News Flash

भयाचा सुवर्णमध्य!

जानेवारी २०२० पासून  करोनाच्या ज्या बातम्या यायला लागल्या, त्यावर जगाची पहिली प्रतिक्रिया शॉक बसल्याचीच होती, कारण सत्य मेंदूत झिरपायला वेळ लागतो.

करोना आपल्याकडे येऊन, हातपाय पसरून स्थिरावला, त्याला एक वर्ष होऊन गेलं. तरीही त्याचं पहिलं पाऊल देशात पडल्यानंतर मनाला जो धक्का बसला होता, त्यातून आपण सावरलो का? सुरुवातीच्या घबराटीनं दीर्घकाळ टिकणाऱ्या काळजीचं रूप घेतलं. काळजी करणे आणि काळजी घेणे यातला फरक लक्षात न घेता बरेच जण काळजीचा अतिरेक करू लागले आणि या अतिरेकातून पुन्हा आणखी काळजीच उत्पन्न होऊ लागली. भयाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सुवर्णमध्य साधण्याचं कसब सांगताहेत मानसोपचारतज्ज्ञ  डॉ. नंदू मुलमुले.  (nandu1957@yahoo.co.in)

चार मजल्यांच्या रहिवासी इमारतीत लिफ्ट न वापरता दोन्ही हातात भल्याजड पिशव्या घेऊन ‘पीपीई किट’ घातलेली ती व्यक्ती जिना चढताना बघून त्याच इमारतीत राहाणाऱ्या डॉक्टर रामेश्वरना आश्चर्य वाटू लागलं. ते चौथ्या मजल्यावर पोहोचून थोडा वेळ रेंगाळले, तो काय, ती पीपीई किट घातलेली व्यक्ती म्हणजे शेजारचे पांडेकाका निघाले! ते पीपीई किट घालून भाजी बाजारात गेले होते. आठ दिवसांतून एकदाच बाहेर पडणाऱ्या साठीच्या पांडेकाकांनी करोनाची पराकोटीची धास्ती घेतली होती. ‘इतकं काही घाबरण्यासारखं नाही. खाली उतरत चला, सोसायटीच्या आवारात फेऱ्या मारा. मोकळ्या हवेत तुम्हाला बरं वाटेल,’ वगैरे समजावूनही त्यांची धास्ती कमी होण्याचं चिन्ह डॉक्टरांना दिसत नव्हतं. किंबहुना हा डॉक्टर करोना रुग्ण तपासतो म्हणून पांडेकाकांनी त्यांचीच धास्ती घेतली होती.

पस्तीस वर्षांच्या आयटी इंजिनीअर रमेशनं ‘वाफेनं करोना मारा’ अशा व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट वाचून स्वत:चं एक ‘तंत्र विकसित’ केलं होतं. फक्त अस्थमा (दमा) किंवा श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांच्याच उपयोगाचं आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वापरावयाचं दीड हजार रुपयांचं ‘नेब्युलायझर’ त्यानं बाजारातून विकत आणलं. त्यात निलगिरीचं तेल टाकून सकाळ-संध्याकाळ तो हुक्का ओढल्यासारखा वाफ घ्यायचा! (निलगिरीच्या वासानं करोनाचा दम घुसमटून जाणारच जणू.)करोना हा एरवी एक निर्जीव प्रथिनकण, तो पेशीच्या आत शिरल्यावर त्याच्यावर वाफेचा परिणाम कसा होणार? असल्या प्रश्नांवर त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. दरम्यान दुसरी लाट आल्यावर आपल्या औषधी दुकानदार मित्राकडून (एका गरजवंताला वंचित ठेवत) त्यानं ‘रेमडेसिविर’ची दोन इंजेक्शनं मिळवून ठेवली होती. मिळालं तर एखादं ऑक्सिजन सिलेंडरही घेऊन ठेवायचा त्याचा विचार होता. पल्स ऑक्सिमीटरमधून आपली पातळी मोजायची आणि नव्वदच्या खाली गेली की फुलासारखा ऑक्सिजन हुंगायचा त्याचा विचार असावा!

पुण्यात राहाणाऱ्या आपल्या मुलाच्या थ्री-बीएचके फ्लॅटवर जाऊन गेली दीड वर्ष मुक्काम ठोकलेला माझा नागपूरचा पासष्टीचा मित्र करोनाच्या भयानं जो खोलीत शिरला, तो सहा महिने बाहेरच पडला नाही. सोसायटीत चार मजले वरती राहाणारं एक कुटुंब ‘पॉझिटिव्ह’ असल्याचं ऐकून त्यानं खोलीच्या खिडक्या सीलबंद करून घेतल्या, जणू वाटीतून ओघळणाऱ्या वरणासारखे करोनाचे ओघळ खिडकीतून आत येणार होते. हा मधुमेही बाप घराबाहेर पाऊलही टाकत नाही हे पाहून मुलानं शेवटी लाखभर खर्च करून ट्रेडमिल घरात आणून ठेवली तेव्हा कुठे शरीराला थोडा व्यायाम घडू लागला. संकटापेक्षा तिची सावली मोठी झालेल्या या भीतीचं करायचं काय?

भीती ही खरं तर क्रोध, तिरस्कार, घृणा, आनंद यांसह सृष्टीच्या उत्पत्तीपासून निर्माण झालेली प्राथमिक भावना. चार्ल्स डार्विननं १८७२ मध्ये मानवी आणि प्राणिज भावनांच्या अभ्यासावर एक पुस्तक प्रकाशित केलं, त्यात जीव वाचवण्यासाठी भीतीच्या उपयुक्ततेची चर्चा आहे. भीतीपोटी माणूस सजग, सक्षम, सतर्क होतो हे खरंच आहे. मानवी उत्क्रांतीच्या वीस लाख वर्षांच्या प्रवासात भीतीच्या भावनेचे घटक हे फारसे बदललेले नाहीत. फरक एकच, पूर्वी प्रत्यक्ष भीतीदायक प्रसंगानं माणूस घाबरत होता, आता तो लिखित शब्दांनीही घाबरतो! त्यात प्रत्यक्ष संकटानं उत्पन्न झालेली भीती आणि संभाव्य संकटाच्या नुसत्या कल्पनेनं निर्माण झालेली भीती (एंक्झायटी- चिंता) हा फरक महत्त्वाचा. करोना साथीसारख्या संपूर्ण जगाला व्यापून टाकणाऱ्या संकटात प्रत्यक्ष संकट किती आणि त्याची भासमान प्रतिमा किती, अशी सत्य आणि आभासाची सरमिसळ होऊन जाते. १९३० पासून हॅन्स सेली या तज्ज्ञानं संकटाचा सामना करताना माणसाच्या शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास सुरू केला.

‘स्ट्रेस’ (ताण) ही मनोशारीरिक विकारांच्या संदर्भात येणारी शतकातली बहुचर्चित, बहुआयामी संज्ञा सर्वप्रथम त्यानं वापरली. ‘स्ट्रेसफुल’ म्हणजे ताणजन्य परिस्थितीत माणूस भय (अलार्म), प्रतिकार (रेझिस्टन्स) आणि अखेर थकवा (फटिग) या तीन टप्प्यांतून जातो. इंद्रियांकरवी भयाची जाणीव होताच मेंदूतील ‘अमिग्डेला’ या बदामाकृती केंद्राला प्रथम सूचना जाते. हा भाग महत्त्वाचा, कारण तेच विविध केंद्रांना ही माहिती पाठवून भयाची व्याप्ती, करावयाची कृती, पुढील काळासाठी उपयुक्त अशी स्मरणशक्ती या सगळ्या गोष्टी क्षणार्धात पार पाडतं. दुसऱ्या टप्प्यावरील प्रतिकार हा महत्त्वाचा, तो कोणत्या प्रकारे करायचा हे ठरल्यावर ती कार्यवाही पार पाडतं ‘हायपोथॅलॅमस’ हे अजून एक महत्त्वाचं केंद्र, कारण तिथूनच प्रतिकारासाठी लागणारी संप्रेरकं निर्माण करण्याचे संकेत शरीरातील ठरावीक अवयवांना दिले जातात. या प्रतिकाराचे चार प्रकार. १९१५ मध्येच वॉल्टर कॅनन या तज्ज्ञानं ते नोंदवून ठेवले होते. जीव वाचवण्यासाठी माणूस एकतर लढा देतो (फाइट), संकटापासून दूर पळतो (फ्लाइट), भीतीनं गोठून जातो (फ्रीज) किंवा बेशुद्ध पडतो (फेन्ट). यातील लढा किंवा पलायनासाठी ऊर्जा मिळते ‘अड्रीनलिन’ आणि ‘कॉर्टिसॉल’ या संप्रेरकांपासून. ‘अड्रीनलिन’ हे हृदयगती आणि पर्यायानं रक्तदाब वाढवतं, तर ‘कॉर्टिसॉल’ रक्तातील साखर वाढवतं. रक्तप्रवाह आतडय़ाकडून स्नायूंकडे वाहू लागतो (म्हणूनच भीतीनं पोटात खड्डा पडल्याचा भास होतो). तर हातपाय गार पडणं, धडधड वाढणं, घसा कोरडा पडणं, घाम येणं, गरगरणं (आठवा- तुमच्या आयुष्यातला पहिल्यांदा भाषण देण्याचा किंवा विंगेतून रंगमंचावर प्रवेश करण्याचा प्रसंग.)- हा सर्व ‘अड्रीनलिन’ या संप्रेरकाचा प्रताप. यात भीतीनं गारठणं किंवा बेशुद्ध पडणं हे मेंदूनं केलेलं एक प्रकारचं पलायनच.

संप्रेरकांचा हा सारा खेळ काही तासा-दिवसांकरिता अभिप्रेत असतो. ही सज्जता दीर्घकाळ ठेवली जाऊ शकत नाही. माणूस कालांतरानं थकतो. त्यामुळेच ताणाचा कालावधी महत्त्वाचा. नोकरी जाणं, करोना  रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ येणं, हा तात्कालिक ताण. तर लहानपणी झालेल्या अत्याचाराची पुन:पुन्हा आठवण येऊन निर्माण होणारा भूत्कालिक ताण. अपघात किंवा प्रियजनांच्या मृत्यूनं येतो तो घटना-पश्चात ताण, तर चक्रीवादळ, महासाथ हा नैसर्गिक आपत्तीजन्य ताण. त्यातही घटनापश्चात येणारा ताण अल्पस्वरूप, तर महासाथीचा दीर्घस्वरूप ताण. त्यामुळेच त्याविरुद्ध भय, प्रतिकार या स्थितीतून जो वेळीच मार्ग काढत नाही, त्याच्या नशिबी थकवा (फटिग) ठरलेला. या प्रदीर्घ ताणानं बव्हंशी माणसं आता थकलेली दिसतात ते याच कारणानं. काही करावंसं न वाटणं, कशात मन न लागणं, उदास वाटणं, भूक मंदावणं ही सगळी थकव्याची लक्षणं.

कुठल्याही वाईट घटनेपश्चात माणूस एका शोकावस्थेतून जात असतो. या शोकप्रक्रियेचा पहिला टप्पा स्तब्धतेचा, शॉक बसल्याचा. या अवस्थेत काही काळ सगळ्या संवेदना जणू गोठून जातात. जानेवारी २०२० पासून  करोनाच्या ज्या बातम्या यायला लागल्या, त्यावर जगाची पहिली प्रतिक्रिया शॉक बसल्याचीच होती, कारण सत्य मेंदूत झिरपायला वेळ लागतो. त्यातून येतो दुसरा टप्पा, नकाराचा- ‘डिनायल’. सोबतच क्रोधाची भावना किंवा पराकोटीचं भय. ‘हे खरं नाही, असं होणं शक्यच नाही’, असा या नकाराचा रोख होता. तसे संदेशही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होते. हे म्हणजे मन:स्थितीचा डोलारा सांभाळण्यासाठी परिस्थितीतून केलेलं पलायन. मात्र काही काळानंतर आला तिसरा टप्पा, सत्याचा स्वीकार आणि पाठोपाठ नैराश्यभावना. काही लोक या नैराश्याचा निचरा होऊन त्यातून बाहेर पडले, मात्र बहुतांश लोक अद्याप त्याच मन:स्थितीत आहेत.

तसं पाहिलं तर हे नैराश्य एका मर्यादित अर्थानं उपकारक, कारण ते भ्रामक आनंदाच्या अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे नेतं. हा प्रकाश प्रखर असतो, डोळ्यांना सहन होत नाही, पण कालांतरानं डोळे सरावतात. माणसं सावरतात. वाट अनिश्चित असली, तरी माणसं पुढचं पाऊल टाकू लागतात. नैराश्य विचार करायला वेळ देतं, कोण आहोत आपण?, निसर्ग ओरबाडणारे निर्घृण ग्राहक की निसर्गलहरीचे याचक?.. नाहीतरी जगण्याचा वेग अनावरच झाला होता.  माणसं नुसती धावत होती. वेळ वाचवण्याच्या वेडात वाचवलेला वेळ आयुष्य अधिक वेगवान करण्यात घालवणं हा वेडेपणाच. पण माणसं तो करीत होती. करोनाच्या तडाख्यानं हा वेग मंदावला, शांत झाला. त्यातून येणारं नैराश्य सकारात्मकरीत्या घेतलं तर ते स्वीकाराच्या अखेरच्या टप्प्यावर नेणारं ठरतं. या दिवसांत पराकोटीची धास्ती घेतलेल्या लोकांत एक फॅड आलं प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उपायांचं. ‘इम्युनिटी बुस्टर’चं.  ऑनलाइन दुकानांतून जलनेति पात्रांपासून असंख्य हर्बल औषधांचा प्रचंड खप वाढला. अनेक औषधी कंपन्यांनी तयार केलेल्या जीवनसत्त्वं आणि विविध क्षारांच्या गोळ्या माणसं गुरांप्रमाणे रवंथ करीत चघळू लागली. रोगप्रतिकारशक्ती प्रणालीचं तत्त्व समजून घेतलं तर यातील फोलपणा लक्षात येईल. संतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी मनस्वास्थ्य एवढंच रोगप्रतिकारासाठी पुरेसं. त्यासाठी वेगळ्या गोळ्यांची गरज नाही. किंबहुना, पराकोटीचं भय हे प्रतिकारशक्तीसाठी मारकच. ‘इम्युनिटी’चे महत्त्वाचे घटक म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी. रक्तातील या श्वेतपेशी (बी लिम्फोसाइट्स) प्रतिपिंड (अँटिबॉडीज) तयार करतात, तर गळ्याजवळील थायमस ग्रंथी ‘टी श्वेतपेशी’

(टी लिम्फोसाइट्स) तयार करते, ज्या पेशीत शिरलेल्या विषाणूंचा फडशा पाडतात. याव्यतिरिक्त प्लीहा, अस्थिगाभा, लसिकासंस्था आणि त्यातून वाहणारे ‘सायटोकाइन’सारखे प्रथिनकण हे सर्व रोगप्रतिकार प्रणालीचे घटक. त्यावर प्रदीर्घ ताण आणि भयाचा विपरीत परिणाम होतो हे सिद्ध झालं आहे. ती वाढवणं हाच उद्देश असेल तर टाळेबंदीतही आहार, आचार आणि विचार संतुलित ठेवणं, पुरेसा व्यायाम करणं आणि मनाचं आरोग्य उत्तम राखणं गरजेचं.

एखादं संकट पूर्णत: विध्वंसक नसतं, त्या संकटाचा सामना करणं गरजेचं. त्या वेळी बेदरकार दु:साहस हा अतिरेक, तर टोकाचं भयही अतिरेकच. या दोहोंचा मध्य म्हणजे सजग धैर्य. हा मध्यममार्ग. मास्क न लावता अनावश्यक भटकणं हा बेदरकार दु:साहसाचा अतिरेक, तर विषाणूचा धसका घेऊन चिंताग्रस्त अवस्थेत स्वत:ला कोंडून घेणं हा भयाचा अतिरेक. आता वेळ आहे सजग धैर्याची. काळजी घेणं आणि काळजी करणं यात फरक आहे. काळजी घेण्यात सजग सक्रियता आहे, काळजी करत बसण्यात निष्फळ चिंता. कुठल्याही गोष्टीत तरतमभाव हवा. हे सुवर्णमध्याचं तत्त्व.

जीवनाचं सौंदर्य कशात आहे? सममिती, समतोल आणि सुसंगतीत. अतिरेकानं तीच गोष्ट घातक होऊन जाते.

ग्रीक मिथकात या सुवर्णमध्याची एक गोष्ट आहे. क्रीटचा अत्याचारी राजा मिनोस याच्या पदरी डेडॅलस हा एक हुशार वास्तुरचनाकार होता. त्याचा पुत्र इक्यॅरस. राजाच्या अत्याचारापासून आपला पुत्र मुक्त व्हावा म्हणून डेडॅलसनं पक्ष्यांच्या पिसांपासून दोन पंख बनवले, घट्ट मेणाच्या सहाय्यानं ते मुलाच्या खांद्याला जोडले आणि त्याला सांगितलं, की या पंखांच्या सहाय्यानं तू समुद्रावरून उडून ग्रीसला जा. मात्र लक्षात ठेव, आकाशात फार उंच उडू नकोस, नाहीतर सूर्याच्या उष्णतेनं मेण वितळून जाईल. त्याच वेळी समुद्राच्या फार जवळूनही उडू नकोस, नाहीतर आद्र्रतेनं तुझे पंख घट्ट होतील. बरोबर समुद्र आणि सूर्याच्या मधोमध उडत राहा. मात्र इक्यॅरसनं दु:साहस केलं. तो उत्साहाच्या भरात उंच उडू लागला. उन्हानं मेण वितळलं आणि तो समुद्रात बुडून मरण पावला.

गीतेच्या सहाव्या अध्यायात श्रीकृष्णानं हा अतिरेक योगी होण्यास घातक ठरवला आहे.

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत:

न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन

‘जो अति खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अति झोपतो किंवा पुरेसं झोपत नाही, तो योगी होऊ शकत नाही.’

योग या शब्दाचा एक अर्थ आहे जोडणं. भीतीला तथ्यांची जोड द्या, तथ्यांना सावधतेची जोड द्या, आणि सावधतेला धैर्याची.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 1:09 am

Web Title: psychiatrist dr nandu mulmule article on post covid stress disorder post covid anxiety zws 70
Next Stories
1 ज्येष्ठांचे लिव्ह इन : अनपेक्षितपणे गवसलेलं सहजीवन
2 व्यर्थ चिंता नको रे : विंचू चावला!
3 मी, रोहिणी.. : खणखणीत दोघी                    
Just Now!
X