‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो’चा एक अहवाल काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला. सन २०१० ते २०१२ या तीन वर्षांमधील स्त्री गुन्हेगारांची आकडेवारी त्यात मांडण्यात आली होती. ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. धक्कादायक दोन अर्थानी, एक म्हणजे स्त्री गुन्हेगारीच्या प्रमाणात होत असलेली वाढ आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राचं या गुन्हेगारीत देशात आघाडीवर असणं. या वाढीमागील सत्यासत्यता, त्यामागील कारणं, महिलांची बदलती मानसिकता आणि सामाजिकदृष्टय़ा या बाबींचे होणारे परिणाम या मुद्यांचा हा ऊहापोह..
समजूतदारपणा, सोशीकता आणि उच्च जाणिवा ही स्त्रीची मूलभूत शक्तिस्थानं मानली जातात आणि हे मानसशास्त्रीय कसोटय़ांवरही सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत. असं असतानाही, गेल्या काही वर्षांमध्ये महिला गुन्हेगारीत वाढ होताना दिसते आहे. असं का होत असावं? स्त्री-पुरुष समतेच्या या काळात पुरुषांना गुन्हे करायला परवानगी अन् स्त्रियांकडेच का म्हणून विश्लेषणात्मक पद्धतीने पाहायचे, असा यामागचा हेतूही नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीचे समर्थन करण्याचा प्रयत्नही नाही. पण वाढती गुन्हेगारी ही कोणत्याही सुदृढ समाजाच्या जडणघडणीसाठी मारकच, तेव्हा यामागील काही कारणे- विशेष निरीक्षणे आहेत का, हे पाहायला हवे.
‘एनसीआरबी’ (‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो’)चा अहवाल काय सांगतो? तो अनेक बाबी उजेडात आणतो आहे, आणि त्या सगळ्या बाबी सत्य असल्याचे माझे निरीक्षण आहे. या अहवालातील माहिती, आकडेवारी पूर्णपणे खरी आहे. गेल्या तीन वर्षांत या देशात एकूण ९३ लाख जणांना अटक करण्यात आली. त्यांपकी ९४ टक्के पुरुष आहेत, तर सहा टक्के स्त्रिया आहेत. या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील ९० हजार ८८४ स्त्रियांना अटक करण्यात आली. देशभरात अन्य राज्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश (५७,४०६), मध्य प्रदेश (४९,३३३), तामिळनाडू (४९,०६६) आणि गुजरात (४१,८७२) अशी क्रमवारी येते.
 महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला, तर सर्वाधिक प्रकरणे ही ‘पती आणि नातेवाइकांशी केले जाणारे क्रूर वर्तन’ या बाबीशी संलग्न आहेत. यामुळे गेल्या तीन वर्षांत २० हजारांहून अधिक स्त्रियांना या प्रकरणात अटक झाली आहे. शिवाय पूर्वी अभावानेच ज्या गुन्ह्य़ांमध्ये स्त्रियांची नावे असत अशा ‘हत्या आणि अपहरणा’सारख्या गुन्ह्य़ांमध्येही स्त्रियांचा सहभाग वाढू लागला आहे, असे अहवालातील निरीक्षण आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर सर्वाधिक स्त्री गुन्हेगारी मुंबईत (७,२६४) त्यानंतर जळगाव (५,३८४), नाशिक ग्रामीण (५,२३५), अहमदनगर (४,९८६) आणि त्यानंतर पुणे (४,०५२) असा क्रम लागताना दिसतो.
  साधारण गुन्हेगारीच्या आकडेवारीचे हे चित्र उभे राहिल्यानंतर त्याची कारणमीमांसा करायची झाल्यास गुन्हेगारीच्या स्वरूपातील काही बदल हे ठळकपणे जाणवतात :
महिला गुन्हेगारीचा विचार करताना सर्वप्रथम काही बदलांची नोंद घेणे गरजेचे आहे. सामान्यपणे गुन्हेगारी म्हटली की, समाजातील कनिष्ठ (म्हणजे आíथकदृष्टय़ा निम्न पातळीवर असणारा) वर्ग नजरेसमोर येतो आपल्या. आजवरचा अनुभव आणि निरीक्षण हे यामागील कारण आहे. आíथक गरजा भागविणे या उद्दिष्टाने प्रामुख्याने भुरटय़ा चोऱ्या, दागिन्यांची लूट असे अपप्रकार स्त्रियांकडून घडताना दिसत होते. आणि खरोखरच आíथकदृष्टय़ा निम्न स्तरातील स्त्रियाच प्रामुख्याने गुन्हेगारीत दिसत होत्या. पण सद्यस्थिती तशी नाही. ज्यांना सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय म्हणता येईल अशा वर्गातील स्त्रिया गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. हे चित्र दु:खद असले तरीही सत्य आहे. बरं, गुन्ह्य़ांचे स्वरूपही बदललेले आहे. पूर्वी असलेली चोरी-दागिन्यांची पळवापळवी अशा प्रकारांबरोबरच आता सायबर किंवा वेब गुन्हे, अपहरणे, हत्या-खून, छळवणूक, फसवणूक अशा गुन्ह्य़ांमध्येही स्त्रियांचा सहभाग स्पष्ट दिसू लागला आहे. गुन्हेगार म्हटल्या गेलेल्या अनेक स्त्रिया या पदवीपर्यंत शिकलेल्याही आहेत. काही ठिकाणी तर बनावट कागदपत्रे दाखवून केली जाणारी फसवणूक- परस्पर घरे विकणे, आíथक अफरातफर अशा गुन्ह्य़ांमध्येही स्त्रियांचे नाव पुढे आले आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे. म्हणजे स्त्रियांकडून होणाऱ्या गुन्ह्य़ांचे विश्लेषण करताना गुन्हेगारीच्या स्वरूपातील हे बदल काळजीपूर्वक टिपणे गरजेचे आहे.
आता थोडे परिस्थितीतील बदलांविषयी बोलायचे, तर गेल्या काही वर्षांत समाजाच्या आíथक क्षमतांमध्ये, क्रयशक्तीमध्ये बराच फरक पडलेला आपल्याला दिसतो. यात वाढती आíथक दरी हाही भाग आहेच. त्याशिवाय स्त्रिया ‘करिअर ओरिएंटेड’ होताना दिसू लागल्या. एकीकडे बदलणारी कुटुंबव्यवस्था आणि त्यातच घरच्या तसेच व्यावसायिक पातळीवर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या यांचा स्वाभाविकपणे वाढणारा ताण स्त्रियांवरही पडू लागला. वाढत्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्याची खटपट याचा दबाव स्त्रियांवरही वाढू लागला. शहरी भागातील लोकसंख्याही वाढू लागली. त्याच प्रमाणात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ होताना दिसू लागली. विश्वासघाताच्या अनेक घटना घडताना आपल्याला दिसू लागल्या. नागरीकरणानेही जीवनाचे दृष्टिकोन बदलले. समजूतदार, संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्वासमोर या सगळ्या बदलांना हाताळण्याचे आव्हान उभे राहिले. स्वाभाविकच आव्हानात्मक परिस्थितीत मिळणाऱ्या प्रतिसादांमध्येही बदल झाले.
   मी स्वत: अनेक तुरुंगांना भेटी दिल्या आहेत. अनेक महिला कैद्यांशी संवाद साधला आहे. तुरुंग अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केल्या आहेत. मानसोपचारतज्ज्ञांशी बोलले आहे. आणि त्यावरून मला काही गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्रियांच्या गुन्हेगारीमागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे त्यांची  चंगळवादी मानसिकता. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या सूत्रापासून फारकत घेत आपण आधुनिक राहणीमानबाबत अधिक दक्ष होत आहोत, पण सम्यक विचारांवरील आपले लक्ष ढळले आहे. सध्या समाजात पसरलेली चंगळवादी वृत्ती हीच गुन्ह्य़ांमागील महत्त्वाचे कारण आहे. ताणाला सामोरे जाताना सहनशीलता कमी होत जाणे, वारंवार होणाऱ्या अन्यायाला सूडबुद्धीने उत्तरे देणे हे प्रकार वाढू लागले आहेत. एकीकडे स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, त्याला त्याच पद्धतीने उत्तरे देण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. स्त्रियांच्या गुन्हेगारीमागे सामाजिक, आíथक, भावनिक कारणेही असल्याचे आपल्याला दिसेल.    
     सामाजिक विषमता असह्य़ झाल्यानेही काही गुन्हे घडलेले मी पाहिले आहेत. तसेच गरजा वाढल्याने त्यांची पूर्तता करण्यासाठी गुन्ह्य़ांचा मार्ग अवलंबिलेला मला दिसला आहे. पशांचा पडणारा मोह, ते झटपट मिळविण्याची हौस यातून लुबाडणुकीच्या घटना घडताना दिसत आहेत.
चंगळवाद हे एक कारण मी नमूद केलेच आहे. पैसा हवा, मग तो एनकेन प्रकारेण मिळवायचाच अशी मानसिकता स्त्रियांमध्येही दिसू लागली आहे. त्यासाठी तोतयागिरी करणे, परस्पर घरे विकणे, धनादेशांची अफरातफर, आíथक घोटाळे, स्वत:ला अधिकारी भासवून लुबाडणे, शिक्षकी पेशात असताना लेखा विभागात मुख्याध्यापकांकडून केली जाणारी अफरातफर अशा अनेक प्रकारचे गुन्हे या स्त्रियांकडून होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची आणि त्यामागे शाळेच्या मुख्याध्यापिकेचा हात असल्याची बातमी आपण सगळ्यांनीच वाचली होती. हे सर्व गुन्हे करणाऱ्या स्त्रिया या सामाजिकदृष्टय़ा मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित होत्या. नियंत्रण ठेवता न आल्याने वाढतच जाणाऱ्या गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी हाताशी असणारी अपुरी साधने यामुळे गुन्हेगारीमध्ये सापडलेल्या अनेक स्त्रिया मी पाहिल्या.
कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्य़ांमागे एकच एक कारण शोधणे किंवा तसे सापडणे अवघड असते. अनेक कारणांची जंत्री आपल्याला गुन्ह्य़ांचे विश्लेषण करताना उलगडते. तशीच स्त्रियांबाबतही ती उलगडते. स्त्रियांकडूनच स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या कौटुंबिक अत्याचार वा ‘डोमेस्टिक व्हॉयलन्स’च्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते आहे. असुरक्षिततेची भावना किंवा हुकुमत गाजविण्याची वृत्ती किंवा सहनशीलता संपणे, कदाचित स्वत:ची संवेदनशीलता गमावणे अशी अनेक कारणे यामागे असतात. विविध प्रकरणांत वेगवेगळी कारणे पुढेही येतात. पण घरगुती िहसाचार आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग ही एक काळजी करावी अशीच बाब आहे, हे मात्र नक्की. याच निमित्ताने अजून एक बाब माझ्या निदर्शनास आली. जेव्हा घरगुती िहसाचाराचे प्रकरण असते तेव्हा घरातल्याच नव्हे तर अगदी लांबच्या नात्यातल्या स्त्रियांवरही गुन्हे दाखल होतात. त्यामुळे रोज घडणाऱ्या घरगुती िहसाचारात सहभाग नसला तरीही अटक होणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते.
गुन्हे करणाऱ्या स्त्रियांमध्येही आता अनेक प्रकार दिसून येतात. त्यात एखादाच गुन्हा करणारी स्त्री आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या स्त्रिया असे ठळक फरक आहेत. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार वारंवार गुन्हे करणाऱ्यांत स्त्रियांची संख्या ही लक्षणीय असल्याचे म्हटले जाते. ताज्या आकडेवारीनुसार ८० गुन्हे दाखल असणाऱ्या एका सराईत स्त्री गुन्हेगाराचे नावही पुढे आले आहे. पण सरसकट असेच चित्र आहे, असे काही मला वाटत नाही. काही अंशी हे खरे असले तरी अनेकदा आपला मार्ग सुधारू इच्छिणाऱ्या स्त्रियाही मी पाहिल्या आहेत. एखादा गुन्हा घडतोही, पण त्यात पश्चात्ताप होऊन पुन्हा गुन्हा न करण्याची शपथ घेणाऱ्याही अनेक जणी असतात. मात्र अपरिहार्यतेने या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या स्त्रिया काही वेळा इच्छा असूनही या गुन्हेगारीच्या विश्वातून बाहेर पडू शकलेल्या नाहीत, असेही चित्र दिसते.
   मला विशेष लक्ष वेधावेसे वाटते ते खटले दाखल झालेल्या काही स्त्रियांबद्दल.. त्या निर्ढावलेल्या नसतात. पण त्यांचे वकीलच अनेकदा त्यांना योग्य मार्गदर्शन करीत नाहीत. ‘तू गुन्हा कबूल केलास तर तुला भयंकर शिक्षा केली जाईल, अशी भीती वकिलांकडूनच घातली जाते. मग या स्त्रिया गुन्हा कबूल करीत नाहीत आणि वर्षांनुवष्रे त्यांची प्रकरणे प्रलंबितच राहतात, त्यामुळे धड शिक्षाही नाही आणि धड सुटकाही नाही, अशी त्यांची विचित्र कोंडी होताना मी पाहिलेली आहे. आणि हे बदलणे नितांत गरजेचे आहे.
कुणालाही गुन्हेगार म्हणवून घेणे आवडणारे नसतेच. म्हणूनच आवश्यकता असते ती वाट चुकलेल्यांच्या पुनर्वसनाची. महाराष्ट्रात महिलांचे पुनर्वसन केले जात नाही, अशातला भाग नाही. पण येरवडय़ाच्या तुरुंगात ते सर्वाधिक प्रभावी पद्धतीने केले जाते. तसे अन्य तुरुंगांत होताना दिसत नाही. येरवडय़ात राज्य सरकारने ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ अर्थात टिस्स या संस्थेच्या मदतीने तसेच ‘प्रयास’ या संस्थेमार्फत अशा गुन्हेगार ठरलेल्या स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना वेळ दिला जातो, त्यांच्याकडे लक्ष दिले जाते. शिवणकामापासून, हस्तकलांपासून, विणकाम, भरतकाम अशा अनेक बाबी स्त्रियांना शिकविल्या जातात. अनेक स्त्रियांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले मी स्वत: पाहिलेले आहे. पण त्यांची आकडेवारी किंवा प्रमाण समाधानकारक नाही. यासाठी अधिक व्यापक प्रमाणात आणि सार्वत्रिक पद्धतीने प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे, हे नक्की.
या आव्हानाला सामोरे जाताना, एकाच वेळी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थात्मक पातळीवरील प्रयत्न, योग्य समुपदेशन, सामाजिक-आíथक आणि भावनिक बदलांना सामोरे जाता येईल असे कौटुंबिक वातावरण आणि संधी व दर्जातील समता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्री गुन्हेगारीच्या संख्येला आळा बसायला नक्कीच मदत होईल.     
शब्दांकन – स्वरुप पंडित         
swarup.pandit@expressindia.com

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता