02 March 2021

News Flash

पावसाळ्याचा आनंद अनुभवताना..

नवसंजीवनी देणाऱ्या पावसाळ्याचा मनमुराद आनंद लहान-मोठे सगळ्यांनाच घ्यायचा असतो.

|| सुकेशा सातवळेकर

नवसंजीवनी देणाऱ्या पावसाळ्याचा मनमुराद आनंद लहान-मोठे सगळ्यांनाच घ्यायचा असतो. मात्र हाच पावसाळा अनेकांना आजारी पाडतो. कारण याच काळात हवेतील आद्र्रता वाढते, त्यामुळे पचनशक्ती कमी होऊन अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात. ओलसर, दमट परिस्थितीत, निरनिराळ्या रोगजंतूंची वाढ होते. हवेत झालेल्या भौतिक रासायनिक बदलांमुळे अ‍ॅलर्जी होऊन सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो, प्यायचं पाणी दूषित असण्याची शक्यता वाढते. म्हणूनच थोडी खबरदारी घेतली की झालं. खाण्यापिण्याच्या सवयींत थोडे बदल करून, काही पथ्यं पाळली तर पावसाळ्यासारखा दुसरा आनंददायी ऋतू नाही.

‘‘अरे मित्रा, केवढं उकडतंय! कधी एकदा पाऊस सुरू होतोय असं झालंय. घराच्या भिंती तापल्यात, पंख्याचं वारंही गरम वाटतंय.’’ ‘‘खरंय रे. आपलं तरी ठीक आहे; पण खरी काळजी वाटते ती तप्त भेगाळलेल्या भुईवर उभं राहून आकाशाकडे बघत पर्जन्यराजाची आराधना करणाऱ्या शेतकरी बांधवांची. त्यांचं सारं जीवनच पावसावर अवलंबून आहे ना रे.’’ पावसाळ्यापूर्वी आमच्या गप्पा सुरू होत्या पण अखेर खूप खूप वाट पाहायला लावून एके दिवशी चक्क आग ओकणाऱ्या सूर्याला काळ्या मेघांनी झाकून टाकलं. टप-टप आवाज करत, तापलेल्या जमिनीवर अमृतथेंब नाचू लागले. मातीचा मंद सुगंध दरवळला. बघता बघता आकाशात विजा चमकायला लागल्या आणि ढगांच्या गडगडाटासह वाजतगाजत वर्षां ऋतूचं आगमन झालं. पावसाळा! रिमझिम सरी, सुखद गारवा आणि हिरवीगार धरणी. नवसंजीवनी देणाऱ्या पावसाळ्याचा मनमुराद, पुरेपूर आनंद लहान-मोठे सगळ्यांनाच घ्यायचा असतो. फक्त थोडी खबरदारी, थोडी तब्येतीची काळजी घेतली की झालं. खाण्यापिण्याच्या सवयींत थोडे बदल करून, काही पथ्यं पाळली तर पावसाळ्यासारखा दुसरा आनंददायी ऋतू नाही असं जरूर म्हणता येईल.

पावसाळ्यात हवेतील आद्र्रता वाढते, त्यामुळे पचनशक्ती कमी होऊन अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात. ओलसर, दमट परिस्थितीत, निरनिराळ्या रोगजंतूंची वाढ होते. हवेत झालेल्या भौतिक रासायनिक बदलांमुळे अ‍ॅलर्जी होऊन सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो, दमा वाढू शकतो. पावसाळ्यात प्यायचं पाणी दूषित असण्याची शक्यता वाढते. या सगळ्याच्या जोडीला वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं तर आरोग्याच्या तक्रारी वाढतात. साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी समतोल, चौरस आहार आणि आरोग्यपूर्ण सवयींचं महत्त्व पावसाळ्यात खूप जास्त वाढतं.

परवा समोरच्या काकू म्हणाल्या, ‘‘अगं, हा पावसाळा सुरू झाला आणि पोटाच्या तक्रारी एकदमच वाढल्या. पोट ‘डब्ब डब्ब’ वाटतंय, खायची इच्छाच होत नाही. आमच्या यांचं तर पोट सारखं बिघडतंय. काय करू सांग? डॉक्टरांची औषधं तरी किती खायची..’’ काकूंना म्हटलं, ‘‘काकू, काकांचं पोट खराब पाण्यामुळे बिघडत असेल. पाणी उकळून प्यावं. पाण्याला उकळी आल्यावर पुढे दहा मिनिटं उकळावं म्हणजे अपायकारक जंतू नष्ट होतील. उकळलेलं पाणी २४ तासांत वापरावं. पाण्यातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी आणि घातक जीवजंतू नाहीसे करण्यासाठी खबरदारी म्हणून एक लिटर पाण्यात ३-४ थेंब क्लोरीन घालावं. ताक किंवा सरबत बनवण्यासाठीही शक्यतो उकळून गार केलेलं पाणी वापरावं. दूधही उकळूनच प्यावं, निरसं दूध पिऊ नये.’’

‘‘या सुमारास पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात आलं, लसूण, पुदिना, हिंग, हळद, मिरे, जिरे, धने यांचा वापर वाढवायला हवा. लसूण पाकळ्या पचन वाढवतात आणि वातदोष आटोक्यात ठेवतात. पदार्थ शिजवताना सैंधव मीठ वापरल्याने पचनशक्ती सुधारते. आल्याची पेस्ट+सैंधव मीठ+लिंबाचा रस यांचं ताजं मिश्रण १ ते १/२ चमचा प्रत्येक जेवणाआधी, निदान नाश्त्याआधी घ्यावं.’’

पावसाळ्यात पचनशक्ती कमी झाल्यामुळे काही जणांना दूध पचत नाही. त्यांनी दुधाऐवजी अधमुरं दही किंवा ताजं ताक घ्यावं. दुधामधील लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक अ‍ॅसिडमध्ये होतं, पचायला सुलभ होतं. काही जणांच्या पचनाच्या तक्रारी पावसाळ्यात वाढतात. त्यांनी सॅलडच्या भाज्या कच्च्या न खाता वाफवून खाव्यात, पचायला सोप्या होतील आणि भाज्यांवर जंतू असतील तर मरतील. कच्ची मोडाची कडधान्यं खाणं शक्यतो टाळावं. मोडाची कडधान्यं खायचीच असली तर शक्यतो वाफवून घ्यावीत आणि थोडय़ाच प्रमाणात खावीत. रात्रीच्या जेवणात शक्यतो कडधान्यं खाऊ नयेत.

दिवसभरात एखादा कप हर्बल किंवा ग्रीन टी घेतल्यानेही बऱ्याच जणांना फायदा होतो. ग्रीन टीमधून अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते, पोटातील अपायकारक जीवजंतू मरतात आणि डीटॉक्स क्रियेला मदत होते. संसर्गजन्य विकार टाळता येतात. हर्बल टी घरच्या घरीही बनवू शकता. एक लिटर पाण्यात १-२ चमचे धणेपूड किंवा ५-६ लवंगा किंवा ४-५ चमचे मध घालून पाणी उकळून घ्यावं. गवती चहा, आलं, पुदिना, तुळशीची पानं पाण्यात उकळवून घेता येतील. तरुण पिढीसाठी बाजारातही ग्रीन टीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. त्यात तुलसी, मिंट, लेमन, जिंजर, पेपर, रोझ, पेपरिमट, जस्मिन अशी नावं घेता येतील.

पावसाळ्यात वरचेवर होणाऱ्या सर्दी, खोकला, व्हायरल तापात आराम मिळण्यासाठी पाण्यात तुळस, सुंठ, हळद, मध घालून काढा करावा, गरम-गरम प्यावा. घसा शेकला जाईल, तापाचा परिणाम कमी होईल. या सुमारास स्वच्छता कटाक्षाने पाळावी लागते. स्वयंपाकघरातही विशेष काळजी घ्यावी लागते. पालेभाज्या, कोबी, फ्लॉवरसारख्या भाज्या मिठाच्या पाण्यात किंवा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घातलेल्या पाण्यात दहा मिनिटं बुडवून ठेवाव्यात. भाज्यांवरची माती निघून जाईल. कीड, अळ्या असल्या तर मरून जातील. भाज्या नंतर नळाखाली पाण्यात व्यवस्थित धुवाव्यात. तरीही शंका असल्यास क्लोरीनच्या पाण्यात बुडवून भाज्या, फळं धुवावीत. बटाटा, रताळ्यासारखी कंदमुळंही व्यवस्थित धुऊन, त्यांच्यावरील माती काढून टाकून वापरावीत. जांभूळ, सफरचंद, चेरी, पीच, डाळिंब यांसारखी या ऋतूत मिळणारी फळं खावीत. या ऋतूत तयार न होणाऱ्या फळांमध्ये कीड असू शकते. शक्य असेल तर सेंद्रिय फळं आणि भाज्या वापराव्यात. कारण त्यांच्यावर जीवजंतूंची वाढ कमी प्रमाणात होते.

मांसाहारप्रेमींनी असे पदार्थ सूप किंवा ‘स्टय़ू’ प्रकारात बनवावेत, पचायला सुलभ होतील. आवश्यक तेवढंच अन्न शिजवावं. उरलेलं अन्न लवकर खराब होऊ शकतं. शिजवून ठेवलेलं अन्न खायची वेळ आली तर गरम करून/ उकळवून घ्यायला हवं. घराबाहेर खायची वेळ आली तर असं हॉटेल निवडावं जिथं किमान दर्जा, स्वच्छता पाळली जाते. बाहेरील पदार्थ शक्यतो स्वत:च्या नजरेसमोर शिजवलेले, उकळलेले किंवा परतलेले हवेत.

पावसाळ्यात काही पदार्थ मात्र टाळायला हवेत. पचायला जड पदार्थ, खव्याचे, मद्याचे पदार्थ, अतिप्रमाणात तेलकट, तळलेले पदार्थ, विकतचे पदार्थ वरचेवर खाऊ नयेत. रेड मिट, कच्चं मटण, मटणाचे मसालेदार, झणझणीत रस्से जास्त प्रमाणात खाऊ नयेत. पावसाळ्यात वातदोष वाढतो. शरीरात शुष्कता येते. पाचकरसांचा समतोल बिघडतो. चयापचयावर अपायकारक परिणाम होतो, म्हणून काळजी घ्यावी. रस्त्यावरचे, उघडय़ावरचे, शिळे, माश्या बसलेले पदार्थ खाणं म्हणजे आजाराला आमंत्रणच असतं, हे लक्षात ठेवावं. रस्त्यावरच्या गाडय़ांवरच्या वडे, भज्यांचा कितीही मोह झाला तरी आवरायला हवा. कारण तिथल्या अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.

पावसाळ्यात मासेमारी केली जात नाही. कारण हा माशांचा प्रजननाचा काळ असतो आणि हवामानही खराब असतं. त्यामुळे या सुमारास मिळणारे मासे शिळे असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मासे शक्यतो खाऊ नयेत. कोलंब्या, खेकडेही टाळावेत. कारण विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. रस्त्यावरच्या गाडय़ांवर किंवा स्टॉल्सवर मिळणारे न शिजवलेले सँडविच, भेळ, पाणीपुरी, चाटचे प्रकार टाळावेत. फ्रुट प्लेट, फ्रुट ज्यूस, उसाचा रस, नीरा यांमधूनही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते, पोट बिघडू शकते. अशी फळं किंवा भाज्या टाळायला हव्यात, ज्यांचा शिळं झाल्यामुळे आकार बिघडलाय, खराब झाल्यात. मोहरीचं तेल, तिळाचं तेल जड असतं; त्यांच्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या वापराने पोट बिघडू शकतं, पित्तदोष वाढतो म्हणून पावसाळ्यात ते वापरू नये. मशरुम्स शिजवल्यानंतर २४ तासांतच खावेत, नंतर खाऊ नयेत. विषबाधा व्हायची शक्यता असते.

पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवं. काहीही खाण्यापिण्याआधी, अन्नपदार्थ हाताळण्याआधी हात जंतुनाशक साबणाने स्वच्छ धुवावेत. चपला, बूट न घालता, अनवाणी घराबाहेर हिंडू नये. बाहेरून घरी आल्यावर पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतूंच्या सूक्ष्म अळ्या शरीरात प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकतं.

पावसाळा मस्तपकी एन्जॉय करायचा असेल तर आपल्या तब्येतीची, खाण्यापिण्याची डोळसपणे काळजी घ्यायलाच हवी.

पावसाळ्यात हवेतील आद्र्रता वाढते, त्यामुळे पचनशक्ती कमी होऊन अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात. ओलसर, दमट परिस्थितीत, निरनिराळ्या रोगजंतूंची वाढ होते. हवेत झालेल्या भौतिक रासायनिक बदलांमुळे अ‍ॅलर्जी होऊन सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो, दमा वाढू शकतो. पावसाळ्यात प्यायचं पाणी दूषित असण्याची शक्यता वाढते. या सगळ्याच्या जोडीला वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं तर आरोग्याच्या तक्रारी वाढतात. साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी समतोल, चौरस आहार आणि आरोग्यपूर्ण सवयींचं महत्त्व पावसाळ्यात खूप जास्त वाढतं.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:08 am

Web Title: rainy season mpg 94
Next Stories
1 आक्रोश ते आर्टकिल १५
2 आईपणाची गोष्ट
3 लोकसहभागातून शिक्षण
Just Now!
X