27 January 2020

News Flash

आभाळमाया : सृजनशील वारसा

संपूर्ण स्क्रिप्ट तयार होईपर्यंत लेखकाबरोबर बाबांचाही सहभाग असायचा.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती मायाळू

‘‘बाबांचं कामातलं झपाटलेपण मी आधी ऐकलं, मग पाहिलं आणि नंतर अनुभवलंही. संपूर्ण स्क्रिप्ट तयार होईपर्यंत लेखकाबरोबर बाबांचाही सहभाग असायचा. मग त्या काळात ते घरापासून, सहकाऱ्यांपासून ‘डिस्कनेक्ट’ झालेले असायचे. एकच विषय. एकच ध्यास. यात कुठलेही फाटे फुटायला नकोत म्हणून फोनसुद्धा करायचे नाहीत दिवसेंदिवस. शूटिंगच्या वेळी सेटवर मुक्काम करायला मिळाला तर फार आवडायचं त्यांना. त्या वातावरणात सतत स्वतशी संवाद चाललेला असायचा. त्या दिवशी होणाऱ्या सीन्सचा परत परत अभ्यास करायचे. जवळजवळ तीस चित्रपटांचं दिग्दर्शन बाबांनी केलं. त्यांच्याबरोबर मी एडिटिंगचं काम करायला सुरुवात केली आणि मला माझ्या आयुष्याचं ध्येय सापडलं.. चित्रपट क्षेत्राच्या रूपाने त्यांनी मोठा सृजन खजिनाच मला वारशात दिलाय..’’ सांगताहेत संकलक भक्ती मायाळू आपले पिता राजदत्त यांच्याविषयी..

बाबांबद्दलची लहानपणीची पहिली आठवण म्हणजे आईने आम्हा दोघींना सांगितलेलं त्यांचं ‘मोठेपण’. आई नेहमी सांगायची, ‘‘ते खूप कष्ट करतात, काम करतात, म्हणून त्यांच्याकडे मुलांना द्यायला फारसा वेळ नसतो. पण तुम्ही मन लावून अभ्यास करा, मोठय़ा व्हा, म्हणजे त्यांच्या कष्टांचे चीज होईल..’’ आईचं सांगणं तेव्हापासून मनात साठून राहिलं होतं.. नंतर त्याचं मोठेपण प्रत्ययाला येत गेलंही.

मी शाळेत होते तेव्हा आम्ही ठाण्यात राहायचो एकत्र कुटुंबात. आजी, आई, बाबा, आम्ही दोघी बहिणी, काकू, माझी तीन चुलत भावंडं आणि आमच्या सगळ्यांचा लाडका कुत्रा चिकू. बाबा घरी खूपच कमी असायचे. कोल्हापूर, राधानगरी, पुणे अशा विविध ठिकाणी शूटिंग चालू असायचं त्यांचं, त्याशिवाय चित्रपटांचं संकलन, लेखन, गाण्याचं रेकॉìडग अशा सर्वच गोष्टी ज्या चित्रपट निर्मितीमधल्या एक आवश्यक भाग असतात त्यात त्यांचा पूर्ण सहभाग असायचा. त्यामुळे एक तर दिवसेंदिवस बाहेरच असायचे किंवा घरी आले तरी बहुतांशी रात्री आम्ही झोपल्यानंतर उशिरा यायचे आणि सकाळी आम्ही उठण्याआधी कामाला निघालेले असायचे. त्या लहान वयात इतकंच वाटायचं, की बाबा खूप कष्ट करतात. त्यांच्याबद्दलच्या इतर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी हळूहळू मोठी होत गेले तेव्हा समजायला लागल्या.

लहानपणीची एक घटना मात्र अजूनही लख्ख आठवते. एकदा मी, बहीण आणि आई- बाबा बीडला बाबांच्या मित्राच्या घरी चाललो होतो. मुळात बसला उशीरच झाला होता. रात्रीचे अकरा वाजून गेले होते आणि अचानक आमची बस थांबली ती जवळजवळ अर्धा तास. मग समजलं की पुढच्या बसला अपघात झाल्याने सर्व गाडय़ा रस्त्यावरच थांबल्या होत्या; साहजिकच वाहतूक ठप्प झाली होती. इतर प्रवाशांप्रमाणे आम्हीसुद्धा बसमध्येच बसून होतो. बाबा मात्र कधीचेच उतरून कुठेतरी गेले होते. जेव्हा बस सुटायची वेळ झाली तेव्हा आमचा ड्रायव्हर बाबांना शोधत आला. तोपर्यंत बाबा शांतपणे येऊन जागेवर बसलेले होते. बाबांनी आम्हाला काही सांगितलं नव्हतं, पण त्या ड्रायव्हरने सांगितलं की त्या अपघातग्रस्त  बसमधल्या लोकांना बाहेर काढण्यात आणि त्यांना दवाखान्यात पोचवण्यात बाबांनी खूप मदत केली होती. खास करून त्या बसचा ड्रायव्हर, तो जागच्या जागी ठार झाल्याचं वाटून कुणीच त्याच्याकडे गेलं नव्हतं. बाबांनी मात्र त्याला जवळजवळ तिथून ओढून काढून हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि त्याचे प्राण वाचले. आमच्या ड्रायव्हरने बाबांकडे येऊन त्यांचे खूप आभार मानले होते त्या वेळी. आपले बाबा इतरांपेक्षा वेगळे आहेत, हे अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून जाणवायला लागलं होतं.

आणखी एक असाच प्रसंग, आजीने सांगितलेला. तेव्हा पानशेतचं धरण फुटलं होतं. बाबा आणि त्यांच्या पुण्यातल्या मित्रांनी तिथल्या लोकांना वाचवण्याचं मदतकार्य स्वत:हून हाती घेतलं होतं. अक्षरश: खांद्यापर्यंतच्या पाण्यातून लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणं, त्यांचं महत्त्वाचं सामान डोक्यावरून नेऊन हव्या त्या ठिकाणी पोहोचणं, पाण्यात अडकलेल्या लोकांना जेवण पोहोचवणं अशी कामे हे सर्व जण करत होते. पाण्यात उभं राहून राहून त्यांच्या अंगावर फोड आले होते, पण मुळातच दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव, त्यामुळे अशा गोष्टींबद्दलचा बाऊ त्यांनी कधी केला नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला मोठेपणा म्हणून किंवा शिकवण म्हणूनसुद्धा कधी काही सांगितलं नाही. हे सर्व कुठून तरी कळायचं आणि अभिमान वाटायचा.

लहान वयात जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे ते आम्हा  सख्ख्या आणि चुलत भावंडांमध्ये अजिबात फरक करायचे नाहीत. सर्वाना समान वागणूक. एखाद दिवशी घरी असतील तर आम्हा सर्व मुलांना घेऊन फिरायला कोपरीजवळच्या रेल्वे ट्रॅकवर न्यायचे. तिथे पुलावर बसून आम्ही खालून येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन्स बघायचो. त्यांनी कधीही आम्हाला कुठल्या चित्रपट किंवा नाटकाला नेलं नाही. अपवाद एकच, ‘टेन कमांडमेंट्स’ हा इंग्रजी चित्रपट. त्या वेळी ती भाषा किंवा त्यातला आशय फारसा कळला नसला तरी खूप भारावून गेले होते एवढं नक्की. त्यातले काही ‘माइंड ब्लोइंग’ प्रसंग आजही मनात घर करून आहेत. त्या वयात अशा अद्भुत गोष्टी समजल्या नाहीत तरी मनाला खूप आनंद देऊन जातात आणि काहीतरी ‘लार्जर दॅन लाइफ’ करण्याची इच्छा जागृत करतात. शिकवण द्यायला बाबांनी अशी अप्रत्यक्षपणे सुरुवात केली होती. ते कधीही बाजूला बसून आमचा अभ्यास घेत नसत, पण त्यांच्या दैनंदिन जगण्याकडे बघूनसुद्धा शिकण्यासारखं खूप काही होतं. सकाळी लवकर उठणं, अभ्यासाला प्रथम प्राधान्य देणं, वेळच्या वेळी जेवण घेणं, संध्याकाळी न चुकता मोकळ्या हवेत फिरायला जाणं, खेळणं, रात्री लवकर झोपणं या गोष्टी त्यांनी आमच्या आयुष्यात खूप ठामपणे रुजवल्या. त्यांच्या प्रचंड व्यग्र वेळापत्रकामधूनही मला प्रोत्साहन द्यायला माझ्या गॅदिरगला ते आवर्जून यायचेच. आणि एखाद्या वर्षी नाही जमलं तरी ‘मस्त डान्स केलास हं तू’ असं सांगायचे. ‘मी मागे उभा होतो गर्दीत म्हणून तुला दिसलो नाही,’ असंही वर सांगायचे. मग मी हळूच विचारायचे, ‘‘डान्समध्ये मुलींच्या रांगेत मी कितवी होते?’’ त्यांच्या चेहऱ्यावरून मला लगेच समजायचं की बाबा माझ्या नृत्याच्या वेळी पोचू शकले नसले तरी त्यांनी वेळ निभावून नेलीय आणि मुलीला हिरमुसू दिलेलं नाहीये. परीक्षेत खूप चांगले गुण मिळायला हवेत यासाठी आम्हाला ते कधी ओरडले नाहीत, पण दरवर्षी प्रगतीपुस्तक दाखवताना प्रचंड भीती वाटायची. ते फार बोलायचे नाहीत त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय कळायचं नाही. खूप आदरयुक्त भीती असल्याने संवाद फारसे व्हायचे नाहीत. त्यांना शिस्त फार प्रिय. चांगल्या गुणांसाठी अभ्यास करा, असं जरी प्रत्यक्ष म्हणत नसले तरी चांगल्या सवयी लहानपणापासून लागल्या तर त्या आयुष्यभर कामी येतील, यावर त्यांचा विश्वास होता हे हळूहळू कळायला लागलं होतं.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य पुरस्कारांमध्ये बाबांना एखादा तरी पुरस्कार असतोच. आत्तापर्यंत त्यांच्या १३ चित्रपटांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्या चित्रपटाच्या प्रीमियरला, बक्षीस समारंभाला, नातेवाईक, मत्रिणी ,सोसायटीमधले शेजारी असा सर्व लवाजमा जायचा. पुरस्कार मिळाल्यावर रात्री शेवटच्या ट्रेनने घरी येताना बाबा ताईच्या किंवा माझ्या हातात तो पुरस्कार द्यायचे. राज्य शासनाची ती ‘बाहुली’ धरायला खूप जड असली तरी अभिमान आणि आनंद यामुळे मन हलकंफुलकं होऊन उडायला लागलेलं असायचं. पुढे राष्ट्रीय पुरस्कारही

(३ चित्रपटांना) मिळू लागले. त्यांचं वितरण दिल्लीला असतं. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा हा अतिशय मानाचा पुरस्कार! त्यासाठी दोन व्यक्तींची विमानाने जाण्या-येण्याची व्यवस्था आणि तिथल्या हॉटेल ‘अशोका’मध्ये राहण्याची सोय केली जायची. एक प्रवास आठवतोय. बाबांनी विमानाने जाणं टाळलं आणि त्या पैशांमध्ये कुटुंबाला म्हणजे आई, आम्ही दोघी बहिणी, चुलत भाऊ आणि आजी आम्हा सगळ्यांना ट्रेनने दिल्लीला नेलं. ‘अशोका’ हॉटेलमध्ये न राहता त्यांच्या एका स्नेह्य़ाच्या कार्यालयात राहिल्याने थोडेसे हिरमुसलोसुद्धा. पण त्यातच आमची हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, जम्नोत्री, उत्तर काशी अशी ट्रीप  झाली. वेळ नसल्याने आणि त्या वेळी आर्थिकदृष्टय़ाही परवडणार नसल्याने आम्ही फार कधी सहलींना गेलो नाही. पण अशा थोडय़ाफार सहली त्यांनी आवर्जून केल्या आमच्यासाठी. अत्यंत साधे राहायचे, लक्झरीपासून दूर राहण्याचा थोडासा अट्टहासच असायचा. त्या वेळी थोडं मनाविरुद्ध व्हायचं हे सगळं. असं वाटायचं, आपल्याला मिळालाय हा मान तर का नाही उपभोगायचा? पण पुढे त्याही गोष्टींमागची कारणं कळली आणि पटलीही.

बाबांचं चित्रपट क्षेत्र अत्यंत अस्थिर. त्यात त्यांचा अत्यंत मानी स्वभाव. त्यांचा चित्रपट हा त्यांच्या पद्धतीनेच व्हायला हवा. त्यातली मूल्यं तशीच जपली जायला हवीत. समाजप्रबोधन, मनोरंजन, त्यातून शिकवण या आणि अशा अनेक बाबींवर प्रचंड अभ्यास केलेला असायचा चित्रपट लेखनाच्या वेळी. त्यात तडजोड अजिबात चालायची नाही त्यांना. तसं झालं तर स्वत:च्या नावावर आणि त्याबद्दल मिळणाऱ्या मानधनावरसुद्धा पाणी सोडायचे. अशा परिस्थितीत कुठलाही मध्यमवर्गीय माणूस जसा काटकसरीने जीवन जगेल तसेच ते जगले. पण त्यात साधेपणाचाच भाग अधिक. पुढील आयुष्याचे नियोजन फार कमी. नियोजनाचा भाग सांभाळला तो मात्र आमच्या आईने.

बाबांचं कामातलं झपाटलेपण मी आधी ऐकलं, मग पाहिलं आणि नंतर अनुभवलंही. संपूर्ण स्क्रिप्ट तयार होईपर्यंत लेखकाबरोबर बाबांचाही सहभाग असायचा. मग त्या काळात ते घरापासून, सहकाऱ्यांपासून ‘डिस्कनेक्ट’ झालेले असायचे. एकच विषय. एकच ध्यास. यात कुठलेही फाटे फुटायला नकोत म्हणून फोनसुद्धा करायचे नाहीत दिवसेंदिवस. शूटिंगच्या वेळी सेटवर मुक्काम करायला मिळाला तर फार आवडायचं त्यांना. त्या वातावरणात सतत स्वत:शी संवाद चाललेला असायचा. आणि मुक्काम करायला मिळाला नाही तर नऊच्या शिफ्टला ते स्वत: सातला पोहोचायचे. कुठे तरी कोपऱ्यात बसून त्या दिवशी होणाऱ्या सीन्सचा परत परत अभ्यास करायचे. मग बऱ्याचदा स्क्रिप्टमध्ये नसलेल्या गोष्टी सुचायच्या. मला आठवतंय, दूरदर्शनवरील ‘गोटय़ा’ या मालिकेच्या शूटिंगच्या वेळी ते मढ आयलँडला सेटवरच राहायचे. त्या वेळी आम्ही नुकतेच अंधेरीच्या नवीन घरात शिफ्ट झालो होतो. पण ते अनुभवायला बाबा घरी थांबलेच नाहीत. उलट त्यांच्या झोकून देण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना तिथे सेटवर किती तरी नवीन सीन्स, नवीन कल्पना सुचल्या. त्याच्याच परिणामस्वरूप ‘गोटय़ा’ लोकप्रिय झाली. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं हे नक्की..

कधी तरी शूटिंग बघायला गेलो तर मोठे मोठे कलाकार त्यांच्याविषयी खूप आदराने बोलायचे. मग त्यांचा मोठेपणा जाणवायचा. आणि अभिमान वाटायचा. एक गमतीदार किस्सा ऐकलाय. निळू फुले हे त्या वेळचे नावाजलेले कलाकार. पण बाबांच्या झपाटून काम करण्यामुळे अनेकदा शूटिंग रात्री तीन-चार वाजेपर्यंत चालायचं. त्या शिफ्टमुळे बेजार होऊन फुले गमतीने म्हणायचे, ‘‘अरे यांच्या कॉफीमध्ये कोणी तरी झोपेची गोळी घाला रे. म्हणजे हेही झोपतील आणि आम्हालाही झोपू देतील.’’

जवळजवळ तीस चित्रपटांचं दिग्दर्शन बाबांनी केलं, ‘अपराध‘, ‘देवकी नंदन गोपाला’, ‘अरे संसार संसार’,‘ शापित’,       ‘पुढचं पाऊल’, ‘सर्जा’ त्या वेळी ते आणि चित्रपट या दोनच गोष्टी बाबांच्या आयुष्यात प्रामुख्याने होत्या. नंतर हळूहळू त्यांनी आपला मोर्चा दूरचित्रवाणीकडे वळवला. मालिका, टेलिफिल्म्स, माहितीपट, लघुपट, जाहिरात किंवा कॉर्पोरेट फिल्म अशी अनेक कामं सुरू झाली. तिथेही त्यांचे वेगळेपण सिद्ध होत होतंच. माझं त्यांच्याबरोबरचं एडिटिंगचं काम करायला सुरुवात इथंच झाली. अर्थात मी नेहमी अनुभवली ती शिस्तच. त्यांच्याबरोबर एडिटिंगला जायचं तर सकाळी सातला घरातून निघायला लागायचं. ताज्या मनाने कामाला सुरुवात केली की काम  छान होतं, नवनवीन सर्जनशील कल्पना सुचतात, असं त्याचं म्हणणं असायचं. मला त्यांच्याकडून एडिटिंग शिकायचं होतं. त्यामुळे त्यांच्या वेळा पाळणं मला भागच होतं. मला माहीत होतं, त्यांनी सांगितलेल्या वेळी जर मी तयार नसले तर मला घरीच सोडून ते स्टुडिओत निघून जातील आणि मला मागून यायला सांगतील. या भीतीमुळे मी ते निघायच्या आधीच पूर्ण तयार होऊन बसलेली असायचे. सुदैवाने त्या वेळी घरातील इतर सर्व जबाबदाऱ्या माझ्या आई आणि बहिणीने सांभाळल्या होत्या. मग काय, आपण कामाला जाऊ तेव्हा ‘स्टुडिओ इन टाइम’ आणि परत येऊ तेव्हा ‘स्टुडिओ आऊट टाइम’!

एडिटिंग वा संकलन हे मुळातच कमी व्यक्तींचं काम असल्यामुळे स्टुडिओमध्ये माणसंही कमी असतात. दिग्दर्शक, संकलक, त्यांचे सहकारी, फार तर आणखी दोघे-तिघे. बाबांच्या कामाच्या पद्धतीमुळे तिथं शांतता असायची. एखाद्या शांत देवळात आपला देवाबरोबर कसा अगदी ‘वन टू वन’ संवाद होतो तशी त्या स्टुडिओमध्ये माझ्या कामाशी माझी नाळ जोडली गेली ती कायमचीच. आणि मग काय विचारता महाराजा.. आजही जेव्हा संकलनाचं काम अशीच शांततेत करत असते तेव्हा कल्पनाशक्तीला असे काही धुमारे फुटतात, अशा काही गोष्टी सुचतात की माणूस त्या अनुभूतीमुळे किती, कसा, कुठे, चालत, धावत, वाहत जातो ते कळतच नाही.. अतिशय हवंहवंसं वाटणारं हे वेड, ही नशा ही कामातच असते हे मुलांना शिकवणारा त्यांचा पिताच असू शकतो.

काही दिवसांपूर्वी मी संकलन करत असलेल्या ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत जेव्हा सावता माळी या संतांची गोष्ट आली तेव्हा अशा संतांनी आखून दिलेल्या मार्गावर बाबा चालत आले आहेत हे भान आलं.

विठ्ठल माझा मळा.. मी वारकरी आगळा..

बाबांचा देव त्यांच्या कामात आहे. आपल्या कामात रमणारा, रंगणारा, त्याच्या मोबदल्याची फारशी फिकीर न करणारा, त्यातून जमेल तसं आपल्या माध्यमातून लोकांना शिकवणारा, त्यांचं मनोरंजन करणारा, वेळ पडल्यास डोळ्यात अंजन घालणारा हा माणूस सश्रद्ध नाही, असं कसं म्हणायचं? इथं काम शिकवताना, मी मुलगी आहे म्हणून किंवा त्यांची मुलगी आहे म्हणून मला अजिबात सवलती दिल्या नाहीत त्यांनी. मला संकलन शिकवणारे पाठारे सर म्हणायचे, ‘‘आता रात्र झाली आहे, हिला घरी जाऊ देत.’’ तर बाबा म्हणायचे, ‘‘तिला एडिटिंग शिकायचं असेल तर तिने वेळेकडे न बघता काम पूर्ण करायलाही  शिकलं पाहिजे.’’ असं दिवस-रात्र काम करून त्यांच्यामागे ‘एम ८०’वर बसून येणं हाही एक वेगळाच अनुभव. त्यांचं ड्रायिव्हग हे त्यांच्या ‘दत्त’ या नावाला साजेसं. अतिशय संयमित, सुरक्षित. मला रात्रीच्या कामाच्या जागरणाने आणि सकाळच्या गार वाऱ्याने बाइकवरच डुलकी यायला लागायची, तर हे सिग्नलला थांबले की मागे माझ्या पायावर थापटी मारून मला जागं करायचे. घरी आल्यावर मला काही न करता झोपायचं असायचं, तर बाबांचा कडक नियम, आधी गरम पाण्याने अंघोळ, मग गरम दूध घेऊनच झोपायचं. म्हणजे जागरणाचा आणि कामाचा त्रास होत नाही. मी नंतर झोपायची तरी पण हे मात्र अजिबात विश्रांती न घेता त्यांच्या आवडीच्या कामाला म्हणजे स्वयंपाक करायला आईलाही बाजूला सारून उभे राहायचे. कितीही दिवस-रात्र काम करून आले तरी घरी आल्यावर बाबा अवेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी झोपले नाहीत. दुपारची जेवणानंतरची वामकुक्षी मात्र कधी चुकवली नाही. आणि रात्री लवकर झोपण्यावर भर. म्हणजे सकाळी लवकर उठून दुचाकीवरून कामाला जायला सज्ज!

ते त्यांच्या दुचाकीवरून कितीही लांब प्रवास करायचे. चर्चगेट-विरारपासून कल्याण-पुण्यापर्यंत. कधीच कसलीही कुरकुर किंवा तक्रार नाही- ट्रॅफिकबद्दल नाही, रस्त्यांबद्दल नाही, पावसाबद्दल नाही, कंटाळा नाही, नराश्य नाही, सतत उत्साह. आणि आसपासचे लोक धपापून जातील असा वेग, झपाटा आणि धमाका! यातच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्कार भारतीच्या कामांमधली गुंतवणूक सुरू झाली. कलेच्या माध्यमातून देशासाठी काय करता येईल, लोकांवर कसे संस्कार करता येतील, यासाठी देशभर भ्रमंती सुरू झाली. तीसुद्धा त्यांना ‘गोवा मुक्ती स्वातंत्र्य’ चळवळीत भाग घेतल्याबद्दल मिळालेल्या ‘ऑल इंडिया फ्री ट्रेन आणि बस’च्या पासवर. त्यामुळे तोही एक मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा भाग!

आणि आता आणखी एक नवीन इिनग सुरू आहे ती अभिनयाची. बाबा आता त्यांच्याकडे येतील त्या छोटय़ा-मोठय़ा भूमिका करतात. त्यांच्या गुरूच्या- राजा परांजपे यांच्या ‘एक धागा सुखाचा’ या गाण्यांमध्ये तुरुंगामधल्या अधिकाऱ्याच्या वेशात फिरतानाही मी त्यांना पाहिलंय आणि नाना पाटेकरांच्या ‘क्रांतिवीर’मध्येसुद्धा. ‘क्रांतिवीर’मधला हिंदू-मुसलमान यांच्या एकजुटीबद्दल बोलणारा हातगाडी ओढणारा त्यांनी रंगवलेला कामगार फक्त एका सीनमध्ये असूनही लक्षात राहतो. याचं श्रेय बाबांनी त्यांच्या क्लोज शॉटमध्ये दाखवलेल्या सहज आणि संयमित अभिनयाला जितकं आहे, तितकंच त्यांच्यामध्ये मुळातच असलेल्या सर्वधर्मसमभाव या वृत्तीलादेखील आहे, असं मला मनापासून वाटतं.

माझं बाबांशी असलेलं नातं हे कुठल्याही काळजी घेणाऱ्या मुलीचं तिच्या वडिलांशी असतं तसंच आहे. यांच्या चांगुलपणाचा, मोठेपणाचा जितका अभिमान आहे तितकाच त्यांच्या अव्यवहारी वागण्याचा त्रासही होतो आणि मग मी खूप वाद घालते त्यांच्याशी. त्यांनी आता वयाच्या हीरक महोत्सवानंतर दुचाकीवरून फिरू नये किंवा एकटं जाऊ नये, असं माझं म्हणणं हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला नसून माझी त्यांच्याविषयीची काळजी आहे, हे त्यांना कळकळीने पटवून देण्याचा प्रयत्न करते.

एक कलाकार आपल्या मुलांना कलेशिवाय दुसरा कोणता वारसा देणार? चित्रपट क्षेत्राच्या रूपाने त्यांनी मोठा सृजन खजिनाच मला वारशात दिलाय. आता ही कला मी कशी वाढवते, फुलवते हे माझ्या अभ्यासावर, कामावर, मेहनतीवर ठरेल.

मात्र या सगळ्या वेगवेगळ्या ट्रॅक्समध्ये बाबा खरेखुरे रमतात ते दिग्दर्शनातच. तिथे त्यांना कसलंच भान उरत नाही. दिवस-रात्र, नाव, पसा, वेळ, मेहनत, कसलंच नाही. मला खात्री आहे, आत्ता त्यांना एखादा चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळू दे.. ते तासन्तास सेटवर उभे राहून कामाला सुरुवात करतील आणि म्हणतील, स्टार्ट..

साऊंड.. लाइट्स.. कॅमेरा.. अ‍ॅक्शन..

mayaloobhakti@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

First Published on July 20, 2019 1:07 am

Web Title: raj dutt mayaloo bhakti mayaloo abhalmaya special memories article abn 97
Next Stories
1 .. ती देशाला उद्धार
2 मनातलं कागदावर : काळजातलं कुसळ
3 गुंतुनी गुंत्यात साऱ्या..
Just Now!
X