News Flash

निरोप असा दहावीचा घेता!

गेल्या वर्षभरातील करोना महासाथीच्या काळामधला ‘दहावीच्या परीक्षा रद्द’ हा एक फार मोठा निर्णय ठरला आहे.

करोना काळामधला ‘दहावीच्या परीक्षा रद्द’ हा फार मोठा निर्णय ठरला आहे. मुलांच्या हातून खूप काही निसटलं आहे, शाळेचा निरोप समारंभ असो, की परीक्षाच रद्द झाल्यामुळे निकालाची हुरहुर असो, यशाचं कौतुक, किंवा त्याउलट अपयशाचा अनुभवही, परंतु त्याहीपेक्षा आपल्या भवितव्याबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता, गोंधळ मुलांच्या मनात ताण निर्माण करणारा ठरतो आहे. मानसिक आणि भावनिकदृष्टय़ाही. कसा घ्यावा निरोप या मुलांनी दहावीचा, सांगताहेत पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या ज्येष्ठ संशोधन सल्लागार आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. वनिता पटवर्धन.

‘निरोप घेणे’ या शब्दांमध्येच कारुण्य भरलेले आहे. मग तो नवविवाहितेने माहेरघराचा निरोप घेणे असो, एखाद्या नोकरीचा किंवा शहराचा किंवा सहलीच्या गटाचा असो किंवा अगदी जगाचा निरोप घेणं असो! दहावी हे शालान्त वर्ष- शाळेतले शेवटचे वर्ष. काही शाळांमध्ये ११ वी आणि १२ वीचे वर्ग हे जोडून त्याच आवारात असले, तरी दहावी हे शाळेला निरोप देण्याचे वर्ष असते. त्यानंतर त्याच आवरात यायचे असले तरी कनिष्ठ महाविद्यालयाचा माहोल वेगळाच असतो. दहावीसाठीचा ‘निरोप समारंभ’ हा तर मिरवण्याचा, मोठे झाल्याच्या जाणिवेचा, ताटातुटीच्या दु:खाचा, विलक्षण हुरहुर दाटण्याचा एक उत्कट  प्रसंग असतो. या समारंभाच्या आठवणींमुळे म्हातारपणीसुद्धा अगदी गहिवरून येते. पण.. पण या वर्षी दहावीचे सर्व विद्यार्थी या समारंभाला मुकले! करोनाच्या महासाथीमुळे असलेल्या संचार बंधनामुळे हा हृद्य कार्यक्रम शाळेत होऊ शकला नाही. प्रत्यक्ष नाही आणि अप्रत्यक्ष किंवा दूरस्थही नाही.

एकूणच गेले वर्षभर शाळा-महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन- दूरस्थ पद्धतीने चालू होते. अनेक अडचणींवर मात करत  सर्वानी हे वर्षभर कष्टाने साधले. याबरोबर एकाग्रता, उत्साह, चिकाटी, जिद्द हे मनोगुण जोपासण्याचाही आटोकाट प्रयत्न केला. शिवाय  करोनामुळे निर्माण झालेला ताण, भीती, चिंता, उदासीनता अशा त्रासदायक भावना थोपवल्या. दहावी आणि बारावीबाबतही हेच घडले. सहामाही आणि पूर्वपरीक्षा दूरस्थ पद्धतीने पार पडल्या. या परीक्षांमध्ये चढते गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे प्रयत्नशील राहिले.. आणि आता? दहावीच्या अंतिम परीक्षाच रद्द झाल्या आणि बारावीच्या पुढे ढकलल्या आहेत.  करोना काळामध्ये अथक आणि वेगळ्या प्रकारच्या वातावरणातल्या कष्टांच्या आधारे परीक्षेच्या ताणलेल्या धनुष्याला बाण जोडून नेम धरलेला असताना अचानक लक्ष्यच नाहीसे झाले! काय करणार?.. गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष शाळेत जाण्याची संधी जेमतेम ४-८ दिवस मिळाली. त्यामुळे ‘निरोप समारंभ’ तर हुकला आणि आता परीक्षाही नाही, अशी दहावीची अवस्था झाली आहे. अपेक्षाभंगामुळे अस्वस्थता भरून राहिली आहे.

विशेषत: दहावीची परीक्षा रद्द होण्याबाबत या सर्वाच्या प्रतिक्रिया काय आहेत? त्यांची मन:स्थिती कशी आहे याचे सर्वेक्षण व्हायला हवे. कारण शालेय इतिहासात असे प्रथमच घडले आहे. भारतामध्ये या घटनेचे परिणाम दीर्घकालीन असू शकतील. त्यातही महाराष्ट्रापुरता विचार केला तर ग्रामीण भागातील, आर्थिक-सामाजिक दुर्बल गटातील, सतत उत्तम गुण मिळवणारे आणि जेमतेम उत्तीर्ण होणारे यांच्या मन:स्वास्थाचे चित्र काहीसे वेगवेगळे असू शकते. कारण विद्यार्थी आणि पालक यांनी दहावीच्या एकेका गुणासाठी केलेल्या झटापटीमध्ये खूप तफावत असणार. काही जिवाच्या कराराने एका नव्हे तर अध्र्या गुणासाठी आटोकाट प्रयत्न करतात; तर काहींना वाटते, की ठीक आहे; दहावीच्या परीक्षेची गुणपत्रिका म्हणजेच सर्व काही असे नाही. पुणे शहरातील दहावीच्या काही विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. या प्रतिक्रियांतून नेमकेपणाने अनेक गोष्टी सामोऱ्या आल्या.

‘‘ प्रथम प्रचंड धक्का बसला!’’ परीक्षांचे दिनांक पुढे जातील असा अंदाज होता, पण रद्द होतील अशी कल्पनासुद्धा मनाला शिवली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची रडारड, संतापणे, सुन्न होणे, ‘आपल्या हातात काहीच नाही’ या विचाराने हताश होणे, ‘थोडे आधी का नाही सांगितले’ असा काकुळतीचा प्रश्न, अशा स्वाभाविक प्रतिक्रिया उमटल्या. -गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात वाढलेल्या करोनाच्या साथीमुळे चालू असलेला  आकांत ध्यानात आला आणि सुरुवातीच्या नकारात्मक भावनांचा उद्रेक कमी होऊ लागला. लहानांना- अगदी दहावीतल्यांनासुद्धा- करोनाची लागण झाल्याचे कळल्यावर प्रकर्षांने जाणवले की प्रत्यक्ष परीक्षेसाठी जाणे-येणे, दीर्घकाळ एकत्र बसणे, हे  करोनाची लाटच नव्हे, तर त्सुनामीसाठी निमंत्रण ठरेल! आणि हे सर्व १५-१६ लक्ष विद्यार्थी, पालक, पर्यवेक्षक आणि परीक्षा यंत्रणेतील हजारो जण यांचा विचार केल्यावर मनोमन पटले. विचारांनी भावनांवर मात केल्यावर काहीशी समजूत पटली. शिवाय दूरस्थ परीक्षेबाबतही अनंत अडचणी आहेत. आता खूप काही मोलाचे गमावल्याची हळहळ वाटत आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, शालान्त परीक्षेच्या निकालावर आधारलेले प्रमाणपत्र हे मिळणारच नाहीत! ही गौरवास्पद कागदपत्रे आयुष्यभर मिरवायची असतात, ती आता नाहीतच; ही कल्पना खूप दु:खदायक आहे. दहावीचा निकाल साजरा करताना कौतुक, पेढेवाटप, पारितोषिके, भेटवस्तू, पार्टी, शाळेच्या फलकावर झळकणारे नाव हे काही काही नाही. ही स्वप्ने विरून गेली. या १५-१६ वर्षांच्या मुलामुलींचा केवढा हिरमोड आहे हा! पण काय करायचे?

यात भर म्हणून आता ‘पुढे काय?’ हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला आहे. त्यात अनेक उपप्रश्न दडलेले आहेत-

११ वी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ‘आयटीआय’ या अभ्यासक्रमांचे प्रवेश कोणत्या निकषांच्या आधारे होणार?

दहावीनंतर कामधंदा शोधणाऱ्यांची पात्रता कोणती?

महत्त्वाचे म्हणजे दहावीमध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण कोण? ते ठरण्याचे पर्याय कोणकोणते आणि ते कोण अंगीकारणार?

प्रत्येक विषयाचे गुण, एकूण टक्केवारी हे तर बहुधा नसणार. कारण काही शाळांनी पूर्वपरीक्षा घेतल्या नाहीत आणि तो एकमेव आधार सुटला आहे. मग प्रत्येक विद्यार्थ्यांला निदान श्रेणी तरी मिळेल ना? त्यासाठी निकष कोणकोणते?

एकंदरीत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षभरातील शिकण्याचे आणि त्यांनी जे संपादन केलेले आहे, त्याचे मूल्यमापन होणार की नाही?, कसे होणार?, आणि त्याचे फलित त्यांच्या पदरात केव्हा आणि कोणत्या स्वरुपात पडणार? या अनुत्तरित प्रश्नांच्या जंजाळामुळे अनिश्चितता, गोंधळ, अस्वस्थता शिगेला पोहोचलेली आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्या मन:स्थितीचे चित्र असे आहे. सुमारे ८०-८५ वर्षांपूर्वीची एक आठवण जुने लोक सांगत. त्या वर्षी ‘बी.ए.’ परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून गेल्या. मग त्या सर्वानाच ‘बी.ए.’चे प्रमाणपत्र दिले गेले आणि ते आयुष्यभर ‘जळके  बी. ए.’ ठरले! असे काहीसे होईल, अशी धास्ती त्यांच्या मनात आहे. परीक्षेच्या निकालातील गुण हे विद्यार्थ्यांमधला सूक्ष्म फरक दाखवतात. तो फरक आता कसा दिसणार? विशेषत: हुशार विद्यार्थ्यांना छळणारा हा प्रश्न आहे. काठावरच्या विद्यार्थ्यांना कदाचित तात्पुरते ‘हायसे’ वाटले असेल.

या निमित्ताने ‘शैक्षणिक मूल्यमापन पद्धत’ या महत्त्वाच्या मुद्याविषयी शिक्षणतज्ज्ञांमध्ये नव्याने ऊहापोह होईल. हे मूल्यमापन केवळ शाळेतल्या किंवा शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर नसावे, यावर तर यापूर्वीच शिक्कामोर्तब झाले आहे. ‘सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यांकन’     (कं टिन्युअस काँप्रीहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन) ही पद्धत गेली काही वर्ष अतिशय काटेकोरपणे, वस्तुनिष्ठ प्रकारे, कष्टपूर्वक अनुसरली जात आहे. सर्व इयत्तांमधील लक्षावधी विद्यार्थ्यांचे शालेय आणि सहशालेय वर्तन ध्यानात घेतले जाते. संख्यात्मक (आकडय़ांमध्ये) आणि गुणात्मक (वर्णन, श्रेणी) मूल्यमापन होते. आठवीपर्यंतचे विद्यार्थी तर एकेक इयत्ता आपोआप वरती चढतात! आता यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनाही काही एक अहवाल नोंद ही शाळेला द्यावी लागेल. त्यांची ती जबाबदारी असेल. हे काम अवघड आहे, कारण स्वत: शिक्षक आणि विद्यार्थी यांचेही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यंदा पणाला लागले होते! हे स्वास्थ्य ठीक नसेल तर मूल्यमापन करणार कसे, असा मुद्दाही उपस्थित होतो.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सध्याच्या पद्धतीनुसार दहावीची परीक्षा मंडळातर्फे न होता केवळ बारावीची होणार आहे. याची चाचपणी यंदापासूनच सुरू होणार की काय? ‘औपचारिक शिक्षणातील गुणांचे महत्त्व किती?’ हा गाभ्याचा प्रश्न उसळून वर आला आहे. यंदाच्या दहावीच्या नवतरुण आणि नवतरुणींसाठी ‘शालेय शिक्षण हे केवळ परीक्षांमधील गुणांसाठी नसून त्यापलीकडे खूप काही आहे, याचा साक्षात्कार होण्यासाठी ‘दहावीच्या परीक्षा रद्द’ या निर्णयाचा उपयोग झाला तर फार बरं होईल, नाही का? मग हुशार मुले केवळ परीक्षार्थी राहाणार नाहीत आणि मध्यम आणि काठावरच्या मुलांची परीक्षेचा बाऊ, इतरांकडून अवहेलना यातून सुटका होईल!

यंदाचे दहावीचे विद्यार्थी हे या शतकातील आणि या सहस्त्रकातील अतिशय तंत्रस्नेही, आपल्या बोटांवर जगाला कवेत घेणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे आता थोडे अडखळले तरी ते नव्या जीवनशैलीला समर्थपणे सामोरे जातील, असा विश्वास वाटतो. परीक्षा रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विशिष्ट परीक्षा असतील, अशी अटकळ बांधून ते तयारीला लागलेले आहेत. मात्र असा वेध घेऊ न शकणारे विद्यार्थी आणि पालक संभ्रमित अवस्थेमध्ये आहेत. त्यांनी शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय तज्ज्ञांची मदत घेणे इष्ट ठरेल.

गेल्या वर्षभरातील करोना महासाथीच्या काळामधला ‘दहावीच्या परीक्षा रद्द’ हा एक फार मोठा निर्णय ठरला आहे. या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काही टप्पे सातत्याने सर करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी प्रमुख गोष्टी –

परिस्थितीचा मन:पूर्वक स्वीकार करून जे आपल्या हातात, नियंत्रणात आहे ते करायला सुरुवात करणे.

या अवघड वेळी दटून राहाणे आणि पुढे जाण्याचा निर्धार करणे.

वेळोवेळी तज्ज्ञांची मदत घ्यायची आणि मिळालेली माहिती विश्वासार्ह आहे ना, हे सतत पडताळायचे.

विद्यार्थ्यांनी स्वत:ला जास्तीत जास्त ओळखायचे. स्वत:ची वैशिष्टय़े, कौशल्ये, बौद्धिक पातळी, कल, आवडनिवड, व्यक्तित्व गुण आजमवायचे. त्यांची जोपासना, विकास यांसाठी प्रयत्न करायचे.

स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्यायची. स्वत:चे स्वास्थ्य जपत अभ्यास, कामे हे नियोजनपूर्वक करायचे.

आपण ५, १०, १५, २० वर्षांनंतर कोण आणि कसे असू याचे चित्र रेखाटायचे.

स्वत:मध्ये आशावाद निर्माण करत दहावीला निरोप देता येईल!

vanita.patwardhan@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:38 am

Web Title: psychologist dr vanita patwardhan article on students worry over cancellation of ssc exams zws 70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : आत्मविश्वासाची पायाभरणी!
2 जोतिबांचे लेक  : रिलेशानी  ‘पुरुषी’ मुखवटा  दूर सारण्यासाठी
3 जगणं बदलताना : बी..स्कोप ते ओटीटी
Just Now!
X