मानसी होळेहोन्नूर

जपानमध्ये सध्या ‘मानलेल्या’ बहिणींची संख्या वाढत आहे. आश्चर्य वाटेल ना, पण हे सत्य आहे, मात्र या बहिणी केवळ मानलेल्याच नव्हे, तर भाडे तत्त्वावरच्या असतात. त्या जे काम करतात ते खूपच प्रशंसनीय आहे. बहिणीच्या नात्यानेच ते सोडवणं गरजेचं असल्यामुळे असेल कदाचित त्यांना सिस्टर म्हटलंय. ‘हिकीकोमोरी’ ही सध्या जपानमधली एक मोठी समस्या समजली जात आहे. १८ ते ३५ या वयोगटातले अनेक जण स्वत:ला खोलीत कोंडून घेत आहेत, ते त्यांच्या घरातूनच नव्हे तर त्यांच्या खोलीमधूनदेखील बाहेर पडत नाहीत. काही जण तर वर्षांनुवर्ष घरातून बाहेर पडत नाहीत. एक प्रकारे ते सगळ्यापासून अलिप्त होतात. हा खरे तर मानसिक आजार समजून त्यावर उपचार झाले पाहिजेत, पण घरात हिकीकोमोरी असणे हे कमीपणाचे समजले जात असल्याने ही गोष्ट लपवण्याकडे लोकांचा कल असतो. पण त्यामुळे गोष्टी काही वेळा अगदीच हाताबाहेर जातात. मुळात असे एखादे कारण घडले असते की ज्यामुळे लोक त्यांच्या कोषात जातात, लोकांमध्ये मिसळणे टाळतात. हिकीकोमोरी होणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाणच जास्त असते. हे पुरुष कोणाशीही संवाद साधत नाहीत, आपल्या खोलीत स्वत:भोवती एक अदृश्य भिंत उभी करून त्याच्या आतच राहतात, कोणालाही त्याच्या आत येऊ देत नाहीत. काही वेळा हे हिकीकोमोरी, स्वत:ला इजा करून घेतात किंवा अचानक आक्रमक होऊन घरातल्यांना शारीरिक इजा करतात. या सगळ्या समस्येचे मूळ संवादात असल्यामुळे जपानमध्ये ‘रेंट-अ-सिस्टर’ हे संवादाचे, हिकीकोमोरींवर उपचाराचे नवीन माध्यम शोधून काढले आहे. या मानलेल्या बहिणी मग ही सेवा मागवणाऱ्या लोकांच्या घरी जातात आणि हिकीकोमोरीच्या दाराबाहेरून त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. कधी कधी त्यांना दोन तीन भेटींमध्येच खोलीत प्रवेश मिळतो, संवाद सुरू होतो, तर काही वेळेला यासाठी काही महिनेसुद्धा द्यावे लागतात. मग हळूहळू संवाद सुरू झाल्यावर या बहिणी त्यांच्या भावांना परत एकदा माणसाळवतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो, तसेच त्याचे समाजापासून दूर जाण्याचे कारण वेगळे असते, त्यामुळे प्रत्येकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधावा लागतो, त्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो. त्यामुळे एकदम अशा लोकांना समाजात मिसळणे, नोकरी, व्यवसाय करणे अवघड जाते, यासाठी म्हणून ‘न्यू स्टार्ट’ या ‘रेंट-अ-सिस्टर’ सुरू करणाऱ्या कंपनीने काही वसतिगृहेसदृश व्यवस्थादेखील सुरू केली आहे. ज्या लोकांना समाजात पूर्णपणे मिसळण्याची खात्री वाटत नसते, असे लोक इथे राहतात. त्या बदल्यात ते काही समाजोपयोगी कामे करतात, त्यातून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा नवा आत्मविश्वास मिळतो. मग ते परत नव्याने त्यांचे आयुष्य सुरू करतात. एखादी बहीण ज्या पद्धतीने शांतपणे ऐकून घेते, गरज पडली तर हात पुढे करून सांभाळून घेते. ही बहिणीच्या नात्यातली भावना जगभर सारखीच असणार. त्यामुळेच जगाकडे पाठ फिरवलेल्यांना परत माणसात आणण्याचे काम करण्यासाठी बहिणीच लागतात आणि त्या घरात नाहीत म्हणून मग अशा भाडेतत्त्वावर मिळवल्या जातात. पूर्वी म्हणायचे कितीही पैसे फेकले तरी नाती बाजारात मिळत नाहीत, आता बदलत्या काळात पैसे देऊन नातीदेखील मिळायला लागली आहेत. काळाचा महिमा तो हाच!

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

धावपटू माता

सध्या लोकांना पळणे आणि पळवणे खूप आवडायला लागले आहे, कारण शहरोशहरी ३ किमी, ५ किमी, १० किमी पळण्याच्या स्पध्रेचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने अनेक जणांना सोशल मीडियावर त्यांचा हा व्यायाम दाखवता येतो. बरेच जण या छोटय़ा स्पर्धाना सरळ मॅरेथॉन असेच म्हणतात आणि बोलता बोलता ३ कि.मी.ची मॅरेथॉन पळालो असे म्हणतात. मुळात मॅरेथॉन असते ४२.१९५कि.मी. किंवा २५.२२ मलांची, हे अर्थात ऑलिम्पिकसाठी ठरवलेले अंतर आहे. असे अंतर कापण्यासाठी मेहनत, सराव हा लागतोच, त्यामुळे हौस म्हणून छोटी अंतरे पळणारे नेहमीच जास्त असतात. हौशे-नवशे हे फार फार तर अर्ध्या मॅरेथॉनपर्यंत जातात. पण एखादी मॅरेथॉन २६८ मलांची असेल तर त्यामध्ये पळणाऱ्यांना काय म्हटले पाहिजे?

दरवर्षी ग्रेट ब्रिटनमध्ये २६८ मल म्हणजे ४३१.३ किमीची ‘स्पाइन रेस’ होत असते, ही स्पर्धा अनेक दऱ्याखोऱ्यांमधून जात असते. धावपटूंचा खरा कस लावणारी ही स्पर्धा जगातल्या अवघड स्पर्धापैकी एक समजली जाते. वेगवेगळ्या वयोगटातले, देशांमधले स्त्री-पुरुष या स्पर्धेत भाग घेत असतात. या वर्षीची ही स्पर्धा १२ जानेवारीला सुरू झाली आणि एका अनपेक्षित स्पर्धकाने ती जिंकली. जॅस्मिन पॅरिस या ३५ वर्षांच्या स्त्रीने या वर्षी ८३ तास, १२ मिनिटे आणि २३ सेकंद ही वेळ नोंदवून या वेळची स्पर्धा जिंकली. जर दिवसांच्या हिशोबात बोलायचे झाले तर जॅस्मिन सलग ३ दिवस ११ तास पाठीवर मोजके सामान घेऊन पळत होती, चालत होती. पहिल्यांदाच या स्पध्रेत भाग घेऊनसुद्धा तिने पहिल्याच वर्षी ही स्पर्धा जिंकून तर दाखवलीच, पण त्याचबरोबर या स्पर्धेतला स्त्री स्पर्धकांमधल्या सर्वात कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रमदेखील गाजवला. जॅस्मिनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही स्पर्धा सुरू असतानाच, ती तिच्या मुलीला ब्रेस्ट फीडिंगही करत होती. या पूर्ण स्पर्धेत पळत असताना तिने काही छोटे विश्राम घेतले होते, ते सगळे मिळून अवघे ७ तासाचे होते. त्यामध्येच तिने खाऊन घेतले होते, पॉवर नॅपही घेतली होती आणि तिच्या १४ महिन्यांच्या मुलीसाठी ब्रेस्ट मिल्क पंप करून दिले होते. या स्पर्धेत भाग घ्यायचा असे जेव्हा तिने ठरवले, त्याच्यानंतर या स्पध्रेसाठी तिने खास तयारी करायला सुरुवात केली. तिच्या मार्गदर्शकाने तेव्हा तिला पाठीवर काहीतरी सामान घेऊन पळण्याची सुरुवात केली, तर या बयेने चक्क तिच्या लेकीलाच पाठुंगळी घेतले आणि पळण्याचा, चालण्याचा सराव करायला लागली. या स्पध्रेच्या काही दिवस आधीच तिची लेक आजारी पडली होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिला अँटिबायोटिक्स दिले होते, म्हणून मग काळजीपोटी, जॅस्मिनने ब्रेस्ट फीडिंग सुरूच ठेवले होते. तिच्या या पळण्याच्या स्पर्धेतही तिने ते सुरूच ठेवले आणि त्याचा कोणताही अडथळा तिला जाणवला नाही. आई झाल्यावर तुम्हाला अनेक गोष्टींच्या मर्यादा येतात. मुलांमुळे काहीच करता येत नाही असे सांगणाऱ्या सगळ्यांना जॅस्मिन पॅरिस, मेरी कोम, सेरेना विल्यम्स यांसारख्या अनेकींनी हे नेहमीच दाखवून दिले आहे. जॅस्मिन ही प्राण्यांची डॉक्टर आहे आणि सध्या ब्रिटनमध्येच एडिन्गबर्ग विद्यापीठात संशोधनदेखील करत आहे. स्पाइन रेस ही स्पर्धा फक्त शारीरिक कस जोखणारी नाही तर तेवढीच मानसिक क्षमता जोखणारीसुद्धा असते. रात्री, अपरात्री एकटय़ानेच एखाद्या भागातून पळायचे, दोन, तीन दिवस नीट सलग झोप झालेली नसतानाही शरीराला आणि मनाला पळवायचे हे नक्कीच सोपे नाही. अनेकजण ही स्पर्धा मध्येच सोडून देतात, जॅस्मिनने पण स्पर्धा जिंकल्यानंतर सांगितले की शेवटचे काही अंतर तिला नुसते भास होत होते, रस्त्यात प्राणी दिसत होते, त्यावेळी तिच्या कणखर मनाने तिला तारून नेले. लेकीला बघण्याची ओढही होतीच. या स्पध्रेच्या आधीही जॅस्मिनने अनेक विक्रमांची नोंद केली होती. पण ‘स्पाइन रेस’ ही तिची खास कामगिरी समजली पाहिजे. कारण तिने आईपण निभावता निभावता स्पर्धादेखील जिंकून दाखवली. आता अजून पुढे पुढे कोणते नवीन विक्रम जॅस्मिन पॅरिस करून दाखवते याची जास्त उत्सुकता आहे.

ऑस्करसाठी ‘भारत’

आंतरराष्ट्रीय स्तरावर घटनांच्या तारखा, महिने अनेकदा ठरलेले असतात, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नोबेल विजेत्यांची घोषणा होते आणि डिसेंबरमध्ये त्यांना हे पुरस्कार दिले जातात, तसेच डिसेंबरमध्ये ऑस्करसाठीच्या पहिल्या ९ नावांच्या यादीची घोषणा होत असते. मग जानेवारीमध्ये शेवटची यादी आणि फेब्रुवारीमध्ये विजेत्यांना पारितोषिके दिली जातात. ‘लगान’नंतर कोणत्याच भारतीय चित्रपटाने शेवटच्या पाचात हजेरी लावलेली नाही, तरीही यावेळच्या ऑस्करमध्ये एका वेगळ्या अर्थाने ‘भारत’ आहे. हे भारताचे ऑस्करमधले प्रतिनिधित्व करायला कारणीभूत ठरली आहे एक इराणी स्त्री. ‘रायका झेहताब्शी’ या इराणी अमेरिकन स्त्री दिग्दर्शिकेची ‘पीरेड, एंड ऑफ सायलेन्स’ ही डॉक्युमेंट्री वा माहितीपट शेवटच्या पाचात आहे. मग आता त्याचा आणि भारताचा काय संबंध? तर या माहितीपटात जी गोष्ट सांगितली आहे ती दिल्लीजवळच्या एका गावातली आहे. या माहितीपटाएवढीच हा माहितीपट कसा तयार झाला याची गोष्टसुद्धा वेधक आहे. लॉस एंजेलिसमधल्या ओकवूड शाळेतल्या मुलींना त्यांच्या शिक्षिकेकडून कळले की जगात अनेक ठिकाणी स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस खूप असुविधांना सामोरे जावे लागते. अनेकींना सॅनेटरी पॅड म्हणजे काय हेसुद्धा माहीत नसते, त्यांच्यामध्ये पाळीबद्दल अनेक गैरसमज असतात. त्यामुळे त्यांनी शाळेत व्हेगन केकची विक्री करून आणि इतर स्टॉल लावून ३ हजार डॉलर म्हणजे जवळपास २ लाख रुपये जमवले. या पशांतून काठीखेरा या हापूर जिल्ह्य़ातल्या गावात ‘पॅडमॅन’ अरुणाचलम मुरुंगथम यांची सॅनेटरी पॅड मशीन विकत आणली जाणार होती. हा प्रकल्प यशस्वीपणे पार पडल्यावर ओकवूडच्या मुलींना आणि त्यांच्या शिक्षिकेला वाटले, जर आपण या सगळ्याची गोष्ट माहितीपटाद्वारे जगासमोर आणली तर कदाचित इतरही अनेक ठिकाणी स्त्रियांना या सुविधा मिळतील, पाळीबद्दलचे समज-गैरसमज दूर होतील. म्हणून त्यांनी रायकाला या कामासाठी विचारले आणि त्यासाठी तिला पैसेसुद्धा देऊ केले. हा माहितीपट करण्यासाठी या अमेरिकन शाळकरी मुलींनी ४० हजार डॉलर (जवळपास २८ लाख रुपये) एवढा मोठा निधी गोळा केला. या माहितीपटाच्या निमित्ताने रायका दोनदा भारतात येऊन गेली. तिला खात्री आहे, या माहितीपटामुळे या विषयावर खुलेपणाने चर्चा होईल. अमेरिकन मुलींच्या पुढाकाराने एका इराणी स्त्री दिग्दíशकेने भारतातल्या एका गावातल्या स्त्रियांचे मासिक पाळीबद्दलचे प्रश्न, त्यांचे समज यावर बोधपट तयार केला हे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाचे उदाहरण आहे. या बोधपटाला ऑस्कर मिळो अशी शुभेच्छा तर देऊ याच; पण त्याचबरोबर आपल्या समाजातही मासिक पाळीबद्दल बोलण्याचा खुलेपणा येवो, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास सुसह्य़ करण्यासाठी आवश्यक ते सगळे मिळो आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न आपल्याच देशातून, आपल्याच समाजातून व्हावे अशी आशा करायला काय हरकत आहे?

(स्रोत- इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे, वृत्तपत्र)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com