12 July 2020

News Flash

मनातलं कागदावर : श्रींची इच्छा..

गेल्या माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘वाडय़ातल्या गणपती’ला सारं गाव लोटलं होतं..

(संग्रहित छायाचित्र)

प्रभाकर बोकील

pbbokil@rediffmail.com

विद्यामंदिराचं स्वप्न साकारण्यात नाना-नानींचं लग्न तसं उशिराच झालं. लग्नानंतर नानांच्या एम.एड.च्या बरोबरीनं नानींनी बी.एड. केलं. शाळेत शिकवत असताना नानी मंदिराची एरवीची देखभाल, सर्व व्यवहार स्वत: खंबीरपणे सांभाळत. गणपतीवर पूर्ण श्रद्धा. उशिरा झालेला एकुलता एक श्रीकांत, उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला अन् नोकरीसाठी तिथंच राहायचा निर्णय घेतला, तेव्हा नानींच्या डोळ्यांना संततधार लागली. ‘श्रींची इच्छा’ म्हणत त्यातूनही सावरल्या. नातवाच्या, प्रसादच्या- जन्माच्या वेळी नाना-नानी अमेरिकेला राहून आले. नातवाला सोडून येताना पुन्हा जीव तुटलाच. लॅपटॉपवरून जगभर संवाद साधणाऱ्या श्रीला आईबापांचं मन समजू नये?

गेल्या माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘वाडय़ातल्या गणपती’ला सारं गाव लोटलं होतं..  नाना देशमुखांच्या घराण्याचं पूर्वापार चालत आलेलं हे गणपती मंदिर. त्याआधी दोनेक वर्षांपूर्वी नानांच्या पंचाहत्तरी सोहळ्याला आजूबाजूच्या गावातले लोकदेखील आवर्जून आले होते. विद्यामंदिर शाळेचा हॉल अपुरा पडला. या उत्स्फूर्त गर्दीला नानांचं व्यक्तिमत्त्वच कारणीभूत होतं.

जेमतेम चौथीपर्यंतच शाळा असलेलं एकेकाळचं हे गाव -खेडंच म्हणायचं खरं तर- आज चांगलं नावारूपास आलं आहे. माध्यमिक शिक्षणासाठी नानांना गाव सोडून जावं लागलं होतं. बी.एड. झाल्यावर नाना गावाकडे परतले. शिकले त्याच प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ध्यास एकच.. प्रत्येक विद्यार्थ्यांला पूर्ण शालेय शिक्षण गावातच मिळालं पाहिजे! त्यासाठी अहोरात्र धडपड सुरू झाली. परवानग्यांसाठी सरकार दरबारी अविश्रांत धावपळ केली. पंचक्रोशीतल्या गावागावांतून इमारतीच्या निधीसाठी पायपीट केली. शाळेच्या जुन्या बठय़ा कौलारू इमारतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर प्राथमिक अन् माध्यमिक शाळेची नवी दुमजली इमारत उभी राहिली.

कालांतराने अजून एक मजला वाढून इंग्रजी माध्यमाची शाखा अन् ज्युनियर कॉलेजदेखील सुरू झालं. नानांचं विद्यामंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. शिक्षणाच्या सोयीमुळे गावाचा चौफेर विस्तार होऊ लागला. दरम्यान, नानांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्तम शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. चाळीस वर्षांनी निवृत्त झाल्यानंतर दहा र्वष नानांनी विनामोबदला संचालक मंडळावर मार्गदर्शक म्हणून काम केलं. पंचाहत्तरी ओलांडताना नव्या पिढीच्या हाती सूत्र सोपवून, पूर्ण समाधानाने नाना निवृत्त झाले, तेव्हा मनाला एकच रुखरुख लागून राहिली होती.. विद्यामंदिर सत्यात उतरवताना, विद्य्ोच्या दैवताकडे, वाडय़ातल्या गणपती मंदिराकडे दुर्लक्ष झालं. त्यांच्या आळीतल्या घरापासून, गल्लीबोळातून चालत आठदहा मिनिटांच्या अंतरावर नदीकाठी असलेलं, दोनशेहून अधिक वर्षांचं जुनं पेशवेकालीन- ‘वाडय़ातला गणपती’ म्हणूनच नावाजलेलं- गणपती मंदिर. नदीला कधी पूर आला की, वाडय़ाच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी यायचं. मंदिराच्या चोहोबाजूंनी तीन तीन फूट जाडीची घडवलेली दगडांच्या भिंतींची तटबंदी. मध्यभागी असलेल्या लाकडी प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर चौफेर प्रशस्त प्रांगण. तटबंदीला लागूनच विश्रांतीसाठी काही चौकाभिमुख ओसऱ्या-ओवऱ्या. एका कोपऱ्यात गोशाळा. दुसऱ्या कोपऱ्यात राहण्यासाठी दोन खोल्या. प्रांगणाच्या मध्यभागी मोठा सभामंडप. त्याचे शिसवी लाकडाचे वर निमुळते होत जाणारे वर्तुळाकार खांब. त्यावर पेशवेकालीन कारागिरीच्या लाकडाच्या महिरपी. छपराच्या आतून लाकडी छतावर वेलबुट्टीची कलाकुसर. सभामंडपात हंडय़ा-झुंबरांच्या दहा जोडय़ा. मंडपाला जोडूनच पूर्वाभिमुख भक्कम काळ्या पत्थरात घडवलेला गाभारा. गाभाऱ्यावर हेमाडपंथी कळस अन् गाभाऱ्यात कोरीव बांधकामाच्या चौथऱ्यावर मेघडंबरीखाली शिळेतून घडवलेली गणपतीची प्रसन्न मूर्ती!.. पण हे सारं पूर्वीचं वैभव.                                                                                   मंदिरात रोज सकाळी नियमितपणे पूजा-अर्चा, संध्याकाळी दिवेलागणीला आरती होते. चतुर्थीला ‘वाडय़ातला गणपती’च्या दर्शनाला गाव गोळा होतं. भाद्रपदात दहा दिवसांचा गणेशोत्सव, माघी चतुर्थीचा गणेश जन्मोत्सव साजरा होतो. दानपेटीत जमा होणाऱ्या पुंजीवर मंदिराचा दैनंदिन खर्च जेमतेम भागतो. काळानुसार या अवाढव्य पसाऱ्याचा सांभाळ करणं परवडेना. मंदिराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊलागलं. वाऱ्यावादळाला वर्षांनुवर्ष तोंड देत उभ्या असलेल्या तटबंदीचे चिरे भोवतीच्या वडा-पिंपळाच्या पुरातन वृक्षांची मुळं बांधकामात शिरल्यामुळे कित्येक ठिकाणी ढासळले. बाजूच्या ओसऱ्या, खोल्या, गोशाळा, मोडकळीस आल्या. सभामंडपाच्या कौलारू छताचा काही भाग एका अतिवृष्टीत कोसळल्यामुळे त्या जागी तात्पुरते पत्रे घालण्यात आले. फरसबंदी ठीकठिकाणी उखडलेली. शिसवी लाकडांच्या खांबांची अन् महिरपींची रया गेली. हंडय़ा-झुंबरांचे अवशेषच शिल्लक राहिले. बाप्पांच्या मूळ मूर्तीवर दर गणेश चतुर्थीपूर्वी शेंदराची पुटं चढत राहिली. त्यामुळे मूळ मूर्तीची कारागिरी, कलाकुसर दिसेनाशी झाली. मूर्तीचं मूळ रूप हरवलं.. मंदिरासारखं!

विद्यामंदिराचं स्वप्न साकारण्यात नाना-नानींचं लग्न तसं उशिराच झालं. लग्नानंतर नानांच्या एम.एड.च्या बरोबरीनं नानींनी बी.एड. केलं. शाळेत शिकवत असताना नानी मंदिराची एरवीची देखभाल, सर्व व्यवहार स्वत: खंबीरपणे सांभाळत. गणपतीवर पूर्ण श्रद्धा. उशिरा झालेला एकुलता एक श्रीकांत, उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला अन् नोकरीसाठी तिथंच राहायचा निर्णय घेतला, तेंव्हा नानींच्या डोळ्यांना संततधार लागली. ‘श्रींची इच्छा’ म्हणत त्यातूनही सावरल्या. नातवाच्या, प्रसादच्या- जन्माच्या वेळी नाना-नानी अमेरिकेला राहून आले. नातवाला सोडून येताना पुन्हा जीव तुटलाच. लॅपटॉपवरून जगभर संवाद साधणाऱ्या श्रीला आईबापांचं मन समजू नये?

परतल्यावर मंदिराची अवस्था बघून मन अधिकच खंतावलं. विद्यामंदिराच्या कामातून श्रींच्या मंदिरासाठी नानांना फुरसत कशी मिळावी? नानांची पंचाहत्तरी साऱ्या गावानं साजरी केली. खऱ्या अर्थानं नाना निवृत्त झाले. रात्री नानी म्हणाल्या, ‘‘पन्नास-पंचावन्न वर्ष शाळेला दिलीत.. गावानं जाणीव ठेवून आज त्याची पोचदेखील दिली. खूप समाधान वाटत असेल नाही? ’’

‘‘तुला झालेला आनंददेखील दिसतोय की तुझ्या चेहऱ्यावर..’’

‘‘का नाही होणार? ‘विद्यामंदिर’ सुरळीत चालू आहे.. आपले किती दिवस उरलेत माहीत नाही. एकच खंत आहे.. श्रींच्या मंदिराकडे आपलं दुर्लक्ष झालंय, असं राहून राहून वाटतंय.’’  ‘‘माझ्या मनातलं बोललीस.. मलादेखील ती रुखरुख आहेच. विद्येचा अधिष्ठाता गणपती. विद्येची सेवा म्हणून शाळेच्या कामात स्वत:ला विसरलो. त्यांत कदाचित तुझ्याकडेही दुर्लक्ष झालं असेल. तू मात्र नेहमीच मंदिराच्या कामात, श्रींच्या सेवेत स्वत:ला गुंतवून घेतलंस..’’ ‘‘करणारं दुसरं कोण होतं? श्री इथं असेपर्यंत काळजी नव्हती.. आजच्या समारंभालादेखील येतो म्हणाला, शेवटी नाहीच आला..’’ नानींचे डोळे पुन्हा पाणावले. हल्ली हे असं रोजच होतं. अश्रू काठावर टपलेलेच असतात.  ‘‘अगं, तीन महिन्यांपूर्वीच दहा दिवस राहून गेला ना? तिथल्यासारख्या सोयी नाहीत या घरात. दहावीपर्यंतचा शाळेचा सगळा अभ्यास तर त्यानं मंदिरातच केला. त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी मंदिरातल्याच. या दहा दिवसांत सारखा मंदिरात जायचा, तासंतास बसायचा, फोटो काढायचा.. नक्की काहीतरी डोक्यात आहे त्याच्या.. अगं हो, आजच्या धामधुमीत विसरूनच गेलो. पंचाहत्तरीनिमित्त आज त्यानं आठवणीनं काही पैसे जमा केलेत खात्यात.’’     ‘‘खरं सांगताय?.. किती आहेत हो?’’ ‘‘ का गं.. एरवी कुठले पैसे, किती पैसे, असं कधीही विचारलं नाहीस..’’    ‘‘नाही हो.. अगदी सहज.’’ नानी ओशाळत हसल्या. ‘‘कितीका असेनात.. आहेत ते सगळे तुझेच आहेत. सांग काय आहे तुझ्या मनात?’’  ‘‘मंदिराची दुरुस्ती व्हायला पाहिजे.. आपण असेपर्यंत. पुढचं देवाच्या हाती!’’ ‘‘मग तुझी इच्छा पूर्ण होणार..’’

तीनेक महिन्यांनी श्रीकांत पुन्हा आला. दहा दिवस राहिला. शाळेची इमारत ज्यानं बांधली, त्या इंजिनीअरला- मल्हारला – भेटला. मल्हार याच शाळेचा त्याचा वर्गमित्र. त्यालादेखील नानांविषयी आदरयुक्त जिव्हाळा. ‘आपल्या शाळेचं’ काम म्हणून अतिशय मन लावून, दिलेल्या अवधीत, ठरलेल्या किमतीत पूर्ण केलं. मंदिराचं अन् गावातल्या चार खोल्यांच्या घराचं ‘नूतनीकरण’ श्रीकांतनं मल्हारवर सोपवलं. काम सुरू झालं. श्रीकांत पैसे पाठवायचा तसं काम व्हायचं. दोन वर्षांनी माघी गणेशजन्माआधी नूतनीकरण पूर्ण झालं. मंदिराचा कायापालट झाला. तटबंदी भक्कम झाली. दगडी बांधकामाला नवी झळाळी आली. ओवऱ्या बांधून झाल्या. नवी फरसबंदी झाली. सभामंडपाला नवी कौलं लागली. पॉलिशमुळे शिसवी खांब-महिरपी नव्यासारख्या दिसू लागल्या. नव्या हंडय़ा -झुंबरांच्या लख्ख प्रकाशांत श्रींची मंगलमूर्ती मूळ स्वरूपात उजळली.

माघी गणेशजन्माच्या दिवशी वाडय़ातल्या गणपतीकडे सारं गाव लोटलं! श्रीकांत बायको-मुलासह -श्रद्धा अन् प्रसादसह- चार दिवस आधीच आला होता. पाच वर्षांनी नातू भेटल्यामुळे नानींच्या आनंदाला सीमा नव्हती. प्रसादसाठी तर हे सारंच नवीन होतं. आल्याआल्या प्रसादचं ‘परदेशी’ मराठी अन् आजीचं ‘देशी’ इंग्लिश अशी जुगलबंदी व्हायची. सारखा आज्जीच्या मागेमागे असायचा. त्या रात्री दिवसभराच्या धावपळीनं दमून प्रसाद झोपल्यावर, श्री अन् श्रद्धा नाना-नानींजवळ बसले. ‘‘नाना, कायमचं परत यायचं आम्ही ठरवलंय. जगभरचं काम मी आता इथं राहूनही करू शकतो..’’

‘‘नानी, विद्यामंदिर हीच आता प्रसादची शाळा!’’ श्रद्धा म्हणाली.

नाना-नानी दोघंही विश्वास न बसल्यासारखे एकमेकांकडे पाहू लागले. नि:शब्द झाले. दोघांचे डोळे भरून आले. आपलं मन श्रीला समजलंच, त्याहीपेक्षा त्यालाच इथली ओढ लागली, हे खरं! दोघांनी गाभाऱ्याकडे पाहिलं.. बस्स!

झोपलेल्या प्रसादला खांद्यावर घेऊन श्रीकांत अन् श्रद्धा घराकडे गेले. नाना-नानी तिथंच नव्यानं बांधलेल्या खोलीत आज राहणार होते. गाभारा बंद करण्यापूर्वी ज्ञानेश्वरांचं ‘पसायदान’ म्हणण्याचा नानींचा नेम. दोघं गाभाऱ्याकडे  वळले. गाभाऱ्यात अजून मंद तेवत असणाऱ्या दोन्ही समयांत श्रींचं रूप विलोभनीय दिसत होतं!  श्रींच्या समोर हात जोडून डोळे मिटून दोघं म्हणू लागले..  ‘‘आतां विश्वात्मकें देवें, येणे वाग्यज्ञे तोषावे..’ गाभारा बंद करून खोलीत गेल्यावर झोपताना नाना म्हणाले,  ‘‘नानी, जो जे वांछील तो तें लाहो.. प्राणिजात! श्रीनं त्याच्या पद्धतीनं सगळ्या समस्या सोडवल्या..’’  ‘‘श्रींची इच्छा!’’ समाधानानं म्हणताना नानींचा डोळा लागला.

सकाळी सहाच्या सुमारास नानांना जाग आली. पहाटे पाचच्या सुमारास उठणाऱ्या नानी अजून उठल्या नव्हत्या. कालच्या सोहोळ्यात पार दमली असेल बिचारी.. विचार करत, त्यांना उठवण्यासाठी नानांनी हलवलं..  ‘‘नानी, उठतेस ना?.. हुंकार, हालचाल नाही.

अशुभ विचारानं नानांच्या मनाचा थरकाप झाला!                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  ‘‘रेवती..!’’ नानांनी जिवाच्या आकांतानं हाक मारली..

माघी ‘गणेश चतुर्थी’च्या दुसऱ्या दिवशी वाडय़ातल्या गणपतीला पुन्हा सारं गाव लोटलं.. नानींना अखेरचा निरोप देण्यासाठी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:11 am

Web Title: prabhakar bokil manatale kagdavar article abn 97
Next Stories
1 पुरुष हृदय ‘बाई’ : पुरुषपण ओलांडताना..
2 अपयशाला भिडताना : युरेका
3 निरामय घरटं : निवांत रमणं
Just Now!
X