बुद्धय़ांक आणि भावनांक यांच्यात श्रेष्ठत्व भावनांकाला आहे. आपल्या भावना कशा निर्माण होतात, त्यांचा उगम कुठे आहे, त्या आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ताबा कसे घेतात याचे त्रयस्थ वा अलिप्तपणाने निरीक्षण करण्याची आणि भावनांवर नियंत्रण करण्याचे सामथ्र्य मुलांमध्ये असले पाहिजे.
माझ्यासारख्या शिक्षकाचा एक फायदा असा की, नवतारुण्याच्या उंबरठय़ावर असणारी, उत्साहाने सळसळणारी १७/१८ वर्षांची मुलं-मुली सतत संपर्कात येत राहतात. त्यांच्याबरोबर मलाही तारुण्याचा सातत्याने स्पर्श होत असतो. वर्गात शिरल्याबरोबर प्रचंड कोलाहल माजवणारी, एकमेकांच्या खोडय़ा काढणारी मिश्कील मुलं बघितली की त्यांना शांत बसा, असं म्हणायला माझंच मन धजावत नाही. अशा वेळी मी वर्गात थोडा वेळ स्तब्ध उभा राहतो. हळूहळू मी आल्याच्या जाणिवेमुळे निर्माण होणाऱ्या शांततेची लाट शेवटच्या रांगेपर्यंत विस्तारत जाते. वर्गात शांतता पसरते. मुलं माझ्याकडून काहीतरी शिकायला आणि मी त्यांच्याकडून काहीतरी शिकायला तयार झालेलो असतो. ‘सह’ शिक्षणाचे दोन-अडीच तास पटकन संपून जातात.
 गेली २८ वर्षे अव्याहतपणे चाललेल्या या ज्ञानदानाच्या यज्ञात या हजारो मुलांच्या मानसिकतेकडे अलिप्तपणे बघण्याची जी संधी मला मिळाली आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक जडणघडणीविषयी जी दृष्टी मला मिळाली ती मानसशास्त्राच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातूनसुद्धा मिळाली नसती, हे नक्की. मला जे जाणवले ते पालकांना सांगण्याची तीव्र इच्छा या लेखमालेतून पूर्ण झाली. सांगण्यासारख्या सगळ्याच गोष्टी सांगून झाल्या असे नाही. खरं म्हणजे ‘सुजाण पालकत्व’ हा एका दीर्घ प्रबंधाचा विषय आहे. यात सांगू इच्छितो त्या सगळ्या मुद्दय़ांची शास्त्रशुद्ध मांडणी करून एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे.
प्रत्येक व्यक्तीला मिळणारे यश तो त्यासाठी किती प्रयत्न करतो यावर अवलंबून असते. आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किती प्रयत्न करू ते त्या ध्येयाच्या उच्च-नीचतेवर अवलंबून असते. जेवढे ध्येय उच्च तेवढे प्रयत्नांचे प्रमाण अधिक. आपण कुठले ध्येय स्वत:पुढे ठेवतो, ते मात्र आपल्या स्वप्रतिमेवर अवलंबून असते. आपले स्वत:विषयीचे मत जर आपण एक सामान्य माणूस आहोत असे असेल तर आपली ध्येयेदेखील सामान्यच असतात. त्यासाठी केले जाणारे परिश्रमही यथातथाच असतात. त्यातून मिळालेले यशही सामान्यच असते. त्यामुळे आपण सामान्यच आहोत ही मनोभूमिका अधिकच घट्ट होत जाते. हे एक दुष्टचक्र आहे. त्यातून जर सुटका हवी असेल तर मुळावरच म्हणजे स्वप्रतिमेवरच घाव घालायला हवा. स्वप्रतिमेची वाटचाल सामान्यत्वाच्या भयावह तुरुंगवासातून असामान्यत्वाकडे होण्यासाठी काय करायला हवे, त्यात पालकाचा सहभाग किती, या सगळ्यांचे विवेचन करण्याचा प्रयत्न मी या सदरातून केला. स्वप्रतिमेची जडण-घडण होण्यात आपल्या भूतकाळात दडलेल्या अनेक घटना कारणीभूत असतात. निदान त्या घटना कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटत राहते. वास्तविक, घटना मूलत: अर्थहीन असतात. घटना कधीही अर्थासकट घडत नाहीत. घटना घडतात प्रत्यक्ष जगात, अर्थ मात्र आपल्या मनात निर्माण केला जातो. एका घटनेचे एक नव्हे तर अनेक परस्पर विरोधी निष्कर्ष निघू शकतात. हे सगळेच निष्कर्ष घटनेत अंतर्भूत नसल्यामुळे एका दृष्टीने असत्यच असतात. परंतु आपली मानसिकता कुठल्याही घटनेतून अर्थ काढण्यास बांधील असते. त्यातच आपले जगणे अवलंबून असते. भूतकालीन घटना त्यातून काढलेल्या अर्थासकट मनात साठवायच्या आणि भविष्यकाळात तशाच घटना घडत असतील तर त्यांना तोंड देण्यासाठी भूतकालीन घटनांचे काढलेले निष्क र्ष आपल्याला निर्णय घ्यायला मदत करत असतात. ही एक अटळ अशी मानसिक प्रक्रिया आहे. त्यातून सुटका नाही. परंतु घटना आणि निष्कर्ष या दोघांच्यामध्ये मानवी मेंदू आणि त्यात असलेले असंख्य मज्जारज्जू यांचा जर वापर करायला शिकलो तर निष्कर्ष आपोआप निघण्याऐवजी विचारपूर्वक हेतुत: बदलता येतात.
निघू शकणारे सगळे निष्कर्ष दोन प्रकारांत मोडतात. पहिला प्रकार म्हणजे गती खुंटवणारे निष्कर्ष. आपल्याला परिस्थितीचा गुलाम बनवणारे, मानसिक दौर्बल्याकडे नेणारे असे हे निष्कर्ष. तर दुसऱ्या प्रकारात असतात, आपल्याला गतिशील करणारे, मात्र कुठल्याही परिस्थितीत आपला कर्तेपणा न हरवू देणारे असे निष्कर्ष. असे निष्कर्ष आपल्याला परिस्थितीवर मात करण्याचा संदेश देत राहतात. अर्थातच कुठल्या तऱ्हेचे निष्कर्ष आपण काढतो त्यावर आपले भवितव्य अवलंबून असते. आपले वर्तमान आणि पर्यायाने भविष्य त्यामुळे नियंत्रित होणार असते. तेव्हा निष्कर्ष निवडीचे स्वातंत्र्य आपल्याला मानव म्हणून आहे आणि त्याचा सतत वापर केला तर आणि तरच आपली स्वप्रतिमा सामान्यत्वाच्या जन्मठेपेतून आपली सुटका करू शकेल. ही प्रक्रिया जर पालकांनी ध्यानात घेतली तर आपल्या पाल्यांना ते एक वेगळीच विजिगीषु जीवनदृष्टी देऊ शकतात. तथाकथित अपयश आणि पराभूत मनोवृत्तीचे बळी न होता यशाकडे वाटचाल करण्याची वृत्ती जागवू देऊ शकतात.
स्वप्रतिमा म्हणजे आपण कोण आहोत, आपली क्षमता कितपत आहे, याविषयीच्या समजुतीची गोळाबेरीज. आपण कोण आहोत हे ठरवण्याला आपला पहिला आरसा असतात, आपले आई वडील. ते जी मते आपल्याविषयी व्यक्त करतात ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा नकळत अविभाज्य भाग होऊन बसतात. पण याची जाणीव बहुतेक पालकांना नसते. त्यांना याची जर जाणीव झाली, आणि त्याच्या परिणामांच्या गांभीर्याची समज आली, तर आपली मते ते जाणीवपूर्वक व्यक्त करतील. त्यांनी असा विचार करावा असा आग्रह मी लेखाद्वारे करू इच्छितो. सुजाण पालकत्व हा शिक्षणाचा विषय आहे. काही लेख वाचून आपल्या वागण्यात परिवर्तन कदाचित होणार नाहीत. परंतु काही घातक परिणामांपासून सुटका नक्कीच होऊ शकेल.
सुजाण पालक नेहमीच आपल्या पाल्यांच्या मनात ‘तू सर्वार्थाने समर्थ व्यक्तिमत्त्व घेऊन जन्माला आला आहेस. तुझं भलं-बुरं तुला नक्कीच कळतं. तुझ्या भविष्याबद्दल साधकबाधक  निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात आहे. चुका कदाचित होतीलच. किंबहुना चुका होणारच. त्यापासून शिकण्याचे मात्र टाळू नकोस, पण चुका करण्याचे स्वातंत्र्य आम्ही पालक म्हणून तुला देतो आहोत. दारुण परिस्थिती आलीच तर तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. तेव्हा सार्वभौम हो, निर्णयक्षमता अंगी असू दे’ अशा भावना रुजवण्याचा प्रयत्न करतात. मुलांना स्वयंभू आणि स्वयंपूर्ण करण्याकडे आपला भर असावा. त्यांच्या अभ्यासासाठी आपण जागणे, त्याचा दिनक्रम आपणच ठरवणे, परीक्षा वगैरे आली की रजा घेऊन खूप काळजी घेणे या गोष्टी खूप गोड वाटत असतील, पण त्यातून तो मुलगा किंवा मुलगी मानसिकदृष्टय़ा परावलंबी होण्याची शक्यता असते. नकळत तो किंवा ती आपले काम, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम नाहीत असा संदेशही जातो. त्यामुळे जेव्हा कणखर भूमिका घेण्याची गरज निर्माण होते, तेव्हा ही मुले कच खाताना दिसतात. एका लेखात मी म्हटल्याप्रमाणे शारीरिक अपंगत्व समर्थ मानसिकतेने भरून काढता येतं, पण मानसिकदृष्टय़ा अपंग व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याची शक्यता शून्य ठरते.    
दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी पुनरुच्चाराचा धोका पत्करून सांगू इच्छितो की बुद्धय़ांक आणि भावनांक यांच्यात श्रेष्ठत्व भावनांकाला आहे. आपल्या भावना कशा निर्माण होतात. त्यांचा उगम कुठे आहे. त्या आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ताबा कसे घेतात याचे त्रयस्थ वा अलिप्तपणाने निरीक्षण करण्याची आणि भावनांवर नियंत्रण करण्याचे सामथ्र्य मुलांमध्ये असले पाहिजे. पालकांनी त्या दृष्टीने त्यांचे संगोपन व समुपदेशन केले पाहिजे. या कामासाठी मी मुख्यत्वेकरून तीन विचारवंतांचा व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला होता. तो आता परत करतो. डॉ. एरिक बर्नचे  Transactional Analyasis  आणि am ok you are ok  हे पुस्तक वाचा. एडवर्ड डी बोनोचे Teach your child how to think हे पुस्तक वाचा. डॅनियल गोलमनचे  Emtional  intelligence हे पुस्तक वाचा, स्टीफन कोव्हे या लेखकाची दोन पुस्तके  7 Habits to most effective people  आणि  7 Habits to most effective families ही दोन्ही पुस्तके वाचा. हजारो वर्षांपूर्वी कन्फ्युशियस नावाच्या चिनी विचारवंताने म्हटले आहे. I hear I forget, I see I belive, I do I understand.याचा प्रत्यय मला माझ्या स्फूर्ती कार्यशाळांमधून अनेकदा आला आहे.
 लेखमाला सुरू झाली आणि आता हा शेवटचा लेखांक. या दरम्यान वाचकांचे असंख्य मेल आले. आपल्या सगळ्यांनाच मी उत्तरे देऊ शकलो नाही, परंतु यापुढेही या विषयावरच्या चर्चा इमेलद्वारे चालूच राहील आणि ज्ञानदानाचा हा यज्ञ असाच चालू राहील.                  (समाप्त)