30 October 2020

News Flash

राजकन्या

आजोबांनी तिला चार गोष्टींचा दहेज दिला. उलट उत्तर न देणे, सेवा करणे, कष्ट करणे, सर्वावर प्रेम करणे या चार मूल्यांचे ती जतन करीत राहिली आयुष्यभर!

| July 26, 2014 04:53 am

आजोबांनी तिला चार गोष्टींचा दहेज दिला. उलट उत्तर न देणे, सेवा करणे, कष्ट करणे, सर्वावर प्रेम करणे या चार मूल्यांचे ती जतन करीत राहिली आयुष्यभर! तिचा संसार सुरू झाला. अंगाने दणकट असणारी सासू स्वभावानेही कडक होती. जमाना व परिस्थिती पाहता या राजकन्येचे काय होणार ते कळतच होते. कैलाशचं कोवळं मन आतून थरथरलं. पण गाढ श्रद्धा. काहीही वाईट होणारच नाही, हा विश्वास, ही श्रद्धा पूर्णत: अढळ होती.

ए क खरीखुरी, अंतर्मनाला स्पर्श करणारी ही सत्यकथा. राजकन्येसारख्या दिसणाऱ्या एका मुलीची. निळे गहिरे डोळे, छान नाजूक आकाराचे, अगदी जाईच्या कळ्यांसारखे, सरळ व थोडेसे फुगीर नाक, तांबूस गुलाबी गोरेपण, छे! वर्णन नकोच. सौंदर्याच्या सीमा पार करणारे तिचे लावण्य! तिच्या डोळ्यात एक अनामिक कसक आहे. संध्या समयीच्या दर्यासारखी अपार शांतता आहे. राजकुमारीची आब आहे.. आजही वयाच्या उत्तरार्धातही तिचं ते शांत समाधानी रूप तेजाळत आहे.. पण त्या दरम्यान? ..
पाकिस्तानातल्या सियालकोटजवळील शहजादे गावात या मुलीने जन्म घेतला. एका पंजाबी कुटुंबात. तिच्या दोन भावांच्या पाठीवरच्या तीन बहिणी गेल्या. ही जाऊ नये म्हणून तिला शेजारणीकडे दिले. मुलगी असून मुलगा झाला असे सांगून लाडू वाटले. नाव ठेवले कैलाश. दोन घरात वाढलेली कैलाश मस्त मजेत झुल्यावर झुलत गावात बागडत होती. तिथे फक्त पाचवीपर्यंत शाळा होती. ती हिंदी शाळेत शिकली. तिच्या काकांनी तिला उर्दू शिकविलं. मैत्रिणीने पंजाबी शिकविलं तर आजोबांनी इंग्लिश शिकविलं. कैलाश हुशार होती. पुढे जाऊन सियालकोटला मिडल स्कूलमध्ये पाठवायचं ठरलं. दरम्यान ही राजकन्या योग्य ठिकाणी ‘पडावी’ म्हणून तिचं लग्न एका ‘राजपुत्रा’शी ठरवण्यात आले.
आणि अचानक १९४७चा आगडोंब तिच्याही घरादारावर पसरला. ५० माणसांच्या कुटुंबातली वडीलधारी मंडळी ‘सोडून जाऊ या’ व ‘इथेच राहू या’ या हेलकाव्यात गोंधळून गेली. नातीगोती राहिली नाहीत. काहीजणांनी ‘अदलाबदली’चा व्यवहार करून पाहिला. म्हणजे भारतातले कुटुंब पाकिस्तानात व पाकिस्तानातले भारतात! पण शब्दाचे पक्के कुणीच राहिले नाहीत.
आणि ती भयानक रात्र उगवली. पंजाबी घरांमध्ये मोठे विस्तृत पण बंदिस्त अंगण असते. तेवढंच काय ते अंतर घर आणि दारामधले. घराचा भलाथोरला दरवाजा धाडधाड वाजत होता. कैलाशला शेजाऱ्यांनी लपवून ठेवली. तिच्या वडिलांचे, काकांचे नाव घेऊन बाहेर आरडाओरड सुरू होता. डोळे मिटून घ्यावेत, श्वास बंद व्हावा असं काहीतरी घडत होतं! कळत होतं, जाणवत होतं. हळूहळू घरातली माणसे मागच्या दाराने हळूच बाहेर पडत होती. लपत छपत, पळत, धडपडत तहानलेली भुकेलेली बायका-मुले व चुकून वाचलेले पुरुष अखेर अमृतसरला पोहोचले.
भारतात आल्यावर त्यांना शरणार्थीच्या रांगेत उभे राहावे लागले. इकडून तिकडे असे भटकावे लागले. पदराची झोळी घेऊन अन्नासाठी भीक मागावी लागली. त्यात ती गोरीपान देखणी राजकन्याही होती. भीक मागताना तिचे हात थरथरले. मन विदीर्ण झाले. झोळीसारखे फाटून गेले. या पळून आलेल्या निष्कासित लोकांकडे कोणतंच वैभव नव्हतं! भणंग, भिकारी, लाचार! या राजकन्येचं वय तेव्हा १३-१४ होतं म्हणून आजोबांनी हिंमत केली. ज्या राजपुत्राशी तिचे लग्न पक्के केले होते, त्याला भेटून  वणव्यातून वाचविलेले हे फूल त्याला स्वीकारायला सांगितले. तेव्हा राजपुत्र मेडिकलच्या अभ्यासाच्या तयारीत होता. आता ‘लग्न नको’ असं म्हणाला. या सुंदर मुलीला कसं सांभाळणार, असा प्रश्न उभा राहिला. कारण पुढच्या क्षणाला काय होणार हे माहीत नाही! पण काही तरी अघटित घडलं आणि त्याचा होकार आला. स्वाती नक्षत्रातला जलबिंदू अलगद शिंपल्यात घरंगळला व त्याचा गुलबट झाक असलेला अस्सल मोती बनला! अनिश्चितीचा शेवट झाला.
आजोबांनी तिला चार गोष्टींचा दहेज दिला. उलट उत्तर न देणे, सेवा करणे, कष्ट करणे, सर्वावर प्रेम करणे. या चार मूल्यांचे  ती जतन करीत राहिली आयुष्यभर! तिचा संसार सुरू झाला. अंगाने दणकट असणारी सासू स्वभावानेही कडक होती. जमाना व परिस्थिती पाहता या राजकन्येचे काय होणार ते कळतच होते. कैलाशचं कोवळं मन आतून थरथरलं. पण गाढ श्रद्धा. काहीही वाईट होणारच नाही, हा विश्वास, ही श्रद्धा पूर्णत: अभेद्य होती, कालातीत होती. पोरीला नववधूचे सोडा, पण कपडेच नाहीत. मग सासूचे मोठे कपडे घालून ती शांतपणे काम करीत राहिली. कामं किती? त्याची गिनतीच नाही. १०-१२ माणसं म्हटल्यानंतर बोलायलाच नको. माहेरी भरपूर श्रीमंती होती, पण आता त्याला काहीच अर्थ नव्हता. सतत अपमानकारक टोमणे ऐकायचे. एवढंच तिला माहीत. तोंडातून ब्र काढायचा नाही, असे आजोबांनी सांगितलं होतं ना? सासू म्हणायची ‘मेरी सेवा करने के लिये लायी है तुमको!’ ती खाली मान घालून ऐकायची.
कैलाशला मुलगा झाला. अवघ्या १४ व्या वर्षी. दिवस जात होते. यथावकाश व्यापारउदीम वाढला. पैसा हाती आला. मुलंबाळं, अमृतसरचे अनेक नातेवाईक, कुटुंब, बिरादरी यांनी घर बहरलं. शरणार्थीच्या राहुटय़ांमधून आता ते सुस्थापित घरात गेले. सर्व ‘नजदिकी रिश्तेदारांचं’ करता करता, त्यांना मार्गी लावता लावता स्वत:ची चार मुलं कधी व किती मोठी झाली ते कळलंच नाही.  
मोठय़ा मुलाने आता व्यवहारात लक्ष घालायला सुरुवात केली. त्याने काही निर्णय घेऊन पैशाला फुटलेल्या अनेक वाटा बंद केल्या. कैलाशला ते मान्य होतं. तिचा शब्द शेवटचा होता, मग त्याच्या वडिलांचा विरोध आपोआपच मावळला.
तिच्या दोन मुलांनी प्रेमविवाह केले. तिच्या लाडक्या नातीने आपल्या आई-बाबांचा कित्ता गिरवला. एका मराठी कर्तृत्ववान मुलाशी कॉलेजमध्येच लग्न ठरवलं. आईबाबांचा गुजराथी-पंजाबी प्रेमविवाह आहे. मोठय़ा डॉ. बहिणीने मुसलमान डॉक्टर मुलाशी ठरवले. धाकटीला मराठी मिळाला. अनेक गोष्टी ‘ममा’ला नापसंत! पण दादादादीचा भक्कम पाठिंबा. दादी म्हणेल ते होत असल्याने नात खूश होती आणि लग्न जवळ येत चालल्याने जोरदार तयारी सुरू झाली.
मध्यंतरीच्या काळात म्हणजे नातीच्या लग्नाच्या तारखेआधी १५ दिवस दादाजी आजारी पडले. खूपच. सहस्रदर्शनाचे थोडक्यात चुकले आणि तिच्याही काळजात धडधड वाढली. शेवटी व्हायचं ते झालं. दादाजी रुग्णालयात असतानाच विचार पक्के ठरले होते. पहिला विचार देहदानाचा. ते अशक्य होते. म्हणून परस्परच स्मशानात न्यायचे ठरले. सर्वानी साहजिकच काहूर उठवलं! ‘दारी न्यायला पाहिजे’ आम्हा सर्वाना दर्शन घेऊ द्या, रडू द्या. पण ती ठाम होती. तिने स्वच्छ सांगितले, ‘नाही! गेलेला गेला. कोणतेही क्रियाकर्म वगैरे काहीही करावयाचे नाही.’ नंतर तिने घरी सर्वाना बोलावले. यथासांग स्वागत करून सर्वाना निरोप दिला. दुसरं कोणी असतं तर लग्नाची तारीख पुढे ढकलली असती. पण दादाजीही सांगून गेले होते, ‘लग्न ठरल्याप्रमाणे होईल.’ दादीने स्वत: लग्नाला पुढाकार घेऊन संपूर्ण समारंभ व्यवस्थित संपन्न झाला. कोणताही रडवा सूर नाही, हसतमुखाने तिने नातीला आशीर्वाद दिले..
कैलाश कायमच झगमगती पण पांढरीशुभ्र साडी नेसत आली. कानांवर हिऱ्याचे वेल, सर्व हिऱ्या-सोन्याचे दागिने आजही तिच्या व्यक्तिमत्त्वावर शोभून दिसतात. लग्न असो वा सत्संग! साडीचा रंग पांढराशुभ्र! धवलवसना, श्वेतांबरा! आपल्या दीप्तीने संसार प्रकाशमय करीत राहिली. ही छोटीशी पण हृदयस्पर्शी गहरी कथा इथे संपली. म्हणजे दे लिव्हड हॅपिली..  या तालावर!
पण माझं मन गुंतलं तिच्या कसदार विचारात! दृढनिश्चयी कृतीत. भावना व विचार व कृती सर्व अगदी तोललेलं. निश्चित. जराही चंचल नाही. आयुष्यभर तिने देवाचे निरंतर आभार मानले. कारण देवांनी तिला सुखरूप ठेवले. आजही ती सिनेमातल्या गाण्यांच्या पंक्ती, ‘छोड गये बालम’ किंवा ‘सैंया मेरे आना रे’ इ. गुणगुणत असते. कबिराचे दोहे, भजनं तिला गुणगुणायला आवडतात. फोनवरसुद्धा ती आपल्याला ऐकवते आणि विशेष म्हणजे आपलं भलं होईल, हा आशीर्वाद देताना आवाज दमदार असतो. असं वाटतं की देव आलाच धावून लगेच!..    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 4:53 am

Web Title: pushpa abhyankar blog for chaturang
टॅग Chaturang
Next Stories
1 सुंदर मी होणार
2 झाकू कशी.. चांदणं गोंदणी
3 आणि मी लेखक झालो
Just Now!
X