‘भावनिक घोटाळा वा भावनिक चकवा विचित्र असतो, एखाद्या प्रतिकूल भावनेतून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. पण हे प्रयत्न मुळावर परिणाम करणारे नसले तर पुन:पुन्हा आपण त्याच भावनेत अडकतो, मग त्याची ही भीती वाटू लागते. ‘प्रॉब्लेम अबाऊट प्रॉब्लेम’ म्हणतात तो हाच.

काही दिवसांपूर्वी एका परिचितांकडे जाणं झालं. कुठल्या तरी फुटकळ कारणाचा मोठ्ठा बाऊ करून त्यांच्या कंपनीनं त्यांना अर्धवट वयात स्वेच्छानिवृत्ती घ्यायला भाग पाडलं होतं. वाटलं होतं, की ‘काय परिस्थिती असेल घरी? आपल्याला जरा बेताबेतानंच मदतीचा-सल्ल्याचा हात पुढे करावा लागेल. एकदम भावना दुखावल्या जायला नकोत.’ दार उघडलं त्याच क्षणी एकदम आतून जोरदार ओरडा ऐकू आला. तोही रागाचा नाही तर उत्तेजित झाल्याचा! पाहिलं तर जमिनीवर कॅरमचा डाव चालू होता. नुकतीच त्यांना कव्हरसकट ‘क्वीन’ मिळाली होती! त्यांनी प्रसन्न हसून स्वागत केलं. आम्हीच हबकलो होतो. ज्या भावनेची आम्ही चित्रं रंगवली होती (सांत्वनाच्या शब्दांसकट) ती कणभरसुद्धा दिसत नव्हती. आमचं अवघडलेपण त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, ‘मला असं बघून आश्चर्य वाटतंय ना? अहो, स्वाभाविक आहे ! जे घडलंय ते नक्कीच धक्का देणारं होतं, निदान पहिले दोन-तीन दिवस तरी. मग मी विचार केला की मनात आलेलं दु:ख आणि निराशा उलटय़ा पद्धतीनंही बघता येते का ते पाहूया! थोडक्यात हा धक्का म्हणजे दु:खाचं रूप घेऊन आलेली एक पर्वणी आहे असं म्हटलं तर? बघा ना, गेल्या कित्येक दिवसांमध्ये मी कुटुंबाला वेळ देऊ शकलो नव्हतो. माझ्या अनुभवावर मला एक ते दोन महिन्यांत एखादी नोकरी नक्की मिळेल. मग ते एक दोन महिने दु:खात, चिंतेत घालवण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी करून बघूया. अर्ज तर करायचेच आहेत. ते चालूच राहील. तुम्हाला सांगू का-ज्या क्षणी मनानं हा विचार केला, त्या क्षणी गरम हवेत थंडगार पाण्याचा फवारा अंगावर उडावा तसं वाटलं. माझं भाग्य की घरातल्या सगळ्यांना ते पटलं आणि खूप आश्वस्थ वाटलं. ही माझी ट्रॅन्झिट फेज सुरू आहे बरं का. स्वैपाक शिकतोय, व्यायाम करतोय, मस्त गाणी ऐकतोय, आई-बाबांशी भरपूर गप्पा मारतोय आणि सगळा आनंद मनातल्या व्हॉल्टमध्ये जपून ठेवतोय. मुलगी तर सगळ्यांना सांगते, बाबांनी आमच्यासाठी म्हणून ‘िस्प्रग ब्रेक’ घेतला. तिथून परतताना वाटलं, ‘खरंच हे जमलं यांना! दु:खाचं-निराशेचं संधीत आणि संधीचं-आनंदात रूपांतर करता आलं. म्हणजे प्रतिकूल भावना आल्या तर त्यांना असं काही डौलदार वळण देता आलं की त्या नुसत्या सुसह्य़ झाल्या असं नाही तर पर्याय शोधायलाही मदत करत्या झाल्या. एखादी अडचण/ समस्या जरा वेगळे पलू फोकस करत बघितली तर आधी तीव्र नकोशा भावनांमुळे झाकल्या गेलेल्या, न दिसलेल्या गोष्टी दिसायला लागतात. अवघड परिस्थितीत/ मनावरचे ताण यांच्यावर स्वत:च केलेला समर्पक विनोद हा तर अशा भावनांवरचा अगदी अक्सीर इलाज आहे. तो सुद्धा त्या परिस्थितीला सहज झेलण्यासाठी मनाला शिस्त लागावी म्हणून!
मी कॉलेजमध्ये असताना रोज पुण्याच्या बालगंधर्व पुलापर्यंत भल्या सकाळी फिरायला जात असे. संघाचे एक ज्येष्ठ कार्यकत्रे  अप्पा सोहोनी तिथे पत्नीसह नियमितपणे भेटत असत. दोघेही सत्तरीच्या आसपास. सोहोनी काकूंची दृष्टी पूर्ण गेलेली होती. अप्पा त्यांचा हात धरून, त्यांना आधार देत चालत असत. माझा त्यांचा पूर्वपरिचय असल्यानं कधी कधी चारदोन शब्दांची देवाण-घेवाण होई. त्या काळी ‘हात हातात धरून चालणारे आजी-आजोबा’ बघून जरा गंमतही वाटायची. मी एकदा त्यांना विचारलं, ‘अप्पा, काकूंना असं सोबत घेऊन चालताना टेन्शन नाही येत?’ अप्पांना बरोबर कळलं, मला काय विचारायचं होतं, ते ! ते चट्कन म्हणाले, ‘अगं उलट बघ ना- आयुष्यभर मी हिचं ऐकलं. आता मी जे म्हणेन ते ही ‘डोळे मिटून’ ऐकते बरं का! त्यामुळे काही टेन्शन येत नाही.’ तेव्हा तो छोटासा विनोद वाटून तेवढंच लक्षात राहिलं. आज वाटतं, त्या दोन वाक्यात केवढं सार होतं. एक न बोलली गेलेली वेदना- विनोदाचं साजरं टोपडं चढवून सुसह्य़ केली गेली होती. हे कौशल्य आपल्याला जमेल का? त्यासाठी काय शिकवावं लागेल मनाला?
काही वेळा असं दिसतं की एखाद्या अगदी गंभीर आजाराच्या वेळीसुद्धा लोक अनुकूल, फील गुड देणाऱ्या भावना अनुभवतात. अशा काही रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या अभ्यासात असं दिसलं, की काही खास शैलीमुळे ‘या ‘काळजीवाहू’ मंडळींनी ‘असह्य़’ परिस्थिती ‘सहन’ करण्याच्या पातळीवर आणली होती. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे असलेल्या ‘अडचणी/समस्येला’ एखाद्या अनुकूल कोनातून पुन्हा एकदा पाहणं. ‘तरी बरं अमुक इतका त्रास आपल्याला नाही’ असं मानणं आणि म्हणणं ही! दुसरी युक्ती आहे ती नेमक्या ‘समस्येवर’ आपली ताकद खर्च करणं ही. खरी दुखरी नस ओळखून त्यावर काही उपाय करणं की ज्यामुळे आपल्या वेदना/त्रास/निराशा काही अंशी तरी कमी होईल. आणि तिसरी अगदी सहज जमण्यासारखी गोष्ट म्हणजे विपरीत परिस्थितीतही आपल्याला मनात प्रसन्नतेचा शिडकावा होईल अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी आवर्जून करणं. मला आठवतं की मद्यपाशात अडकलेल्या एका गृहस्थाची पत्नी स्वत:च मनोबल टिकवून ठेवण्यासाठी आवर्जून उत्तम चित्रपट पाहणं, नातवंडांशी भरपूर खेळणं, रमेश मंत्री, आदींची खदाखदा हसवणारी पुस्तकं वाचणं अशा गोष्टी करत असे. ती म्हणायची की, या सोनेरी क्षणांतून मला जी प्रसन्नता मिळते ती नवऱ्याच्या व्यसनामुळे जाणवणारी चिंता आणि आíथक ओढाताणीतून बाहेर पडायचं बळ देते!
ग्रामीण भागामध्ये ‘चकवा लागणं’ नावाचा एक समज प्रचलित आहे. ‘एखाद्या जागी जात असताना वाट चुकून पुन:पुन्हा मूळ जागीच परत येणं’ असा त्याचा अर्थ आहे. ‘भावनिक घोटाळ्या’ला ही उपमा चपखल लागू पडते. एखाद्या प्रतिकूल भावनेतून बाहेर पडण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. पण हे प्रयत्न मुळावर परिणाम करणारे नसले तर पुन:पुन्हा आपण त्याच भावनेत अडकते; मग त्याची ही भीती वाटू लागते. ताण अधिकच वाढतो.  ‘प्रॉब्लेम अबाऊट प्रॉब्लेम’ म्हणतात तो हाच. सुनेत्रा ही एक अगदी उत्साही तरुण मुलगी. नीलेशशी तिचं लग्न ठरलं होतं. तिच्या महाविद्यालयीन आयुष्यात तिचं एका मित्रावर प्रेम होतं. पण काही गरसमजामुळे नातं तिथेच थांबलं होते. लग्न ठरल्यापासून सुनेत्रा खूपच अस्वस्थ झाली. तिचं एक तत्त्वनिष्ठ मन तिला म्हणत होतं की- ‘काही लपवू नकोस !’ तर दुसरं मन घाबरत होतं. ‘आपण सांगितलं तर त्याला आपल्याबद्दल तिटकारा वाटणार नाही ना? न सांगावं आणि कुठून तरी काही पसरलं तर? ’.. या सगळ्यातून तिला स्वत:चाच तिटकारा वाटायला लागला. विचार-भावनांच्या गुंतागुतीमुळे ‘स्वत:चा राग- तिटकारा’ ही नवी कोंडी तिची सगळी ऊर्जा खाऊन टाकत होती. ‘आता मी हे लग्नच मोडते, मी कधी लग्न करणारच नाही !’ असा तिचा स्टॅण्ड होता.
    खरंच, नुसतं दु:खद/त्रासदायक भावना-किंवा त्या निर्माण करणाऱ्या (आपल्या समजुतीप्रमाणे !) घटना यांच्यापासून दूर पळून जाऊन, सुटका झाली असती तर किती सोप्पं होतं सगळं. पण हा उपाय ‘चकवा’ लागल्यासारखा असतो. त्यापेक्षा त्या भावनेला ‘समोर जाणं’- स्वीकारणं आणि मग त्या मागच्या आपल्याच विचारांचं विश्लेषण करणं हे त्या चकव्यातून बाहेर पडायला मदत करतं.
जे लोक भावनांचा ‘जगणं शिकण्या’साठी पुरेपूर उपयोग करून घेण्याचं ठरवतात, त्यांना हा समतोल जास्त चांगला जमतो. कुठल्या भावना आपल्याला कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदत करतात आणि कुठल्या भावना त्यातच पुन: ढकलतात हे कळायला हवं. सुनेत्राच्या उदाहरणात अस्वस्थपणा-थोडी चिंता तिला ‘विश्वासघाताच्या’ अपराधीपासून नक्कीच वाचवू शकेल पण ती चिंता जेव्हा अति काळजी आणि भीतीमध्ये बदलते तेव्हा तिला योग्य उपाय कसा सुचेल?
नकोशी भावना तीव्र, दु:ख/राग/ निराशेत रूपांतरित व्हायच्या आतच तिला वेगळी वाट काढून देणारा अ‍ॅॅक्शन प्लॅन बनायला हवा. त्यासाठी आपले मन ज्यात पूर्ण बुडून जाईल अशी एक तरी गोष्ट हाताशी हवी! अशी एकरसता-एकतानता अनुभवताना क्षणापूर्वी जाणवलेली प्रतिकूल भावना पाचोळ्यासारखी कुठल्या कुठे उडून जाते. असं म्हणतात की अशोककुमारची पत्नी, मोठी वहिनी गेल्यानंतर किशोरकुमार खूपच दु:खी झाला होता. त्या वहिनीने त्याला मुलाप्रमाणे माया दिली होती. त्या संध्याकाळी वहिनीच्या खोलीत बसून त्यानं पेटी ओढली आणि सुमारे दोन तास अत्यंत दर्दभऱ्या आवाजात तो एकटाच तंद्रीत गात राहिला. ते गाण्यात बुडून जाणं ही त्या दु:खावेगातून बाहेर पडण्यासाठीची त्याच्या मनानं केलेली ‘अप्रतिम’ धडपड होती. असे अनुभव आपणही सर्व जण अनेकदा घेत असतो. अतीव ताणाच्या/ निराशेच्या वेळी एखादा स्वर, रंग, निसर्गाचं अद्भुत दर्शन, रोज म्हटलं जाणारं स्त्रोत्र, पाण्यात पोहोताना अनुभवता येणारी ‘जलसमाधी’ अशा आपापल्या आवडीच्या गोष्टीत स्वत:ला हरवून टाकण्यातून नकळत काही सुख-संवेदनाच निर्माण होत असतात. वेळ पट्कन निघून जातो किंवा थबकल्यासारखा वाटतो, एका शब्दाचाही व्यत्यय नकोसा वाटतो, मनातून- सर्व शरीरातूनच एक वेगळीच उत्साहाची लाट धावल्याचा अनुभव येतो. हव्याशा भावनांचा असा ‘ओघ’ आपण जितका जाणीवपूर्वक अनुभवू तेवढी नकारात्मक भावनांना थोपवणारी किंवा कृतिशीलतेत बदलणारी आपली मन-प्रतिकार शक्ती अजून बळकट होत जाते.
भावनांचं सामथ्र्य असं अफाट आहे. कधी पुढे नेणारं-कधी मागे खेचणारं! कधी प्रश्न पाडणारं- कधी वाट काढणारं! शेवटी निवड आपली आहे, की ‘या ऊर्जेतील आश्वासक सूर्यकिरण शोधायचे का काजळी अंधारात बुडून जायचं? अनुकूल भावनांचा रियाझ करता प्रतिकूल भावनांना नियंत्रित करायचं का उलट त्यांच्या प्रभावानं रोजचं आयुष्य अजून असह्य़ बनवायचं? शेवटी निवड आपली आहे !
 डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org