डॉ. चंद्रकांत संकलेचा आणि डॉ. अरुण गद्रे यांनी २६ सप्टेंबरच्या अंकात लिहिलेल्या ‘गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा’ या लेखाला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अपेक्षेप्रमाणेच बाजूने आणि त्या लेखाच्या विरोधातही. ‘गर्भसंस्कार’च्या नावावर केल्या जाणाऱ्या बाजाराचे, फसवणुकीचे कुणीच समर्थन करणार नाही. म्हणूनच प्रतिसाद म्हणून आलेल्या मन:शक्ती केंद्र, तसेच नामवंत डॉक्टर, वैद्य, आणि वाचकांच्याही निवडक प्रतिक्रिया देत आहोत.
डॉ. अरुण गद्रे आणि डॉ. संकलेचा यांचा गर्भसंस्कारावरील लेख वाचला आणि माझेही अनुभव मला सांगावेसे वाटले. गेल्या ४४ वर्षांपासून स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मी काम करीत आहे. त्यातील २० वर्षे महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम केलं आणि गेली २५ वष्रे स्वत:ची प्रॅक्टिस आहे, हे यासाठी सांगितलं की ग्रामीण आणि शहरी भागातील प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे.
गर्भसंस्काराचा विचार म्हणा, फॅड म्हणा, फॅशन म्हणा हे सगळं या पाच-सात वर्षांतील आणि शहरी भागातलंच. खेडय़ात तर आरोग्याच्याच सुविधा अपुऱ्या आहेत, त्यामुळे गर्भसंस्काराचा संस्कार अजून तरी तिथे झालेला नाही. वाढत्या वयात होणारी लग्नं, उशिराचं गरोदरपण, आíथक सुबत्ता, फक्त दोघांचं कुटुंब, वाढत्या वयाबरोबर येणारे आजार, उच्च रक्तदाब, गरोदरपणीचा मधुमेह, बाळाची वाढ बरोबर नसणं इत्यादी बाबींमुळे गर्भवतीवर खूप ताण येत असतो, अशा वेळी त्यांना हे ‘गर्भसंस्कार करणारे’ भेटतात आणि योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी भलत्याच गोष्टी शिकवितात. औरंगाबादसारख्या १५ लाखांच्या शहरात १०-१५ अशी गर्भसंस्कार केंद्रे असतील. यातील दोन-चार अगदी चांगली आहेत. मातेच्या आरोग्याचा विचार करणारी, अतिशय वैज्ञानिक आहेत, पण बाकीची चिंता करण्याजोगी.
आता माझे अनुभव सांगते. एक गर्भवती महिला आली. पोटाला लेप लावलेला होता. सातवा किंवा आठवा महिना होता. तपासल्यानंतर तिला म्हटलं सोनोग्राफी करायची आहे. हा लेप पुसून टाक नाही तर सोनोग्राफी करता येणार नाही. तर म्हणाली, ‘हा लेप २४ ते ४८ तास ठेवायचाय हा पुसता येणार नाही. नॉर्मल प्रसूती व्हावी म्हणून हा लेप लावलाय.’ हा लेप लावून समजा बाळ आडवं असेल. पायाकडून असेल, वार खाली असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं जरी लेप लावला तरी डिलेव्हरी नॉर्मल होणार नाही, पण ती बाई ऐकायला तयारच नव्हती. खरं म्हणजे सुरुवातीपासून ती माझ्याकडे तपासण्यासाठी येते. पण माझा संवाद, समुपदेशन कौशल्य, माझा अनुभव सगळं निष्प्रभ पडलं आणि ८-१५ दिवसांच्या गर्भसंस्काराच्या वर्गाचा एवढा प्रभाव की ती लेप काढू देईना. मग सोनाग्राफी कशी होणार?
दुसरा अनुभव. एक सुशिक्षित, वकील झालेली (घरी आई/ वडील/भाऊ/काका सर्वच वकील) रुग्ण नियमित तपासणीला येणारी. नेटवरून माहिती घेऊन सतत प्रश्न विचारणारी. जागरूक. प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. तपासायला गेले तर पोटावर एक सी. डी. प्लेअर लावलेला. त्यावर मंत्रोच्चार चालू होते. मी म्हटलं प्लेअर काढ. तपासायचं आहे. तर म्हणाली मी काढणार नाही. तसंच तपासा. प्लेअरची जागासुद्धा बदलू नका. नस्रेसनीही तक्रार केली की त्या आवाजामुळे (एन. एस. टी.) मशीनने बाळाच्या ह्रदयाचे ठोके ऐकता येत नाहीत. पण ऐकेना. इकडे तिला कळा येताहेत. तिच्या ओरडण्याचा आवाज त्यातच मंत्रोच्चारांचा आवाज सगळा गोंधळ. त्यात बाळाचे ठोके अनियमित आणि कमी झाले. सीझरचा निर्णय घ्यावाच लागला. डॉक्टरवरच ठपका आलाच की सी. डी. प्लेअर हलवल्यामुळे सीझर झालं, नाही तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. असो.
तिसरी एक पहिलटकरीण. कळा सुरू झाल्या म्हणून आमच्याकडे दाखल झाली. तिचाही मंत्रजप सुरूच झाला पण तोंडाने. यथावकाश तिला लेबररूममध्ये घेतलं तर ही बाई टेबलवर झोपायला तयार नाही. झोपलं की कळा येत नाहीत. डोकं खाली येत नाही, असं तिला या क्लासमध्ये सांगितलेलं होतं. बसूनच डिलिव्हरी करा म्हणाली. ९९ टक्के प्रसूती झोपलेल्या अवस्थेतच करतात. शेवटी कळा टिपेला गेल्या तेव्हा चार- चार बायकांनी तिला धरुन समजवलं तेव्हा कुठे महत्प्रयासाने डिलिव्हरी नाटय़ावर पडदा पडला.
असे कितीतरी अनुभव सांगता येतील. अमेरिकेतले ‘लम्हाज क्लासेस’ मी पाहिलेले आहेत. गर्भवती, तिचा नवरा यांच्यासाठी अतिशय चांगलं प्रशिक्षण तिथे देतात. तिथे आपल्यासारखी परिस्थिती नाही. गर्भसंस्कार हे खरं म्हणजे गर्भावरचे संस्कार नाहीतच. ते गर्भवतीवरचे, तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं, बाळंतपणासाठी सक्षमपणे समोर जाता यावं. योग्य आहार, योग्य व्यायाम व सर्वासाठीचे हे समुपदेशन. मार्गदर्शन किंवा प्रत्यक्ष कृतीतून केलेले हे संस्कार, त्यामुळे बाळ हुशार, तेजस्वी, कॅलेंडर बेबी होईल हे स्वप्न दाखवणं, हा आभास निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे. या वर्गाना जाणाऱ्या स्त्रिया सर्व सुशिक्षित, आíथक सुस्थितीतल्या असतात. या वर्गामध्ये दोनच गोष्टींवर जोर दिला जातो. बाळ हुशार, गुटगुटीत व्हावं आणि प्रसूती नॉर्मल व्हावी. उद्देश वाईट नाही. पण माझा अनुभव असा आहे की, या गर्भवती मंत्र, ध्यान वगरे गोष्टी लक्षात ठेवतात आणि खूप नेमाने मनापासून नियमित त्याचं पठणही करतात, पण आहार, विहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष करतात.
बाळ हुशार व्हावं म्हणजे काय? इंजिनीअर, डॉक्टर, वकील म्हणजे हुशार का? एकदा हुशार म्हणजे काय हेही ठरवायला हवं. गुटगुटीत किंवा जास्त वजनाचं बाळ उलट चिंतेचं कारण असतं. साडेतीन किलोपेक्षा जास्त वजन असेल बाळाचं तर सीझेरियन होण्याचं प्रमाण खूप वाढतं. या सगळ्या शास्त्रीय बाबींकडे कानाडोळा करायचा आणि जे लक्षात ठेवलं नाहीतरी चालेल तेच लक्षात ठेवायचं हे गर्भसंस्कार वर्गाचं यश आणि आम्हा डॉक्टरांचं अपयश असे खेदाने म्हणावे लागेल. गर्भसंस्काराच्या शास्त्रीय बाजूचे यथार्थ विवेचन डॉ. अरुण गद्रे यांनी केलेलंच आहे. (गेली अनेक वर्षे ते हे जनजागृतीचे काम करीतच आहेत.) मी तर माझ्या रुग्णांना सांगते की, हे गर्भावरचे संस्कार नसून गर्भवतीसाठीचा मार्गदर्शनाचा संस्कार आहे. अशा वर्गामध्ये १५ दिवस संस्कार करून बाळ सुसंस्कारीत होईल याची काय हमी?
संस्कार तर आयुष्यभर करावे लागतात. कौटुंबिक संस्काराबरोबर सामाजिक संस्कारही महत्त्वाचे असतात. त्याची सांगड धर्म, अध्यात्म याच्याशी फारशी घालू नये. गर्भवतीच्या भावनिक कमजोरीचा गरफायदा घेऊ नये.
– डॉ. सविता पानट, औरंगाबाद -drsavitapanat@gmail.com

दुनिया झुकती है..
डॉ. गद्रे आणि डॉ. संकलेचा यांचे अभिनंदन. मी एम.एस्सी. नर्सिग असून सायन येथील नर्सिग स्कूलची निवृत्त प्राचार्य आहे. सध्या टाटा हॉस्पिटलच्या नर्सिग कॉलेजमध्ये प्राध्यापक तसेच नर्सिग सल्लागार म्हणून काम पाहते. त्याचप्रमाणे ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आपला गर्भसंस्कारावरील लेख अतिशय प्रबोधन करणारा आहे. यामधले मांडलेले मुद्दे केवळ अशिक्षितांसाठीच नव्हे तर ते आमच्यासारख्यांनीही ध्यानात घ्यावेत असे आहेत.
‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ याप्रमाणे सध्या गर्भसंस्कार वर्ग चालतात. आणि हे झुकानेवाले दुसरे-तिसरे कोणी नसून पेशाने डॉक्टर असणारेच बहुधा असतात. तर झुकणाऱ्यांमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे अनेक डॉक्टर आणि नर्सही आहेत. त्यामुळेच तुम्ही याबाबतीत आवश्यक असणारे सर्व मुद्दे योग्य उदाहरणासह मांडल्याने फारच आनंद झाला. काही महिन्यांपूर्वी ‘स्टेम सेल्स’च्या जतनाविषयी आपण लिहिलेला लेखही असाच लोकांचे डोळे उघडणारा होता. या विषयावर जनजागृती करण्यासाठी आपल्याला मदत करायला मला नक्की आवडेल.
– अनिता देवधर

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

झणझणीत अंजन
डॉ. गद्रे आणि डॉ. संकलेचा, आपण गर्भसंस्कारांविषयी लिहिलेल्या मुद्देसूद लेखाबद्दल सलाम. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिल्यामुळे हा लेख गर्भसंस्कारांमागे डोळे झाकून धावणाऱ्यांसाठी एक झणझणीत अंजनच आहे. मीही एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. स्त्रीरोगसंदर्भात अनेक चर्चासत्रांमध्ये मी सहभागी होत असतो. सोशल मीडियामध्ये संपूर्ण भारतातील अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ सहभागी आहेत. त्या माध्यमावरील संघटनेचा मी एक सदस्य असून मला आपला लेख इंग्रजीत भाषांतरित करण्याची माझी इच्छा आहे. जेणेकरून इतर राज्यांत सुरू असलेल्या गर्भसंस्कारांच्या क्लासेस आणि व्यवसायाला चाप बसवण्यास फायदेशीर ठरेल.
– डॉ. पराग पाटील, कल्याण</strong>

गर्भसंस्कार हे पूर्ण शास्त्र
गर्भसंस्कारांवरील डॉ. गद्रे आणि संकलेचा यांचा पूर्ण लेख वाचल्यानंतर लेख लिहिणाऱ्या सन्माननीय डॉक्टरांना गर्भसंस्कार म्हणजे फक्त यंत्र, मंत्र, डॉल्बी संगीत, आहार व्यायाम व यासाठी भरपूर पैसा लागतो इतकेच माहीत आहे असे स्पष्ट जाणवते.
गर्भसंस्कार हा विषयच मुळात जुना. त्यावर आयुर्वेदातील शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या कित्येक नामवंत डॉक्टरांनी संशोधने करून, शास्त्रीय पुरावे समोर ठेवून गर्भसंस्कारांचे फायदे जगासमोर ठेवले. गर्भसंस्कार हे पूर्ण शास्त्र आहे. त्यामध्ये गर्भधारणेपूर्वी शरीरशुद्धीकरण, गर्भधारणेपूर्वीची काळजी, गर्भावस्थेतील काळजी, गर्भावस्थेत आहार, राहणीमान, गर्भाचा मासानुमासिक विकास कसा होतो याचे ज्ञान, गर्भावस्थेत व्यायाम-योगासन, प्रसूतिपश्चात आई व बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळावर कोणते संस्कार कधी व कसे करावेत याची सांगोपांग माहिती दिली जाते. माननीय-सन्माननीय लेखक डॉक्टरद्वयीला माझा प्रश्न आहे की, आहे का तुमच्या आधुनिक शास्त्रात ही माहिती? आजच्या विभक्त कुटुंब संस्कृतीमध्ये गर्भधारणा-गर्भावस्थेची सांगोपांग माहिती देणारे शास्त्र म्हणजे गर्भवती स्त्रीची आईच आहे. गर्भसंस्कारातील नॉर्मल प्रसुतीसाठी बस्ती चिकित्सा, वातानुलोमन चिकित्सा याचा फायदा होतो याची अक्षरश: लाखो उदाहरणे देता येतील.
महाराष्ट्रातील काही विद्यापीठांमध्ये गर्भसंस्कार या विषयावर प्रमाणपत्र कोर्स सुरू झाले आहेत. मग या प्रमाणपत्रालाही अंधश्रद्धा म्हणायचे काय?
– डॉ. पवन लड्डा, लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय, लातूर

गर्भपात टाळण्यासाठी गर्भसंस्कार
‘गर्भसंस्काराचा अंधश्रद्ध सापळा’ या लेखात लेखकद्वयीला नक्की काय म्हणायचे आहे, त्याबद्दल संभ्रम आहे असे वाटते. ‘गर्भवती स्त्रियांची काळजी’ याला गर्भसंस्कार हा शब्द वापरू नये, त्यामुळे ते आयुर्वेदिक वाटते असे त्यांना वाटते का? खरेच या क्लासेसमध्ये काय शिकवले जाते ते त्यांनी किती आयुर्वेदिक डॉक्टरांशी चर्चा करून मत मांडले आहे? लहानपणी मार खाल्लेली किती तरी मुले मोठेपणी कर्तृत्ववान झाली आहेत, म्हणून बालसंस्कार अंधश्रद्धा ठरत नाही. तसेच चाइल्ड सायकोलॉजिस्ट थोतांड आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे. कालपर्यंत योगालासुद्धा अशास्त्रीय म्हणून फिजियोथेरपीच शास्त्रीय मानली जात होती. शहरातील लोकांना हे क्लासेस करण्याचे मुख्य कारण सतत होणारे गर्भपात आणि सिझेरियन टाळणे हे आहे, हेसुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
– वैद्य संगीता जाधव, ऐरोली, नवी मुंबई</strong>

सापळा उद्ध्वस्त करण्याची गरजच
डॉ. संकलेचा आणि डॉ. गद्रे , तुमच्या लेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! गर्भसंस्कारांचा हा अंधश्रद्ध सापळा उद्ध्वस्त करण्याची फार गरज होती, तुमच्या लेखाने हे काम चोखपणे केले आहे.
तुमचा लेख मी माझ्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे, ज्याला येणारे विरोधी कमेन्ट्स पाहून या विषयात आपला समाज अजूनही किती अडाणी, किती चटकन फसणारा राहिला आहे हे लक्षात येते. आता तुमच्या लेखालासुद्धा बराच विरोध होईल (एव्हाना सुरू झालाही असेल), मात्र सगळेच सुधारक विचार नेहमी अल्पमतात असतात, हे लक्षात घेत तुम्ही हे प्रबोधन सुरू ठेवले पाहिजे, तुम्ही तसेच कराल याचा विश्वास वाटतो. मी स्वत:सुद्धा आयुर्वेदाचा पदवीधर (इअटर) आहे, मात्र कॉलेजमध्ये असल्यापासून माझा यावर कधीही विश्वास नव्हता. तुमच्या लेखात ज्याचा उल्लेख नाही असा एक ‘पुंसवन विधी’ आयुर्वेदात दिला आहे- जो पुत्रप्राप्तीसाठी केला जातो. त्याचेही मार्केट असेच जोरात आहे, आणि माझ्या परीने मी माझ्या रुग्णांचे प्रबोधन करीत त्यांना यापासून परावृत्त करत असतो. नाकात औषध सोडल्याने गर्भाचे लिंग बदलत नाही, असे परोपरीने समजावत असतो.
– डॉ. ज्ञानेश पाटील, जळगाव.

विश्लेषक वृत्तीचा अभाव
गर्भसंस्कारांवरील शास्त्रीय पद्धतीने तुम्ही लिहिलेल्या डोळे उघडवणाऱ्या लेखाबद्दल धन्यवाद. आजच्या काळात आपण स्पर्धा आणि प्रचंड ताणाला सामोरे जात असल्याने असे ‘शॉर्टकट’ शोधले जातात. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा संपन्न, सुशिक्षित लोक याच्या जाळ्यात सापडतात. पण मूळ समस्या आहे ती शिक्षण. आपल्याकडे शास्त्रीय पद्धतीने एखाद्या गोष्टीचा विचार करणे, त्याचे विश्लेषण करणे याचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अनेकांचे फावते.
प्रसाद फाळे, पुणे</strong>

गर्भासाठी भाषा निर्थकच
‘गर्भसंस्कार’ या विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन. मुळात आपल्या बोलण्यात जी एनर्जी असते ती ‘७० डीबीएचएल’ एवढीच असते. गर्भाशयातल्या बाळाच्या कानापर्यंत पोहोचेस्तोवर ती शक्ती क्षीण झालेली असते आणि जरी तिथवर पोहोचली तरी बाळाच्या मेंदूला त्याचा अर्थ लावता येत नाही. त्याच्यासाठी ती निर्थक, अनोळखी भाषा असते. बाळाला बहुधा जाणवतात ते आवाजातले चढउतार, सुटे सुटे शब्द नव्हेत. हे सगळं मी पालकांना समजावून सांगत असतेच आणि फसवणुकीपासून सावध करायचा प्रयत्नही. तुम्ही या स्वघोषित तज्ज्ञ आणि छद्म विज्ञानावर हल्ला चढवला आहे. त्याबद्दल आभार.
सावनी गोडबोले, श्रवण शास्त्रज्ञ आणि वाचा विशेषज्ञ, पेण

आयुर्वेदाविषयी आकस नाही
डॉ. अरुण गद्रे आणि डॉ. चंद्रकांत संकलेचा यांच्या या लेखाद्वारे अनेकांच्या मनात रुजलेल्या गर्भसंस्कार या सुप्रतिष्ठित व्यवसायाबाबतचा संदेह/भ्रम दूर होण्यास मदत व्हावी. लेखक स्वत:च उच्चविद्याविभूषित स्त्री-रोगतज्ज्ञ असल्याने सोनाराने कान टोचले ते बरेच झाले; तथापि संपूर्ण लेखात त्यांचा आयुर्वेदाबाबत आकस अथवा किंतु दिसून येत नाही. आयुर्वेदाची स्पेस आणि मर्यादा त्यांना मान्य आहे. हा लेख वाचून सुज्ञांनी गर्भसंस्काराच्या मोहजालातून/ सापळ्यातून वेळीच सुटका करून घेणे त्यांच्या तसेच पर्यायाने समाजाच्या हिताचे आहे.
– जयंत म्हेत्रस

गर्भसंस्कार नव्हे, पालकसंस्कार
या लेखात म्हटल्याप्रमाणे गर्भसंस्कारांचे बाजारीकरण, व्यापारीकरण झाले आहे हे सत्य आहे. गर्भसंस्कार हा जास्त मानसशास्त्रीय आहे असे मला वाटते. म्हणूनच यात गर्भसंस्कारांना ‘माता-संवर्धन’ची दिलेली उपमा अत्यंत समर्पक वाटते. या वर्गामध्ये मुख्यत्वे संगीत किंवा मंत्र ऐकविले जातात. त्याचा गर्भावर व त्याच्या वाढीवर काय/कसा परिणाम होतो याचा शास्त्रीयदृष्टय़ा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. आत्ताच्या घडीला तरी गर्भसंस्कार हा गर्भावर नसून पालकांवर होतो. जे आई-वडील यांच्यासह आजी-आजोबांवरही होणे गरजेचे आहे, कारण त्याच्या संगोपनाची जबाबदारी एक टय़ा आईची नसून साऱ्यांची आहे.
– दीप्ती कुलकर्णी, पुणे

लेखाच्या बाजूची पत्रे रुपाली पवार, रेडिओथेरपी टेक्नॉलॉजिस्ट, प्रथमेश आडविलकर , डॉ. श्रीराम गीत आदींनीही पाठवली होती.