20 October 2020

News Flash

सोरिअ‍ॅसिस

सोरिअ‍ॅसिस होण्यामागे आनुवंशिकता, घर्षण, कुठल्याही प्रकारची इजा, घशाचे जंतुसंसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण यापैकी कुठलं तरी कारण नक्कीच असतं.

| July 26, 2014 03:49 am

सोरिअ‍ॅसिस होण्यामागे आनुवंशिकता, घर्षण, कुठल्याही प्रकारची इजा, घशाचे जंतुसंसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण यापैकी कुठलं तरी कारण नक्कीच असतं. विशेषत: गुडघे, कोपर, कंबर, पाठ, डोक्यावरील त्वचा इथे सुरुवातीला सोरिअ‍ॅसिसचे चट्टे दिसू लागतात. नंतर ते वाढत जाऊ शकतं. मात्र योग्य औषधोपचाराने सोरिअ‍ॅसिस काबूत ठेवता येतं. डॉ.
सोरिअ‍ॅसिस या त्वचारोगाचा लोकांनी धसका घेतलेले बहुतांश रुग्ण ‘मला सोरिअ‍ॅसिस झालेला नाही ना?’ असा भीतियुक्त प्रश्न विचारल्याशिवाय राहात नाहीत. या भीतीमागे मुख्यत: दोन कारणं आहेत. एक म्हणजे या आजाराविषयी समाजात असलेलं अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान आणि दुसरं म्हणजे रोज टीव्ही व वर्तमानपत्रांतून ‘सोरिअ‍ॅसिस’वर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचा भडिमार! ‘आम्ही सोरिअ‍ॅसिसचे हजारो रुग्ण सोरिअ‍ॅसिसमुक्त केले आहेत, आता भारत देशही सोरिअ‍ॅसिसमुक्त करू,’ असे फोल दावे करणाऱ्या जाहिराती पाहून अर्थातच रुग्णांना खूप आशा वाटते व रुग्ण अशा ‘क्लिनिक्स’कडे आकर्षित होतात. तसंच ‘अ‍ॅलोपॅथिक औषधं म्हणजे विष’ ही खुळी समजूतही रुग्णांच्या मनात घट्ट रुजवली जाते. या सर्व गोष्टींमध्ये खरंच किती तथ्य आहे हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी सोरिअ‍ॅसिस म्हणजे नक्की काय, त्यावरचे इलाज काय स्वरूपाचे असू शकतात, उपायांवरील मर्यादा, संभावित दुष्परिणाम, सोरिअ‍ॅसिसशी निगडित संधिवात, त्यावरील उपचार, नवीन औषधे व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाची जगण्याची गुणवत्ता कशी सुधारता येईल या सर्व गोष्टींचा ऊहापोह या लेखात करण्याचा प्रयत्न आहे. सोरिअ‍ॅसिस हा त्वचारोग संसर्गजन्य नाही तसंच या रोगापासून जिवाला कसलाच धोका नसतो.
सोरिअ‍ॅसिस होण्यामागील कारणे-
रक्तामधील पांढऱ्या पेशींपैकी ‘टी’ लिम्फोसाइटमध्ये काही बदल होऊन त्याचा परिणाम त्वचेच्या अस्तरामधील पेशींमध्ये होतो. यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा कमी वेळ लागतो आणि खवल्यांप्रमाणे जाडीभरडी त्वचा तयार होऊन लालसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसू लागतात. तसंच या चट्टय़ांवर रुपेरी पांढरट पापुद्रेही येतात. विशेषत: गुडघे, कोपर, कंबर, पाठ, डोक्यावरील त्वचा इथे सुरुवातीला सोरिअ‍ॅसिसचे चट्टे दिसू लागतात. आनुवंशिकता, घर्षण, कुठल्याही प्रकारची इजा, घशाचे जंतुसंसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण यापैकी कुठलं तरी कारण सोरिअ‍ॅसिस होण्यामागे नक्कीच असतं. फक्त तळहात-तळपायांवर भेगा पडू शकतात. त्यावर देखील रुपेरी पापुद्रा तयार झालेला असतो. सोरिअ‍ॅसिसच्या दुसऱ्या प्रकारात काख, जांघा, स्तनाखालील त्वचा अशा ठिकाणी चट्टे उमटतात. या प्रकारामध्ये मात्र प्रचंड खाज सुटते. सोरिअ‍ॅसिसमध्ये हाताची व पायांची नखेही खराब होऊ शकतात . आणखी एक प्रकारच्या सोरिअ‍ॅसिसमध्ये चट्टे न उमटता पू भरलेल्या पिवळ्या  फोडांचे पुंजके लालसर त्वचेवर दिसून येतात, याला पुश्चुलर सोरिअ‍ॅसिस म्हणतात. क्वचित सोरिअ‍ॅसिस हा त्वचा विकार डोक्यापासून पावलापर्यंत संपूर्ण त्वचाही व्यापू शकतो. त्याला सोरिअ‍ॅटिक इरिथ्रोडमी असं म्हटलं जातं. कधी कधी सोरिअ‍ॅसिसचा भाग असलेला संधिवाती डोके वर काढू शकते. बोटं, मनगट, कंबर येथील सांधे सुजून कडक होऊ शकतात, वेदना व हालचालींवर मर्यादा प्रामुख्याने त्रासदायक ठरतात.
निदान व उपचार :
आपणास त्वचेच्या कुठल्याही भागावर पुरळ किंवा चट्टे दिसल्यास जवळच्या त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांनी निदान केल्यानंतर अजिबात खचून जाऊ नये. कुठलाही विकार झाला की त्याचा स्वीकार करणं जड जातंच. मधुमेह, रक्तदाब, संधिवात किंवा अशा अनेक रोगांवर आजन्म औषधं घेणं क्रमप्राप्त असतं, त्याबाबत कोणीही तक्रार करत नाही. त्वचा बाहेरून दिसत असल्यामुळे त्वचेचा विकार लवकरात लवकर बरा व्हावा ही प्रत्येक रुग्णाची रास्त अपेक्षा असते. त्वचेचा आजार बराही होत नाही आणि रुग्ण दगावतही नाही असं गमतीनं म्हटलं जातं. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी सोरिअ‍ॅसिस या आजारापासून जिवाला कुठलाच धोका नाही ही जमेची बाजू लक्षात घ्यायला हवी. थंडीच्या दिवसात त्वचा शुष्क होत असल्यामुळे जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. सोरिअ‍ॅसिसची व्याप्ती जास्त असेल तर रोज तेल, मलम लावत बसायला आजच्या काळात वेळ काढणंही शक्य नसतं आणि कालांतराने कंटाळाही येतो.
कमी प्रमाणात पोटात घ्यायची औषधं, नॅरो बॅण्ड यूव्हीबी किरणोपचार, सिमर लेजर यामुळे बऱ्याच प्रमाणात सोरिअ‍ॅसिसला काबूत ठेवता येतं. नवीन औषधं जरी महागडी असली तरी ती मूळ कारणावरच घाव घालत असल्यामुळे प्रभावी ठरली आहेत. या औषधामुळे ‘रोगमुक्त काळ’ बऱ्याच प्रमाणात लांबवता येतो. शक्यतो तज्ज्ञ डॉक्टरांकडे (त्वचा रोगांवरील) जाऊनच उपचार करून घ्यावेत. शरीरावरील सोरिअ‍ॅसिसची व्याप्ती किती आहे, यावर उपचार पद्धती अवलंबून असते. मोजकेच चट्टे असतील किंवा व्याप्ती खूपच कमी असेल तर बाह्य़ोपचारांवर भागू शकते. चट्टय़ांची जाडी व पापुद्रे कमी करण्यासाठी विविध ऑइलमेन्ट्स, तेले, लोशन्स उपलब्ध आहेत. एकच प्रकारचे औषध प्रत्येकाला उपयोगी पडेल असे नाही. घरात उपलब्ध असणारे किंवा दुसऱ्याने सुचवलेले अथवा केमिस्टने दिलेले मलम सर्रास वापरून बघायची मनोवृत्ती असते. यापासून फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. लोबेट, क्लॉप, एक्सेल, हे नोव्हेट, कॉस्व्हेट अशी प्रभावी  मलमे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरावीत.
प्रचंड प्रमाणात पसरणारे गजकर्ण, मुरुमांसारखे फोड, केसतोडे, गळू, स्त्रियांमध्ये अनावश्यक केसांची वाढ, त्वचा फाटणे असे अनेक गंभीर परिणाम स्टिटॉईड मलमांच्या अयोग्य व अति वापरामुळे उद्भवतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अल्पप्रमाणात आठवडय़ात कमीत कमी वेळा व फक्त जाड चट्टय़ांवर (आजूबाजूला पसरू न देता) मलम लावल्यास त्याचा फायदा होतो. कुठलेही मलम कितीही व कसेही फासू नये. ज्यांच्या त्वचेवरील सोरिअ‍ॅसिसची व्याप्ती बरीच आहे अशांना पोटातून औषधं घेणं गरजेचं असतं. यातील काही औषधं घेण्यापूर्वी तसंच ती सुरू असताना नियमित कालावधीनंतर (साधारण ३ ते ६ महिने) रक्त तपासणी करावी लागते. औषधांचं प्रमाण/मात्रा ठरविण्यासाठी तसेच काही दुष्परिणाम (संभाव्य) जाणून घेण्यासाठी या तपासण्या केल्या जातात. अ‍ॅलोपॅथीची औषधं अतिशय ‘उष्ण’ असतात तसेच त्याचे दुष्परिणामही ‘भयानक’ असतात. या अवाजवी गैरसमजुती डोक्यातून काढून टाकल्या तरच त्या औषधांचा योग्य परिणाम होतो.
या उपचारांबरोबरच सूर्यकिरणोपचार किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणोपचार तसेच अत्याधुनिक टारगेटेड फोटोथेरपी हे उपचारही सोरिअ‍ॅसिसवर उपयुक्त ठरतात. नॅरो बॅण्ड अल्ट्राव्हायोलेट किरणोपचार हे अतिशय सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहेत. आठवडय़ातून २ ते ३ दिवस हे उपचार घेणं आवश्यक असतं. डोक्यावर सोरिअ‍ॅसिसचे चट्टे असतील तर केस बारीक करून उपचार केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मलमांपेक्षा लोशन्स, तेलं, शाम्पू यांचा वापर श्रेयस्कर ठरतो. तळहात व तळपायांवर सोरिअ‍ॅसिसमुळे भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे हात-पाय भिजवून नंतर मलमे लावावीत, त्यामुळे तेथील त्वचेतील आद्र्रता व त्यायोगे मऊपणा टिकून राहायला मदत होते. तसेच रात्री मलम लावल्यावर सुती हातमोजे व पायमोजे घालून झोपावे.
 औषधोपचारांव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जीवनशैली व ताणतणाव याचं नियोजन. मानसिक ताण हे अनेक व्याधींचं मूळ कारण असतं, हे आता सिद्ध झालं आहे. रोजचा व्यायाम, योगासनं व ध्यानधारणा यांचा समावेश औषधांबरोबर किंबहुना त्याआधीच करायला हवा. बिटा ब्लॉकर्ससारखी रक्तदाबावरील औषधंही सोरिअ‍ॅसिसचे चट्टे वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. आपण जर ती घेत असाल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन पर्यायी औषध घ्यावीत (एकदम बंद करू नयेत.). तेव्हा सोरिअ‍ॅसिस झाला असेल तर घाबरून, खचून न जाता त्याचा स्वीकार करायला शिका आणि आपल्या त्वचातज्ज्ञांचा सल्ला व साहाय्य घेऊन, जीवनशैली सुसह्य़ आणि आनंदी कशी करता येईल याचा प्रयत्न करा, हा आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी ठरेल.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:49 am

Web Title: psoriasis treatments and self care
Next Stories
1 ‘रिअल’ उद्योजिका
2 गीताभ्यास – स्वधर्माचरण
3 एस.एन.डी.टी. एक अश्वत्थ!
Just Now!
X