गणेश मतकरी

‘‘रोजच्या व्यवहारात एकच पात्रता असणाऱ्या स्त्री-पुरुषांना मिळणाऱ्या वागणुकीतली तफावत आपण गृहीत धरून चालतो. घरीही वडील आणि आई यांच्या भूमिका वेगळ्या असतात आणि त्यांना मिळणारा मानही वेगळा असतो. जेव्हा एका समूहानं दुसऱ्या समूहावर केलेला अन्याय गृहीत धरला जातो, तेव्हा आपण तो करणाऱ्यांच्या गटात असणं, हे तो सहन करणाऱ्यांच्या गटात असण्यापेक्षा फायद्याचं असतं. मला स्वत:ला या गटात, म्हणजे ‘पुरुषांच्या’ गटात असल्याचा कितपत फायदा झाला, हे माहीत नाही. बहुधा फारसा नसणार, कारण आमचं घर अलिखित नियमांनुसार चालणारं नव्हतं. त्याचे चालण्याचे नियम भलतेच होते..’’

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

स्त्री आणि पुरुष यांच्यात बरोबरी होणं शक्य नाही, असं माझं सरळ, स्पष्ट आणि माझ्या अनुभवातून तयार झालेलं मत आहे. हो, म्हणजे शारीरिक कष्टाबिष्टाच्या कामात पुरुष बहुधा वरचढ ठरू शकतात, पण अशी निव्वळ अंगमेहनतीच्या बळावर तुलना आजच्या काळात करावी तरी कशाला? पुरुषापुरुषांत तरी ती कुठे केली जाते? डोक्याचा वापर हा तिथेही श्रेष्ठच मानला जातो. त्यामुळे ही एक गोष्ट बाजूला काढली तर मला वाटतं स्त्रिया या नक्कीच पुरुषांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जायला हव्यात.

रूपासारखी गोष्ट जरी आपण ‘सब्जेक्टिव्ह’ आणि तुलनेसाठी काहीशी ‘पोलिटिकली इनकरेक्ट’ म्हणून बाजूला काढली, तरी कामातली शिस्त, ‘मल्टिटास्किंग’, भावनिक गुंतवणुकीचे अनेक पदर आणि वैचारिक स्पष्टता, हे गुण आपल्याला सामान्यत: स्त्रियांमध्येच अधिक प्रमाणात दिसतात. सर्जनशीलता हा घटक तसा स्त्री आणि पुरुष दोघांकडे समप्रमाणात जरूर आहे, पण पुरुषांना त्याचा अधिक फायदा झाला याला इतिहासच साक्ष आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव हा जगभरात आणि इतक्या मोठय़ा प्रमाणात पूर्वीपासूनच राहिला आहे, की स्त्रिया या मोठा काळ शिक्षणापासून वंचित राहिल्या. साहित्य, कला यांमधल्या सहभागापासून सामाजिक व्यवस्थेपर्यंत प्रत्येक ठिकाणीच त्यांना मागे ठेवण्याचे कायम प्रयत्न झाले आणि त्याचा परिणाम म्हणून या दरेक क्षेत्रांमध्ये पुढे आलेली नावं ही मोठय़ा प्रमाणात पुरुषांची राहिली आहेत. गंमत म्हणजे या सगळ्याचीच आपल्याला इतकी सवय झालेली आहे, की असं होत असल्याचं आपल्या लक्षातही येत नाही. (इथे ‘आपल्या’ म्हणजे ‘पुरुषांच्या’ अशा अर्थी घ्यावं, का ‘एकूण समाजाच्या’ अशा अर्थी घ्यावं याबद्दल मी संभ्रमित आहे, कारण पुरुषांप्रमाणेच बहुधा स्त्रियांनाही यात काही विशेष वाटत नसावं अशीच समाजाची मन:स्थिती अनेक वर्ष राहिली आहे.) आणि जगभरात हीच स्थिती आहे. ‘ऑस्कर’ नामांकनासारखी सर्वसाधारण परिचयाची गोष्ट घेतली तरी ९१ वर्षांच्या इतिहासात केवळ पाच स्त्रिया या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन विभागात नामांकनासाठी पात्र ठरल्या आणि कॅथरीन बीगेलो, या एकाच स्त्रीला हा पुरस्कार मिळाला, असं सांगितल्यावर आपल्याला तेवढय़ापुरतं आश्चर्य वाटतं, पण पुढच्या वर्षीच्या नामांकनांची वेळ होईपर्यंत हे ऐकल्याचं आपण विसरूनही गेलेलो असतो. रोजच्या व्यवहारातही एकच पात्रता असणाऱ्या स्त्री-पुरुषांना मिळणाऱ्या मेहनतान्यातली तफावत, त्यांना मिळणाऱ्या वागणुकीत दिसणारा भेदभाव, या गोष्टी कोणी तरी खास कानावर घातल्याखेरीज आपल्याला जाणवत नाहीत. त्या तशा असणार, असं आपण गृहीतच धरून चालतो. बाहेरचं सोडा, घरीही वडील आणि आई यांच्या भूमिका वेगळ्या असतात, त्यांना मिळणारा मान वेगळा असतो आणि तिथेही बहुधा दोघं प्रत्येक बाबतीत बरोबरीचे असले, तरी ही विभागणी टळत नाही.

मी असं पाहिलंय, की जेव्हा एका समूहानं दुसऱ्या समूहावर केलेला अन्याय गृहीत धरला जातो, तेव्हा आपण तो करणाऱ्यांच्या गटात असणं, हे तो सहन करणाऱ्यांच्या गटात असण्यापेक्षा फायद्याचं असतं. मला स्वत:ला या गटात- ‘पुरुषांच्या’ गटात असल्याचा कितपत फायदा झाला, हे माहीत नाही. बहुधा फारसा नसणार, कारण आमचं घर त्यामानानं अशा अलिखित नियमांनुसार चालणारं नव्हतं. त्याचे चालण्याचे नियम भलतेच होते. याचं प्रमुख कारण म्हणजे बाबांनी निवडलेला व्यवसाय आणि त्यांची कार्यकारणपद्धती.  इतर घरांमध्ये, म्हणजे अगदी आमच्या नात्यातल्या किंवा मित्रमंडळींच्या घरांमधूनही, ‘मॅन ऑफ द हाऊस’ ही भूमिका विशिष्ट प्रकारची असायची. करिअरला महत्त्व देणं, घर चालवण्याची; म्हणजे आर्थिकदृष्टय़ा चालवण्याची जबाबदारी घेणं आणि त्यासाठी खरोखरच पडतील ते कष्टही उचलणं, या गोष्टी त्यांनी करणं ठरलेलं होतं, पण ‘हाऊसवाइफ’ हा शब्द रूढ असलेल्या काळात स्त्रियांचं आतून घर चालवणं हे तसं दुर्लक्षितच असे. स्त्रिया सरसकट नोकरी करत नसत असंही नाही. आमच्या नात्यातही अनेक स्त्रिया नोकरी करून घर सांभाळत, पण शिशुविहार शाळेत उपमुख्याध्यापिका असणाऱ्या माझ्या आजीसारखे काही अपवाद वगळता, त्यांची नोकरी ही दुय्यम महत्त्वाची मानली जात असे. जर अडचणीच्या प्रसंगी तडजोड करावी लागली आणि एकालाच भार उचलावा लागला, तर तो पुरुषानंच उचलणं अपेक्षित होतं. या वडीलमंडळींची घरात जरब असे, शब्दाला आईपेक्षा किंमतही असे आणि सर्वात छान म्हणजे त्यांची नोकरी ही संध्याकाळी संपायची, सुटीच्या दिवशीही त्यांना आराम करण्याची मुभा असे. आयामंडळींची अघोषित नोकरी आपली सतत चालू असे. बाहेर काम करत असल्या तर घरी आल्यावर कामाच्या स्वरूपातला बदल, हाच काय तो विरंगुळा.

आमच्याकडे वेगळी गोष्ट ही, की घरातली तिन्ही मोठी माणसं, या ठरवून दिलेल्या भूमिकांच्या पलीकडली होती. आता तीन माणसं कोण, तर बाबा, आई आणि आमच्या शेजारच्या घरात एकटय़ाच राहाणाऱ्या सुमनताई. या सुमनताई आमच्या घराचाच भाग होत्या. इतकंच नाही, तर बाबा अनेक वर्ष त्यांच्या घरातल्या एका खोलीतच आपलं ऑफिस थाटून लिहीत असल्यामुळे त्यांचं घरही आमच्या घराचाच भाग होतं. त्यांच्या घरची चावीही आमच्याकडे असायची आणि आमची त्यांच्या. त्यामुळे या दोन घरांमध्ये सतत ये-जा सुरू असायची. साहजिकच, माझ्यासाठी तरी ही ‘दोन घरं’ आणि ‘तीन मोठी माणसं’ अशी आमच्या घराची एकत्रित ओळखच आहे. या तिघांमध्ये बाबा आणि आई, हे दोघंही घरूनच काम करत. (बाबा शेजारच्या घरून, पण म्हणजे घरूनच.) बाबा ‘बँक ऑफ इंडिया’त होते तो काळ मला पुसटसा आठवतो, पण खूप नाही. कधी तरी घरी आल्यावर ते डायनिंग टेबलवर बसून चहा पितायत, कधी तरी मी आणि माझी मोठी बहीण सुप्रिया, त्यांना बँकेत भेटून पुढे त्यांच्याबरोबर सिनेमा पाहायला गेलोय, अशा काही आठवणी आहेत, पण फारच कमी. बहुतेक वेळा ते आठवतात, ते घरून काम करणारे. टेक्निकली ते पुरुषांच्या ‘मिळवते’ या भूमिकेत होते आणि आम्हाला जो काय धाक होता तो त्यांचाच होता हे खरं, पण इतर बाबतीत ते आणि आई यांच्या कामाची विभागणी संमिश्र होती. म्हणजे आई आमच्या नाटय़संस्थांच्या कामकाजाचा बराच भाग बघायची. कोणाशी जाऊन बोलणी करणं, परवानग्या घेणं, अकाऊंट्सची कामं करणं, वगैरे भाग तिच्याकडे असायचा, त्यामुळे घराबाहेर अधिक वेळ ती असायची. घरकामाला आलेल्या मुलीकडून सांगितलेली कामं व्यवस्थित करून घेणं, स्वयंपाकाचा मेनू ठरवून देणं, अशा गोष्टी बाबा करत. बाबांचा लिहायला बसायचा वेळ ऑफिससारखा ठरवलेला होता; पण चहा, जेवण अशा गोष्टींसाठी ते घरातच असत. संध्याकाळी तालमी वगैरे असल्या तर तिथे आई आणि बाबा दोघांचीही हजेरी लागे आणि आमच्या गरजेनुसार माझ्या आणि सुप्रियाच्याही तिथे चकरा होत. घरातलं तिसरं माणूस, सुमनताई मात्र एका सरकारी ऑफिसात व्यवस्थित नोकरी करत. एरवी मुलं जशी वडिलांच्या ऑफिसात कधीमधी जातात, तसा मी त्यांच्या ऑफिसात गेल्याचं मला आठवतं. आमच्या डोळ्यापुढली ‘रोल मॉडेल्स’ या तिघांची असल्यानं माझ्यापुढे तरी पुरुषानं अमुक करावं आणि स्त्रीनं तमुक, अशा प्रतिमा तयारच झाल्या नाहीत. नाही म्हणायला सिनेमा-नाटकांतून, कथा-कादंबऱ्यांतून त्या काय असतात याचा परिचय होता. घरकाम करणाऱ्या बाईला नवरा दारूपिऊन मारतो, या प्रकारचे संदर्भ अचानक कुठूनसे कानावर येत, पाहाण्यातली इतर घरंही होती; पण ते जग आमच्यापासून काही अंतरावर होतं.

माझ्या स्वत:च्या लग्नानंतरचा काळ हा    स्त्री-मुक्ती आंदोलन येऊन स्थिरावल्यानंतरचा, समाजात स्त्री-पुरुष समानता काही एका प्रमाणात मान्य झाल्यानंतरचा होता. त्यात माझा प्रेमविवाह तर माझ्याच कॉलेजमधल्या, मला ज्युनिअर असलेल्या पल्लवी देवधरशी झाला. त्यामुळे ती करिअर करणार हे सुरुवातीपासूनच निश्चित होतं. माझ्या बाबतीत मात्र थोडी इतिहासाची पुनरावृत्ती झाली, असं म्हणता येईल. मी लग्नानंतरच्या वर्षी समीक्षात्मक लेखन सुरू केलं आणि पुढे पुढे माझा ‘आर्किटेक्चर’मधला रस कमी होत समीक्षा आणि ‘क्रिएटिव्ह रायटिंग’मधलाच रस वाढत गेला. बाबांचं घर लेखनावर चाललं, पण ते यशस्वी नाटककार असल्यानं प्रयोगांच्या मानधनाच्या रूपानं येणारा पैसा ही नियमित मिळकत होती. माझ्या लेखनात तशी सोय नसल्यामुळे थोडं लेखन-थोडं व्यावसायिक काम असं मी अनेक वर्ष केलं आणि जेव्हा पल्लवी म्हणाली, की आता ती करिअरमध्ये अशा पातळीवर आहे, की ती एकटी घर व्यवस्थित चालवू शकेल, तेव्हा मी पूर्णवेळ लेखनावर लक्ष केंद्रित करून घरी राहायचं ठरवलं.

काही वर्षांपूर्वी मी पुण्यात एका वाचकसमूहाला भेटलो. माझ्या ‘खिडक्या अर्ध्या उघडय़ा’ पुस्तकावर त्यांना चर्चा करायची होती. पुस्तकातल्या आत्मचरित्रात्मक संदर्भाविषयी बोलताना विषय व्यक्तिगत आयुष्याकडे वळला. मी म्हणालो, की मी लिहू शकतो, कारण आमच्याकडे ‘मॅन ऑफ द हाऊस’ पल्लवी आहे. यातला विनोदाचा भाग सोडला, तर  स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांसंदर्भात हे अगदी खरंच आहे आणि आमच्या दृष्टीनं ते ‘प्रॅक्टिकल’देखील आहे. आपल्या समाजात नाटक, पटकथा या क्षेत्रातला (यशस्वी) लेखक हा जसा घर चालवू शकतो, तसा साहित्य/ समीक्षा यांमधला लेखक करूशकत नाही, त्यामुळे त्याला पूर्णवेळ लेखन शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय ही त्याची गरज होऊन बसते, जे त्याच्या लेखनाचा वेळ किमान निम्म्यावर तरी आणतंच, वर या कामातले तणाव तो वेळ त्याहूनही खाली आणू शकतात. मी पूर्णवेळ लेखन करू शकतो, कारण आम्ही व्यक्तिगत सोयी, शक्याशक्यता, गरजा यांचा विचार करतो; पण प्रथा-परंपरा, लोकांची मतं यांचा करत नाही. असं करणारं काही आमचं एकच कुटुंब आहे असं नाही. गेल्या पिढीपेक्षा या पिढीत अशा कुटुंबांची संख्या अधिक प्रमाणात आहे.

कुटुंबात किंवा कुटुंबव्यवस्थेबाहेरही, या लादलेल्या भूमिका आता हळूहळू संपायला लागलेल्या आहेत. आपण व्यक्ती म्हणून कोण आहोत, आपण काय करूशकतो, आपल्यावर कसली जबाबदारी आहे, आपल्या वेळाचा, आपल्या आयुष्याचा विचार आपण कशा रीतीने करतोय, याला आता ‘जेंडर सेन्ट्रिक’ ढाच्यांपेक्षा अधिक महत्त्व यायला हवं.  ते आलं तर आपण आपल्या एकूण अस्तित्वाचा विचारच अधिक मोकळेपणाने करू शकू आणि तो केवळ पुरुष म्हणून वा स्त्री म्हणून करण्यापेक्षा ते अधिक संयुक्तिक ठरेल.

ganesh.matkari@gmail.com