दिवसेंदिवस नोंद झालेल्या बलात्काराच्या घटनांत वाढच होत आहे. आत्तापर्यंत दूर कुठे तरी होणारा बलात्कार घराच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलाय का, ही भीती आज प्रत्येकीच्या मनात दबा धरून आहे. आत्ताच त्यावर जरब नाही बसवली तर हा प्रश्न अधिकाधिक अक्राळविक्राळ रूप धारण करेल, म्हणूनच गरज आहे ती समाजाने त्या पीडित स्त्रीच्या मागे उभं राहण्याची. बलात्कार हा अपघातच मानून पुढे जाण्याची. पोलिसांनी तिला कायद्याचे कडक संरक्षण देण्याची. यासाठी प्रत्येकालाच हा बलात्काराचा कायदा काय सांगतो याची माहिती हवी. त्यासाठी सरकारी पातळीवर आणि ‘मजलिस’सारख्या संस्थांतर्फे होणाऱ्या प्रयत्नाची माहिती हवी. समाजाने एकत्र येऊन बलात्काराच्या राक्षसाचा आतातरी र्निवश करायलाच हवा,  हे सांगणारा लेख.  
टीव्हीवरील मुंबईच्या बलात्कारावरील चर्चा ऐकताना सर्वप्रथम मनात आले की, यावेळच्या फोटोपत्रकार मुलीच्या बलात्कारामध्ये आणि मध्यंतरी घडलेल्या पल्लवी पुरुकायस्थ या प्रोफेशनल मुलीवर वॉचमनने केलेल्या बलात्कारामध्ये काय फरक आहे? सामूहिक बलात्कार आणि व्यक्तीने केलेला बलात्कार हा तर मोठा फरक आहेच, पण त्याहीपेक्षा मोठा फरक म्हणजे पल्लवीने अतिशय कडवा प्रतिकार केला आणि मृत्यू ओढवून घेतला. किंबहुना तिची आई म्हणते की तिच्यावर बलात्कार झाला नाही, तर त्याहीपेक्षा मोठी म्हणजे मृत्युदंडाची शिक्षा तिला मिळाली. पुरुषाला असलेल्या बलात्काराच्या अधिकाराचा तिने अधिक्षेप केला. फोटोपत्रकार स्त्रीला प्रतिकार करणे जवळजवळ अशक्यच होते कारण पाच जणांचे तिच्यावरील आक्रमण सहजी परतविणे शक्य नव्हते. पण ती वाचली. तिच्या व तिच्या मैत्रिणींच्या आलेल्या प्रतिक्रियाही सुज्ञ दिसतात. ‘आम्ही का म्हणून रडत बसू? तब्येत बरी झाली की आम्हाला आमच्या कामाला लागायला आवडेल. बलात्काराच्या छायेखाली, भीतीखाली सतत राहणे आम्हाला आवडणार नाही. परवडणार नाही. आणि तसे झाले तर आमचा खरोखर पराभव झाला असे आम्हाला वाटेल.’
या दोन प्रसंगांची तुलना करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होते; काय महत्त्वाचे आहे, जिवंत राहाणे की, शीलाचे रक्षण करता करता मृत्यू आला तरी चालेल असे हौतात्म्य पत्करणे? हे हौतात्म्य कोणी शिकविले आम्हाला? आमच्या संस्कृतीने? उदाहरणार्थ, दिल्लीला निर्भयाचा मृत्यू झाल्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका सदस्याची काय प्रतिक्रिया असावी? ‘जिन्दा लाश’ जगण्यापेक्षा मेलेली बरी. बलात्कार झाला म्हणजे तिचे भविष्य बरबाद झाले. तिचा विवाहाचा हक्क संपला, तिच्या शरीराचे पावित्र्य संपले, तिच्या शीलाला डाग लागला अशा कल्पना सातत्याने स्त्रियांच्याही मनात येत असतात. पुरुष मंडळी तर तरुणांना अशा तऱ्हेचे आक्रमण न करण्याचा सल्ला देताना बहीण, आई, मुलगी, सून, वहिनी, मेव्हणी, पत्नी अशा अनेक नात्याने स्त्रियांकडे पाहण्याचे आवाहन करतात आणि तुमच्या घरातील अशा नात्यातील स्त्रीवर कोणी असे आक्रमण केले तर कसे वाटेल, काय होईल? असा उपदेश करून एक प्रकारे स्त्रियांना तुमच्या संरक्षणाची गरज आहे व तुमच्या स्त्रियांवर दुसऱ्यांनी हल्ला करू नये म्हणून तुम्ही त्यांच्या स्त्रियांवर हल्ला करू नका असेही अप्रत्यक्षरीत्या सुचवितात. या हल्ल्यामुळे केवळ तिलाच काळिमा लागत नाही, तर घराण्याला काळिमा लागतो. या सर्व कथितातून स्त्रियांचे दुय्यमपण पुन्हा पुन्हा ठसविले जाते. मला वाटते की स्त्रीसुद्धा या देशाची नागरिक आहे आणि म्हणून मुलांना, पुरुषांना जितके संचाराचे, अभिव्यक्तीचे, अर्थार्जनाचे स्वातंत्र्य आहे तितकेच स्त्रियांनाही आहे, हे सत्य त्यांच्या अंतर्मनामध्ये ठसविणे जास्त महत्त्वाचे आहे.
म्हणूनच मला दादा धर्माधिकारी म्हणतात ते बरोबर वाटते, की स्त्रीनेसुद्धा बलात्काराचा धसका न घेता तो एक अपघात समजावा आणि अपघातातून उठल्यावर आपण जसे नव्या जोमाने पुन्हा कामाला लागतो तसे कामाला लागावे. अर्थात शारीरिक जखमा होणारच आणि त्या भरून निघायला वेळ लागणारच. पण मनाच्या जखमा तरी लवकर भरून याव्यात. आजपर्यंत मुक्तसंचार करणाऱ्या स्त्रीला धोक्याचा अनुभव आला की काही काळ तरी ती आत्मविश्वास गमावून बसणार. भीतीची भूते तिचा पाठलाग करणार हे उघड आहे. तिला सावध राहावेसे वाटणार, पण घरातील लोकांनी, मित्र मत्रिणींनी उत्तेजन दिले, आधार दिला की या मानसिक जखमाही भरून यायला वेळ लागणार नाही. प्रश्न आहे तो आजूबाजूच्या लोकांचा, जे तिच्याकडे ‘डागाळलेली’ म्हणून बघतात त्यांचा. त्या जखमा कदाचित परत परत होत राहतील आणि त्याला तोंड देण्यासाठी तिला स्वत:ची खूप तयारी करावी लागेल.
अरविंद गोखल्यांची याच विषयावरील कादंबरी अतिशय प्रभावी होती, जवळजवळ ३० वर्षांपूर्वी लिहिलेली. मित्राबरोबर टेकडीवर फिरायला गेलेली असताना मित्राला पकडून ठेवून तिघेजण तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात. मित्र समजावतो, पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार नोंदविली जाते, विवाह होतो. पण तिचा मुक्तसंचार करण्याचा आत्मविश्वास परत येत नाही. ती नोकरी सोडून देते. घरात गृहिणी होऊन मुले-बाळे करत बसते. आणि एक दिवस तिच्या पाहण्यात एक बातमी येते. एका स्त्रीला एका खोलीत कोंडून अनेक महिने तिच्यावर बलात्कार केला जातो. कुठे तरी ही बातमी तिला जाऊन भिडते आणि ती त्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याचा निर्धार करते. प्रथमच ती घरातून एकटी बाहेर पडते. भीती, संकोच सर्व सोडून.. अरविंद गोखल्यांनी यामध्ये अतिशय हळुवारपणे या स्त्रीच्या मनातील आंदोलने टिपलेली आहेत.
आज बलात्काराचा प्रश्न सर्वव्यापी आणि भयंकर स्वरूप धारण करून पुढे आला आहे. कारणे अनेक आहेत. पण स्त्रियांनी, विशेषत: पीडित स्त्रियांनी त्याकडे कसे पाहायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण त्यांना शारीरिकरीत्या तयार राहा, कराटे शिका, लाल मिरचीची पूड जवळ ठेवा, इमर्जन्सी नंबराची कळ दाबा वगरे प्रतिकाराचे सल्ले देतो, पण बलात्कार झालाच तर मानसिकरीत्या काय तयारी असायला हवी हे शिकवत नाही. सोहेला अब्दुल्ला नावाच्या मुलीवर चेंबूर टेकडीवर फिरायला गेली असताना दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यावेळी ती कॉलेजमध्ये होती. बरोबरच्या मित्राला बांधून ठेवले होते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर तिने प्रसंगावधान राखून फारसा प्रतिकार केला नाही. इजा झालीच. पण मानसिकरीत्या ती सक्रिय राहिली. अमेरिकेला जाऊन शिकली. प्रसिद्ध लेखिका झाली. मुंबईच्या मुलीच्या बलात्काराची बातमी आल्यावर तिने न्यूयॉर्क टाइम्समध्ये आपल्या अनुभवावर आधारित लेख लिहिला.
आपल्या मनात एक स्वप्न असते की, सद्यस्थितीत स्त्रियांना पोलिसांनी संरक्षण दिले पाहिजे, कायद्याचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा धाक बलात्काऱ्यांना बसला पाहिजे. स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे. पुरुषांची आक्रमक वृत्ती बदलली पाहिजे. स्त्रियांना मोकळेपणी भटकण्यासाठी आवश्यक वातावरण तयार झाले पाहिजे. तरच कोपऱ्या कोपऱ्यावर सावजाची वाट बघत लपलेल्या नरराक्षसांची भीती लहान मुलींच्या मनात भरविण्याची गरज आपल्याला जाणवणार नाही.
 त्याच बरोबर आजपर्यंत यावर एकमत झाले आहे की, बलात्काऱ्यांना अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्त्व आहे ते पोलिसांनी व्यवस्थित पुरावे गोळा करून, साक्षीदारांना सरंक्षण देऊन, खटले वेळेवर चालवून, लवकरात लवकर शिक्षा होण्याची. असे झालेच तर खऱ्या अर्थाने अशा कृत्यांना अटकाव होण्याची, बलात्काऱ्यांना भीती बसण्याची शक्यता आहे. आज अशी भावना तयार झाली आहे की रेंगाळणारे खटले, पशाची मदत किंवा प्रभावशाली लोकांचा दबाव, पोलिसांचे शैथिल्य आणि न्यायाधीशांचे पुरुषी पूर्वग्रह या सर्वाचे मिश्रण होऊन अनेकदा गुन्हेगार सुटून जाऊ शकतो. परंतु तो पल्ला गाठण्यासाठी आज गरज आहे की सर्व महिलांनी विशेषत: स्वयंसेवी संस्थातील कार्यकर्त्यांनी कायदा समाजावून घेऊन बलात्कारित स्त्रीला न्याय मिळवून घेण्यासाठी उत्तेजन देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या स्त्रियांना प्रत्येक पायरीवर कोणत्या मदतीची आवश्यकता आहे याची माहिती करून घेतली पाहिजे. आणि न्यायालयात खटला उभा राहून चालू असेतोवर प्रत्येक वेळी त्याचा मागोवा घेत, न्यायाधीशांच्या टिपणांची नोंद घेत आवश्यकतेनुसार सरकारी वकिलांना मदत करत खटल्याच्या निकालापर्यंत त्या स्त्रीच्या बरोबर राहाणे आवश्यक आहे. निदान काही खटले तरी या गांभीर्याने चालविले गेले तर स्त्रियांवरील अत्याचारांचे महत्त्व पोलीस विभागालाही समजून येईल आणि गुन्हेगारांना शिक्षा होऊन वचक बसेल. अधिक स्त्रिया बदनामीची भीती न बाळगता पुढे येतील आणि या व्यवस्थेमध्ये बदल होण्यासाठी खूप मदत होईल.  
असा एक उपक्रम ‘राहत’ नावाने मजलिस व महाराष्ट्र सरकारच्या स्त्रिया आणि बाल विभागाने आखला आहे. त्यातील पहिले पाऊल म्हणून त्यांनी प्राथमिक पावले उचलण्याबाबत पोलिसांनी करावयाच्या कृतीसंबंधी बलात्काराचा कायदा काय माहिती देतो याबद्दल एक सक्र्युलर काढण्याची पोलीस आयुक्तांना विनंती केली व ती नोटीस प्रत्येक, मुंबईतील ९२ पोलीस स्टेशनमध्ये पाठविण्याची योजना आखली. तसेच या सूचनांचे मोठे पोस्टर तयार करून तेही स्टेशनच्या बाहेर लावण्यात येईल असा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे सामान्य माणसाला, विशेषत: पीडित व्यक्तीला व तिच्याबरोबर असलेल्या मदतनीसांनाही आपले अधिकार काय आहेत, याची माहिती होईल. यासाठी दोन्ही कायद्यांचा वापर करण्यात आला आहे; पॉक्सो (बालसुरक्षा कायदा २०१२) व आय.पी.सी. म्हणजे १८ वर्षे वयावरील स्त्रीवरील आक्रमणाचा कायदा.
या नोटिशीमधील काही प्रमुख मुद्दे असे;
एफ.आय.आर. अहवाल
* कोणीही व्यक्ती जिला अशा गुन्ह्य़ाची माहिती होईल ती जाऊन एफ.आय.आर. दाखल करू शकते. त्यासाठी जिच्यावर अत्याचार झाला आहे त्याच व्यक्तीची वाट पाहण्याची गरज नाही.
* अत्याचारित व्यक्ती, स्त्री स्वत: माहिती देण्यासाठी आली असेल तर स्त्री पोलीस अधिकारी किंवा जवळपास राहणारी कोणीही सरकारी स्त्री अधिकारी यांनी तिच्याशी बोलून एफ़.आय.आर. लिहिण्याची गरज आहे.
* एखाद्या अपंग स्त्रीला किंवा मानसिकरीत्या आजारी असलेल्या स्त्रीला गुन्ह्य़ाची तक्रार नोंदवायची असेल तर तिच्या घरी जाऊन किंवा तिला सोयीस्कर वाटेल अशा ठिकाणी जाऊन ही नोंद करावी. खास शिक्षण असलेली व्यक्ती तेथे अन्वयार्थ लावण्यास हजर असावी. गरज असल्यास व्हिडीओ काढून ठेवावा.
* एफ.आय.आर.ची कॉपी लगेच तक्रार नोंदविणाऱ्याच्या हाती द्यावी.
* नोंद या पोलीस स्टेशनमध्ये आणि गुन्हा दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असेल तरी पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी तो तिकडे पाठवावा.
प्राथमिक औषध योजना व वैद्यकीय परीक्षा
* गुन्हा घडला असेल तर पीडित व्यक्तीला सरकारी किंवा खासगी रुग्णालयात फुकट औषधयोजना मिळाली पाहिजे.
* लहान मुलाच्या बाबतीत जरी गुन्ह्य़ांची नोंद केली गेली नसेल तरीही फुकट औषधयोजेनेस ते मूल पात्र असेल.
* बलात्कार किंवा लहान मुलांच्या बाबतीतील गुन्ह्य़ाची माहिती कळल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे.
पीडित व्यक्तीचा जवाब
* पीडित व्यक्तीचा जवाब वा बयान तिच्या सोयीने तिच्या नातेवाईकांच्या समक्ष किंवा समाजसेवक स्त्रीच्या समक्ष तिचा ज्याच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीच्या समक्ष, स्त्री सरकारी अधिकारी किंवा स्त्री पोलीस अधिकारी यांनी घेणे आवश्यक आहे.
* लहान मुलांच्या बाबतीत त्या गुन्ह्य़ाची तपासणी चालू असताना ज्याच्यावर गुन्हा दखल केला गेला आहे ती व्यक्ती त्या मुलाच्या सहवासात येणार नाही, भीती दाखविण्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
* आसराघर आणि बाल कल्याण समिती
जर तपासणी अधिकाऱ्याला असे आढळून आले की लहान मुलाला आश्रयाची गरज आहे, तर त्यासंबंधीच्या कारणांचा अहवाल तयार करून त्या मुलाला आसराघरात किंवा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी आहे.
* या गुन्ह्य़ासंबधीची व त्यासंबंधी उचललेली पावले यांची माहिती २४ तासांच्या आत बाल कल्याण समितीला व मुलांसाठी नेमण्यात आलेल्या न्यायालयाला देण्यात यावी.
‘मजलिस’ संस्थेने आवाहन केले आहे की, ज्यांना अशा गुन्ह्य़ामध्ये पीडित व्यक्तीला मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर त्यांच्याशी संपर्क साधावा. आणि सामान्य व्यक्तीनेसुद्धा कायद्यातील वरील गोष्टींचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे ‘मजलिस’ आग्रहपूर्वक म्हणते.    
chhaya.datar1944@gmail.com