आपले मूल खात नाही म्हणून त्या आईने व वेळप्रसंगी आजीने त्याच्याबरोबर   सर्कस (अक्षरश:) तासाभराची कसरत करू नये. नाही तर घरात लेकराचे जेवण म्हणजे एक पकडापकडीचा खेळ असतो. याचे शास्त्रीय कारण असे की जे पचनासाठीची लाळ फक्त २० मिनिटे टिकते. त्यानंतर आपले भुकेचे केंद्र कार्य करायचे बंद करते व कितीही आटापिटा केला तरी ते मूल खात नाही. पण भूक लागल्यावर ते मूल असेल ते न कुरकुर करता खाते. मग ते मूल पिझ्झा-बर्गरची वाट बघत नाही. पण त्यासाठी फक्त असावा लागतो तो आईमध्ये संयम.

पूर्वी स्थूलपणाचे किस्से ऐकले की ते थोडे अवास्तव व अतिरंजित वाटायचे, परंतु वाढते रुग्ण बघायला मिळाल्यावर असे वाटले की अरे ही पाश्चात्त्य समस्या आपल्या दारात येऊन उभी राहिली आहे. म्हणून लहानग्यांमधील स्थूलता यावर लेखात चर्चा करुया.
माझ्याकडे एक नऊ महिन्याचे गोंडस बाळ आले होते. बाळ कसले तो साक्षात ‘छोटा भीमच’ होता. वजन ‘फक्त’ अठरा किलो. आईला म्हटले, ‘बाई गं काय खायला घालतेस त्याला?’ तर अपराधी स्वरात म्हटली, ‘काय करू डॉक्टर हा खातच नाही?’ तिच्या डोक्यातला तो दर दोन तासांनी साजूक तुपातील पदार्थ भरवण्याच्या किडय़ाला काढायला मला सहा महिने लागले. कारण पंधराव्या महिन्यात त्या बाळाचे वजन २५ किलोवर पोहोचले. वडिलांना त्याला उचलणेदेखील अवघड झाले.  शेवटी बाळाला सोडून आईचे समुपदेशन करावे लागले.
स्थूलपणाच्या धोक्याविषयीच्या यादीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यामुळे होणारा अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा व रात्री घोरणे व निद्रानाश. त्याला आपण obstructive sleep apnea  म्हणतो. त्यामुळे रात्रीची झोप तर अपुरी होतेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
आता अलीकडेच माझ्याकडे चार रुग्ण असे आले की त्यातल्या मुलींची मासिक पाळी सुरू झालेली होती. त्या मुलींची वये ८ ते १० वयोगटांतली. दवाखान्यात मायलेकी दोघी रडत होत्या. आईला पहिले बघावे की त्या लेकीला हा पेचप्रसंग. मग त्यातील एका आईने मला विचारले की ‘डॉक्टर आता पाळी आल्याने जास्तीत जास्त काय नुकसान होणार?’ मी म्हटले, ‘अगं बाई तिची वाढ खुंटेल, उंची वाढणार नाही’ आईचे उत्तर, ‘काय बोलताय डॉक्टर ती तर तिच्या वर्गात सगळ्यात उंच आहे.’ हे उंचीचे प्रकरण चांगलेच उंच ताणले गेले आणि मग मला तिला त्या विधानामागची ‘लांब’ शास्त्रीय कारणे सांगावी लागली. म्हटले, ‘अगं, पाळी लवकर आल्यामुळे हाडांची वाढ वेळेआधी होते, त्यालाच आम्ही growth plate fusion  असे म्हणतो. ही एकदा का पूर्ण झाली की साक्षात धन्वंतरीने वाढीचे अमृत दिले तरी उंची वाढणे केवळ अशक्य!’
म्हणूनच महत्त्वाचा मुद्दा असा की सातव्या-आठव्या वर्षीच मुलींच्या स्तनाची वाढ झाली किंवा काखेत केस दिसू लागल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण अशा वेळी सल्ला घेतल्यास पाळी थांबवणे शक्य असते व उंची वाढवायच्या (Growth Hormones) चा पर्याय उपलब्ध असतो. जेव्हा आपण स्थूलपणाबद्दल एवढी चर्चा करतो, तेव्हा त्यावर प्रतिबंधात्मक उपाय सांगणे अनिवार्य आहे.
लहान मुले अनुकरणप्रिय असतात. स्थूलपणा व लहान मुलांमधील मधुमेह याबाबतच्या पथ्याचा सल्ला देताना आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात की हे पथ्य त्या बालकापुरते मर्यादित नसून ते साऱ्या कुटुंबीयाने पाळणे आवश्यक असते. आपण पिझ्झा, बर्गर खायचा व लेकराला सांगायचे की अमुकतमुक खाऊ नकोस! केवळ अशक्य! आता पंचाईत अशी होते की घरात दोन मुले असल्यास व त्यातील एक स्थूल नसल्यास त्या ‘त्रास’ नसलेल्या लेकराला आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटते. तोडगा काय? तर तो असा की, दुसऱ्या लेकरालादेखील स्थूलपणाचा धोका असतोच! हे जर त्याला पटवून दिले, फास्ट-फूडपेक्षा अधिक चांगले (चवीला) पण पौष्टिक पर्याय दिले तर बऱ्याच प्रमाणात ही समस्या सुटते.
मग पदार्थ द्यावे तरी काय? किती व किती वेळा? एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिवसातून तीन वेळा जेवण देण्यापेक्षा चार ते पाच वेळा छोटे भाग द्यावेत. म्हणजे त्या मर्यादित कॅलरीज् लगेच खर्ची पडतात व त्या जास्तीच्या साखरेचे रूपांतर चरबीमध्ये होत नाही.
दुसरा मुद्दा असा की टीव्ही बघत जेवण कधीही देऊ/भरवू नये. यात दोन टोकांचे दुष्परिणाम होतात. एक तर ते मूल त्या ‘कार्टून’ वा तत्सम कार्यक्रमामध्ये इतके मग्न होते की काहीच खात नाही अथवा आपण किती खातो यावर नियंत्रणच राहत नाही.
तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपले मूल खात नाही म्हणून त्या आईने व वेळप्रसंगी आजीने त्याच्याबरोबर सर्कस (अक्षरश:) तासाभराची कसरत करू नये. नाही तर घरात लेकराचे जेवण म्हणजे एक पकडापकडीचा खेळ असतो. याचे शास्त्रीय कारण असे की जे पचनासाठीची लाळ फक्त २० मिनिटे टिकते. त्यानंतर आपले भुकेचे केंद्र कार्य करायचे बंद होते व कितीही आटापिटा केला तरी ते मूल खात नाही. किंबहुना जबरदस्ती केली तर वेळप्रसंगी ओकारी करते. तात्पर्य, असे की भूक लागल्यावर ते मूल असेल ते न कुरकुर करता खाते. मग ते मूल पिझ्झा-बर्गरची वाट बघत नाही. फक्त असावा लागतो तो आईमध्ये संयम.
आता सगळ्यात मोठी भेडसावणारी समस्या, अर्थात आईसाठी- डॉक्टर, खायला काय देऊ? रोज किती चीज दिले तर चालेल? अंडे रोज चालेल काय? एक ना अनेक प्रश्न.
थोडक्यात सांगायचे झाले तर असे साधारण दोनदा कडधान्य (भात/पोळी/भाकरी) एक वेळा सूप, एखादे फळ, मांसाहारी असाल तर १ अंडे (शक्यतो पांढरा भाग) किंवा एक खीर/मधल्या वेळचे खाणे देण्यास हरकत नाही.
शक्यतो गुळावर जोर देऊन साखरेचा वापर कमी करावा. उदा. साखरेचा शिरा करण्यापेक्षा गुळाचा सांजा करावा. मधल्या वेळात खाण्यात खजुराची खीर, गूळ-शेंगदाण्याचा लाडू अथवा चिक्की जरूर द्यावी. चुरमुरे- कमी तेलातील भडंग द्यायला हरकत नाही. मांसाहार घेणाऱ्यांमध्ये चिकनपेक्षा माशांचे सेवन जास्त करावे. त्यातील ओमेगा तीनने कोलेस्टेरॉलने होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण तर होतेच आणि बुद्धय़ांक वाढण्यास मदत होते.
हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते कळते पण वळत नाही. मग यांत आईचे कौशल्य काय तर घरी केलेल्या ‘चमचमीत पदार्थात’ बीट/पालक/गाजर/मेथी अशा फळ व पालेभाज्या अशा बेमालूमपणे घालणे की त्या लहानग्यांना त्याचा मागमूसदेखील लागत नाही.
तिसरा मुद्दा तेल कोणते वापरावे? तर ते असे की सनफ्लॉवर, राइसब्रान, शेंगदाणा तेल आलटूनपालटून वापरावे. मध्ये एका वैद्यकीय मासिकात एका शोधनिबंधात असेही आढळले आहे की मशीनवरच्या तेलापेक्षा घाण्यावरच्या तेलाचे सेवन जास्त करावे. आठवडय़ातून दोन वेळा थोडे चीज द्यायला हरकत नाही. जेवणात ताकाचे महत्त्व अनन्यसाधारण. ताकामुळे रक्तशर्करा यांचे नियमन चांगले होते.
आता विषय येतो तो मुलांनी किती खेळावे, कोणते व्यायाम करावेत? भरपूर पळणे, सायकल चालवणे व पोहण्यासारखे व्यायाम उत्तम. या व्यायामांनी स्थूलपणा कमी होतोच पण स्टॅमिना व मानसिक आरोग्य सुधारते. हल्ली व्यायामाबद्दल विचारले की एकच उत्तर मिळते, डॉक्टर सायकल चालवते ना? किती विचारले की बिल्डिंगभोवती ३-४ चक्कर मारतो! बस? वाढत्या वयात किमान ४ ते ५ किमी तरी किंवा ४० मिनीटं  ब्रिस्क एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकीची चावी हातात ठेवण्याआधी त्या लेकराला सायकल वापरायला प्रोत्साहन द्यावे. आई-वडिलांनी मुलांबरोबर सायकलिंग केले तर फारच उत्तम!
जर आइस्क्रीम, गोडधोड खाणे झालेच तर आल्यावर त्या कॅलरीज खर्ची करण्याची सवय मुलांना लावावी. वरील मुद्दय़ांचा आधार घेऊन जर मुलांचे दिनक्रम आखले तर एक सुदृढ व आनंदी समाज बघायला मिळेल. तेव्हा ‘स्वस्त’ खा ‘मस्त’ राहा.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने