खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या संवेदनशील स्त्रीला अतृप्तता, तृषार्तता अन् संयोग वियोगाचा शापच मिळाला असावा. मात्र जीवनाच्या या नकारात्मक पलूंच्या अनुभूतीतूनच ती घडली.. ती मलिका-ए-जज्बात एक करुण कवयित्री नाज ऊर्फ मीनाकुमारी.
हिंदी चित्रपट सृष्टीत ती एक श्रेष्ठ अन् लोकप्रिय अभिनेत्री म्हणून गाजली. तिचा उल्लेख मलिका-ए-जज्बात म्हणजे भावनांची सम्राज्ञी असा व्हायचा. तिचा आवाज, तिचे डोळे, तिची देहबोली.. ती भूषवीत असलेल्या पात्राच्या अंतकरणातील सुखदुखाचे अनुवाद करायचे. तिचं नाव मीना कुमारी.
‘मीना’ या फारसी शब्दाचा अर्थ मदिरेची सुरई अथवा पेला अन् मीना कुमारी म्हणजे मद्य किंवा साकी (जी मद्यप्यांना मद्य देते ती.) मद्याने भरलेली सुरई रिती होते अन् मद्य देणारी साकी ऊर्फ मदिराक्षी मात्र मद्यापासून वंचित असते. तशीच मीनाकुमारी जीवनाच्या मद्यालयात सदैव वंचित अन् रिती राहिली. खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या संवेदनशील स्त्रीला अतृप्तता, तृषार्तता अन् संयोग वियोगाचा शापच मिळाला असावा. मात्र जीवनाच्या या नकारात्मक पलूंच्या अनुभूतीतून घडली एक करुण कवयित्री नाज ऊर्फ मीनाकुमारी.
मीनाकुमारीच्या शायरीचं यथार्थ शीर्षक होईल ‘व्यथोपनिषद्.’ या तिच्या काव्यात प्रकर्षांने उठून दिसणारा रंग व्यथांचाच आहे. या व्यथेच्या विविध छटांचा एक कोलाज वाचकाला जाणवतो.
दर्द तो होता रहता है, दर्द के दिनही प्यारे है,
जैसे तेज़्‍ा छुरी को हमने रह-रहकर फिर धार किया
व्यथा एवढी प्रिय वाटणे ही व्यथेची परमसीमा होय.
मसर्रत पे रिवाजों का सख्त पहरा है
न जाने कौन सी उम्मीद पे दिल ठहरा है
तेरी आँखों में झलकते हुए इस गम की कसम
अय दोस्त, दर्द का रिश्ता बहुत ही गहरा है
(आनंदावर प्रथा-परंपरेचा सक्त पहारा आहे, कोणत्या आशेवर मन अजूनही विसंबून आहे कळत नाही. तुझ्या डोळय़ातून झरणाऱ्या या दुखाची शप्पथ मित्रा, व्यथेचं नातं अत्यंत गहन आहे.)
मीनाकुमारी जीवनातील व्यथा दुखांना नाकारीत नाही तर त्यांना ती स्वकीय मानते-
खुदा के वास्ते ग़म को भी तुम न बहलाओ
इसे तो रहने दो, मेरा, यही तो मेरा है
अशात तिचा आशावाद अधेमध्ये जागृत होतो.
एक वीरान-सी खामोशी है
कोई साया-सा सरसराता है
गम के सुनसान काली रातों में
दूर एक दीप टिमटिमाता है
मीनाकुमारीचं दुख हे वियोग, विरह, पल्लवित होणाऱ्या आशा अन् नराश्यातून उद्भवणारी जीवनविषयक अर्थहीनता यातून आलेलं आहे. प्रियकराच्या पायरवाचा आभास ते प्रत्येक आवाजात त्याचाच पायरव तिला जाणवतो-
तेरे कदमों की आहट को है दिल ये ढूंढता हरदम
हर इक आवाज़्‍ा पे इक थरथराट होती जाती है
कदाचित तोच असेल, कारण-
मेरे अश्कों के आईनों में आज,
कौन है वह जो मुस्कुराता है
तिच्या संपूर्ण शायरीत तो चेहऱ्याने साकारत नाही.
न हाथ थाम सके, न पकडम् सके दामन,
बडम्े क़रीब से उठकर चला गया कोई
जवळून उठून जाणाऱ्यास थोपवून न धरता जाऊ देणं ही तिची निष्क्रियता नव्हे, तर स्थितप्रज्ञता म्हणता येईल? तर मग खालील वक्तव्याचं काय?
रोते दिल, हंसते चेहरों को कोई भी न देख सका
आंसू पी लेने का वादा, हां सबने हर बार किया
नराश्यग्रस्तता हा मीनाकुमारीच्या शायरीचा स्थायीभाव आहे. क्वचितच तिची लेखणी सकारात्मक ओळी रेखाटते. गुलजार म्हणतात, ‘‘काही चित्रं अशीही आहेत, जी तिच्या डोळय़ात तरळत असत. एक पांढरं वाळवंट, सावळय़ा किनाऱ्यावर गुलमोहराचं झाड किंवा धुक्यांनी वेढलेल्या नदीत डुंबणारी नाव. केव्हातरी स्वप्नात बघितली अन् ते दृश्य शेरात शब्दबद्ध केलं.’’
दिल डूबे है, या डूबी बारात लिए कश्ती,
साहिल पे मगर कोई कोहराम नहीं होता
(कोहराम म्हणजे रडारड, शोक)
रडारड होणार तरी कशी-
आंखों ने कसम दी आंसू को
गालों पे हरदम यूं न छलक
हंसी थमी है इन आंखों में, यूं नमी की तरह,
चमक उठे है अंधेरे भी रोशनी की तरह
गज़्‍ालच्या शेरात पहिल्या ओळीत प्रस्तावना व दुसऱ्या ओळीत आकर्षक समारोप असतो. ही कला मीनाकुमारीला सहज साध्य झाली. तिचे पती कमाल अमरोही हे उर्दूतील चांगले शायर होते. त्यांचा सहवासही थोडाबहुत मीनाकुमारीचे काव्य लक्षणीय होण्यास कारणीभूत ठरला असावा.
मीनाकुमारीने शायरी स्वांतसुखाय केली. प्रकाशनार्थ कधीच पाठवली नाही. तिच्या काव्यसृजनात सातत्य नव्हते. त्यामुळे अनेक गज़्‍ाला तीन-चार शेरांच्याच आहेत. विषयांच्या मर्यादेत राहून तिचे भोगलेलं वास्तव मांडलं आहे. ओढूनताणून सामाजिक, राजकीय भाष्य करण्याच्या फंदात ती पडली नाही. त्यामुळे ही शायरी कॅनव्हॉस मोठा नसला तरी अस्सल आहे. तिच्या जीवनाचे चित्र ती स्पष्टपणे न रेखाटता प्रतीकात्मक शैली अंगीकारते.
जिन्दगी क्या इसी को कहते है
जिस्म तनका है और जो तनहा
हमसफर कोई मिल गया जो कहीं
दोनों चलते रहे तनहा-तनहा
जिन्दगी गढम्के देख ली हमने
मिट्टी गारे की एक मूरत है
हे असे जीवन तिला चेतनाशून्य, सुन्न वाटतं,
न इंतजार, न आहट, न तमन्ना, न उम्मीद,
असं कारण तिच्या वाटण्यास पुरेसं आहे. या भावव्याकुळ कवयित्रीवर गुलजारने एक सुरेख पोटर्र्ेट कविता लिहिली. उल्लेख त्या माहजबी म्हणजे चंद्रमुखीचा अन् कथनशैली संवेदनशील गुलजारची-
तुती वृक्षाच्या डहाळीवर बसलेली मीना
विणतेय रेश्माचे धागे
क्षणक्षण उकलतेय
पान-पान विणतेय
एकेक श्वास वाजवून ऐकतेय वेडी
एकेक श्वासास उकलून,
आपल्या देहावर गुंडाळत जातेय.
स्वतच्याच धाग्यातली कैदी
रेशीमाची ही कवयित्री एक दिवशी
आपल्याच धाग्यात गुदमरून मरून जाईल.
ती कविता वाचून मीनाकुमारी हसली. म्हणाली, ‘‘जाणतोस नं, हे धागे काय आहेत ते? त्यांना प्रेम म्हणतात. माझं तर प्रेमावर प्रेम आहे, प्रेमाच्या जाणिवेवर प्रेम आहे. प्रेम या नावावर प्रेम आहे. एवढं प्रेम जर कुणी आपल्या देहाला बिलगून करू शकत असेल तर आणखी काय हवं?’’ पण या संदर्भात तीच कबूल करते की,
अपने अन्दर महक रहा था प्यार,
खुद से बाहर तलाश करते थे
गुलजार म्हणतात,
बाहेरून आत जाण्याचा हा प्रवास किती दीर्घ होता. तो पूर्ण करण्यासाठी तिला एक आयुष्य घालवावं लागलं. वाटेत जंगलही लागले, वाळवंटही लागले वैराण अन् डोंगराळ प्रदेशही आले. या प्रवासाबाबत मीनाकुमारी म्हणते,
कुहर है धुंध है, बेशक्ल-सा धुंआ है कोई,
दिल अपनी रुह से लिपटा है अजनबी की तरह
(छिद्र, धुके, अन् चेहराविहीन धूर आहे, आत्म्याला माझं मन एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे वेढलंय.) मीनाकुमारीच्या गज़्‍ालांपेक्षा तिच्या कवितेत चिंतनाची सखोलता अधिक प्रत्ययास येते,‘ अतीत व वर्तमान’ ही कविता बघा-
प्रत्येक आनंद
एक उद्ध्वस्त दुख आहे
प्रत्येक दुख
एक उद्ध्वस्त आनंद
अन् प्रत्येक अंधकार एक नष्टप्राय प्रकाश
अन् प्रत्येक प्रकाश एक नष्टप्राय अंधकार
याचप्रमाणे
प्रत्येक वर्तमान
एक नायनाट झालेलं अतीत
अन् प्रत्येक अतीत
एक नायनाट झालेलं वर्तमान
आपल्यातल्या एका अभिनेत्रीचे जीवन तिने कवयित्री रूपात कसे व्यक्त केले, ते ‘जिंदगी यह है’ या कवितेतून पाहा-
सकाळ ते संध्याकाळ
दुसऱ्यासाठी काहीतरी करायचंय
ज्यावर आपला स्वतचा असा ठसा नाही
त्या साकार चित्रात रंगच भरायचे
जीवन म्हणजे काय?
कधी विचार करू लागते बुद्धी
अन् मग आल्यावर दाटतात
व्यथांच्या सावल्या, उदासीनतेचा धूर,
दुखाचे मेघ,
मनात राहून राहून विचार येतो
हेच जीवन असेल तर मरण कशाला म्हणतात?
प्रेम एक स्वप्न होतं, याचं स्वप्नफळ
विचारू नकोस.
प्रेम अपराधाची मला काय शिक्षा मिळाली?
विचारू नकोस.
प्यास जलते हुए कांटों की बुझाई होगी,
रिसते पानी को हथेली पे सजाया होगा
अशा तरल शेरांची शायरा.. मीनाकुमारीचं मूळ नाव माहजबी बानो होतं. तिचा जन्म १ ऑगस्ट १९३२ ला मुंबईमध्ये झाला. तिचे वडील अली बक्ष हे चित्रपटात छोटय़ा भूमिका करत असत. ते उर्दू काव्यही करत. मीनाकुमारीची आई प्रभादेवी ही त्यांची दुसरी पत्नी (लग्नानंतरची इकबाल बानो) ती एक नर्तकी होती अन् टागोर परिवारातील होती.
अली बक्षची सांपत्तिक स्थिती हलाखीची होती. त्याला दोन मुली पहिल्या पत्नीपासून होत्या. कुटुंब पोसण्याएवढी मिळकत नसल्याने मीनाला सातव्या वर्षांपासून बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करावे लागले. त्यामुळे तिचे शालेय शिक्षण झालेच नाही. कुटुंबाचा आíथक भार एवढय़ा लहान वयातच तिच्यावर पडला.
१९५२ साली मीनाकुमारीची प्रमुख भूमिका असलेला ‘बजूबावरा’ हा चित्रपट गाजला अन् ती मशहूर झाली. त्याच वर्षी तिने कमाल अमरोही या तिच्याहून वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं. पण वैचारिक मतभेदांमुळे १९६४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीनाकुमारी या धक्क्यातून सावरली नाही. ती गंभीर आजारी झाली. मदिरेच्या पूर्णत: आहारी गेली. तिच्या जीवनात आलेले अनेक पुरुष प्रवासी एकेक करून सोडून गेले. ती मात्र अतृप्त, विरहव्यथित, स्वच्छंद अन् व्यसनाधीन झाली. तिच्या दुखात जीवनाला अनुरूप अशाच भूमिका तिला मिळत गेल्या अन् त्या भूमिका ती वास्तवात जगत राहिली.
 तिला ट्रॅजेडी क्वीन, क्वीन ऑफ सॉरो, मलिका-ए-जज्बात अशी विशेषणे लाभली. ३१ मार्च १९७२ रोजी लिव्हर सोरायसिसने तिच्या कारुण्यमय व्यथोपनिषदाचं अंतिम पृष्ठ उलटले. तिने लिहून ठेवलेच होते-
राह देखा करेगा सदियों तक,
छोडम् जायेंगें ये जहाँ तनहा
व्यथित, विरहव्याकुळ, करुण भूमिका अन् शायरी आजही तिची प्रतीक्षा करीत आहे.    
डॉ. राम पंडित -dr.rampandit@gmail.com