30 September 2020

News Flash

मनातलं कागदावर : उरते फक्त आमसुलाची चटणी

माझा आपोआप वासलेला ‘आऽ’ बंद करून, त्यांना अडवून मी म्हटलं, ‘‘एकदा सवडीने भेटायला जाईन त्यांच्याकडे..

(संग्रहित छायाचित्र)

पुष्पा जोशी

मैत्रीण सांगत होती, ‘‘कालच आम्ही ‘तेराव्या’ला जाऊन आलो. हल्ली क्रियाकर्म सगळं बाहेरच उरकून घेतात आणि जेवायला हॉलवर बोलावतात. घरात कुणी पसारा घालत नाहीत. इथेही कॉन्ट्रॅक्टरनंच फोल्डिंग टेबलं मांडून, त्यांच्या मोठय़ा हॉलमध्ये पानं वाढली होती. सगळे जण मुकाटय़ानं, पण मनापासून जेवले. आमसुलाची चटणी इतकी टेस्टी झाली होती; आणि अळूची..’’ माझा आपोआप वासलेला ‘आऽ’ बंद करून, त्यांना अडवून मी म्हटलं, ‘‘एकदा सवडीने भेटायला जाईन त्यांच्याकडे..

दुपारचा चहा करताना ‘खट्, खट्, खट्’ आवाज आला म्हणून खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या कम्पाऊंडमधील भरगच्च हिरव्या पिसाऱ्याच्या फणसाच्या फांद्या तोडण्याचं काम चाललं होतं. झाडावरची पाखरं आजूबाजूला आसरा घेऊन भयचकित नजरेनं पाहत होती. थोडय़ा वेळानं झाडाची भलीमोठी, फणस लगडलेली, जाडजूड फांदी कडाकडा आवाज करत कोसळली. जमीन शहारली. पाखरं भीतीनं दूर उडून गेली. साठ-सत्तर वर्षांचं भारदस्त, भक्कम झाड रितं, मुकं झालं. कावळेबुवांनी चार दिवस उरलेल्या झाडावर बसून कर्कश्श निषेध व्यक्त केला. धिटुकल्या चिमण्यांनी पुन्हा काडी-काडी जमवून, राहिलेल्या बुंध्यावर घरटी बांधायला घेतली.

सत्तर वर्षांची जुनी, घनदाट हिरवी सोबत आठवून काही जण हळहळले. तर खिडकीसमोरची जागा मोकळी झाली म्हणून काही जण सुखावले. काही जण ट्रकभर ओंडके घाईघाईने घेऊन गेले आणि मी माझ्या कामाला लागले.. अनेक दिवस पुढे-पुढे ढकललेलं कपाट आवरायचं काम काढलं होतं, किती ‘पसारा’ साठवलाय मी त्यात, आवडलेल्या कवितांच्या जुन्या वह्य़ा, ज्ञानेश्वरीच्या निरुपणाची वर्तमानपत्रांतील कात्रणं, मैत्रिणींची पत्रं, काही अर्धवट लिहिलेले लेख, काही छापून आलेले लेख, वाचकांची खुशीपत्रं.. सगळं हाताळताना जाणवलं, ‘संध्याकाळ’ झालीय! हा मनाचा हिरवा पिसारा आता त्या समोरच्या झाडासारखा छाटून टाकायला हवा. आठवणींच्या फांद्यांवरचे फणसभरले भार कमी करायला हवेत. या साऱ्या पसाऱ्यातून मोकळं व्हायला हवं.. सारं कळतंय. पण..

फोन वाजला म्हणून उठले. मैत्रिणीचा फोन होता. मगाशी कपाट आवरायला काढायच्या आधी तिलाच फोन केला होता सहज गप्पा मारायला म्हणून. पण तो उचलला गेला नव्हता. ती म्हणाली, ‘‘अगं, गाढ झोप लागली होती सुस्तावून. आज आमच्या पुतणसुनेच्या वडिलांचा ‘तेरावा दिवस’ होता. हल्ली क्रियाकर्म सगळं बाहेरच उरकून घेतात आणि जेवायला हॉलवर बोलावतात. घरात कुणी पसारा घालत नाहीत.’’

‘‘आजारी होते का ते?’’

‘‘फार नाही, पण वृद्ध होतेच. सगळा संसार झाला होता आणि लोळत पडण्यापेक्षा.. त्यांच्याबद्दलच्या आठवणींची थोडीफार उजळणी झाली आणि सगळे जण जेवायला बसले. इथले ‘तांबे केटर्स’ प्रसिद्ध आहेत. अळूच्या भाजीपासून आमसुलाच्या चटणीपर्यंत सगळे पदार्थ अगदी उत्तम झाले होते. सगळे जण मुकाटय़ाने, पण मनापासून जेवले.’’

‘‘हल्लीच्या धावपळीच्या गतिमान जगात गेलेल्या माणसाच्या थोडय़ाफार आठवणी तेवढय़ा उरतात. कुणाला घराचं म्हातारपण संपल्याचा आनंद वाटतो. झाड तुटल्याची हळहळ असली तरी मोकळं झाल्याची भावना असतेच!’’ मी म्हटलं.

दोन दिवसांनी संध्याकाळी फिरताना वाटेत एक बाई भेटल्या. त्यांचे शेजारी आमच्या चांगल्या परिचयाचे. ते आजोबा नुकतेच गेल्याचं कळलं होतं. त्यांचा एक मुलगा-सून अमेरिकेत असतात. सहज म्हणून त्या बाईंना विचारलं, की ते गेले तेव्हा मुलगा-सून आली होती का?

‘‘छे हो, इतक्या लांबून, एवढा खर्च करून, कसं येणार? रजेची व्यवस्थाही व्हावी लागते ना. इकडच्या नातवंडांनी त्यांना तिकडे सगळं काही व्हिडीओवर दाखवलं. त्यांनी तिथून नमस्कार केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा. शिवाय इथंही लोकांना ताटकळत बसावं लागलं नाही.’’

‘‘आता आलीत का ती दोघं? बऱ्याच वर्षांत त्या दोघांची भेट झाली नाहीए म्हणून विचारलं.’’

‘‘आली आहेत. कालच आम्ही तेराव्याला जाऊन आलो. सगळं कॉन्ट्रॅक्टच दिलेलं होतं. कॉन्ट्रॅक्टरनेच फोल्डिंग टेबलं मांडून, त्यांच्या मोठय़ा हॉलमध्ये पानं वाढली.’’

‘‘चांगलंच की. आता आपल्यालासुद्धा वाकून वाढायला होत नाही.’’

‘‘पण जेवण मात्र छान होतं. आमसुलाची चटणी इतकी टेस्टी झाली होती; आणि अळूची भाजी..’’ माझा आपोआप वासलेला ‘आऽ’ बंद करून, त्यांना अडवून मी म्हटलं, ‘‘एकदा सवडीनं भेटायला जाईन त्यांच्याकडे. मुलगा-सून आहेत ना अजून?’’

‘‘हो तर. अहो, आता आईचा प्रश्न सोडवावा लागेल. वाटण्या होतील. थोडी रजा घेऊनच आलीत ती दोघं.’’

मनात म्हटलं, ‘बरोबर, तिकडे अमेरिकेत समृद्धीचा भरगच्च हिरवा फणस दारात डोलत असला, तरी इथल्या फणसाचे गरे हक्काचेच..’

चालता-चालता एका मैत्रिणीच्या बहिणीची आठवण झाली. तिच्या बहिणीने आयुष्याच्या उत्तरार्धात घरच्या दोन साडय़ांव्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी फक्त एकच साडी ठेवली होती. नाटकाला जायचं असो की कुठे समारंभाला, तीच एक साडी आणि एक पर्स. बस्.. बाकी सारं तिनं स्वहस्ते वाटून टाकलं होतं. ‘नाही बाई.. इतकं निरिच्छ व्हायला जमणार नाही’ माझ्या मनानं प्रांजळ कबुली दिली. लगेच दुसऱ्या मनानं फटकारलं. ‘इतकं नाही, पण तो गोतावळ्यासारखा इतक्या वर्षांचा पसारा जमवला आहेस, तो तरी मार्गी लावायला हवा. कळलीय ना किंमत? उरते काय तर फक्त आमसुलाची चटणी! तीसुद्धा चविष्ट झाली असली तरच थोडय़ाफार आंबट-गोड आठवणी..’

दुपारचा चहा करताना सवयीनं खिडकीतून बाहेर पाहिलं, तर समोरच्या फणसाच्या एका उंच गेलेल्या, शेलाटय़ा फांदीवर एक फणस वाऱ्यानं डुलत होता. त्याच्याखालची भक्कम फांदी तुटून पडल्यामुळे, आता तिथे पोचून फणस काढणं अशक्य होतं, ‘असू दे. डुलू दे त्याला. त्याची वेळ झाली की तो अलगद गळून पडेल. मग होईल फांदी मोकळी.’ मनात म्हटलं.

‘आज आत्ता चहा झाल्यावर ‘तीऽऽऽ कपाटाची आवराआवरी करायची ना?’ दुसऱ्या मनानं आठवण करून दिली.

‘बरं आठवलं. उद्या ऑफिस-ग्रुपमधल्या एका मैत्रिणीच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला जायचं आहे. लवकरच निघायला हवंय. खूप दिवसांनी सगळ्या जणी भेटल्या की मजा येते. आत्ताच सगळी तयारी करून ठेवायला हवी.’

‘आणि तेऽऽऽ आवराआवरीचं काम?’ दुसऱ्या मनानं थोपवलं.

‘असू दे. बघू नंतर. होईल ते कपाट मोकळं, त्याची वेळ झाली की. नाही तरी चटणीसाठी आमसुलं भिजत घालायला अजून किती वेळ आहे ते कुणाला माहितेय?

pushpajoshi56@gmail.com

chaturang@expressindia.com

आवाहन तरुण कथालेखिकांसाठी

मराठी साहित्यात कथेचं समृद्ध दालन आहे. आत्तापर्यंत अनेकांनी दर्जेदार कथा लिहीत मराठी साहित्याचं हे दालन जिवंत ठेवलं, नव्हे वाढवलं, मोठं केलं. आजच्या तरुण कथालेखिका, ज्यांचं वय चाळिशीच्या आत आहे,  पाठवू शकतात आपल्या कथा आमच्याकडे. २०२० च्या ‘चतुरंग’ पुरवणीत असेल त्यांच्या दर्जेदार कथांचं दालन, जे असेल मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालणारं!  कथेला विषयांची मर्यादा नाही, की शैलीचं बंधन नाही. कथा कुठेही घडणारी, कुठल्याही काळातली असली तरी चालेल, मात्र माणसाच्या अस्सल जाणिवांना हात घालणारी असावी. जगण्याच्या वास्तवाला भिडत कल्पनेच्या रंजकतेून उतरलेल्या रसरशीत अनुभवगाथा आम्ही प्रसिद्ध करू शनिवारच्या अंकांतून. शब्दमर्यादा १५०० ते १८०० शब्दांपर्यंत. पाठवा chaturangnew@gmail.com किंवा  चतुरंग,  ई एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० या पत्त्यावर.  पाकिटावर वा सब्जेटमध्ये – ‘कथा चतुरंग’ लिहिणे आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:29 am

Web Title: pushpa joshi chaturang manatale kagdavar article abn 97
Next Stories
1 सूक्ष्म अन्नघटक : ..आणि मंडळी!
2 कालमर्यादा हवीच
3 विचित्र निर्मिती : अभिनेते अन् दिग्दर्शक
Just Now!
X