आरती कदम

‘‘रॅगिंग करणाऱ्या लोकांची मानसिकता विकृत असते, गुन्हेगारांची असते तशीच. दुसऱ्यांना वेदना देण्याच्या कल्पनेनेही त्यांना आनंद वाटतो. मोठय़ांना प्रश्न विचारायचे नाहीत, त्यांच्यासोबत असहमती दर्शवायची नाही, असे सांगणाऱ्या आपल्या विचार परंपरेमुळे भारतात रॅगिंग फोफावले आहे. विकसित जगातील विद्यापीठांमध्ये, असहमती व्यक्त करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडे हे दाबून टाकले जाते. म्हणूनच आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अविकसित राहून गेला आहे. रॅगिंगचे नकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकणारे आहेत. रॅगिंगला सामोरे गेलेले लोक भित्रे होतात, आयुष्यभर  आकस घेऊन जगतात आणि याचा दूरगामी परिणाम आपल्या राष्ट्रीय उत्पादनक्षमतेवरही होतो, म्हणूनच हा प्रश्न व्यक्तिगत राहण्यापेक्षा देशाचा जास्त होतो.’’ ‘अमन चळवळ’ संस्थेचे संस्थापक राज कचरु यांच्याशी झालेली ही बातचीत..

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर रॅगिंग हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. महाविद्यालयात अशा प्रकारच्या रॅगिंगना थोडय़ा फार प्रमाणात विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. मात्र जेव्हा ते कुणाला आत्महत्येपर्यंत नेत असेल तर वेळीच थांबवणे गरजेचे असते. राज्यात ‘महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९’ लागू आहे. या कायद्यात रॅगिंगविरोधात कठोर शासन सांगितलेले आहे. अनेकांना त्याविषयी फारशी माहिती नसल्याने त्याची मदत घेतली जातेच असे नाही, परंतु अशा मुलांसाठी एक दिलासा ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)च्या अंतर्गत असलेल्या १८०० १८० ५५२२ या हेल्पलाइनचा फायदा भारतभरातील मुले घेत असून कथा-व्यथा तेथे व्यक्त करत आहेत. या हेल्पलाइनचे मार्गदर्शक आणि रॅगिंगविरोधात आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या ‘अमन चळवळ’ (aman movement) संस्थेचे संस्थापक

राज कचरू यांची या हेल्पलाइनविषयीच्या अनुभवांवरची ही प्रश्नोत्तरे-

रॅगिंग विरोधातली ही हेल्पलाइन भारतातील अशा प्रकारची एकमेव आहे, हे खरे आहे ना?

रॅगिंग विरोधातली १८०० १८० ५५२२  ही भारत सरकारची हेल्पलाइन असून संपूर्ण भारतातील एकमेव हेल्पलाइन आहे. संपूर्ण देशभरातून त्यावर दूरध्वनी येतात आणि आम्ही त्याला प्रतिसाद देतो. रॅगिंगविरोधात विद्यार्थ्यांना आवाज उठवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करावं यासाठीच मी ‘अमन चळवळ’ ही संस्था सुरू केली. त्यातलाच एक भाग म्हणजे आम्ही रॅगिंग प्रतिबंध कार्यक्रम राबवण्यासाठी भारत सरकारच्या सहयोगाने ही हेल्पलाइन चालवतो आहोत. महाविद्यालये रॅगिंगसंदर्भातील नियमांचे पालन करत आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यासारखे आणखी उपक्रम या अंतर्गत येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करणे, डेटा बेसचे व्यवस्थापन आदी कामेही करतो. ही हेल्पलाइन रॅगिंग झाल्यानंतर मदत पुरवते, पण आमच्या अधिक भर आहे तो मुळात रॅगिंगला प्रतिबंध करण्यावर.

रॅगिंगची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे साधारण किती कॉल्स, महिनाभरात किंवा वर्षभरात, येतात?

– आम्हाला महिनाभरात हजारो कॉल्स येतात, पण त्यातील सगळेच तक्रार स्वरूपातील नसतात. माहिती विचारणारे, पुढील कार्यवाहीसंदर्भात प्रश्न विचारणारेही असतात. २०१२ मध्ये आम्ही ३७५ तक्रारी नोंदवून घेतल्या होत्या. या तक्रारींची संख्या हळुहळू वाढत गेली आणि गेल्या वर्षभरात १०१६ तक्रारी आल्या. यंदा गेल्या पाच महिन्यांत आम्ही ३६० तक्रारींची नोंद केली आहे. जानेवारी २०१२ पासूनच्या एकूण तक्रारींचा आकडा ५१५२ आहे.

हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढली याचा अर्थ रॅगिंगच्या प्रकारांत वाढ झाली असा होत नाही. उलट यातून हेल्पलाइनवरील वाढता विश्वास दिसून येतो. अधिकाधिक लोकांना या वेबसाइटबद्दल माहिती होत आहे आणि आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असा विश्वास त्यांना वाटत आहे. आपल्या खासगी आयुष्यावर होणारे अतिक्रमण सहन करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये कमी होताना दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे.

गेल्या दशकभरात रॅगिंगचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे हे आपण जाणतो. २००९ मध्ये आमचा ढोबळ निष्कर्ष असा होता की, सरासरी सुमारे ४० टक्के विद्यार्थी सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या रॅगिंगला तोंड देतात. गेल्या वर्षी सुमारे ५००० महाविद्यालयांतील २० लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण गोपनीयरीत्या घेण्यात आले. रॅगिंगसंदर्भातील आकडेवारी ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. देशातील अनेक भाग हे तुलनेने रॅगिंगमुक्त असले तरी काही भागांत रॅगिंगवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही. ५ टक्के विद्यार्थी अद्याप रॅगिंगला तोंड देत आहेत, याचा अर्थ सुमारे १० लाख विद्यार्थी आजही रॅगिंग सहन करत आहेत. मुख्यत्वे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत रॅगिंगचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण महाराष्ट्र, पुण्यातूनही काही प्रमाणात रॅगिंगच्या तक्रारी येतात.

सध्या मुंबईतील डॉ. पायल तडवी प्रकरण गाजत आहे, त्यानिमित्ताने मला वैद्यकीय महाविद्यालयांविषयी बोलावेसे वाटते. गेल्या ७ वर्षांत देशभरातून आमच्याकडे वैद्यकीय महाविद्यालयांतून ७३९ तक्रारी आल्या, तर अन्य महाविद्यालयांतून आलेल्या तक्रारींची संख्या ४४१३ आहे. देशभरात ५०० हून कमी वैद्यकीय महाविद्यालये आहेत, तर अन्य प्रकारच्या महाविद्यालयांची संख्या ४० हजार  आहे ही तुलना येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. २००९ मध्ये हिमाचल प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयात अमन कचरू या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भारतातून रॅगिंगचे निर्मूलन करण्याची मोहीम सुरू झाली असली, तरीही आज वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रॅगिंग सुरू आहे हे यातून स्पष्टपणे दिसत आहे. याचा दोष ‘मेडिकल कॉन्सील ऑफ इंडिया’कडे जातो, असे म्हणण्यात मला अजिबात वावगे वाटत नाही. कारण, कॉन्सीलने रॅगिंगची समस्या गांभीर्याने घेतलेली नाही. वैद्यकीय महाविद्यालयांतील रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी मेडिकल कॉन्सील अपेक्षित उपाययोजना करण्यात कमी पडली आहे. दुसऱ्यांच्या वेदनेप्रति संवेदनशील असणं हा डॉक्टरांचा एक गुण मानला जातो अशा ठिकाणीच विद्यार्थी, डॉक्टरांकडून सहाध्यायींचे रॅगिंग होत असेल तर ती लाजिरवाणी बाब आहे.

तक्रार करणाऱ्या किंवा हेल्पलाइनवर दूरध्वनी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय साधारण किती ते किती  असते?

– आम्ही तक्रार करणाऱ्याचे वय नोंदवून घेत नाही पण ते सगळे महाविद्यालयात जाणारे, पहिल्या वर्षांपासून ते पदव्युत्तर स्तरावरचे, विद्यार्थी असतात. रॅगिंगच्या व्याख्येमध्ये २००९ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार रॅगिंग हे केवळ प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही. रॅगिंगमध्ये सर्व प्रकारच्या, शारीरिक व मानसिक, हिंसाचाराचा समावेश होतो, वांशिक भेदभाव , जात, वर्ण, वर्ग आदींच्या आधारे केलेल्या भेदभावाचाही समावेश होतो.

मुख्यत: तक्रारी कोणत्या असतात? यात मुलांची संख्या अधिक असते की मुलींची?

मानसिक व शारीरिक अशा सर्व प्रकारच्या हसाचाराच्या तक्रारी असतात. सगळ्या तक्रारींची यादी सांगणे जरा किचकट होईल. या प्रश्नाचे नेमके उत्तर देण्यासाठी आवश्यक ते विश्लेषण आम्ही अद्याप केलेले नाही. गेल्या वर्षीपर्यंत आमच्याकडे आलेल्या तक्रारींपैकी ५०४७ मुलांकडून आल्या होत्या, तर ७२४ मुलींकडून. सुमारे १२ टक्के तक्रारी मुलींकडून येतात. बाकी सर्व मुलांकडून येतात.

मुलांनी केलेल्या या तक्रारी महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडे पाठवल्या जातात का?

– या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही मिनिटांतच महाविद्यालयीन प्रशासनाकडे म्हणजेच कुलगुरू, रजिस्ट्रार आणि संचालक आदींना ई-मेलद्वारे पाठवल्या जातात. तक्रार वाचून त्यावर कारवाई झाली की नाही हे तपासण्यासाठी दूरध्वनीही केला जातो. यातून काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असेल तर स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते. दूरध्वनी आणि ईमेल्सच्या माध्यमातून नियमित पाठपुरावा केला जातो.

आई-वडिलांपर्यंत तक्रारी जातात का?

–  नाही. आम्ही कोणाच्याच आई-वडिलांना यात सहभागी करून घेत नाही. छळ होत असलेल्यांच्याही नाही आणि ज्याच्यावर आरोप असेल त्याच्याही नाही. पालकच तक्रारदार असतील तर गोष्ट वेगळी. काही वेळा मुलांच्या वतीने त्यांचे पालक तक्रार नोंदवतात. तक्रार कोणाकडूनही अगदी निनावीही नोंदवून घेतली जाऊ शकते.

तुमच्याकडे येणारे दूरध्वनी समस्येला सुरुवात झाल्यानंतर येतात की सगळे विकोपाला गेल्यानंतर?

– बहुतेकदा समस्या विकोपाला गेल्यानंतरच तक्रार केली जाते. काहीवेळा अर्थातच हेल्पलाइन सुविधेचा गैरवापरही केला जातो. पण अशा कॉल्सचे प्रमाण चिंताजनक किंवा अस्वस्थ करणारे नाही.

 तक्रारी शारीरिक त्रासाच्या अधिक असतात की मानसिक छळाच्या?

– मी क्षमा मागतो. आम्ही या प्रकारचे विश्लेषण केलेले नसल्याने मी तुम्हाला अचूक आकडेवारी देऊ शकणार नाही. पण माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की शारीरिक हिंसाचारापेक्षा हा त्रास मुख्यत्वे मानसिक असतो. भावनिक हिंसाचाराच्या या तक्रारी असतात. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे संख्यात्मक प्रमाण आमच्याकडे नाही. भविष्यकाळात आम्ही अशा प्रकारचे विश्लेषण नक्कीच करू.

तक्रारींची उदाहरणे सांगू शकाल का?

खूप आहेत. काही प्रातिनिधिक सांगतो. एकीने अशी तक्रार केली होती की एक मुलगा तिच्या चारित्र्याविषयी इतक्या अफवा पसरवत होता की महाविद्यालयातील सगळेच जण तिच्याकडे ‘वाया गेलेली’ याच नजरेने पाहायला लागले होते, इतके की तिला महाविद्यालयात जाणं अवघड झालं होतं. दुसऱ्या प्रकरणात एका विद्यार्थ्यांने ग्रंथालयात जाताना लिफ्टमध्ये एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार तर केलेच, शिवाय तो तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत असे. एकीच्या बाबतीत तर आठ महिने एक  तरुण तिच्या मोबाईलवर घाणेरडे मेसेज पाठवून आणि सोशल मीडियावर फार वाईट कमेंटस् करून त्रास देत होता. इतकंच नव्हे तर संपूर्ण वर्गासमोर तिचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न करीत असे. एका महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांला रॅगिंगच्या नावाखाली बेदम तर मारलच पण त्याचं मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ते व्हायरलही केलं गेलं. एका समलैंगिक विद्यार्थ्यांला तर त्याचे डोळे आणि ओठ यावरून असह्य़ होतील असा शाब्दिक अत्याचार सहन लागत होता. काही मुली दारू आणि सिगरेट पिऊन हॉस्टेलमध्ये प्रचंड दंगा करायच्या. जोरजोरात गाणी लावणं, अर्वाच्य शिव्या देणं याचा इतर कनिष्ठ वर्गातील मुलींना फार त्रास होई. एका तरुणाच्या बायकोने तक्रार केली होती की त्यांच्या महाविद्यालयातील मुलांच्या सततच्या रॅगिंगचा तिच्या नवऱ्याने इतका धसका घेतला होता की तो नैराश्याचा शिकार झाला होता आणि  पुन्हा महाविद्यालयात जायलाही घाबरत होता. एका मुलाने अशी तक्रार केली होती की हे विद्यार्थी त्याला त्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरून आणायला सांगायचे. त्याने नकार दिला तर आपल्या खोलीवर बोलवायचे, अर्वाच्य शिव्या द्यायचे. त्यांच्या या सततच्या दहशतीचा परिणाम त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झाला होता. एका प्रकरणात एका मुलीनेच दुसऱ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिच्या कुटुंबाविषयीही अनुद्गार काढले होते. जेव्हा या मुलीने विरोध केला तेव्हा तिला तर मारलंच, पण रागाच्या भरात तिच्या खोलीतील आरसाही फोडला. एकाने पार्टीसाठी वर्गणी द्यायला नकार दिला तर त्याला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारलं. एक प्रकरण माजी विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहाण्यासंदर्भात होतं. ते तिथे राहून करत असलेल्या गुन्हेगारी वर्तनाचा इतर कनिष्ठ वर्गातील मुलांमध्ये भय निर्माण झालं होतं. अशा असंख्य तक्रारी आमच्यापर्यंत येतात

रॅगिंग करणाऱ्यांची काय मानसिकता असते असे तुम्हाला वाटते?

रॅगिंग करणाऱ्या लोकांची मानसिकता विकृत असते. समाजात गुन्हेगारांची असते तशीच मानसिकता यांची असते. दुसऱ्यांना वेदना देण्याच्या कल्पनेनेही त्यांना आनंद वाटतो. भारतातील रॅगिंगची कारणे हा खरे तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. रॅगिंग केवळ भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या देशातच होते, हे का ते समजून घेण्याची इच्छा भारतातील बहुतेक लोकांना नाही. हा प्रकार अन्य कोठेही दिसत नाही. मी युरोप, आफ्रिका, चीन, अमेरिका आदी ठिकाणी अध्यापन केले आहे. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्येही रॅगिंगसारखा काही प्रकार नाही. मोठय़ांना प्रश्न विचारायचे नाहीत, त्यांच्यासोबत असहमती दर्शवायची नाही, असे सांगणाऱ्या आपल्या विचार परंपरेमुळे भारतात रॅगिंग फोफावले आहे. असहमती दर्शवणे म्हणजे अनादर करणे असा समज आपण पक्का केला आहे. जगभरातील विद्यापीठांमध्ये, म्हणजे विकसित जगातील विद्यापीठांमध्ये, असहमती व्यक्त करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडे हे दाबून टाकले जाते. म्हणूनच आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अविकसित राहून गेला आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. भारताने आपल्या आकारमानाच्या तुलनेत जगातील विज्ञानाच्या विकासात कमी योगदान दिले आहे. अभ्यासाच्या वेळी शिक्षकांसोबत असहमती दर्शवायची नाही, असे आपल्याला शिकवले गेले आहे. हे दु:खद आहे पण वास्तव आहे. रॅगिंगची कारणे हा पूर्णपणे वेगळा विषय आहे.

रॅगिंग सहन करणाऱ्यांची मानसिकता कशी असते?

मला वाटते या प्रश्नाचे उत्तर मी काही प्रमाणात वर दिले आहे. हे काही मी एक-दोन ओळीत वर्णन करू शकेन असे नाही. हे भारतातील कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या स्त्रियांप्रमाणेच आहे. याचा संबंध आपल्या संस्कृतीशी, आपल्या जडणघडणीशी आहे तसेच विरोध करण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचे सामर्थ्य नसल्याचे हे लक्षण आहे. आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की कोणत्याही प्रकारच्या भांडणात पडू नका. विनाअट आज्ञाधारकता हा गुण आहे असे आपल्याला शिकवले जाते. तर अन्य देशात तो दुर्गुण मानला जातो.

रॅगिंगमधील नकारात्मकतेचा मुलांच्या भवितव्यावर काय परिणाम होतो असे तुम्हाला वाटते?

रॅगिंगचे नकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकणारे आहेत. यामुळे ते सहन करणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्वच बदलून जाते. त्याच्या उत्पादनक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. रॅगिंगला सामोरे गेलेले लोक भित्रे होतात आणि आयुष्यभर एक प्रकारचा आकस घेऊन जगतात. गेल्या वर्षी रॅगिंगचे प्रमाण घटलेले

(५ टक्के) दिसत असले तरीही वर्षभरात याचा परिणाम दहा लाख तरुणांच्या मेंदूंवर नक्कीच झाला आहे. याचा आपल्या राष्ट्रीय उत्पादनक्षमतेवर किती परिणाम होत असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

बहुतेक लोकांना असे वाटते की रॅगिंग हा चांगला प्रकार नाही, कारण त्यामुळे मुलांना खूप काही सहन करावे लागते. याकडे मानवतावादी समस्या म्हणून बघितले जाते. माझा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. मला वाटते की या समस्येमुळे आपली वैज्ञानिक प्रवृत्ती कमी होते, चाकोरी मोडण्याची आपली क्षमता कमी होते, आपली उत्पादनक्षमता कमी होते, आपली बौद्धिक वाढ खुंटते. ही मानवतावादी समस्या तर आहेच, पण त्याहून अधिक म्हणजे शिक्षण व बौद्धिक वाढीची समस्या आहे. त्यामुळे उत्पादनक्षमतेचे मोठे नुकसान होते.

ही हेल्पलाइन केव्हापासून सुरू आहे? समुपदेशनाची तुमची पद्धत कशी आहे आणि किती लोकांना या पद्धतीचा लाभ झाला आहे?

ही हेल्पलाइन २००९ पासून सुरू आहे. आम्ही या हेल्पलाइनचे व्यवस्थापन २०१० पासून हाती घेतले. आम्ही विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक समुपदेशन सत्रे घेत नाही. आम्ही त्यांना दूरध्वनीवरील संभाषणातून आत्मविश्वास देतो. भारत सरकार त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देतो. विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खात्री देऊन आम्ही त्यांना कोणत्याही वेळी नि:शंकपणे दूरध्वनी करा, असे सांगतो. गेल्या ७ वर्षांत, आम्ही सुमारे ४७०० केसेस नोंदवून घेतल्या आहेत. त्यापैकी किमान ८५ टक्के प्रकरणातील तक्रारदाराचे समाधान होऊन बंद झाल्या. थोडय़ा फार चुकीला जागा ठेवूनही आम्ही म्हणू शकतो की दरवर्षी देशातील किमान ५०० विद्यार्थ्यांना हेल्पलाइनचा थेट फायदा झाला आहे, होतो आहे.

या विरोधात कोणते कायदे आहेत आणि त्यांचे पालन कितपत होते?

रॅगिंगविषयीच्या नियमांना २००९ मध्ये कार्यान्वित करण्यात आले. हे सर्वसमावेशक नियम आहेत. या नियमांचे पालन जसे होणे अपेक्षित आहे, तसे ते झाले तर रॅगिंग खूप कमी होईल. मात्र, सध्याच्या लक्षणीय घट होण्याचे श्रेयही या नियमांना व त्यांच्या अंमलबजावणीला द्यावे लागेल. ‘अमन चळवळ’ (aman movement) या नियमांच्या अंमलबजावणी व पालनासाठी काम करते. आम्ही देशभरातील सुमारे ४० हजार महाविद्यालयांसोबत संपर्कात आहोत आणि त्यांना हे नियम प्रभावीरीत्या अमलात आणण्याचे महत्त्व पटवून देत आहोत.

यात किती लोकांचा समावेश आहे?

आम्ही २५ जण ३ शिफ्ट्समध्ये काम करून कॉल सेंटर सांभाळतो. या टीमला ५ सदस्यांची तांत्रिक साहाय्य टीम मदत करते. याशिवाय ५ जण विद्यापीठ अनुदान आयोगावर (यूजीसी) रॅगिंगसंदर्भात काम करत आहेत. भारत सरकारने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची जबाबदारी यूजीसीवर टाकल्याने यूजीसी यामध्ये सहभागी झालेली आहे.

रॅगिंग विरोधात अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते का?

व्यक्तिगत स्तरावर माझा शिक्षेवर विश्वास नाही. शिक्षा हा कशावरही उपाय होऊ शकत नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. पण मला फक्त महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला इतकंच सांगायचे आहे की रॅगिंग संपले आहे असे अनेकांना वाटते तर ते तसे नाही. ते कमी नक्कीच झाले आहे, परंतु पूर्णत: संपलेले नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे गंभीरपणे लक्ष द्या. त्यावर ताबडतोब कारवाई करा. काही लोकांच्या विकृतीमुळे तारुण्य नासलं जाऊ नये इतकंच!

Kachrooraj@gmail.com

arati.kadam@expressindia.com