प्रज्ञा गिजरे

पूजा गिजरे, एका प्रथितयश कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करते आहे. कला, अभिनय, उत्तम स्वयंपाक यांच्याबरोबरच तिला अनेक गोष्टींमध्ये रस आहे आणि तिने त्या आत्मसातही केल्या आहेत. कर्णबधिर असूनही तिने आपली आई प्रज्ञा गिजरे यांच्या मदतीने ‘शब्दाविना विकास’ साधला आहे.

अपूर्णाक हा गणिताशी संबंध असलेला शब्द आहे. गणितात अपूर्णाकाला खूप महत्त्व असतं. पण आपल्या जीवनात मात्र अपूर्णाक असेल तर आपल्यासमोर कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक असे बरेच प्रश्न निर्माण होतात. माझ्या जीवनात असलेला ‘अपूर्णाक’ कसा ‘पूर्णाक’ झाला, हे व्यक्त करतेय.

मुलाच्या पाठीवर असोशीने झालेली मुलगी म्हणजे ‘पूजा’. पूजा झाली तर तिचे किती कोडकौतुक करू, असं होऊन गेलं. सगळी शारीरिक प्रगती पटपट करणारी पूजा आवाजाला मात्र प्रतिसाद देत नव्हती. आवाज केल्यानंतरही तिचं शांत राहणं पाहून आम्हाला काळजी वाटू लागली. म्हणून तिची ‘ऑडीओमेट्री’ केली आणि तिला ऐकू येत नाही, हे कळलं. वेडय़ा आशेने आम्ही दोन-तीन डॉक्टरांकडे हीच तपासणी केली, पण काही आशेचा किरण दिसला नाही. ती कर्णबधिर आहे, हे नक्की झाले. थोडय़ाशा मानसिक धक्क्यातून सावरल्यावर त्यावरच्या उपाय योजना लक्षात घेऊन तिला ‘स्पीच थेरेपी’ सुरु केली. त्यामुळे ती तिच्या पद्धतीने बोलायला शिकत गेली, शिवाय समोरच्याच्या ओठांच्या हालचालींवरून त्यांचेही संवाद समजावून घ्यायला लागली.

माझा मुलगा म्हणजेच पूजाचा दादा, कौस्तुभ पूजापेक्षा साडेतीन वर्षांनी मोठा. पूजा साधारणत: दीड-पावणदोन वर्षांची असेल. कौस्तुभ खेळून आला की सतत विचारायचा, ‘‘आई, सगळी बाळं बोलतात, मग आपलंच बाळ का नाही बोलत?’’ त्याला आता काय सांगू मी, असा प्रश्न माझ्यासमोर पडलेला असायचा. मग मी त्याला म्हटलं, ‘‘अरे, आपलं बाळ लवकर चालू लागलंय ना, मग उशिरा बोलेल.’’ त्याच्या बालबुद्धीला ते पटलं, पण मी मात्र विचारात पडले. कौस्तुभला पूजाविषयी सगळं खरं खरं कळायला हवं आणि तेही त्याच्या मनात कुठेही किंतु न राहता. एक दिवस मी त्याला कापसाचे मोठे बोळे कानात घालायला दिले आणि म्हटलं, ‘‘मी बोलते ते तू ऐक.’’ आणि मी त्याच्याशी बोलले. कानात बोळे असल्याने अर्थातच त्याला ते ऐकू येणं शक्य नव्हतंच. तो म्हणालाच, ‘‘आई काहीच ऐकू येत नाही.’’ मग मी समजावलं, ‘‘बघ असेच गच्च बोळे देवाने आपल्या बाळाच्या कानांत घातलेत, म्हणून ती बोलत नाही. तू तिच्याशी सारखं बोलत राहा, मग हळूहळू तीही बोलेल.’’ यात मात्र मला यश आलं. त्या दिवसापासून कुणीही तिला चिडवण्यासाठी मागून आवाज दिला आणि हसले तर तो तिच्या पाठीशी उभा राहायचा आणि कोणालाही तिची अशा प्रकारे चेष्टा करू देत नसे. मी, तिचे बाबा, तिचा दादा भक्कमपणे तिचा अवघड प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत होतो. कौस्तुभ आणि पूजामध्ये चांगले बंध निर्माण करण्यात आम्हाला यश आले. आमच्या मागे तो नक्कीच तिच्या पाठी भक्कमपणे उभा राहील, याची खात्री आहे. आम्ही पूजाशी सतत संवाद साधायला लागलो. तिच्याशी खूप बोलायचो. आमच्या सोसायटीत तिच्या बरोबरचीही खूप मुले होती, तेही तिच्याशी खूप बोलत.

ती तीन वर्षांची झाली आणि शाळेचा प्रश्न उभा राहिला. आम्ही पुण्यात कोथरुडला राहतो तर त्याच परिसरात एक प्रथितयश शाळेत तिला प्रवेश घेतला. शाळेतून तिला आणायला गेले की, ती एका कोपऱ्यात बसलेली दिसायची. मी एक दिवस खूप आशेने बाईंना विचारले, ‘‘कशी आहे आमची पूजा’’ तर त्या पटकन म्हणाल्या, ‘‘तिचा काही त्रास नाही हो. बिचारी एका कोपऱ्यात बसलेली असते.’’ मला हा धक्काच होता. त्या क्षणीच मी त्यांना म्हणाले, ‘‘मी तिला बिचारी करण्यासाठी इथे पाठवत नाहीये. तिला शाळा खूप आवडते तर इतर मुलांबरोबर तिलाही शिकवा.’’ खरा धक्का तर पुढेच होता. तिच्या कर्णबधिर असण्याबद्दल सगळं स्पष्ट सांगून शाळेत प्रवेश घेतला असतानाही त्यांनी आम्हाला सांगितलं की, ‘तिला शाळेत ठेवता येणार नाही.’ मुलांची चांगली जडणघडण व्हावी, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी, यासाठी आपण त्यांना शाळेत घालतो. तसेच समाजशीलतेची ओळख व्हावी, असे प्रत्येक संवेदनशील पालकांना वाटत असते. पण शिक्षणाच्या मंदिरातच असा असंवेदनशीलतेचा अनुभव आला आणि मानसिक त्रासही झाला.

आम्हाला लोकांच्याही संवेदनाहीन मनाचे चटके बसू लागले होते. नातेवाईक आणि परिचित विचारायचे, ‘‘हिला काही कळते का?’’ मुद्दाम तिच्या पाठीमागून आवाज द्यायचे. ते बघून खूप वेदना होत होत्या. पण यातूनच तिला घडवायची, तिला स्वत:च्या पायावर उभी करायची ही जिद्द निर्माण होत होती. येणाऱ्या काळावर विश्वास ठेवून आम्ही प्रयत्न सुरू केले.

आम्ही पूजाची शाळाच बदलायचा निर्णय घेतला. याच दरम्यान एका परिचिताने आम्हांला ‘आपटे प्रशाला’चे नाव सुचवले. त्या शाळेत ‘एकात्म शिक्षण योजना’ आहे. तिथे तिला प्रवेश मिळेला, आणि आम्ही निश्चिंतच झालो. सगळे शिक्षक, बाई चांगल्या होत्या. मीही पूजाबरोबर अनेक गोष्टी शिकत होते. मी रोजच तिच्याबरोबर शाळेत जायचे, तिची प्रगती जाणून घ्यायचे. त्यामुळे तिच्या शिक्षकांना तिच्याविषयी काही विचारले तर त्या माझ्या अडचणी समजून घेत अनेक गोष्टी समजावून सांगत. पितळे बाई आणि चौथाई बाई यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. मी त्यांच्याकडून तिला शिकवायचे तंत्र अवगत करून घेतले. काही अडचण आली तर त्या आपुलकीने त्याचे निवारण करायच्या. एखादी चांगली गोष्ट जर तिने केली तर तेही सांगायच्या. अशा सुरक्षित, आनंदी वातावरणात दहा वर्षे कशी गेली कळलंच नाही.

पूजाचे बाबा सिव्हिल इंजिनीअर आहेत. तिच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्यांची बदलीची नोकरी होती. तेवढा कालावधी सोडला तर पूजाच्या सामान्यपणे शिक्षण घेण्यामध्ये माझ्याप्रमाणे त्यांचाही मोठा वाटा आहे. पाचवीनंतर आम्ही दोघांनी विषय वाटून घेतले होते, त्याप्रमाणे तिला शिकवायचो. घरीच शिकवल्याने त्याचा तिला खूप फायदा झाला. तिला अभ्यास आवडत होताच आणि मेहनत घ्यायची तयारी होती. त्यामुळे यश मिळत गेले. पुढे पुढे कौस्तुभही तिच्या अभ्यासातल्या काही समस्या सोडवू लागला.

देव एका हाताने काही राखून ठेवतो तर दुसऱ्या हाताने नक्कीच काही तरी देतो, याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी आला. पूजा दुसरीत असताना शाळेत नकाशा काढण्याची स्पर्धा ठेवली होती. त्यात तिने खूप चांगल्या प्रकारे भारताचा नकाशा रेखाटला. तिला त्यात बक्षीस मिळाले होते. ती उत्तम अभिनय करत असे. मी तिला जे जे आवडत असे ते ते शिकवण्यासाठी पाठवलं. त्यामुळे मेंदीपासून ते स्वयंपाकापर्यंत ती सगळंच उत्तम करते.

पूजाची दहावी झाल्यावर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न आला. नारळकर संस्थेमधून तिने ‘आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन’ हा डिप्लोमा उत्तम प्रकारे पूर्ण केला. तिथे सगळ्यांचे सहकार्य मिळाले. त्यानंतर ‘अभिनव स्थापत्य केंद्र’ या संस्थेमधून सिव्हिल डिप्लोमा उत्तम मार्कानी पूर्ण केला. तिथे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तेथेच कॅम्पस इंटरव्ह्य़ूद्वारे एका प्रथितयश कंपनीत तिला नोकरी मिळाली. आज ती तिथे ‘ज्युनिअर इंजिनीअर’ म्हणून काम करते. कंपनीत वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सगळेच तिला सहकार्य करतात. सौर्हादाने वागतात. ती तिचं काम चोखपणे तर करतेच शिवाय नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक असते. नोकरीतही इतर बऱ्याच गोष्टीत तिला रस आहे आणि तिने त्या आत्मसात केल्या आहेत. आता संसारही उत्तम करते आणि त्यात रमून गेली आहे.

मला एकच वाटतं की पालकांनी निराश होऊन चालणार नाही, कारण मुलांच्या जडणघडणीत फक्त एक वाट बंद झाली तरी अनेक वाटा निर्माण होत असतात, फक्त त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. त्या सापडल्या की मूलही घडत जाते आणि मोठेपणी त्यांची प्रगती आनंदच देते. त्यासाठी थोडा संयम, चिकाटी लागते, एवढंच.

आज आम्ही समाधानी आहोत, आम्हाला तिचा अभिमान आहे. आज आमच्या जीवनातला एक अपूर्णाक ‘पूर्णाक’ झाला, याचे अतीव सुख आहे.

gijare.p.s@gmail.com

chaturang@expressindia.com