डिमेन्शियामध्ये स्मृतीबरोबर वाचाशक्ती, कुशल क्रिया करणे, बघितलेल्या गोष्टी ओळखण्याची क्षमता, अवघड क्रमाने करावयाच्या क्रिया करणे अशा गोष्टींवरही परिणाम होतो. या अशा बौद्धिक विकलांगतेमुळे हळूहळू त्याबरोबर रुग्णाच्या शारीरिक व भावनिक कुवतीवरदेखील परिणाम होतो. यामुळे त्याला कालांतराने दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठीसुद्धा इतरांची मदत लागते. यामुळे रुग्णाचे जीवन अधिक कष्टप्रद होते.

म नुष्याचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे वयस्कर लोकांची संख्या समाजामध्ये अधिक होऊ लागली आहे. असे म्हटले जाते की १९९७ पासून २०२५ पर्यंत ६५ वर्षांपुढील लोकांची संख्या दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर दिसणाऱ्या आजारांचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. अशा आजारांमधील एक म्हणजे स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्रजीमध्ये  dementia  या नावाने ओळखले जाते.
स्मृतिभ्रंश या आजारामध्ये प्रामुख्याने स्मृतीचा ऱ्हास होतो. स्मृती, म्हणजे इंग्रजीमध्ये मेमरी (memory) ही दोन प्रकारची असते. शॉर्ट टर्म मेमरी (थोडय़ा वेळापूर्वी आकलन केलेली गोष्ट लक्षात ठेवणारी) व लाँग टर्म मेमरी (दीर्घ कालापूर्वी आकलन झालेली गोष्ट लक्षात ठेवणारी) स्मृतीभ्रंशामध्ये शॉर्ट टर्म मेमरी अतिशय कमजोर होते. परंतु बुद्धीची कमजोरी इतपतच हा आजार मर्यादित नसतो. स्मृतीसोबत इतरही काही बौद्धिक कार्ये करणे रुग्णाला अवघड व्हायला लागते. त्यामुळे शास्त्राने स्मृतीभ्रंशाची व्याख्या अशी केली आहे, कायमस्वरूपी स्मृतीचा ऱ्हास loss of memory ) व त्याबरोबर पुढीलपैकी एक * Aphasia (अफेजिया)- कमजोर वाचाशक्ती Apraxia  (अप्रॅक्सिया)- कुशल हालचाली करण्याची क्रिया कमजोर होणे. * Agnosia (अग्नोजिया)- परिचित वस्तू किंवा व्यक्ती ओळखण्याची क्रिया कमजोर होणे.  * Loss of executive functioning  (लॉस ऑफ एक्झिक्युटिव्ह फंक्शिनग)- अवघड क्रिया न जमणे.
 तर अशा पद्धतीने डिमेन्शियामध्ये स्मृतीबरोबर वाचाशक्ती, कुशल क्रिया करणे, बघितलेल्या गोष्टी ओळखण्याची क्षमता, अवघड, क्रमाने करावयाच्या क्रिया करणे, या गोष्टींवरही परिणाम होतो. या अशा बौद्धिक विकलांगतेमुळे हळूहळू त्याबरोबर रुग्णाच्या शारीरिक व भावनिक कुवतीवरदेखील परिणाम होतो. यामुळे त्याला कालांतराने अ‍ॅक्टिव्हिटिज ऑफ डेली लिव्हिंग (Activities of daily living-ADL) म्हणजे दैनंदिन जीवनातील कामे- जसे की आंघोळ, स्वच्छतेच्या क्रिया, कपडे घालणे, जेवणे ही कामे करण्यासाठीसुद्धा मदत लागायला लागते. यामुळे रुग्णाचे जीवन अधिक कष्टप्रद होते. रुग्णाची सेवा करणाऱ्या नातेवाईकांवरही अशा कामांचा ताण पडतो. नातेवाईकांना त्यांचे दु:खदेखील बघवत नाही, त्यामुळे त्यांचेही मानसिक संतुलन बिघडते. अशा प्रकारे स्मृतीभ्रंशामुळे सर्व परिवारावरच आघात होतो, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
आता आपण डिमेन्शिया होण्याची कारणे समजावून घेऊ या. मेंदूच्या विविध आजारांमुळे डिमेन्शिया होऊ शकतो, त्यांची यादी खाली नमूद केली आहे-
*  डिजनरेटिव्ह (Degenerative) – म्हणजे मेंदूच्या पेशींचा ऱ्हास होणे- अल्झायमर्स स्मृतीभ्रंश या वर्गात मोडतो. * मल्टी इफाक्र्ट डिमेन्शिया (Multi infarct dementia)- मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा स्मृतीभ्रंश.* विटॅमिन बी डेफिशियन्सी (Vitamin B deficiency)- बी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा डिमेन्शिया.* पोस्ट- ट्रॉमॅटिक (Post troumatic)- मेंदूला मार लागल्यामुळे झालेला डिमेन्शिया.* HIV dementia – एचआयव्ही वायरसमुळे.*  Alcohol and other toxins  – दारू व इतर हानिकारक पदार्थाच्या सेवनामुळे. *Brain tumor- मेंदूचे टय़ुमर (गाठी).
तर अशा अनेक  गोष्टींमुळे डिमेन्शिया होतो. वाढते वय, रक्तदाब, मधुमेह, दारूचे सेवन, धूम्रपान, पोषक आहाराची कमतरता या गोष्टी जर असतील तर एखाद्या व्यक्तीला स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता निरोगी माणसापेक्षा जास्त असते.
तर स्मृतिभ्रंशाची लक्षणे अशा प्रकारे आहेत-
* स्मृती कमजोर होणे. * निर्णय घेणे न जमणे.
   * अडचणी सोडवू न शकणे. * मत बनवू न शकणे * संघटित कार्य करण्याची क्षमता जाणे.
* हिशेबात गोंधळ * बोलताना अडचणी येणे-शब्द न सापडणे * वाट चुकणे * व्यक्तिमत्त्वात बदल होणे-रागीट, दु:खी स्वभाव होणे, सायकोटिक बनणे.
* भावनांवर नियंत्रण ठेवता न येणे. * आवडीने भाग न घेणे, औदासीन्य येणे.  * Mood disorder(मूड डिस्ऑर्डर)- मनोवस्थेचे आजार- उदा.- नैराश्य.
वरीलपैकी एक किंवा जास्त लक्षणे रुग्णामध्ये आढळतात व जसजशी आजाराची तीव्रता वाढत जाते, तसतशी अधिकाधिक लक्षणे दिसू लागतात.
स्मृतिभ्रंशाचे निदान आपण विविध तपासण्या करून पक्के करतो. बुद्धीचे मापन करण्याची विविध प्रश्नावली वैद्यकीय साहित्यात उपलब्ध आहेत. त्यामध्ये सामान्यपणे आम्ही फोल्स्टिन मिनिमेंटल स्केल ही प्रश्नावली वापरतो. ती अशी आहे-
* काळाचे भान आहे का हे तपासणे- रुग्णाला वेळ, वार, महिना, कुठले वर्ष सुरू आहे हे विचारा. जागा व पत्ता याचे भान आहे का हे तपासणे, रुग्णाला पत्ता विचारणे. * रुग्णाला एखादी गोष्ट करायला सांगून त्याला ते समजते आहे ते हे पाहणे. * रुग्णाला ३ शब्द देऊन त्याची नोंद तो मनात ठेवतो का हे पाहणे. तेच ३ शब्द १० मिनिटांनी आठवतात हे पाहणे. * साधी वजाबाकी करायला सांगून रुग्णाची साधे हिशेब करण्याची क्षमता व त्याचे आपल्याकडे व्यवस्थित ध्यान आहे हे तपासणे. * वस्तू दाखवून त्यांची नावे सांगायला लावणे. * वाचन करता येते का हे तपासणे. * लिखाण करता येते का हे तपासणे. * आपण बोललेले तो परत बोलू शकतो का हे तपासणे. * पंचकोन काढायला सांगून रुग्णाची आकार समजण्याची क्षमता तपासणे.
तर अशा प्रकारच्या तोंडी व लेखी प्रश्नावलीतून रुग्णाला स्मृतीभ्रंश आहे व तो किती तीव्र स्वरूपाचा आहे हे समजते. यानंतर त्याचे स्कॅन जसे की सीटी स्कॅन किंवा एमआरआय हे केले जातात. गरजेप्रमाणे काही रक्त-लघवीच्या चाचण्यादेखील केल्या जातात.
आपण आता वरील नमूद केलेल्या पैकी ‘अल्झायमर्स डिमेंशिया’ या आजाराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. आधी सांगितल्याप्रमाणे अल्झायमर्स हा एक डिजनरेटिव्ह प्रकारातला डिमेंशिया आहे, म्हणजे यामध्ये मेंदूच्या पेशींचा हळूहळू ऱ्हास होतो व त्या कमी होत गेल्यामुळे मेंदूची बौद्धिक क्षमता कमी होते. अलॉइस अल्झायमर या मेंदू शास्त्रज्ञाने १९०७ साली हा आजार शोधून काढला.
अल्झायमर्समध्ये मेंदूमध्ये कशा स्वरूपाचे बदल होतात हे पाहू या. मेंदूतल्या पेशी कमी होतात. मेंदूच्या पेशी एकमेकांशी मज्जातंतूद्वारा संपर्क करतात. या आजारामध्ये या तंतूंमध्ये अमायलॉइड (Amyloid) या प्रकारचे तंतुमय प्रथिने साठायला लागते. त्याचबरोबर न्यूरोफिब्रिल (Neurofibril) या प्रकारचे नळीच्या आकाराचे फॉस्फरस जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात असलेले दुसरे प्रथिन यांची गुंतागुंत मज्जातंतूंमध्ये तयार व्हायला लागते. या अमायलॉइड व न्यूरोफिब्रिस यांच्या गुंतागुंतीमुळे मज्जातंतूमधला एकमेकांचा संपर्क कमजोर होतो. मेंदूच्या एका पेशीकडून दुसरीकडे संदेश पोहोचणे जमेनासे होते. यामुळे बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. मेंदूतील बौद्धिक कार्ये ही एका पेशीकडून दुसरीकडे न्यूरोकेमिकलची (Neurochemical – रसायने) देवाणघेवाण केल्याने होते. अशाच एका अ‍ॅसिटिलकोलिन (Acitylcholine) या रसायनाची अल्झायमर्समध्ये कमतरता होते. दुसरे एक ग्लुटामेट  नावाचे रसायन माफक प्रमाणामध्ये मेंदूत राहिल्यास बुद्धी जागृत ठेवते; परंतु अल्झायमर्समध्ये त्याचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त होते. ग्लुटामेट या रसायनाचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त झाल्याने पेशी जरुरीपेक्षा जास्त उत्तेजित होतात व त्यामुळे थकून जातात. असे झाल्यामुळेदेखील बुद्धीवर परिणाम होतो.
आता अल्झायमर्सचे निदान कसे करतो हे पाहू या. फोल्स्टिन मिनिमेंटल स्केल व यांसारख्या प्रश्नावलींचा उपयोग करून बुद्धी कमी झाली आहे व ती किती प्रमाणात कमी झाली आहे हे आपण जाणून घेतो. त्याबरोबर मेंदूचा सीटी किंवा एमआरआय स्कॅन करून मेंदूच्या पेशी सुकल्या आहेत हे आपण बघतो. वरील प्रकारचे स्कॅन सोडून काही विशेष स्वरूपाचे स्कॅन अल्झायमर्सच्या निदानासाठी उपलब्ध आहेत. याला पेट स्कॅन असे म्हणतात. हा स्कॅन करण्यापूर्वी शरीरामध्ये रेडिओअ‍ॅक्टिव्ह  (म्हणजे अणूकिरणोत्सर्जी फ्लोरिन ग्लुकोजला जोडलेले असलेले) शरीरात इंजेक्शनद्वारा सोडतात. अल्झायमर्स रुग्णाच्या पेशी या निरोगी पेशींपेक्षा ग्लुकोज कमी प्रमाणात वापरतात व हे या पेट स्कॅनमध्ये दिसून येते व निदान होण्यास मदत होते.
अल्झायमर्सचा उपचार खालीलप्रमाणे करावा- १) औषधे- मेंदूमध्ये अ‍ॅसिटिलकोलीन हे रसायन वाढविणारी औषधे देणे. त्याचबरोबर ग्लुटामेट हे रसायन कमी करणारी औषधेदेखील उपयोगी पडतात. २) कुटुंबीयांचे समुपदेशन- त्यांच्या मनाची तयारी करणे, त्यांना आजाराविषयी शिकविणे, रुग्णाच्या मर्यादा समजून घेण्याची त्यांची क्षमता वाढविणे. ३) केअरर अर्थात रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती, तिला प्रशिक्षण देणे. उदा.- रुग्णाला औषधे कुठली, कशी देणे, त्याला दैनंदिन जीवनातल्या कामकाजामध्ये कशी मदतीची गरज लागते हे शिकविणे. ४) घरामध्ये व्यवस्था व आखणी बदलणे- उदा. रुग्ण वस्तू कुठे ठेवल्यात ते विसरतो, म्हणून त्याच्या कपाटांना पाटय़ा लावणे.
तर अशाप्रमाणे अल्झायमर्स डिमेंशिया या आजाराचे निदान जर लवकर होऊ शकले तर त्यावर उपचार करता येतो, ज्यामुळे रुग्णाचा आणखी बुद्धीचा ऱ्हास आपण रोखू शकतो व त्याचे व त्याच्या नातेवाइकांचे आयुष्य आपण सुकर करू शकतो.