विश्व लोकसंख्या स्थितीसंबंधीच्या अहवालानुसार जगभरातील बाल-कुमारवयीन मातांमध्ये वाढ होते आहे. भारतातच नव्हे तर जगभरात ही स्थिती आहे, आपण त्याविरोधात काय पावले उचलतो आहोत, कोणते प्रयत्न अधिक वाढायला हवेत, याविषयी येत्या ११ जुलैच्या विश्व लोकसंख्या दिनानिमित्ताने..
११ जुलै हा दिवस विश्व लोकसंख्या दिन म्हणून गेली २८ वर्षे जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या पाच अब्ज झाली आणि त्यानंतर ही संख्या वाढत वाढत आज ती सात अब्जाहून अधिक झाली आहे. ‘संयुक्त राष्ट्र संघ लोकसंख्या निधी कार्यक्रम’ ही संस्था १९६९ पासून कार्यरत आहे. दरवर्षी या संस्थेतर्फे विश्व लोकसंख्या स्थितीसंबंधी एक अहवाल प्रकाशित होतो. २०१३ च्या अहवालात जगातील कुमारवयीन मातांच्या संख्येतील चिंताजनक वाढीसंबंधी माहिती, विवेचन, आकडेवारी दिली आहे. ही सारी कथा, माहिती, आकडेवारी चक्रावणारी, चिंताजनक आहे.
   आज जगात ५८ कोटी मुली कुमारवयीन आहेत. त्यापैकी ८० टक्के विकसनशील देशांमधील आहेत. साधारणत: विकसनशील देशांतील १९ टक्के मुली वयाच्या १८ वर्षांपूर्वीच गर्भवती होतात, या इच्छेविरुद्ध वा अवांछित गरोदरपणाचा मुलींचे आरोग्य, शिक्षण व भावजीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. दररोज २० हजार मुली बाळांना जन्म देतात. दरवर्षी ७० हजार मुलींचे मृत्यू गरोदरपण, प्रसूतीकाळात होतात. इतकेच नव्हे तर कुमारवयीन मुलींमध्ये दरवर्षी ३२ लक्ष मुलींचे असुरक्षित गर्भपात होतात. मुलींचे मानवी हक्क उघड उघडपणे नाकारले जातात. यामागची मुख्य कारणे म्हणजे  बालविवाह, स्त्री-पुरुष विषमता, दारिद्रय़, लैंगिक हिंसा व कुटुंबनियोजन साधनांचा अभाव व वयोगटानुरूप लैंगिकता शिक्षणास राष्ट्रीय धोरणांचा विरोध, शिक्षण व प्रजोत्पादक आरोग्य सेवांचा अभाव आणि कुमारवयीन मुलींसाठी अपुरी गुंतवणूक या साऱ्याचा परिणाम जगभर कुमारवयीन मुली अकाली अवांछित माता बनतात, सर्वस्वी नको असलेले मातृपद त्यांच्यावर लादले जाते. विकसनशील देशांतील अशा मुलींची संख्या आहे १९ टक्के.
विकसित देशांनाही कुमारवयीन गरोदरपणाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. प्रमाण कमी असेल पण स्वरूप तसेच आहे. १५-१९ वयोगटातील मुलींकडून जगात दरवर्षी १.३१ कोटी मुले जन्माला घातली जातात. त्यापैकी ६ लक्ष ८० हजार विकसित देशांतील आहेत. विकसित देशांमध्ये अमेरिकेचा क्रम पहिला आहे. २०११ मध्ये अमेरिकेत कुमारवयीन मुलींनी ३ लक्ष २९ हजार ७७३ मुलांना जन्म दिला. मेक्सिकोतील जन्मदर सर्वात अधिक म्हणजे ६४.२ दर हजारी जन्मामागे आहे. १५-१९ वयोगटातील या अवांछित गरोदरपणामुळे सकस राष्ट्रीय उत्पादनांपैकी ‘जन्मभरण’ खर्च अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, चीन या देशांमध्ये प्रत्येकी १ टक्का, बिस्तमध्ये २ टक्के, ब्राझील १० टक्के, पॅराग्वे व भारत प्रत्येकी १२ टक्के, नायजेरिया २६ टक्के, मलावी २७ टक्के आणि युगांडा ३० टक्के आहे. पण खरी किंमत द्यावी लागेल ती या मुलींच्या बालकांचा अत्यंत कमी आरोग्य दर्जा. बेरोजगारी, मुलींच्या कौशल्यातील कमालीची कमतरता, कमी सामाजिक सक्षमीकरण या साऱ्यांमुळे ही किंमत खूप पटींनी वाढते. मानवी साधनसंपत्तीच्या दृष्टीने हे नुकसान प्रचंड आहे आणि त्याचा भार साऱ्या देशाला सोसावा लागतो.
भारतात ‘पाथफाइंडर इंटरनॅशनल’ या संस्थेने ‘प्रचार’ हा शासकीय कार्यक्रम अमलात आणला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप असे होते की, बिहारमधील कुमारवयीन मुला-मुलींना व तरुण दाम्पत्यांना दैनंदिन वागणूक बदलण्याच्या दृष्टीने उशिरा विवाह, सुयोग्य सवयी आणि दोन जन्मांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासंबंधी जाणीव, जागृती निर्माण करणारे प्रशिक्षण देणारा ‘प्रचार’ कार्यक्रम होता, बिहार राज्यात सर्वाधिक बालविवाहाचे प्रमाण ६३ टक्के आणि १५-१९ वयोगटातील मुलींचे माता होण्याचे सर्वाधिक प्रमाण- २५ टक्के आहे. प्रचार कार्यक्रमामध्ये १२-१९ वयोगटातील मुलींना व १५-१९ वयोगटातील मुलांना लैंगिक व मनोविषयक आरोग्यासाठीचे प्रबोधन, प्रशिक्षण व जाणीव जागृती कार्यक्रमातून मुख्यत: होते. कार्यकर्त्यां महिलांनी तरुण विवाहित स्त्रियांच्या तर कार्यकर्त्यांनी तरुण विवाहित मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या. आई-वडिलांना व सासूबाईंना गावातील गट सभांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. युवा दाम्पत्यांना नवविवाहितांच्या स्वागत समारंभात आमंत्रित करण्यात आले होते व त्यांनी  नवविवाहितांना लैंगिक, प्रजोत्पादक आरोग्यासंबंधी माहिती दिली. या कार्यक्रमांचा चांगला परिणाम दिसून आला.
१९९६ पासून महाराष्ट्रात ‘जीवन कौशल्ये’ कार्यक्रम सुरू झाला. आठवडाभर होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात आरोग्य, बालआरोग्य आणि पोषक आहार या विषयासंबंधी व्याख्याने, गटचर्चा होतात. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रामुख्याने १२ ते १८ वयोगटातील अविवाहित मुलींसाठी आयोजित केला जात असे, या मुलींमध्येही शाळेत न जाणाऱ्या, शाळा सोडलेल्या काम करणाऱ्या मुलींसाठी विशेषत्वाने कार्यक्रम योजिले गेले. या कार्यक्रमाच्या विकासासाठी पालकांचा सहभाग आवर्जून असे. शिक्षकांना त्यात समाविष्ट करून घेतले जाते. कार्यक्रमाचे मूल्यमापन झाल्यानंतर असे दिसून आले आहे की, मुलींचे विवाह वय एक वर्षांने १६ वरून १७ वर वाढले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलींच्या १८ वयापूर्वी होणाऱ्या विवाहात ८०.६ टक्क्यांवरून ६१.८ टक्क्यांपर्यंत घट झाली. प्रशिक्षण कार्यक्रमाला हा निश्चित परिणाम होता, फायदा होता. अशा प्रकारचे कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी राबविणे ही काळाची गरज आहे.