शहरातील रोजच्या धावपळीचा, त्याच त्याच कामांचा ताण आणि शीण येतोच. मनाला विरंगुळा म्हणून कधी वाचन करतो तर कधी चित्र वाहिन्यांवर फेरफटका मारत असतो. पण मन.. मन तसंच राहातं.. एकटं.. उदास.. शिणलेलं.. काही तरी शोधत असतं.. पण सापडत नाही.. ते सरभर धावतच असतं. मनातले विचार काही वेळ का होईना पण बाजूला ठेवून निवांतपणा, आनंदाचे दोन क्षण अनुभवता येईल असं काही तरी हवं असतं.
ते सापडतं.. खिडकीतून दूरवर दिसणारे किंवा बागेतील एखादे झाड किंवा दुसऱ्याच्या गॅलरीत निरागसपणे डोलणारी रंगीबेरंगी फुलं पाहून.. आपल्याला थोडं निवांत वाटतं, मन सुखावतं.. डोळ्यांना बरं वाटतं. आणि नकळत आपल्याकडेही असं एखादं कुंडीत फुलाचं झाडं असावं असा विचार मनात येतो.. विचार मनात आला की बुद्धी आपल्याला सावध करते. तर्क करून ते खोडून काढते.. कशाला कट कट.. कुंडय़ा आणा, झाडं आणा.. रोज रोज पाणी घाला.. खत घाला, कीड पडते.. बरं त्याविषयी विचारायला जावं तर कुणाला विचारावं असे एक ना अनेक प्रश्न.. जाऊ दे असं म्हणून.. खिडकीतून समोरचीच झाडं बघून विषय सोडून देतो.
पण ही कुंडीतील बाग फुलवणं आपल्या, कुटुंबाच्या आरोग्यासाठी हितावह आहे. बाजारात रासायनिक खतांचा मारा झालेली भाज्या-फळे असताना, घरची ताजी-टवटवीत भाजी तीही सेंद्रिय पद्धतीने फुलवता येईल, हा विचारही करायला हवा ना! चला तर मग, घरच्या घरी सकस भाज्या कशा पिकवू शकतो ते पाहूया अधिक विस्तृतपणे.
संदीप चव्हाण – sandeepkchavan79@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:07 am