आयुष्यात आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करणारे अनेक लोक वा त्यांचे नकारार्थी विचार आपल्याबरोबर सतत असणारच आहेत. आपल्या सुंदर स्वप्नांपासून रोखणारे अनेक जण भेटणारच आहेत. आपण ते कानाआड करायला हवेत. अशा वेळी तुम्ही चक्क बहिरं व्हायला हवं. तुम्हाला काय हवंय, काय मिळवायचं आहे हे मनाशी पक्कं ठरवायला हवं. कारण आपल्या विचारांमध्ये कमालीची ताकद असते.
तो अपघात भीषण होता. हायवेवर समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या भरधाव गाडीला इतक्या जोरात ठोकलं की, कार चालवत असलेल्या समीरना क्षणभर कळलंही नाही काय होतंय ते. फक्त जाणवली ती शरीरभर पसरत गेलेली वेदना !
दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली ती थेट रुग्णालयात. काही क्षणांसाठीच. नळ्यांच्या जाळ्यात आणि प्लास्टरमध्ये गुंडाळलेलं त्यांचं शरीर त्यांनाच ओळखता आलं नाही. कुटुंबीयांचे काळजीयुक्त चेहरे आणि डॉक्टरांची तणावयुक्त नजर त्यांना बरंच काही सांगून गेली. बघता बघता त्यांची शुद्ध हरपली. शुद्ध-बेशुद्धीचा खेळ सुरू झाला.. तसाच जीवन-मरणाचाही!
शुद्धीवर असताना डॉक्टरांनी त्यांना कल्पना दिली, ‘एक शस्त्रक्रिया गरजेची आहे. त्याची खात्री मी देऊ शकत नाही. हा एक प्रयत्न आहे, तुम्हाला जगवण्याचा. यश मिळालं तर जीवनदान, नाही तर.. तुम्हीच सांगा ती शस्त्रक्रिया करायची की नाही.’ विचारांच्या आवर्तनात त्यांना तसंच सोडून डॉक्टर निघून गेले. आता निर्णय समीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना घ्यायचा होता. शस्त्रक्रिया करायची की नाही? समीरना जाग आली तेव्हा समोर कुटुंबीयांचे हसरे चेहरे होते. डॉक्टरांच्या नजरेतला तणावही नाहीसा झाला होता. डॉक्टरांच्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत होता. नंतरही काही छोटय़ा शस्त्रक्रिया पार पडल्या. महिन्याभरात समीर बोलू लागले, उठून उभे राहू लागले. रुग्णालयातून समीर आज घरी जाणार होते. डॉक्टर त्यांच्या बेडपाशी आले आणि म्हणाले, ‘‘अगदी प्रामाणिकपणे सांगू, तुम्ही ज्या अवस्थेत दाखल झाला होतात ते पाहता तुम्ही जगाल, स्वत:च्या पायावर उभे राहाल, असं वाटत नव्हतं. शस्त्रक्रिया खूपच अवघड होती. तुम्ही सारं पेललत.’’
समीर छानसं हसले. म्हणाले, ‘‘खरं सांगू डॉक्टर, तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे शस्त्रक्रियेची माहिती दिलीत. तेव्हा आत्तापर्यंत अनुभवलेलं, जगलेलं सारं आयुष्य माझ्या समोर आलं. चांगले, वाईट प्रसंग डोळ्यासमोर तरळायला लागले. मनाशी म्हटलं, छान गेलं आयुष्य, पण स्वत:साठी, समाजासाठी जगायचं राहिलंच आपलं. निवृत्तीनंतर खूप काही करायचं होतं. पण आता कदाचित त्यासाठी वेळ नाहीए. ते सारं करायचं असेल तर मला जगायलाच हवंय. खूप काही करायचंय. त्याच क्षणी माझा निर्णय झाला होता.. आणि मला ग्लानी आली.. त्यानंतर जाग आली ती माझ्या रूममध्येच तुमच्या सगळ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासमोरच. माझ्या जगायच्या एका क्षणाच्या निर्णयानेच मला जगवलं.’’ डॉक्टर प्रसन्नपणे हसले. त्यांचा हात हातात घेत समीरनी त्यांचा निरोप घेतला..
सकारात्मक विचारांची ताकद ही अशी असते. मला जगायचंय या स्वत:शी घेतलेल्या एका ठाम निर्णयाने समीरना तारून नेलं. आयुष्यात अशा सकारात्मक वा पॉझिटिव्ह विचारांची गरज पावलोपावली आपलं अस्तित्व जागवत असते. कारण तो विचारच तुम्हाला ताकद देत असतो पुढे जायची, काही घडवायची. तुम्ही जोपर्यंत स्वत:ला त्यासाठी तयार करत नाही तोपर्यंत निराशा येणं वा काहीच सकारात्मक न घडण्याचीच शक्यता जास्त असते. पण एकदा का त्यांची ताकद कळली की चमत्कारही घडू शकतात.
रामराव आणि श्यामराव, कधीही एकमेकांना न भेटलेल्या दोन व्यक्ती. आजारपणामुळे एकत्र आलेल्या. रुग्णालयाच्या एका खोलीत दोघांचे दोन बेड. रामराव कर्करोगाने त्रस्त. शेवटच्या पायरीवर असलेले. तर श्यामरावांना पॅरालिसीसचा अटक येऊन अंगं लुळं पडलेलं. रामराव सुदैवी होते. त्यांच्या बेडच्या बाजूलाच एक भली मोठी खिडकी होती. त्या खिडकीशी ते कायम बसलेले असत. बाहेर घडत असलेल्या अनेक गमतीजमती श्यामरावांना सांगत. ‘‘बाहेर एक भली मोठी बाग आहे,’’ ते सांगत. वेगवेगळ्या रंगांची, आकारांची फुलं तिथे फुलत. त्यावर अनेक फुलपाखरं फिरत. झाडावर पक्षी आपली घरटी बांधत. एके दिवशी रामरावांनी श्यामरावांना सांगितलं, आंब्याच्या झाडावर कबुतराने घरटं बांधलंय. मग त्या दिवसानंतर दोघांचा तो छंदच झाला. कबुतराचं जोडपं नेमकं काय करतंय ते बघण्याचा. श्यामराव सारं काही रामरावांच्या नजरेने पाहत होते. घरटं बांधणं. कबुतराने कबुतरणीची वाट पाहणं. एके दिवशी रामरावांनी चांगली बातमी दिली. कबुतरणीने तीन अंडी दिल्याची. नवे जीव जन्माला येणार होते. दोघंही उल्हसित झाले होते. श्यामरावांची तब्येत झपाटय़ाने सुधारू लागली. कबुतरणीचं अंडी उबवणं सुरू होतं आणि श्यामराव उठून उभं राहण्याची शक्ती स्वत:त आणत होते. एके दिवशी रामरावांनी बातमी दिली एक अंड फोडून इवलंस पिल्लू बाहेर आलंय. श्यामरावांना पिल्लू बघण्याची उत्सुकता वाढू लागली. आपण स्वत: चालत त्या खिडकीपाशी जायचंच, त्यांनी ठरवलं. त्याच दिवशी रामरावांच्या दुखण्याने जोर धरला. त्यांचा कर्करोग अंतिम टप्प्यातच होता. आपण जगणार नाही याची कल्पना त्यांना फार पूर्वीच आली होती. त्यासाठी ते स्वत:ला तयार करत होते. अखेर तो क्षण आलाच. त्यांच्या रूममध्ये प्रचंड धावपळ उडाली. रामरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ते गेल्याचीच बातमी आली. श्यामराव खिन्न झाले. आता त्यांना ओढ लागली होती घरटं बघण्याची. दोन पिल्लं अंडय़ाच्या बाहेर येणार होती. श्यामरावांची तब्येत खूपच सुधारली होती. ते आता स्वत:च्या हाताने खाऊ लागले होते. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. खिडकीजवळच्या बेडवर जाण्याची. ते खिडकीपाशी आले. त्यांना वाटलं आता कबुतराची पिल्लं नक्कीच चिवचिवत असतील. कबुतरीण त्यांना खायला घालत असलेली पाहायला मिळेल. पण बघतात तो काय. त्या खिडकीपलीकडे काहीच नव्हतं. रुग्णालयाची भलीमोठी रूक्ष भिंत समोर उभी होती. त्यांनी नर्सला विचारलं, ‘‘इथली बाग कुठे गेली?’’ नर्स हसली. म्हणाली, ‘‘ती रामरावांच्या कल्पनेत होती. तुम्हाला बरं वाटावं. तुम्हाला जगण्याची उमेद वाढावी म्हणून रामरावांनी ती तयार केली होती, खास तुमच्यासाठी.’’ श्यामराव नि:शब्द झाले. आपल्या थरथरत्या हाताने त्यांनी ती खिडकी बंद करून टाकली..
शब्दांची जादू अशी असते. ती नवं काही तरी जन्माला घालत असते. सकारात्मक काही घडवत असते. फक्त आपला त्या शब्दांवर विश्वास हवा. पण तोच कमी पडतो. आपण स्वत: काय आहोत यापेक्षा इतर लोक काय सांगतात त्यावर आपण आपलं आयुष्य घडवत असतो अनेकदा.
अशीच एक कथा बेडकाची. एका छोटय़ा बेडकाच्या मित्रांनी ठरवलं की, आपण धावण्याची शर्यत लावायची. एका उंच मनोऱ्यावर चढायचं होतं. त्या दहा-बारा बेडकांना प्रोत्साहन द्यायला त्यांची बरीचशी बेडूकमंडळी जमली होती. पण सगळ्यांचा सूर नकारात्मकच होता. कुणी म्हणत होतं, ‘‘कसं शक्य आहे इतकी उंच चढण चढणं?’’ कुणी म्हणत होतं, ‘‘अशक्यच आहे. उगाचंच वेडेपणा करताहेत ही बेडकं.’’ गर्दी मोठमोठय़ाने बोलत होती. काही अंतर चढल्यावर एकामागोमाग एक बेडूक खाली कोसळू लागले. काहींनी मात्र आपली जिद्द कायम ठेवली. ‘‘मला नाही वाटत कुणी एक तरी पोहोचेल वपर्यंत.’’ गर्दी बोलतच होती. उरलेल्या बेडकांमधला एकेक बेडूक खाली कोसळत होता. फक्त एक छोटा बेडूक मात्र सरसर वर सरकत होता. गर्दीचा आवाज आता क्षीण झाला होता. पण तो पुढे जातच राहिला आणि अखेर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलाच. साऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही. त्याच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सारे त्याच्याभोवती जमले. तेव्हा लक्षात आलं, तो बहिरा होता. कुणाचं काही ऐकण्याच्या पलीकडे तो पोहोचलेला होता.
थोडक्यात काय? आयुष्यात आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करणारे अनेक लोक वा त्यांचे नकारार्थी विचार आपल्याबरोबर सतत असणारच आहेत. आपल्या सुंदर स्वप्नांपासून रोखणारे अनेक जण भेटणारच आहेत. आपण ते कानाआड करायला हवेत. अशा वेळी तुम्ही चक्क बहिरं व्हायला हवं. तुम्हाला काय हवंय, काय मिळवायचं आहे हे मनाशी पक्कं ठरवायला हवं. कारण आपल्या विचारांमध्ये तेवढी ताकद असते. आपण काय विचार करतो त्यावर आपली कृती ठरत असते. आणि ती कृतीच आपलं आयुष्य घडवत असते.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात