13 December 2019

News Flash

पपा एक महाकाव्य

सांगताहेत मीना देशपांडे आपले पपा प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे यांच्याविषयी ..

|| मीना देशपांडे

पपांच्या आयुष्यातले फारच थोडे क्षण आमच्या वाटय़ाला आले. पण जे क्षण आले ते मनावर कायमचे कोरले गेले. आपल्या विनोदाने खळखळवून हसवणारे पपा, वेळप्रसंगी समाजातील शत्रूंवर तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या एखाद्या सैनिकाप्रमाणे तुटून पडणारे पपाही पाहिले आहेत. ‘वज्रादपि कठोराणि। मृदुनि कुसुमादपि’ या उक्तीप्रमाणे लोण्यासारखे विरघळणारे पपाही पाहिले आहेत. माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण केवळ पपांमुळेच मला पाहायला मिळाला. पपांमुळे माझ्या वाटय़ाला आलेल्या अनेक अनुभवांनी माझं आयुष्य माझ्या नकळत घडत गेलं. त्यांनी मला भरभरून दिलं, पण ते घ्यायला माझी ओंजळ कमी पडली.. सांगताहेत मीना देशपांडे आपले पपा प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे यांच्याविषयी ..

‘इवलासा अश्रू पर्वत बुडवी

जीवाला चढवी मोक्षपदी

इवलासा अश्रू परी वज्रा चुरी

पाषाणाचे करी नवनीत

इवलासा अश्रू परि बोले किती

देवी सरस्वती होते मूक..’

साने गुरुजींची ‘अश्रू’ ही पपांची अत्यंत आवडती कविता. ‘अश्रूंचा शोध साने गुरुजींनी लावला.’ असं सांगताना आचार्य अत्रे म्हणजेच आमचे पपा प्रल्हाद केशव अत्रे म्हणायचे की ‘अश्रू’ ही अत्यंत सुंदर कविता. एवढीच कविता साने गुरुजींनी लिहिली असती, तरी मराठी वाङ्मयात त्यांचं नाव अजरामर झालं असतं.

पपा आणि अश्रू. ही कल्पनाच कदाचितच मराठी रसिकांना करता येणार नाही. कारण आचार्य अत्रे म्हणजे विनोदाचा धबधबा. आचार्य अत्रे म्हणजे विडंबन काव्याचा प्रणेता. वक्तृत्व-नाटय़-चित्रपट -राजकारण या विविध क्षेत्रांतून दुमदुमणारे हशा आणि टाळ्यांचे आवाज! मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, तेव्हा तेव्हा आपल्या लेखणीतून, वक्तृत्वातून, पत्रकारितेतून या अन्यायावर तुटून पडणारं एक अमोघ अस्त्र, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणपणाने लढणारा एक सच्चा शिलेदार. खिशात पैसे नसतानाही शून्यातून विश्व निर्माण करून उदात्त कल्पनांच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या अवकाशात भराऱ्या घेणारा, अन् त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवणारा एक जादूगार.

महाराष्ट्राच्या या प्रख्यात आचार्य अत्रे यांची मी कन्या आहे, या गोष्टीवर कधी कधी माझा विश्वासच बसायचा नाही. मी आणि नानी, (शिरीष पै) आम्ही त्यांच्या दोनच मुली. ‘नानी-मिनी’ ही लाडकी नावं त्यांनीच ठेवली. नानीच्या जन्माच्या आधी ते नुकतेच एक वर्षांच्या टी. डी.चा अभ्यास करून इंग्लंडहून परतले होते. (त्या काळात टी. डी. म्हणजे टीचर्स डिप्लोमाला अनन्यसाधारण महत्त्व होते!). इंग्लंडहून येताना ते संपूर्णपणे ‘आंग्लाळलेले’ होऊन आले. खाणं, पिणं, कपडे, राहणी एकूण एक ब्रिटिश माणसासारखी अर्थात इंग्लंडहून येताना ते ब्रिटिश साहित्याचा फार मोठा वारसाही घेऊन आले. ‘‘इंग्लंडच्या राजाला जशा दोन मुली, तशा मलाही दोन मुली.’’ असं प्रत्येकाला सांगताना ते स्वत: इंग्लंडच्या राजाच्या थाटात राहात होते.

पपांची सहा फूट, दोन इंच उंची, देहाचं प्रचंड आकारमान, ढगांच्या गडगडाटासारखं हसणं, बोलणं, भोवताली सतत माणसांचा गराडा यामुळे पपा मला आपले वडील न वाटता घरात वावरणारी कुणीतरी एक अद्भुत व्यक्ती असल्यासारखे वाटायचे. त्यांच्याकडे वर बघताना जणू मी आभाळाकडेच बघतेय इतकी माझी मान मागे कलंडायची. त्यांच्याबद्दल एक प्रकारचा भीतियुक्त आदरच त्या काळी माझ्या मनात वसत असे. पण गंमत म्हणजे आम्ही कुठे बाहेर जायला निघालो की मांजरीच्या पिलाला चिमटीत पकडावं तसं ते मला उचलून त्यांच्या कडेवर घेत. तेव्हा मला सारं जग ठेंगणं झाल्यासारखं वाटे.

त्या काळची पपांची सारी नाटके मी पपांच्या मांडीवरच बसून बघितली. फारसं काही कळत नव्हतं तरी नाटकातल्या कोणत्या वाक्याला टाळ्या पडणार, कोणत्या प्रसंगाला हास्याचा प्रचंड स्फोट होणार, अन् कोणत्या प्रसंगी प्रेक्षकांमधून हुंदके फुटणार हे मला अचूक माहीत झालं होतं. पपांची नाटकं बघणं हा माझ्या आयुष्यातला ब्रह्मानंद होता!

पपांच्या अफाट कार्यक्षेत्रामुळे ते आमच्या वाटय़ाला फारसे येत नसत. पण कधी तरी अचानक त्यांना लहर येई अन् आमच्यासाठी वेळ काढून ‘पिकनिक’ला निघत. फराळाचे डबे, चहाचे थर्मास, सतरंज्या, लोड अशा जाम्यानिम्यासकट आम्ही आमच्या शेव्हरलेट् गाडीनं खडकीजवळच्या नदीकाठी असलेल्या एका उपवनात जात असू. पपांची ती अत्यंत आवडती जागा. तिथं एक पाण्याचा लहानसा डोह होता. आमच्यासाठी आणलेले सुंदर रंगीबेरंगी पोहायचे पोशाख चढवून आम्ही त्या डोहात उतरत असू. पपा पट्टीचे पोहणारे. मध्येच लहर आली, की ते सपासप हात मारीत आणि नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचत. आमच्यापासून ते खूप लांब गेल्याच्या भीतीने आम्ही ओरडून त्यांना हाका मारीत असू, ‘‘पपा, लवकर या..’’ ते पुन्हा सपासप हात मारीत आमच्यापाशी आले की, आमचा आनंद गगनात मावेनासा होई.

कधी लहर आली, तर आम्हाला ‘पूना क्लब’मध्ये जेवायला न्यायचे. इंग्रजी पद्धतीने जेवण्याच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. सूपचा चमचा कोणता, कुठला काटा कशाला वापरायचा, जेवण संपले की काटा-सुरी कसे समांतर ठेवायचे याचे ‘गमभन’ त्यांनी आम्हाला व्यवस्थित मन लावून शिकवले. पुडिंग खाऊन नॅपकीन व्यवस्थित घडी करून ठेवला की तृप्त झालेल्या आमच्याकडे आनंदाने बघत म्हणायचे, ‘‘काटर्य़ा अगदी बापापेक्षा हुशार झाल्याहेत!’’ पण असे सोन्याने न्हाऊन निघणारे क्षण आमच्या आयुष्यात अगदी विरळाच येत.

पपांनी निर्मिलेली ‘नवयुग वाचनमाला’ त्या काळात सर्व शाळांमध्ये अभ्यासाला लावलेली होती. मला अक्षरओळख झाली ती त्यांच्या ‘नवयुग वाचनमाले’मधूनच. ‘टिपूची शेपटी’, ‘पळपुटी पुरी’, ‘मुरलीवाला’ या माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी. शब्दांना अर्थ असतो, त्याचबरोबर त्यांना ताल आणि नादही असतो ही मनात जाणीव निर्माण झाली ती त्या गोष्टीमुळेच.

‘नवयुग वाचनमाले’मधल्या ‘हरण हरिणी’, ‘मला नाही हसू येत’, कावळ्यांची शाळा’, ‘दिनूचे बिल’, या कथांमधून पपांच्या हळुवार, सहृद्य वृत्तीचे अन् मानवतावादी दृष्टिकोनाचे दर्शन घडले. अर्थात ‘नवयुग वाचनमाले’चे कर्ते प्रत्यक्ष आपले पपा आहेत, याची त्या वयात मला बिलकूल जाणीव नव्हती. कालांतराने मला कळलं की ‘नवयुग वाचनमाला’ ही पपांची निर्मिती आहे तेव्हा अभिमानाने माझा ऊर भरून आला अन् मी माझ्या मैत्रिणींना सांगत सुटले की या गोष्टी माझ्या पपांनी लिहिल्या आहेत.

सामान्य मुलं आई-वडिलांच्या सावलीत वाढतात, ते भाग्य आम्हाला मिळालं नाही. आमची आई (सुधा अत्रे)हुजूरपागा शाळेत शिक्षिका होती. पपाही त्यांच्या प्रचंड कार्यक्षेत्रामुळे क्वचितच आमच्या वाटय़ाला येत. या काळात माझी मोठी बहीण नानी हीच माझं सर्वस्व होती. माझी आई, माझे वडील, माझी गुरू, माझी मैत्रीण सारं काही तीच होती. त्यामुळे सगळ्याच गोष्टीत मी तिची नक्कल करे. त्या काळात मला माझं असं स्वतंत्र अस्तित्वच नव्हतं. याच काळात आईची नाशिकला मुलींच्या सरकारी शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून बदली झाली. त्याचप्रमाणे सरकारी ट्रेनिंग कॉलेज अन् त्यात शिकणाऱ्या शिक्षिकांच्या वसतिगृहाची देखभाल अशी तिहेरी जबाबदारी तिच्यावर पडली. आईला राहायला सुंदर बंगला देण्यात आला. इतकी सन्मानाची नोकरी मिळाल्यावर आईनं आमच्यासह नाशिकला स्थलांतर केलं.

दरम्यान, पपांनी मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून नाव मिळवलं होतं. पुण्याचे कार्यक्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाला अपुरे पडू लागल्यामुळे त्यांनी याच काळात मुंबईला प्रयाण केलं. थोडय़ाच काळात त्यांनी ‘पायाची दासी’ या चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली. स्वत:चा स्टुडिओ विकत घेतला. त्यांच्या यशाचा झेंडा मराठी चित्रपटसृष्टीत फडकत असताना त्यांनी ‘वसंतसेना’ या अत्यंत खर्चीक चित्रपटाची निर्मिती केली. पण अनेक कारणांनी तो पार कोसळला अन् पपा कर्जाच्या खाईत बुडाले. होतं नव्हतं ते सारं गमावून बसले.

आम्ही दूर नाशिकला असल्यामुळे पपांवर कोसळलेल्या या भयंकर संकटाची काहीच कल्पना नव्हती. आम्हाला वाटायचं की, पपा एवढे ऐश्वर्यात राहताहेत अन् आम्ही मात्र सामान्यांचं जीणं जगतोय. आम्हाला काय माहीत की, पपांची जीवनाशी घनघोर लढाई चालू आहे. मात्र पपा आम्हाला भेटायला नाशिकला यायचे तेव्हा आमच्यावर भेटवस्तूंची अक्षरश: उधळण करायचे. कधी आईला ढीगभर साडय़ा, तर आम्हाला पेटीभर गोष्टींची पुस्तकं. एखादं पुस्तकांचं दुकानच जणू लुटून आणावं तितकी. तेव्हापासून आम्हाला वाचनाचं विलक्षण वेड लागलं. अनेक मोठमोठय़ा मराठी लेखकांची पुस्तकाद्वारे ओळख झाली. साने गुरुजी तर आमचे लाडके लेखक. त्या दिवसात आम्ही पुस्तकं खात होतो, पीत होतो. झोपतानाही पुस्तक लागायचे. ‘‘डोळे बिघडवून घ्यायचेत का काटर्य़ानो?’’ पपा ओरडायचे. ‘‘तुम्हीच तर आणलीत ना पुस्तकं?’’ आम्ही त्यांना उलट बोलून त्यांचंच तोंड बंद करत असू.

त्या काळातला एक प्रसंग कधीच विसरणं शक्य नाही. एकदा पपा आले ते एका विलक्षण मन:स्थितीत. स्वत:च्याच विचारात मग्न असलेले. ते लिहीत असलेलं एक नाटक त्यांना पूर्ण करायचं होतं. कैफ चढावा तशा एका विलक्षण अवस्थेत ते कोचावर नाटक लिहायला बसले. शेजारी कोऱ्या कागदांचा ढीग. आपल्या मोठाल्या ठळक अक्षरात ते भराभर लिहीत होते. त्यांचा तो लिहिलेला कागद आम्ही दोघी अधाशासारखा वाचत होतो. एखाद्या समाधीवस्थेत गेल्यासारखे ते भराभर लिहीत होते. अन् आमच्या अंगावर कागद फेकत होते. मधूनमधून आई चहाचे कप पुरवीत होती. पण त्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. नाटक लिहून पुरं झालं तेव्हा ते भानावर आले अन् समाधानाने मोठय़ांदा हसत आईला म्हणाले, ‘‘आता आण तुझा चहा!’’

संध्याकाळी नेहमीप्रमाणे सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी भेटायला आले. त्यांचं स्वागत करताना म्हणाले, ‘‘या सोपानदेव, असं फर्स्ट क्लास नाटक लिहिलंय! वाचूनच दाखवतो.’’ आम्हा सर्वाना भोवताली गोळा करून त्यांनी नाटय़वाचनाला सुरुवात केली, ‘‘नाटकाचं नाव आहे, ‘जग काय म्हणेल.’ कसंय् नाव?’’ आपल्या पहाडी आवाजात जणू ते साऱ्या जगालाच प्रश्न विचारत होते, ‘जग काय म्हणेल?’

त्यानंतरचा त्यांचा दोन-तीन तास चाललेला वाचनाचा यज्ञ! एका विलक्षण बेभान अवस्थेत पपांनी ते संपूर्ण नाटक वाचून दाखवलं. नाटकाचा अखेरचा भाग इतका प्रभावी होता की तो माझ्या मन:पटलावर कायमचा कोरला गेला. नवऱ्याच्या छळाने त्रस्त झालेली नायिका-उल्का हिला तिच्या परिस्थितीची जाणीव झालेले वडील भेटायला येतात अन् तिला संसाराचा त्याग करून देशकार्याला वाहून घेण्याचा सल्ला देतात. तेव्हा तिचा बिथरलेला नवरा त्यांना उलट विचारतो, ‘‘काय केलंत तुम्ही हे. ती संसार सोडून गेली तर जग काय म्हणेल?’’

त्यावर उल्काचे वडील त्याला ठणकावून सांगतात, ‘‘जग हेच म्हणेल, ती एका बंडखोर बापाची मुलगी आहे.’’

‘जग काय म्हणेल!’ या नाटकातलं हे अखेरचं वाक्य वाचताना पपांचा चेहरा लालबुंद झाला होता. केस विस्कटलेले. जणू एका कैफात असल्यासारखे ते साऱ्या जगाला ओरडून सांगत होते, ‘एका बंडखोर बापाची ही बंडखोर मुलगी आहे!’

हा सारा प्रसंग, पपांचे ते शब्द, त्यांना चढलेला तो विलक्षण उन्माद मी आयुष्यात कधी विसरणं शक्य नाही!

पपांच्या आयुष्यातले फारच थोडे क्षण आमच्या वाटय़ाला आले. पण जे क्षण आले ते मनावर कायमचे कोरले गेले. आपल्या विनोदाने खळखळवून हसवणारे पपा, वेळप्रसंगी समाजातील शत्रूंवर तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या एखाद्या सैनिकाप्रमाणे तुटून पडतानाही पाहिले आहेत. ‘वज्रादपि कठोराणि। मृदुनि कुसुमादपि’ या उक्तीप्रमाणे लोण्यासारखे विरघळणारे पपाही पाहिले आहेत.

एकदा तर मी पपांचं एक विलक्षण रूप पाहिलं. वृत्तपत्रकारितेतील पपांचे गुरू पुण्याच्या ‘ज्ञानप्रकाश’ दैनिकाचे संपादक काकासाहेब लिमये यांच्या मृत्यूनंतर दु:खातिरेकाने अश्रूंच्या महापुरात बुडालेले पपा मी पाहिले. मला वाटायचं अश्रूंचा मक्ता फक्त माझ्याकडेच आहे. पण पपांना अश्रू ढाळताना बघून त्यांच्या-माझ्यात  एक निराळेच नाते असल्याची जाणीव झाली.

आणखी एक असाच हृद्य प्रसंग. १९४७ चा मे महिना. अत्यंत कडक उन्हाळ्याचे दिवस. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण आरंभलं होतं. आठ दिवस झाले तरी काही मार्ग दिसेना. गुरुजींची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. पपांचं साने गुरुजींवर विलक्षण प्रेम. पपा काही मित्रांना आणि आम्हा दोघींना घेऊन पंढरपूरला आले. डोळे खोल गेलेले, म्लान चेहरा, अशा अवस्थेतील गुरुजींना बघताच पपांनी त्यांच्याजवळ बसून, त्यांचे हात हातात घेतले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा

महापूर लोटला. अश्रू हीच दोघांची भाषा.

तोच त्यांचा संवाद. कोण भक्त आणि कोण पांडुरंग. तो भावोत्कट प्रसंग हृदयावर कायमचा कोरला गेला.

मध्यंतरी आम्ही मुंबईला स्थायिक झालो.

बी. ए. झाल्यानंतर आईने माझे लग्न ठरवले. तेव्हा पपा ‘पीस कॉन्फरन्स’साठी हेलसिंकीला गेले होते. तिथून परत आल्यावर पपा एखाद्या सर्वसामान्य वधुपित्यासारखे धुळ्याला लग्नाची बोलणी करायला गेले. १५ ऑगस्ट ही तारीख ठरवून परत आले. आम्ही दहा-बारा जणंच लग्नासाठी गेलो.  माझ्या सासुबाई आजारी असल्यामुळे लग्न घरच्या घरीच साधेपणाने झाले. लग्नाविषयी सामान्य तरुणीसारख्या रम्य कल्पना बाळगणाऱ्या माझा जरा विरसच झाला. शिवाय पपांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सारा खर्च आईनंच केला. त्याचेही मनावर दडपण होते. उदास मनाने मी सासरी जायला निघाले तेव्हा प्रथम आईच्या पाया पडले. एखाद्या खंबीर पित्याप्रमाणे तिनं माझ्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला. पपांच्या पाया पडायला गेले, तर पपा दु:खाने अक्षरश: कोसळलेच. एखाद्या मातेच्या ममतेने मला जवळ घेताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर लोटला. त्यांच्या अश्रूंनी माझ्या मनात साचलेली कितीतरी किल्मिषं वाहून गेली!

माझ्या आयुष्यातील आणखी एक दु:खाचा प्रसंग. माझ्या प्रथम कन्येचं जन्मानंतर आठ दिवसातच हॉस्पिटलमध्ये निधन झालं. आदल्या दिवशीच दैनिक ‘मराठा’चा वाढदिवस पपांनी साजरा केला होता. आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण साजरा करत असतानाच पपांवर दु:खाचा घाला पडला. ते मला त्यांच्या घरी घेऊन आले. त्यांच्या-माझ्या अश्रूंना तर खंडच नव्हता. एक दिवस त्यांनी मला जवळ घेऊन सांगितले, ‘‘पूस ते अश्रू. आता दु:ख करू नकोस. ती आपली नव्हतीच. ती होती एक शापित अप्सरा. ती आता परत जाऊन आकाशातली चांदणी बनलीय. रोज ती तुझ्याकडे पाहतेय.’’ पपांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी माझे अश्रू पुसले. पण त्यांचे-माझे ‘अश्रूंचे नाते’ जडले ते कायमचेच.

आयुष्यात काही दु:खाचे क्षण पाहिले तसे पपांच्या आयुष्यातल्या काही परमोच्च क्षणांची मी साक्षीदार बनले याचा मला मनापासून अभिमान वाटतो. १९५४ मध्ये दिल्लीला मराठी साहित्य संमेलन भरणार होते. उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते होणार होते. पपा, आई आणि मी दिल्लीला जायला निघालो. निघता निघता एक दु:खद घटना घडली, ती म्हणजे पपांच्या आईचा मृत्यू! तिच्या अस्थींचा कलश घेऊन जाण्याची आमच्यावर वेळ आली. साहित्य संमेलन संपल्यानंतर हरिद्वारला जाऊन आम्ही अस्थिविसर्जन केले. दिल्लीला परत येतो न् येतो तोच पपांच्या ‘श्यामची आई’ला उत्कृष्ट भारतीय चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाल्याची आनंदाची बातमी कळली. पपा तर आनंदाने हसता हसता रडत होते. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट निर्माण केला होता.

साने गुरुजींच्या अकाली निधनानंतर त्यांच्या चितेच्या साक्षीनं पपांनी शपथ घेतली होती की साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर मी चित्रपट निर्माण करेन. पपांच्या मार्गात अनेक अडचणी आल्या तरी त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या स्पर्धेत सोहराब मोदींचा ‘झांशी की रानी’ आणि बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ हे चित्रपट असूनही ‘श्यामची आई’ला सुवर्णपदक मिळणं ही दैवी योजना आपल्या आईनेच केली असावी, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.  या सर्व इतिहासाची मी साक्षीदार होते. माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण केवळ पपांमुळेच मला पाहायला मिळाला. पपांमुळे माझ्या वाटय़ाला आलेल्या अनेक अनुभवांनी माझं आयुष्य माझ्या नकळत घडत गेलं. त्यांनी मला भरभरून दिलं पण ते घ्यायला माझी ओंजळ कमी पडली.

पपा म्हणजे एक महाकाव्यच. जणू शेक्सपिअरनं लिहावं तसं. आयुष्यात त्यांनी पराकोटीचे चढउतार पाहिले. पण ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व गाजवलं त्या सगळ्याला मानवतेची झालर होती. अश्रू हे मानवतेचं प्रतीक. इतरांच्या दु:खाने ज्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात तोच खरा माणूस.

साने गुरुजींच्या शब्दात सांगायचं तर,

‘नको माझे अश्रू    कधी नेऊ देवा

हाचि थोर ठेवा  माझा एक

बाकी सारे नेई धन – सुख – मान

परी हे लोचन राखी ओले.’

पपांचे डोळे नेहमीच ओले होते. तेच त्यांचं अन् माझं नातं होतं..

१९४७ चा मे महिना. अत्यंत कडक उन्हाळ्याचे दिवस. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण आरंभलं होतं. आठ दिवस झाले तरी काही मार्ग दिसेना. गुरुजींची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. पपांचं साने गुरुजींवर विलक्षण प्रेम. पपा काही मित्रांना आणि आम्हा दोघींना घेऊन पंढरपूरला आले. डोळे खोल गेलेले, म्लान चेहरा, अशा अवस्थेतील गुरुजींना बघताच पपांनी त्यांच्याजवळ बसून, त्यांचे हात हातात घेतले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा महापूर लोटला. अश्रू हीच दोघांची भाषा. तोच त्यांचा संवाद. कोण भक्त आणि कोण पांडुरंग. तो भावोत्कट प्रसंग माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला.

binapai93@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on August 10, 2019 12:02 am

Web Title: pralhad keshav atre acharya atre mpg 94
Just Now!
X