डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

पाण्याला जीवन म्हटलं जातं इतकं  ते आपल्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे शुद्ध पाणी मिळणं अशक्य होत चाललं आहे. म्हणूनच मधल्या काळात  क्लोरिननं पाणी र्निजतुक करून ते नळानं पुरवलं जाऊ लागलं.  कालांतरानं घरोघरी ‘अल्ट्रा व्हायोलेट’ (अतिनील) किरणं असलेली उपकरणं आली. आता घरी ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) असावं लागतंय. दरम्यान खनिजं असलेलं ‘मिनरल वॉटर’ही मिळू लागलं. अलीकडे तर ‘अल्कलाइन वॉटर’ पिण्याचं फॅड आलं आहे. जे पचन बिघडवू शकतं. अशा फॅड्सचा सुकाळ असताना गरज आहे ती पाण्याचं महत्त्व आणि पाण्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांमध्ये असलेलं विज्ञान समजून घेऊन सारासार विचारान्ती निर्णय घेण्याची.

परीक्षेनंतर आजीकडे गावी गेलेली सुरभी टाळेबंदीमुळे एप्रिलपासून तिथेच अडकली. जून उजाडला आणि एक दिवस आजी म्हणाली, ‘‘अगं सुरभी, फार लांब जाऊ नकोस. पाऊस येणार आहे. दूरवर कुठेतरी पाऊस पडायलाही लागला आहे. बघ किती छान मृद्गंध आला वाऱ्यावर!’’ सुरभी पक्की मुंबईकर!  काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या तिला कु ठून माहीत असणार मृद्गंध? तिनं पटकन ‘गूगल’ची मदत घेतली. त्यावरून तिला कळलं, उन्हात तापलेल्या मातीवर पहिल्या पावसाचा शिडकावा झाल्यावर आसमंतात दरवळणारा मातीचा खास आणि बहुतेकांना आवडणारा सुवास म्हणजे मृद्गंध!

आपल्याला हा शब्द अनेक वर्षांपासून माहीत आहे. पण थंड प्रदेशातल्या लोकांना १९६४ मध्ये कळला. दोन ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी ‘पेट्रिकोर’ असं याचं वर्णन केलं आहे. ग्रीक भाषेमध्ये त्याचा शब्दश: अर्थ दगडातून वाहणारं दिव्य पाणी असा होतो. जमिनीमधील ‘अ‍ॅक्टिनोमायसेट्स’ वर्गातील जिवाणूंच्या कवचरूपी ‘स्पोअर’वर पाणी पडलं की त्याचं जीवन पुनर्निर्मित होतं, आणि ‘जिओस्मिन’ अशी काही सुगंधी रसायनं बनवून जणू ते पावसाचं स्वागतच करतात. म्हणून मृद्गंध आला की शेतकरी आनंदित होतो. जीवनाला अत्यावश्यक अशी कोणती गोष्ट आहे, असं विचारलं तर हवा आणि पाणी हेच उत्तर पटकन दिलं जाईल. हवेशिवाय काही मिनिटंदेखील आपण जगू शकत नाही. निसर्गाच्या कृपेनं हवा आणि प्राणवायू मोफत मिळतो. पण पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. संस्कृतमध्ये पाण्याला जीवन म्हणतात. खरोखरच पाणी नसेल तर जीवसृष्टी, अगदी झाडपालादेखील निर्माण होऊ शकणार नाही. रासायनिकदृष्टय़ा पाणी म्हणजे १ ऑक्सिजन आणि २ हायड्रोजन यांचं संयुग असलेला, १८ अणुभार असलेला लहानसा रेणू. पण ९५ टक्के रासायनिक क्रिया या पाण्याच्या माध्यमातून होतात. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (‘युनिव्हर्सल सॉल्व्हंट’) असं म्हणतात.

गावं वसवली जातात ती नदीकाठी. कारण गोडं पिण्याचं पाणी असल्याशिवाय माणसं, गाईगुरं राहू शकत नाहीत, शेती होऊ शकत नाही. पृथ्वीवर किती पाणी आहे आणि त्यापैकी किती गोडं पाणी आणि किती खारं पाणी (समुद्र) आहे? असं म्हणतात, की जर तिसरं महायुद्ध झालं तर ते पिण्याच्या पाण्यासाठी होईल. पृथ्वीचा २५ टक्के भूभाग जमीन असून ७५ टक्के पृष्ठभाग पाण्याखाली आहे. त्यापैकी बरंचसं पाणी खारं असून केवळ २.५ टक्के पाणी पिण्यालायक, गोडं आहे. त्यातलंदेखील खूपसं गोडं पाणी बर्फ आणि ‘ग्लेशियर’ स्वरूपात असून फारच कमी पाणी वाहतं असतं. निसर्गानं पाण्याचं एक उत्कृष्ट चक्र तयार केलं आहे. तीन ‘आर’- म्हणजे ‘रिडय़ूस’ (वापर कमी करणं), ‘रियूज’ (पुनर्वापर करणं  ) आणि ‘रिसायकल’ (पुनर्निर्मिती करणं), हे आपण आता शिकतो. पण निसर्गामध्ये बघितलं तर हे आधीपासून घडतं आहे, अर्थात मानवानं ढवळाढवळ केली नाही तर! समुद्राच्या खाऱ्या पाण्याची उन्हामुळे वाफ बनून आकाशात ढग बनतात. वाऱ्याबरोबर ते सर्वत्र पसरतात. पर्वताच्या रांगांमध्ये ते अडल्यामुळे पाऊस सुरू होतो व सगळीकडे गोडं पाणी बरसलं जातं. जमिनीमध्ये मुरलेल्या पाण्यामुळे झरे, विहिरी, तळी बनतात, तर वाहणारं पाणी ओहोळ, ओढे, नाले, नद्या होतात. शेवटी चांगलं, वाईट, गढूळ, सांडपाणी अशा विविध स्वरूपांत ते समुद्राला येऊन मिळतं, की परत ढग बनण्याचं चक्र चालू. ‘नायगरा’ हा जगातला सर्वांत मोठा धबधबा आहे. तो सर्वात उंच नाही, पण त्यामधून सर्वात अधिक पाणी वाहतं. प्रमाणच सांगायचं, तर सेकंदाला २,४०० क्यूबिक मीटर, आणि १ क्यूबिक मीटर म्हणजे १,००० लिटर. नायगऱ्यातून एका आठवडय़ात पडणारं पाणी अख्ख्या मुंबईला १ वर्ष पुरेल. उन्हाळ्यात तिथे सकाळी निरभ्र असलेलं आकाश दुपारी १ वाजता ढगांनी भरून जातं- जणू समुद्रावर ढग बनण्याची क्रिया ‘फास्ट फॉरवर्ड मोड’मध्ये घडते.

सजीव सृष्टी ८० ते ९९ टक्के पाण्यानं बनलेली आहे. मानवी शरीरात सरासरी ६० टक्के पाणी असलं, तरी वेगवेगळ्या अवयवांत त्याचं प्रमाण बदलतं. वयाप्रमाणेदेखील शरीरातलं पाणी हळूहळू कमी होतं. लहान बाळांच्या शरीरात ८० टक्के पाणी, तर वृद्धापकाळी शरीरात फक्त ५० ते ५५ टक्के पाणी असतं. हाडांमध्ये फक्त ३१ टक्के, तर मूत्रपिंडात ७९ टक्के. रक्त म्हणजे ९५ टक्के पाणीच. मानवी शरीरात ४.५ ते ५.५ लिटर रक्त असतं. पाण्यामुळे शरीराचं तापमान कायम राहणं हे मुख्य काम होतं. तसंच ऑक्सिजन- कार्बन डायऑक्साइड यांची अदलाबदल, स्नायूंमध्ये पोषक द्रव्यं (‘न्यूट्रियंट्स’) पोहोचवणं आणि विषारी द्रव्यं (‘टॉक्सिन्स’) परत घेणं, शिवाय पचनक्रियेमध्ये पाचक रस निर्माण करणं, आणि मूत्राद्वारे द्रवरूप कचरा बाहेर टाकणं, अशी पाच महत्त्वाची कामं शरीरात पाण्यामुळेच होऊ शकतात. पाण्याचा अणू लहान असला, तरी त्याचा उत्कलन बिंदू १०० अंश सेल्सिअस म्हणजे खूप अधिक आहे. याचं कारण पाण्याचे रेणू एकमेकांबरोबर हलक्या साखळीनं (‘हायड्रोजन बॉन्ड’) जोडले जातात आणि स्फटिक स्वरूप धारण करतात. नादासारख्या ऊर्जेच्या मदतीनं हे स्वरूप बदलतं, असं काही वैज्ञानिकांचं मत आहे. चुंबकावर ठेवलेलं पाणी, तांब्याच्या भांडय़ातलं पाणी, सोनं किंवा चांदी उकळलेलं पाणी,  र्अध आटवून काढा के लेलं पाणी, असं अनेक प्रकारचं पाणी वापरात आणलं जातं. पाणी घटाघट न पिता घोटाघोटानं प्यावं. थोडं थंड चालेल, पण थंडगार नको. पचन चांगलं नसल्यास कोमट पाणी पिणं उत्तम.

पाण्याचा आणखी एक गुणधर्म अतिशय महत्त्वाचा आहे. बहुतेक द्रवरूप पदार्थ गरम केले की प्रसरण पावतात आणि म्हणून हलके होतात. तसंच थंड केल्यावर ते अधिक घन म्हणजे जड होतात. ४ अंशांपर्यंत पाणी असं आकुंचन पावतं व जड बनतं, पण ४ अंश ते ० अंश असं थंड होताना- म्हणजे बर्फ होताना नेमकं उलट घडतं. असं का होतं हे आजर्प्यत कुणालाही उमजलेलं नाही. पाण्याच्या या अपवादात्मक प्रसरणामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो. केवळ या कारणामुळे थंड प्रदेशात जेव्हा नदी आणि तलाव गोठतो, तेव्हा वरचा भाग घनरूप बर्फ होतो, त्यावर चक्क चालता येतं, सायकल चालवता येते. पण त्याच्या २-३ फूट खाली मात्र ४ अंश तापमानाचं जड द्रवरूप पाणी असल्यामुळे मासे आणि जलचर जिवंत राहतात. आहे की नाही निसर्ग बुद्धिमान?

आपण निरोगी राहावं यासाठी निसर्गाचं हे देणं म्हणजेच पाणी नियमित पिणं गरजेचं आहे. स्त्रियांनी रोज २.७ लिटर पाणी प्यावं, तर पुरुषांनी ३.७ लिटर पाणी प्यावं. मूत्र आणि घाम या स्वरूपात जे पाणी शरीराबाहेर टाकलं जातं तेवढं पाणी पिणं आवश्यक आहे. बाकीचं पाणी शरीरामध्ये परत परत वापरलं जातं. जर मूत्र खूप पिवळ्या रंगाचं असेल तर तुम्ही कमी पाणी पीत आहात, आणि मूत्र बिनरंगाचं असेल तर शरीरात पाणी जास्त होत आहे. मूत्राचा किंचित पिवळसर हा योग्य रंग आहे. ‘बी कॉम्प्लेक्स’ आणि ‘मल्टीव्हिटॅमिन’ घेतल्यावर मूत्राला येणारा पिवळा रंग हा शरीरात न शोषलं जाणारं जीवनसत्त्व मूत्रपिंड बाहेर टाकत असल्यानं येतो. ‘पीएच’ मोजपट्टीवर ७ पेक्षा कमी म्हणजे आंबट आणि ७ पेक्षा अधिक म्हणजे कडू चव असते. ४ हा पीएच खूप आंबट आणि १० हा पीएच खूप कडू लागेल. पिण्याचं पाणी उदासीन- म्हणजे ७ पीएच जवळ असतं आणि चांगल्या नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याला मधुरपणा असतो. फार पूर्वी पाणी मलमलच्या कापडातून गाळून, पावसाळ्यात फार माती असेल तरच किंचित तुरटीचा वापर करून, माठात ठेवून पिण्यासाठी वापरलं जाई. उन्हाळ्यात वाळा, मोगरा, गुलाब असा सुवास पाण्याला दिलेला खूप छान वाटे. पुढे मोठय़ा गावांत आणि शहरांत पाणी र्निजतुक करण्यासाठी ‘क्लोरिन’चा वापर करून नळानं पाणी पुरवलं जाऊ लागलं. त्यानंतर ‘ओझोनेशन’ आलं. कालांतरानं घरोघरी ‘यूव्ही’- म्हणजे ‘अल्ट्रा व्हायोलेट’ (अतिनील) किरणं असलेली उपकरणं आली. आता तर  घरी ‘आरओ’ म्हणजे ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ नसेल तर तुम्ही फार मागासलेले आहात असं शहरात समजलं जातं. आपल्या देशात जे बाटलीबंद पाणी मिळतं ते बहुधा ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ असतं. ज्या ठिकाणी कूपनलिकेचं पाणी खूप खारं असतं (‘टीडीएस’- ‘टोटल डिजॉल्व्ह्ड  सॉलिड्स’चं प्रमाण १,००० मिलिग्रॅम प्रतिलिटर आणि अधिक) तिथे घरी ‘आरओ’ लावणं, अथवा पाण्याचे जार विकत घेणं गरजेचं असतं.

दुसऱ्या प्रकारचं पाणी म्हणजे ‘मिनरल वॉटर’. याची किंमत बरीच अधिक असते. हिमालयातल्या अथवा नैसर्गिक पाण्याचा स्रोत वापरून ज्यात चांगली खनिजं आहेत असं पाणी फक्त गाळून, कोणतीही रासायनिक प्रक्रिया अथवा ‘आरओ’, ‘यूव्ही’ न वापरता बाटल्यांमधे भरतात. या पाण्याचा पीएच ७.५ च्या आसपास असतो. भारतीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये पाण्याचे फक्त दोनच प्रकार आहेत. परंतु विद्युत वापर करून अथवा निसर्गत: भरपूर मॅग्नेशियम आणि काही धातूंचे क्षार असल्यामुळे ८.५ पीएच असलेलं ‘अल्कलाइन वॉटर’ पिण्याचं फॅड सध्या आलं आहे. लिटरला १०० रुपयांहून अधिक किंमत असलेलं हे पाणी जणू आरोग्याची जादूची छडी आहे, असा काहींचा विश्वास आहे. समजा साधं पाणी न पिता खाण्याचा सोडा घातलेलं पाणी कायम प्यायलो, तर पोटातलं आम्ल नष्ट होऊन पचन बिघडणारच. तसंच काहीसं हे अल्कलाइन पाणी रोज प्यायलो तर होईल, असं बहुतेक आहारतज्ज्ञ मानतात. तसंच मॅग्नेशियम इतर खाण्यातून मिळत असताना पाण्यातून इतक्या प्रमाणात पोटात गेलं तर ‘हायपर मॅग्नेसेमिया’ होण्याची भीती आहे.

गेली १०० र्वष अमेरिके त जेवताना पाणी न पिता ‘सोडा’ म्हणजे ‘कोला’ प्यायलं जायचं. असं ‘स्पार्कलिंग वॉटर’ मोठय़ा हॉटेलांतसुद्धा देतात. कार्बन डाय ऑक्साइड पाण्यात विरघळून हा सोडा बनतो. हे तर ‘काबरेलिक अ‍ॅसिड’- म्हणजे ७ पेक्षा खूप कमी पीएच असलेलं पाणी, आणि आता म्हणे प्या अल्कलाइन वॉटर. म्हणजे दुसरं टोकच! कालाय तस्मै नम:! परंतु तुम्ही मात्र कोणतं पाणी प्यावं, त्याच्यावर प्रक्रिया व्हावी का, झाली तर कोणती, याचा सारासार विचार करूनच पाणी प्यायलं पाहिजे, कारण पाणी हेच ‘जीवन’ आहे.