घ्यायला हवं.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

‘न्यूट्रास्युटिकल’ हा शब्द ‘न्यूट्रिशन’ म्हणजे पोषण आणि ‘फार्मास्युटिकल’ म्हणजे औषधे या दोन शब्दांपासून बनवला आहे. सर्वसामान्य अन्न हे पोषक असावं, अशी अपेक्षा आहे. परंतु काही पदार्थामध्ये असे काही घटक असतात जे औषधाचंदेखील काम करतात. अशा अन्नपदार्थाना ‘न्यूट्रास्युटिकल’ म्हणतात. औषधी अन्न, ‘डिझाइनर फूड’, ‘फायटोकेमिकल’, ‘फंक्शनल फूड’, ‘न्यूट्रिशन सप्लिमेंट’ अशा विविध नावांनी बाजारात अन्नाचे प्रकार उपलब्ध आहेत. औषधांऐवजी योग्य अन्न खाऊन जर रोग बरा करणं अथवा रोग टाळणं शक्य होत असेल तर किती बरं!  या विचारावर या पोषक अन्नाची संकल्पना आधारलेली आहे.

रासायनिकदृष्टय़ा ‘न्यूट्रास्युटिकल’चे शेकडो प्रकार आहेत- जसं हळदीमधील ‘करक्युमिन’, ज्यामुळे ‘अल्झाइमर’सारखा भयंकर आजार बरा होऊ शकतो अथवा टाळता येऊ शकतो. बरीचशी ‘प्रोबायोटिक’ आणि ‘अँटीऑक्सिडंट’ ही आतडय़ाचा कर्करोग टाळू शकतात- उदा. रेड वाइन आणि कोकममधील ‘अँथोसायनिन’. तसंच ग्रीन टीमधील ‘पॉलिफिनॉल’ आणि ‘कॅटेचिन’मुळे वजन कमी व्हायला, तर लसूण खाल्ल्यामुळे हृदयरोगापासून बचाव व्हायला मदत होते. काही जडीबुटी आणि वनस्पती, ‘स्पिरुलिना’सारखं शेवाळं हे गोळ्या स्वरूपात मिळतं. गेली २० र्वष असे अनेक खाद्यपदार्थ हे गोळ्या, पावडर आणि पेय, अशा विविध रूपांत उपलब्ध आहेत. दुधाचा वापर करून देखील असे ‘न्यूट्रास्युटिकल’ पदार्थ बनतात- जसं ‘याकुल्ट’ आणि दही. सध्याच्या ‘करोना’च्या दहशतीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या अन्नपदार्थाचं बाजारात पेवच फुटलं आहे.

आपण पाहतो त्यातल्या काही जाहिराती खऱ्या असतात, तर काहींमध्ये बरीच अतिशयोक्ती असते. हल्ली अनेक खाद्यपदार्थाना आणि काही जणांनी अगदी कपडय़ांनादेखील ‘इम्युनिटी बूस्टिंग’ हा गुण चिकटवलेला पाहायला मिळतो. सामान्य माणूस या सगळ्यामुळे गोंधळून नाही गेला तरच नवल. कु णी तरी म्हटलंच आहे ना, ‘दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिये’. तेव्हा आज मानवी शरीर रोगाला प्रतिकार कसा करतं ते आधी जाणून घेणं गरजेचं आहे.

वारंवार सर्दी, अ‍ॅलर्जी, जखम सावकाश भरणं, थकवा आणि सतत लहानसहान आजारपण, चिडचिडी त्वचा, ही सर्व लक्षणं प्रतिकारशक्ती कमी असण्याची आहेत. अति मानसिक ताण हे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचं एक कारण तर ठरतंच, पण प्रतिकारशक्ती कमी असेल तरी लहानसहान गोष्टींनी मनावर ताण येऊ शकतो. म्हणूनच रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची? योग्य, समतोल आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप या तीन गोष्टी नैसर्गिकपणे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवितात. आहारात भरपूर आणि विविध फळं, भाज्या, आलटून पालटून विविध धान्यं, डाळी, कडधान्यं, यांचा समावेश हवा. स्थूल शरीर रोगाचं माहेरघर असतं. मिताहार चांगला. जेवणानं फक्त १/३ पोट भरलं पाहिजे. पोटातली उरलेली १/३ जागा ही पाण्यासाठी (म्हणजे प्यायलेले पाणी आणि तयार झालेले पाचक रस) आणि १/३ पोट मोकळं (हवा राहण्यासाठी) राहायला हवं. असं असेल तरच जठराची आकुंचन-प्रसरण हालचाल नीट होऊ शकते आणि अन्न उत्तम पचतं. रोज सकाळी पोट हलकं  असताना थोडा घाम येईल असा व्यायाम (‘एरोबिक’) निदान ३० मिनिटं केला पाहिजे. त्याशिवाय आणखी ३० मिनिटं शक्य असल्यास योगासनं, वजन उचलणं, स्नायूंना ताण देईल असा व्यायाम सकाळी अथवा सायंकाळी करावा. या सगळ्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या ग्रंथी (यकृत, स्वादूपिंड, थायरॉइड) उत्तेजित राहातात आणि शरीर आरोग्यवान व्हायला मदत होते.

शरीराचे शत्रू म्हणजे रोगजंतू आणि विषाणू. जंतू सजीव म्हणून औषधांनी मारता येतात. विषाणू जिवंत नाही, म्हणून त्याला मारता येत नाही; पण नष्ट अथवा निष्प्रभ करता येतं. बहुतेक विषाणू म्हणजे प्रथिनांनी बनलेली विशिष्ट रचना असते, ज्याला एक वेगळा गुणधर्म असतो. हा रेणू सजीव पेशीमध्ये शिरून त्या पेशीच्या ‘डीएनए’वर ताबा मिळवतो आणि स्वत:सारखे हजारो-लाखो रेणू काही तासांत बनवू शकतो. त्यामुळे पेशी फुटून मरते आणि हे लाखो विषाणू रेणू रक्तामधून नव्या पेशींमध्ये शिरतात. ‘करोना’ विषाणू इतका भयंकर आहे, कारण तो संसर्गजन्य असल्यानं सहज पसरतो. बाधित व्यक्तीनं स्पर्श केलेले पृष्ठभागदेखील ‘करोना’ पसरवायला मदत करतात. तसंच तो रक्तामधील हिमोग्लोबिन नष्ट करत असल्यामुळे प्राणवायूच्या अभावामुळे काही जण  श्वासविकारानं तडकाफडकी मृत्यू पावण्याची भीती असते.

त्वचेचं आरोग्य ‘कोलॅजिन’ या प्राथिनांच्या साखळीमुळे असतं, ज्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ महत्त्वाचं आहे. श्वसनविकार आणि सर्दीवरदेखील औषधाप्रमाणे ‘सी’ जीवनसत्त्वाचा उपयोग होतो. ते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे रक्ताच्या ‘प्लाझ्मा’मध्ये (रक्तद्रवामध्ये) मिसळतं आणि सर्वत्र पोहोचून त्वचेचं रक्षण करतं. परंतु जास्त खाल्लं गेल्यास ते मूत्राद्वारे बाहेर टाकलं जातं. म्हणून रोजच्या आहारात कोशिंबीर अथवा सॅलडसह लिंबाचा समावेश करतात. तसंच आवळा, पेरू, संत्रं, किवी, स्ट्रॉबेरी अशा आंबट फळांत भरपूर ‘सी’ जीवनसत्त्व असतं.

शरीराचे शत्रू हवेतून आले, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी नाकातील ओलसर त्वचा ते रोखण्याचं महत्त्वाचं कार्य करते. तसंच कफाच्या पटल आवरणामुळे (‘म्युकोसा’) धूळ, कण आणि हवेतील जंतू नाकातच अडकतात. नाकातील ओलसर त्वचा, केसांची गाळणी, यामुळे सर्व रोगजंतू थांबत नाहीत. काही अतिसूक्ष्म जंतू वा कण हवेबरोबर पुढे जातात. त्याकरिता आणखी एक खूप महत्वाची रचना आहे. श्वासनलिकेतील केसांची लव (‘सिलिया’) ज्याच्यामुळे धूळ, कण आणि प्रदूषण फुप्फुसांमध्ये जात नाही. ही लवसुद्धा ‘सी’ जीवनसत्वामुळे चांगली बनते आणि हवेतून पसरणाऱ्या रोगांपासून आपला बचाव होतो. तसंच ‘म्युकोसा’चा उपयोग जंतूंना पकडण्यासाठी शरीरातील इतर भागांतदेखील होतो- जसं फुफ्फुसं, डोळे, आतडं आणि गुप्तांग. या सगळ्यामुळे जर संसर्ग झाला तर रोगाचं प्राथमिक स्वरूप म्हणजे सर्दी, छातीमधे कफ, डोळे चिकटणं अशा तक्रारी सुरू होतात. शरीरात योग्य प्रमाणात कफ तयार होऊन संसर्ग टाळण्यासाठी ‘व्हिटॅमिन

ए-१’ (‘रेटीनॉल’) आणि ‘व्हिटॅमिन

बी-६’ आहारातून किंवा गोळ्या म्हणून घेतलं पाहिजं. चीज, साजूक तूप, फिश ऑइल आणि कॉडलिव्हर ऑइल, ब्रोकोली, पपनस,

टरबूज, यामध्ये ‘व्हिटॅमिन ए-१’ असतं. तर ओटस्, शेंगदाणे, चिकन, केळी यात ‘व्हिटॅमिन बी-६’ असतं.

आणखी एका मार्गानं शत्रू (रोगजंतू इत्यादी) आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. अशुद्ध पाणी, खाण्यास अयोग्य- किडकं, नासकं अन्न (उदा. भाजी, फळं, धान्य, खवा व इतर) नकळत खाल्लं गेलं तर अन्नातून होणारी विषबाधा, पोट बिघडणं, कावीळ आणि अनेक रोग होऊ शकतात. रोगजंतू शरीरात कोणत्याही मार्गानं घुसले तरी त्यांच्याशी लढण्यासाठी वेगवेगळ्या सेना शरीरानं तयार ठेवलेल्या असतात. रक्तामधील श्वेत पेशिका (‘डब्ल्यूबीसी’) हे नाव सर्वाना माहीत आहे. त्यांचे ५ प्रकार असतात. त्यापैकी ‘टी’ आणि ‘बी’ अशा दोन महत्त्वाच्या पेशिका आहेत, ज्यांचा शरीराची प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. अस्थिमज्जेमध्ये बनतात त्या ‘बोन’ अर्थात ‘बी सेल्स’. ‘थायमस’ या हृदयाजवळील छोटय़ाशा ग्रंथीमध्ये वाढतात त्या ‘टी सेल्स’. या ‘टी’ पेशिकांमध्ये देखील ३ प्रकार आहेत- मदतनीस, लढवय्ये आणि प्रतिरोधक. मदतनीस ठरवतात की समोर दिसणारं प्रथिन आपला (मित्र) आहे, की शत्रू (शरीराबाहेरचा). मग लढवय्ये हे शत्रू प्रथिनांचा नाश करून रोगजंतू ठार मारतात. जोशात येऊन हे लढवय्ये फार मारामारी करू लागले तर मित्र प्रथिनांचा नाश होऊ शकतो. तेव्हा प्रतिरोधक ‘टी’ पेशिका त्यांना सूचना देतात, की आता मारामारी पुरे करा. ही लढाई शरीरभर पसरलेल्या ‘लिम्फ’ संस्थेमध्ये चालते आणि मेलेले जंतू आणि मारल्या गेलेल्या ‘टी’ पेशिका तिथल्या तिथे विघटन करून नाहीशा केल्या जातात.

एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात असावी की प्रत्येक ठिकाणी योग्य तोल सांभाळणं गरजेचं आहे. काही कारणानं उदा. अतिरेकी वागण्यामुळे, चुकीच्या खाण्यामुळे, वा शारीरिक/ मानसिक बिघाडामुळे जर संतुलन बिघडलं, ‘टी’ पेशिका खूप वाढल्या तर त्या मित्र प्रथिनांचासुद्धा नाश करतात. शत्रू आणि आपल्या शरीराची प्रथिनं यातील फरक त्यांना करता येत नाही. अशा व्यक्तीस ‘ऑटोइम्यून डिसिज’चा सामना करावा लागू शकतो. या आजारात ‘तूच आहेस तुझा भक्षक’ असं काहीसं चित्र निर्माण होतं. खाल्लेलं अन्न अजिबात अंगी लागत नाही, खूप अशक्तपणा येतो, वजन झपाटय़ानं कमी होतं आणि जीवनातील आनंद नष्ट होतो.

आहार, विहार आणि निद्रा यांचा तोल ऋतुमान, वय आणि राहणीनुसार सांभाळावा यावर आयुर्वेदामध्ये भर दिला आहे. प्रकृती बिघडल्यास प्रथम परीक्षा कशी करावी याचे खूप साधे, सोपे असे ८ प्रकार आहेत- नाडी, जिव्हा, नेत्र, मल, मूत्र, शरीराची ठेवण, आवाजाची प्रत आणि स्पर्श. वैद्य जेव्हा नाडीपरीक्षा करतात तेव्हा रोग्याच्या मनगटावर ३ बोटं ठेवून तीन गोष्टी बघतात. गती, शक्ती आणि हाडाचा बळकटपणा. तुम्हीही स्वत:ला थोडं बरं नसताना शरीरात काय साधे बदल होतात हे पाहिलं असेल. आम्लपित्तामुळे जीभ पांढरी होणं, आवाज खरखरीत होणं, उष्णतेनं त्वचा कोरडी होणं, केस राठ वाटणं वगैरे.

माझे गुरू पद्मभूषण प्रा. जेष्ठराज जोशी यांचे आयटी अभियंता  पुत्र प्रशांत जोशी या विषयावर संशोधन करत आहेत. आधुनिक आणि सुटसुटीत असा मनगटी घडय़ाळासारखा पट्टा- जो लावल्यावर ‘डिजिटल नाडी परीक्षा’ होईल आणि आपोआप त्याचा निष्कर्ष इंटरनेटद्वारे संगणकावर पाहता येईल. शिवाय सकाळी उठून जिभेचा सेल्फी पाठवायचा आणि संगणक १०,००० रोग्यांचा ‘डेटा’ बघून तुम्हाला आज काय खा, याचा सल्ला देईल. लवकरच हा पट्टा बाजारात येईल आणि त्याची किंमत १००० रुपयांपेक्षा कमी असेल, अशी या तरुण संशोधकाची खात्री आहे. हे स्वप्न साकारलं तर खरोखरच पारंपरिक विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि अन्न हेच औषध ही संकल्पना, असा त्रिवेणी संगम बघायला मिळेल.

प्रतिकारशक्ती हा गहन विषय आहे. अन्नाची अ‍ॅलर्जी, ‘अँटीबॉडी’ (प्रतिपिंड), ‘अँटीजेन’, रोगाची लस,  ‘टी’ आणि ‘बी’ पेशिकांचे गुणावगुण, प्रत्येक व्यक्तीचा गुणसूत्र इतिहास, तसंच नैसर्गिक जीवनसत्त्वं आणि त्यांचे कृत्रिम रेणू शरीरात सारखेच शोषले जातात का (म्हणजे त्यांची ‘बायो अँव्हेलेबिलिटी’), अशा अनेक अंगांनी हा विषय समजून घेतला तरच असंख्य जाहिरातींच्या आजच्या युगात आपण गोंधळापासून आणि चुकीचे वा टोकाचे निर्णय घेण्यापासून वाचू शकू . याविषयीची अधिक माहिती २६ सप्टेंबरच्या या सदरातील लेखात.