दृक्-श्राव्य माध्यमांनी स्त्रीच्या मनापेक्षा तिच्या शरीराचाच वापर जास्त केला पण माध्यमांनी केला म्हणण्यापेक्षा स्त्रियांनी तो करू दिला. आपण कोणती स्त्रीप्रतिमा पडद्यावर साकारतोय याचा विचार माध्यमात काम करणाऱ्या स्त्रियांनी फार गंभीरपणे करायला हवा. आपण साकारत असलेल्या स्त्रीप्रतिमा हास्यास्पद आहेत, कुचेष्टेचा विषय होणाऱ्या आहेत, वास्तवातल्या स्त्रीवर ‘देहपातळीवर जगणारी मठ्ठ स्त्री’ असं शिक्कामोर्तब करणाऱ्या आहेत आणि मुख्य म्हणजे तिच्या खऱ्या प्रश्नांना बगल देणाऱ्या आहेत याची बोच तरी त्यांना असायला हवी की नको?

दृक-श्राव्य माध्यम आणि लिखित माध्यम ही दोन्ही माध्यमं समाजाच्या सर्वागीण प्रगतीला हातभार लावणारी माध्यमं आहेत. स्त्री हा समाजाचाच, तोही पुरुषाइतकाच महत्त्वपूर्ण घटक असल्यानं तिचं जगणं सुकर करण्यासाठी, तिच्यावर अन्याय होत असेल तेव्हा तिला न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांच्या मदतीची अपेक्षा नेहमीच केली गेलेली आहे. आणि माध्यमांनी तिचे प्रश्न उचलून धरत अनेक वेळा तिला न्यायही मिळवून दिलेला आहे. लिखित काय किंवा दृक्-श्राव्य काय, दोन्ही माध्यमांत समाजाला प्रभावीपणे व परिणामकारकरीत्या प्रतििबबित करण्याची ताकद आहे. समाजातील अनीती आणि अनाचार निपटून काढण्याची ताकद ही सगळीच माध्यमं बाळगून आहेत. पण प्रश्न आहे तो ही ताकद कशी आणि किती वापरली जाते याचा!
या ठिकाणी स्त्रीचं वास्तवातलं जगणं, तिचं माध्यमात दिसणारं रूप आणि त्यात तिच्या केल्या गेलेल्या वापराचा वास्तवातल्या स्त्रीच्या जगण्यावर होऊ शकणारा दुष्परिणाम या  संदर्भात माध्यमांचा विचार करायचा आहे.
हे खरं आहे की माध्यमं ही काही फक्त समाजाच्या उद्धाराच्या भूमिकेवर जिवंत राहू शकत नाहीत. त्यांना व्यवसायही सांभाळावा लागतो; पण हा व्यवसाय करताना, लोकांचं मनोरंजन करताना सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक जनमत घडवण्याची ताकदही माध्यमं बाळगून असतात आणि ते काम ती किती निष्ठेनं करतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्त्रियांच्या जगण्याच्या संदर्भात ही लेखमाला असल्यानं साहजिकच माध्यमं हाताळणारी मंडळी माध्यमाच्या सामर्थ्यांचा उपयोग स्त्रियांच्या हितासाठी करतात का? प्रेक्षक या नात्यानं जनता आपल्या आवडी-निवडींचा दबाव या माध्यमांवर किती आणते आणि माध्यमात काम करणाऱ्या स्त्रिया आपला वापर माध्यमांना कसा करू देतात याचा विचार या ठिकाणी करावयाचा आहे.
वृत्तपत्रं, मासिकं, साहित्य, रंगभूमी यांसारख्या माध्यमातून स्त्रीचं जगणं पुरेशा गांभीर्यानं आणि जबाबदारीनं मांडलं जातं. पण लोकांच्या कानामनावर सतत आदळणाऱ्या जाहिराती, विविध वाहिन्यांवरील मराठी-िहदी मालिका आणि िहदी सिनेमा यातून आपल्यासमोर येणारी स्त्री ही वास्तवातल्या स्त्रीचे प्रश्न, तिचं जगणं खरंच प्रतििबबित करते का, स्वत:ला व्यक्त करण्यासाठी इतकं प्रभावी माध्यम स्त्रीला मिळालं असताना ती त्याचा उपयोग कसा करते, मुळात या माध्यमातून स्वत:ला सादर करताना तिला विचार करण्याचं स्वातंत्र्य असतं का, केवळ काळ्या-पांढऱ्या रंगात केलेलं स्त्रीचित्रण अभिनित करण्याला ती नकार देते का, की या माध्यमातून नजरसुखाचं, करमणुकीचं आणि त्याही पुढे जाऊन एक चेष्टेचं साधन म्हणूनच स्त्री समोर येते, स्वत:ला समोर येऊ देते, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांच्या मागे माध्यमातून तिचं जे उघडंवाघडं दर्शन होतं ते बऱ्याच अंशी कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. र. धों. कर्वे म्हणत की, पुरुष बुद्धी विकून पसा मिळवतो मग स्त्रीनं शरीर विकून पसा मिळवला तर कुठे बिघडलं? ज्याच्याकडे विकण्यासारखं जे आहे ते त्यानं विकावं. स्त्रीकडे बुद्धी असेल तर तिनं बुद्धीच्या जोरावर पसा मिळवावा, सुंदर शरीर असेल तर त्या शरीराच्या जोरावर पसा मिळवावा. स्त्रीला तिच्या बुद्धीचा वापर करू देण्यास आडकाठी करणाऱ्या, तिची सगळी ऊर्जा, कर्तृत्व माजघरात बंदिस्त करू पाहणाऱ्या समाजावरच्या रागातून र.धों.नी असे उपरोधी उद्गार काढले, पण र.धों.च्या या म्हणण्याचा गíभतार्थ न जाणता शब्दार्थापाशीच स्त्रियांचा वापर करणारे पुरुष आणि खुद्द स्त्रियाही थांबल्या असतील तर ते र.धों.चं दुर्दैवच म्हणायचं.
दृक्-श्राव्य माध्यमांनी स्त्रीच्या मनापेक्षा तिच्या शरीराचाच वापर जास्त केला आणि माध्यमांनी केला म्हणण्यापेक्षा स्त्रियांनी तो करू दिला. याला असंख्य जाहिराती आणि तितकीच असंख्य अशी िहदी सिनेगीतं साक्षी आहेत; तर दुसरीकडे विविध वाहिन्यांवरून सादर होणाऱ्या अनेक मालिकांनी स्त्रीला बुद्धीच नसल्याचं गृहीत धरलं. मालिकांत काम करणाऱ्या स्त्रिया त्यातल्या स्त्री-चित्रणावर कोणताही आक्षेप न घेता उलट ती कामं इतकी मन लावून करताना दिसताहेत की त्यांनीही आपल्याला बुद्धी नाही हे मान्य केलं आहे असं वाटतं. मालिकांतून काम करणाऱ्या या स्त्रिया सुमार बुद्धीच्या दाखवलेल्या असल्यामुळे चित्रविचित्र आकाराच्या कपाळावर लावलेल्या टिकल्या, केसांच्या काढलेल्या बटा, कानातले मोठे मोठे डूल, दंडावरचे टॅटू, मुळुमुळु रडत वाट्टेल तेवढे अन्याय सहन करणारी सून आणि प्राण गेला तरी तिला सुख लागू द्यायचं नाही असा जणू पण केलेली भयंकर दुष्ट सासू, भानामती, काळी विद्या यांचा या बायकांनी घेतलेला सर्रास आश्रय, यात भर म्हणून लग्नबाह्य संबंधांची खैरात.! या भूमिका करायला कोणतीही स्त्री तयार होतेच कशी?  
एकीकडे आत्मसन्मान ही जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानायची, तशी आपली स्वतंत्र ओळख सिद्ध करायची आणि दुसरीकडे आपला हवा तसा वापर माध्यमांना करू द्यायचा.. याच्या परिणामांचा विचार स्त्रीनं आता करायलाच हवा.
हिंदी सिनेमात तर नृत्यकलेच्या नावाखाली अश्लीलतेला नुसता ऊत आला आहे. ‘नंबर वन’ आणि ‘नंबर टू’ म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या नटय़ा अंगावर दोन चिंध्या लावून अतिशय अश्लील आणि कामुक अंगविक्षेप करत नाचत असतात तेव्हा कुठली कला त्या वृिद्धगत करतात? आपण जे काही करतो आहोत त्यानं आपण आपल्या देहाचाच नव्हे तर समस्त स्त्रीजातीचा अपमान करत आहोत असं त्यांना वाटत नाही?
पशासाठी आणि ‘भूमिका’ म्हणून आपण हे करतो असं जर त्यांचं यावर उत्तर असेल तर वेश्याही पशासाठीच काम करत असते, आणि त्या त्या वेळेपुरती तीही एक भूमिकाच वठवत असते. पण त्यांना कोणी ‘कलाकार’ म्हणून प्रतिष्ठा देत नाही. उलट त्यांच्याविषयी सारा समाज घृणा बाळगतो. विशेष म्हणजे वेश्यांविषयी ही घृणा बाळगण्यात समाजात स्त्रियाच आघाडीवर असतात आणि दुसरीकडे याच स्त्रिया आपल्या मुलींना करीना, कॅटरिनासारखे नाच करायला प्रोत्साहनही देत असतात. विविध वाहिन्यांवरचे नृत्यांचे कार्यक्रम आणि त्यात वयाला आणि शरीरालाही न शोभणाऱ्या कामुक हावभावांचं लहान मुलींनी घडवलेलं दर्शन त्यांच्या आयांनाच आक्षेपार्ह वाटत नसेल तर कोण काय करणार?
स्त्रीमुक्ती संघटना याविरोधात काही का करत नाहीत, असा प्रश्न चळवळीतल्या स्त्रियांना बऱ्याचदा केला जातो. किंवा पुरुषांच्या अंडरवेअर्स, डिओडरन्ट्स यांच्या जाहिरातीत अर्धनग्न बायका पाहून आता स्त्रीमुक्ती संघटना गप्प का आहेत, असा खोचक प्रश्नही त्यांना विचारला जातो. स्त्रीमुक्ती संघटना या स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काम करतात. स्त्रियांना त्यांचा जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लढतात. पुरुष स्वैराचारी असेल तर स्त्रीनंही हे स्वैराचाराचं स्वातंत्र्य का घेऊ नये असले मूर्ख प्रश्न करण्यासाठी, असली समता आणण्यासाठी त्यांनी संघटना बांधलेली नाही. शिवाय इथं स्त्रियांवर अन्याय होतोय असं म्हणायला जागा तरी आहे का? अगदी स्वेच्छेनं अशी कामं करणाऱ्या, आयटेम साँगचं, रेव्ह पाटर्य़ाचं, ‘भूमिकेची गरज’ म्हणत अर्धनग्न वावराचं समर्थन करणाऱ्या या ‘कलाकार’ स्त्रिया स्त्रीमुक्ती संघटनेचं म्हणणं थोडंच मनावर घेणार आहेत? त्यामुळे या प्रश्नांत स्त्रीमुक्ती संघटनांना दोष देण्यात काही अर्थ नाही.
माध्यमाद्वारे उंबऱ्याआडची स्त्री जगासमोर आली खरी, पण खऱ्या अर्थानं तिच्या पायांतले परंपरांचे साखळदंड तुटले का? की ज्या पद्धतीनं ती पत्नी, आई, सून ही आपली रूपं माध्यमात साकारतेय त्यातून तिनं मान्य केलेल्या तिच्या बेडीचीच जाणीव अधिक लोकांपर्यंत पोहोचली? तिची वेशभूषा, केशभूषा बदलली, पण तिचं मन स्वतंत्र झालं का? की उलट माध्यमात तिला अधिक गृहीत धरण्यात आलं? तिनं कसं दिसावं हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा माध्यमांच्याच हातात राहिला. सिनेमा, जाहिरातींसारखी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी माध्यमं तिच्या आवाक्यात आली, पण यातून तिचं ‘भोगवस्तू’पण अधिक जाहीर झालं. ती ‘प्रदर्शनीय’ वस्तू झाली.
स्त्रीची ही जी काही प्रतिमा माध्यमातून समाजासमोर येते त्याचं अपश्रेय माध्यमात असली कामं करणाऱ्या स्त्रियांबरोबरच या मालिकांच्या प्रेक्षक म्हणून भूमिका बजावणाऱ्या लाखो स्त्रियांकडेही जातं. आपण हे पाहतो, चालवून घेतो म्हणजे आपणही त्यांच्यासारख्याच मठ्ठ आहोत असं मालिका पाहणाऱ्या स्त्रियांच्या मनात येत नाही?
माध्यमात काम करणाऱ्या स्त्रियांनी फार गंभीरपणे या प्रश्नांचा विचार करायला हवा. त्यांची या संदर्भातली भूमिका स्त्रीच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं मोलाची कामगिरी बजावणारी आहे. कोणतं काम करावं आणि कोणतं करू नये याचं स्वातंत्र्य माध्यमातल्या स्त्रीला जरूर आहे, असायलाच हवं. पण त्याचबरोबर तिच्याकडे तारतम्य बुद्धी हवी. स्त्री म्हणून इतकी कोंडी तिला अवतीभवती दिसत असताना तिनं आपण कोणती स्त्रीप्रतिमा पडद्यावर साकारतोय याचा किमान विचार तरी करायलाच हवा. आपण साकारत असलेल्या स्त्रीप्रतिमा हास्यास्पद आहेत, कुचेष्टेचा विषय होणाऱ्या आहेत, वास्तवातल्या स्त्रीवर ‘देहपातळीवर जगणारी मठ्ठ स्त्री’ असं शिक्कामोर्तब करणाऱ्या आहेत आणि मुख्य म्हणजे तिच्या खऱ्या प्रश्नांना बगल देणाऱ्या आहेत याची बोच तरी त्यांना असायला हवी की नको?