18 October 2019

News Flash

ध्यानातून शांतीकडे

शांती हा एक आयाम आहे. चित्तवृत्ती नि:शेष होणं, वृत्तीनिरोध होऊन राहणं ही जी योगावस्था आहे, तिच्याशी शांती शब्दाचा संबंध आहे, कितीही क्षोभकारक परिस्थिती निर्माण

| March 2, 2013 01:01 am

शांती हा एक आयाम आहे. चित्तवृत्ती नि:शेष होणं, वृत्तीनिरोध होऊन राहणं ही जी योगावस्था आहे, तिच्याशी शांती शब्दाचा संबंध आहे,  कितीही क्षोभकारक परिस्थिती निर्माण झाली तरी क्षोभ निर्माण होत नाही, तिला शांती म्हणतात.
प्रश्न : ध्यानात चित्ताच्या एकाग्रतेचं महत्त्व काय आहे?
उत्तर : एकाग्रतेचा अर्थ आहे एखाद्या वस्तूवर, विषयावर, व्यक्तीवर, मंत्रावर, ध्वनीवर किंवा विषयावर चित्त स्थिर करणं. ‘एकाग्र’, ‘अनेकाग्र’, ‘सर्वाग्र’ अशा चित्ताच्या अवस्था असतात. कोणत्याही एका विषयावर आपली सर्व शक्ती समग्रपणे स्थिर केली की एकाग्रता येते. म्हणजे इथे चित्त कोणत्या ना कोणत्या एका विषयाशी युक्त आहे, जोडलेलं आहे. मग तो विषय एखादा पदार्थ असेल, व्यक्ती असेल, मंत्र असेल वा ध्वनी असेल. याच्या नेमकी उलट अवस्था ध्यानात आहे-ध्यान म्हणजे चित्ताची निर्विषय अवस्था, त्यामुळे इथे चित्ताच्या एकाग्र-अनेकाग्र असण्याशी काही संबंध नाही. एकाग्रता धारणेत महत्त्वाची असते. धारण (Concentration) ही एक प्रक्रिया आहे, जिच्यामुळे चित्तात धृती, धैर्य, सहनशीलता, तितिक्षा इ.चा विकास होतो. बुद्धीचं तेज वाढतं. धारणेच्या अभ्यासासाठी एकाग्रता अनिवार्य आहे आणि ध्यानासाठी एकाग्रता असंगत आहे; कारण धारणेत चित्ताची एक  क्रिया आहे. त्यात आपण निश्चियपूर्वक चित्ताला एका विवक्षित दिशेला घेऊन जातो आणि मग ते तिथेच स्थिर राहवं यासाठी प्रयत्न करतो. म्हणजेच तिथे चित्ताची काही ना काही गती आणि क्रिया आहे. धारणेचा अभ्यास अनेक प्रकारे केला जातो- दृष्टी आणि रूप, श्रुती आणि शब्द, नाद आणि जप अशा विविध प्रक्रियांतून एकाग्रता साधली जाते. त्यामुळे एकाग्रतेचं धारणेच्या अभ्यासात विशेष महत्त्व आहे.
पण ध्यान ही एखादी क्रिया नव्हे, न शरीराची, न चित्ताची, न बुद्धीची. ती चेतनेची, तुमच्या समग्र अस्तित्वाची एक अवस्था आहे. त्यामुळे कोणतीही क्रिया ध्यानात महत्त्वाचीही नाही, गौणही नाही. क्रिया मात्र ध्यानाशी असंगत आहे. भजन-पूजन-आराधना, जप-एकाग्रता-अनेकाग्रता-सर्वाग्रता इ. सर्व आपापल्या क्षेत्रात महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत; पण ध्यानाशी त्यांचा काहीही संबंध नाही. चित्ताला कोणत्या ना कोणत्या विषयाला धरून राहण्याची सवय आहे. त्याला त्यातच रुची आहे. त्यामुळे कोणत्याही विषयाला चिकटून राहण्यात त्याला रस वाटतो. पण ध्यान ही आहे निर्विषय अवस्था. ध्यान म्हणजे शून्याकार होणे. त्यामुळे ध्यानाचा एकाग्रतेशी संबंध नाही. हे समजून घ्यायला हवं की, ध्यान आणि धारणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. धारणा ही एक मानसिक क्रिया आहे. धारणेला एक दिशा आहे, गती आहे, लक्ष्य आहे, परिणाम आहे. धारणेनं सिद्धी प्रकट होतात. धारणेत शक्तींचा विकास आहे. धारणेनं अनुभूतींची दारं उघडली जातात. हे सारं धारणेनं होतं. या धारणेच्या अभ्यासाच्या भारतीय साधनशास्त्र तसेच योगशास्त्र आणि त्याच्या शाखांत विविध पद्धती आणि प्रक्रिया आहेत. पण त्या ध्यानाशी जोडू नका.
प्रश्न : ध्यानाला बसल्यावर झोप का येते? झोप रोखण्याचा काही उपाय सुचवाल?
उत्तर : ‘ध्यानाच्या’ वेळी न म्हणता ‘मौनाच्या’ वेळी असं म्हणा. कारण ध्यान ही एक अवस्था आहे; त्याच्यासाठी कुठलीही निश्चित अशी वेळ नसते. ध्यान केलं जात नाही, ध्यानाला बसायचं नसतं. ध्यान ही एखाद्या अन्तर्वाही प्रवाहासारखी अवस्था आहे, जी जागृती-स्वप्न-सुषुप्ती इ. सगळ्या अवस्थांत आत सतत प्रवाहित असते, तो तर जीवनाचा एक आयाम बनतो; त्यामुळे वेळेचा प्रश्नच उरत नाही.
आपण जाणू इच्छिता की, मौनाच्या वेळी झोप का येते? याची अनेक कारणं असू शकतात. एक कारण असं असू शकतं की, तुम्हाला मौनात रस नसेल, रुची नसेल, दुसऱ्याचं पाहून वाटतं की, ‘सर्व जण बसतात; यामध्ये जरूर काही तरी सुख मिळत असेल. आपणही त्याचा अनुभव घ्यावा’. अशी स्वत:वर जबरदस्ती करून, रुची नसताना बसत असाल तर तंद्री-मूच्र्छा-जडता येऊ शकते; ती निद्रा नसून एक प्रकारची निष्क्रियता आहे.
अतिश्रम आणि तेही न आवडणाऱ्या कामाचे, हे आणखी एक कारण असू शकते. नावडत्या वातावरणात, न आवडणाऱ्या लोकांबरोबर, तासन् तास एकत्र बसून काम करावे लागत असेल. अधिक काम हे परिस्थितीवश असू शकेल आणि तुमच्या मनाला व शरीराला झेपणार नाही इतके श्रम पडत असतील. या दोन्हीमुळे (अरुचिकर काम आणि अतिपरिश्रम) मनाला अशी बधिरता येते, की अगदी अनिवार्य असेल तेव्हाच ते काम करतं; पण स्थिर व्हायला सांगितलं, की ढेपाळतं.  Overexhausted nervous system and brain याचा हा परिणाम आहे. शांतपणे बसला आहात, आसपास कोणत्याही प्रकारचा आवाज-गडबड नाही, मनावर कुठलाही दबाव-ताण नाही, अशा वेळी तन-मन-बुद्धीच्या अतिपरिश्रमाचा परिणाम तंद्री वा जडतेच्या रूपात प्रकट होतो.
तेव्हा अतिपरिश्रम, रुची नसणं, पोट  स्वस्थ नसणं- अशा कारणाने तंद्री-जडता येते. मौनात व ध्यानात रुची ही ‘मनुष्याणाम् सहस्र्ोषु’ हजारात एखाद्यालाच असते. कारण त्यात मिळत काहीच नाही. कर्ता-भोक्ता-भावाचं सुख नाही, द्रष्टा व साक्षीभावदेखील उरत नाही. केवळ शून्य होऊन जगायचं असतं. You get reduced to nobodyness, nothingness. त्यात काही गंमत वाटत नाही. हजारात एखाद्यालाच अशी शून्यात बुडी मारण्यात रुची असते.
मौनाला बसताना निद्रा न येण्यासाठी एक तर निद्रेची जी कारणं सांगितली त्यांचं निराकरण करायला हवं. दुसरं, जेव्हा मन ताजंतवानं असेल अशा वेळी मौनाला बसा. दमल्याभागल्या अवस्थेत तर मुळीच नको. असं स्वस्थचित्त बसणं आठवडय़ातून दोन-तीनदाच शक्य असेल तर तेवढंच बसा. १०-१५ मिनिटंच मिळत असतील तर तेवढंच पुरे. वेळेचं बंधन ठेवू नका.
आणखी एक तात्पुरता उपाय सुचतो तो असा : मौनाला बसून १०-१५ मिनिटांनी जर तंद्री लागते आहे किंवा जडता येते आहे असं वाटलं तर आसनावरून उठून उभे राहा. थोडं इकडेतिकडे फिरा. हात-पाय-तोंड गार पाण्यानं धुवा आणि पुन्हा बसा. जर आवड असेल तर थोडं संगीत ऐका आणि परत आसनावर जाऊन बसा. १०-१५-२० मिनिटं, जितकं सहज शक्य असेल तितकंच मौनाला बसा. स्वत:वर जबरदस्ती करू नका.
प्रश्न : शांती ही मनाशी निगडित आहे; तिचा ध्यानाशी काय संबंध?
उत्तर : मनात-चित्तात विविध तऱ्हेचे-वृत्तींचे तरंग उमटतात. चित्ताचं तरंगहीन होणं ही शांती आहे.  A quiet mind is not a silent mind. ज्या चित्तात प्रक्षोभ नाही, जे चित्त विक्षिप्त नाही, अशा अर्थी शांत आहे असं चित्त! इथेही मौन नाहीये, शांती हा एक आयाम आहे. चित्तवृत्ती नि:शेष होणं, वृत्तिनिरोध होऊन राहणं ही जी योगावस्था आहे, तिच्याशी शांती शब्दाचा संबंध आहे. जिथे सहज-संतुलन आहे, अक्षोभ्य अवस्था आहे, म्हणजे असं की कितीही क्षोभकारक परिस्थिती निर्माण झाली तरी क्षोभ निर्माण होत नाही, तिला शांती म्हणतात. या उलट पूजेला किंवा मौनाला बसला आहात तेव्हा शांत आहात, तेवढय़ात कुणी तरी आलं, काही तरी बोललं, की लगेच तुम्ही क्रोधित झालात, मनात ईर्षांभाव निर्माण झाला, तर ती शांती नव्हे, जर मनात शांती नावाच्या आयामाचा विकास झाला असेल तर तिथे क्षोभ प्रवेश करू शकत नाही.
मेरू रे डगे पण जेना मनडा डगे नहीं रे,
भले भांगी पडे ब्रह्मांड जी!
‘भले भांगी पडे ब्रह्मांड जी-’ सुमेरू पर्वत हलण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी ज्याचं मन अचल-अविचल राहतं, ब्रह्मांड तुटून पडलं तरी ज्याचं चित्त तुटत नाही, अशा चित्तात क्षोभ निर्माण होत नाही.
संत गंगासतीनं आपल्या या भजनात ज्याकडे लक्ष वेधलं आहे ती वेगळीच गोष्ट आहे- ही मनाच्याही पलीकडची शांती आहे. हा ध्यान नावाचा आयाम आहे.
आज काही रासायनिक प्रक्रियांच्या मदतीनं मन चार-दोन तास किंवा चार-पाच दिवससुद्धा शांत ठेवता येतं. पण तो तुमच्या जीवनाचा आयाम नव्हे. विविध प्रकारची रसायनं (गांजा, चरस इ.) शरीरात घालून किंवा एखाद्या तांत्रिक प्रक्रियेनं किंवा विशिष्ट बीजमंत्राचा जप करून काही काळासाठी तुम्ही एखाद्या अवस्थेत जाता; पण अवस्था म्हणजे आयाम नव्हे. अवस्था अल्पकालीन असते; त्यातून बाहेर यावं लागतं.
आत्म्यामध्ये जो सहज शांतीचा प्रसाद आहे, सहज संतुलनाचं ऐश्वर्य आहे, सहज प्रेमाचा आल्हाद आहे, तो मनाच्या स्तरावर अशक्य आहे. बुद्धीनं विवेकाचे कितीही आसूड फटकारले, यम-नियमाच्या पाशात स्वत:ला जखडून टाकलं, दमन-निग्रहपीडन केलं किंवा स्वैर-स्वच्छंदी वर्तनात इंद्रियांना डुंबत ठेवलं, यातून ती सहज आल्हाद-प्रसादरूपी शांती प्राप्त होणं शक्य नाही.
कुणी सांगितलं की अज्ञानात भय आहे? तेच जीवन आहे जे निर्भयपणे, धाडसीपणे उभं राहतं. अज्ञातातच जीवनाची ‘रोमांचकता’ आहे.
अज्ञाताची भीती बाळगणारे जीवनाला पोपट बनवून, सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडून त्याला मोत्याचा चारा खाऊ घालतात. त्यांच्या हातात केवळ पिंजरे राहतात, जीवन निघून जातं.
अज्ञाताशी भयाचा संबंध जोडणाऱ्यांनी जीवनावर फार मोठा अन्याय केला आहे. नित्यनूतनतेची शक्ती केवळ अज्ञातात आहे, ज्ञातात नाही.
(‘जीवन सौरभ’ या प्रतिभा काटीकर यांनी लिहिलेल्या ‘ढवळे प्रकाशना’च्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार )

First Published on March 2, 2013 1:01 am

Web Title: pursuing peace through meditation