News Flash

जोतिबांचे लेक : नव्या वाटा रुळवणारा संवादी!

गरीब मुस्लीम कुटुंबात जन्मलेला अझिम ऊर्फ राजू इनामदार. शालेय वयापासूनच स्त्रीवरच्या अन्यायाचं भान त्याला आलं आणि वेगवेगळ्या संस्थांशी संलग्न होत त्यानं स्वत:ला समाजकार्यात झोकून दिलं.

कार्यशाळेत दृष्टांत नाटय़ सादर करताना राजू इनामदार

हरीश सदानी – saharsh267@gmail.com

गरीब मुस्लीम कुटुंबात जन्मलेला अझिम ऊर्फ राजू इनामदार. शालेय वयापासूनच स्त्रीवरच्या अन्यायाचं भान त्याला आलं आणि वेगवेगळ्या संस्थांशी संलग्न होत त्यानं स्वत:ला समाजकार्यात झोकून दिलं. समाजकार्याचं रीतसर शिक्षणही घरातल्या अडचणींमुळे तो घेऊ शकला नाही. पण त्यानं आपल्या समाजप्रबोधनाचा झेंडा खाली पडू दिला नाही. समाजभान, पुरुषभान देणारी अनेक गाणी गात, संवादमाध्यमाचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक कार्यशाळा तो घेत आहे. पुरुषत्वाच्या कल्पना बाजूला सारत स्त्रीच्या वेदना जाणून घेऊन त्याविषयी तरुणांमध्ये जनजागृती करणाऱ्या या जोतिबांच्या लेकाविषयी..

‘तू चीज बडी हैं मस्त मस्त..’, ‘जादू तेरी नजर..’ ही आणि तत्सम लोकप्रिय हिंदी गाणी, ‘अवं लंगडं, कसं उडून मारतंय तंगडं’ यांसारखी पारंपरिक तमाशातली, लोकसंगीतातील गीतं, ‘तो’ ऑर्केस्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे गायचा आणि जमलेल्या तमाम लोकांची वाहवा मिळवायचा. पुढे कालांतरानं या गाण्यांमध्ये दडलेल्या स्त्री-वस्तुकरण, पुरुषी वर्चस्व, व्यंग असलेल्या व्यक्तींविषयी अनादर या गोष्टींची जाण आल्यानंतर तो वेगळ्या तऱ्हेची गाणी गाऊ लागला. ‘मैं अच्छी हूँ घबराओ नको, ऐसा खत में लिखो..’ (गीतकार शहनाज शेख आणि गीता महाजन, पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या परदेशस्थित, संशयखोर नवऱ्याला उद्देशून), ‘डोळं तुमचं डोळं, तुमच्या डोळ्यांची मला भीती.. खाली बघून चालू किती..’

(ज्योती म्हापसेकर), ‘अपना दिन हम मनाएं तो बडा मजा आएं..’ (कमला भसीन, सर्वसामान्य स्त्रीच्या माफक अपेक्षा, आकांक्षा व्यक्त करणारं गीत) ही गीतं भारदस्त आवाजात नुसती न गाता, त्यांचा आशय समजावून ती अधिक लोकप्रिय करू लागला आणि असंख्य तरुणांना ‘पुरुषभान’ देत राहिला.

ही कहाणी आहे अझिम ऊर्फ राजू इनामदार याची. पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर तालुका येथील सुमारे ३,००० लोकवस्तीच्या परिंचे गावात राहाणारा राजू. एका सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात जन्मलेला. गावात जसे कुंभारकी, चांभारकी करून उदरनिर्वाह करणारे बलुतेदार होते, तसंच राजूचे वाडवडील बकरं, कोंबडं कापून ‘मुलानकी’ करायचे. गावातील ८-१० मुस्लीम कुटुंबांपैकी ते एक. गावातील रयत शिक्षण संस्थेनं चालवलेल्या शाळेत राजू आपली एक बहीण आणि एका भावाबरोबर शिकत होता. लहानपणापासून राजूला गाण्यांची आवड. नववी-दहावीत असताना दरवर्षी शाळेच्या वार्षिक गॅदरिंगमध्ये तो आवर्जून भाग घ्यायचा आणि गाणी म्हणायचा. पुढे १६-१७ वर्षांचा असताना तो जेजुरी आणि परिसरातील गावांमध्ये भरणारे ऑर्केस्ट्रा बघायला जायचा. तिथल्या आयोजकांना एखादं फिल्मी गीत किं वा लोकसंगीत सादर करण्याची गळ घालायचा. आपल्या सुरेल आवाजानं लोकांना आकर्षित करणाऱ्या राजूला दर वेळी गाणं गायची संधी मिळायची आणि जमलेल्या असंख्य लोकांच्या टाळ्यादेखील.

साधारण १९९२ मध्ये ‘फाउंडेशन फॉर रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ (एफआरसीएच) ही सामुदायिक आरोग्यषियक संशोधन करणारी संस्था राजूच्या परिंचे गावात काम करण्यासाठी आली. कुष्ठरोगी आणि भाजलेल्या व्यक्तींच्या उपचाराविषयी उल्लेखनीय काम केलेले प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन पद्मश्री डॉ. एन. एच. अ‍ॅन्टिया हे संस्थेचे प्रमुख संस्थापक. त्या दरम्यान लोकसंगीतावरील एका स्पर्धेत राजूनं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर पोवाडा रचून गायला होता आणि त्यात त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्याच्यातलं हे कौशल्य ओळखून संस्थेनं राजूला आणि गावातील १०-१२ इतर मुलग्यांना घेऊन ‘समता जनजागरण कलामंच’ नावाचं एक कलापथक उभारलं. आरोग्यविषयक प्रश्नांवर आधारित नवनवीन पोवाडे रचून हे कलापथक गावागावातून सादर करू लागलं. राजू बारावीत शिकत असताना संस्थेनं त्याला आणि त्याच्या कलापथकाला मोठी उभारी दिली. संस्थेच्या नव्यानं सुरू झालेल्या ‘सावली’ प्रकल्पात काम करणाऱ्या वैशाली वैद्य आणि अरविंद वैद्य यांच्या कामाकडे राजूचं लक्ष वेधलं गेलं. शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या राजूनं ‘एफआरसीएच’बरोबर फावल्या वेळात काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि        १९९४ मध्ये त्याला आरोग्य आणि पर्यावरणविषयीचा ‘खेळवाडी’चा उपक्रम पुरंदर तालुक्यातील ३०-३२ वाडय़ांत जाऊन ९ ते १४ र्वष वयाच्या मुलांबरोबर राबवण्याचं काम मिळालं. सामुदायिक आरोग्य म्हणजे केवळ हिवताप, क्षयरोग आणि रोगजंतूंविषयी प्रबोधन नव्हे, तर स्त्रियांना पुरुषांइतकाच दर्जा आणि सन्मान मिळावा, सर्वजण धार्मिक सलोख्यानं, लोकशाही आणि सहभागी पद्धतीनं राहाणं हा व्यापक विचार घेऊन गाणं, चित्रं, नाटुकल्यांद्वारे खेळवाडी उपक्रम चालू होता. राजू दादा येणार म्हटलं की मुलं आनंदून जायची. त्यांना राजूचं बोलणं, त्याचं गाणं, त्याचं शिकवणं खूप आवडायचं.

समता जनजागरण कलामंचासह गाणी, पोवाडे यांबरोबरच अहमदनगरला जाऊन ‘मुलगी झाली हो’ हे नाटक सादर करण्यासाठी संधीही त्याला मिळाली. पण या पथकात केवळ मुलगे होते. स्त्री पात्राची भूमिका करण्यासाठी पथकातील मुलांनी आपल्या बहिणींना तयार करावे, असं आवाहन ‘एफआरसीएच’च्या संघटकांनी केलं. राजू आपल्या बहिणीबाबत आईशी बोलला, पण ‘चांगल्या घरातल्या मुली नाटकात जात नाहीत आणि आपण मुस्लीम असल्यामुळे याबाबत जास्त काळजी घ्यायला हवी,’ अशी समज आईकडून मिळाल्यावर राजू निराश झाला. पण नंतर नाटकाचा विषय कसा स्त्रियांच्या विकासाशी संबंधित आहे आणि त्यात त्याच्या बहिणीनं एखादी भूमिका केल्यानं काही चुकीचं पाऊल म्हणून पाहिलं जाणार नाही, हे पटवून दिलं आणि नाटकासाठी तयार केलं. मग नगरबरोबरच परिंचे गावात आणि इतर गावीही ‘मुलगी झाली हो’ नाटकाचे प्रयोग झाले.

सासवड येथील वाघिरे महाविद्यालयातून कलाशाखेत पदवी घेतल्यानंतर राजूनं मुंबईत येऊन ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’त समाजकार्याचं रीतसर प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं. राजूला आपला मुलगा मानणाऱ्या अरविंद आणि वैशाली वैद्य यांनी नवी मुंबईतील स्वत:च्या घरी त्याची राहण्याची सोय केली. समाजकार्य पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करण्याबरोबरच त्याचा मानवी हक्क आणि हक्काधारित दृष्टिकोन अधिक व्यापक, प्रगल्भ व्हावा यासाठी वैशाली यांनी विशेष प्रयत्न केले. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात विकासाच्या मुद्दय़ांवर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना भेटून राजूला खूप शिकायला, अनुभवायला मिळालं. या सगळ्या शिकण्याच्या अनुभवातील महत्त्वाची निरीक्षणं, नोंदी तो त्याच्या रोजनिशीत नेटकेपणानं लिहू लागला. पुरुषमंडळी नोकरी-व्यवसाय करून कमावून आणतात त्याचं अनेक जण कौतुक करतात. स्त्रिया घराबाहेर जाऊन मिळवत्या झाल्या तरी सकाळपासून रात्रीपर्यंत करीत असलेल्या असंख्य ‘घरकामां’चं मोल सहसा समाजात दिसत नाही. किंबहुना ते ‘काम’ म्हणून पाहिलंच जात नाही. या अदृश्य स्वरूपात असणाऱ्या कामाला भूमिका, नाटय़रूपानं मूर्त स्वरूप देऊन पुरुष  आणि स्त्रीच्या श्रमविभागणीचा प्रसंग उभा करत, त्यातला दृष्टांत आणि मर्म वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये राजू समजावू लागला. आठ-दहा महिने नवी मुंबईत राहिलेल्या राजूला गावी आई-वडील दोघे दुर्धर आजारानं ग्रस्त झाल्याचं कळल्यानंतर  समाजकार्याचं शिक्षण घेण्याचं स्वप्न बाजूला सारत गावी परतावं लागलं.

राजूचा ध्येयवाद, जिद्द आणि त्याच्या क्षमता ओळखून ‘एफआरसीएच’नं त्याला पुन्हा काम दिलं. हळूहळू राज्यभरातील विविध संस्था, संघटना राजूला संवादमाध्यमांविषयी कार्यशाळा, प्रशिक्षणं घ्यायला बोलावू लागल्या. ‘महिला सर्वागीण उत्कर्ष मंडळ’ (मासूम), ‘साथी-सेहत’, राष्ट्र सेवा दल, ‘बायफ’ (भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन), ‘मावा’ (मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅण्ड अब्युज), ‘आरोग्यभान’ या स्वयंसेवी संस्थांबरोबरच ‘युनिसेफ’ तसंच ‘यशदा’ (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी), ‘माविम बार्टी’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांसारख्या शासकीय संस्थांकरिता २००१ पासून राजूनं नियमितपणे कार्यशाळा घेतल्या. समाजप्रबोधनाकरिता गाण्यांच्या सीडी, प्रशिक्षण मार्गदर्शिकांची (मॅन्युअल्स) निर्मिती केली. घरातील परिस्थितीमुळे समाजकार्याचं रीतसर प्रशिक्षण राजूला घेता आलं नाही. पण यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय (सातारा), कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन, समाजकार्याचं पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शेकडो मुलामुलींना संवादमाध्यमांची कौशल्यं त्यानं शिकवली. जुन्या हिंदी आणि मराठी फिल्मी गीतांच्या चालींवर आधारित सामाजिक जागृतीपर नवीन गाणी रचण्यासाठी राजूनं अनेक तरुणांना प्रेरित केलं. मात्र ती जुनी गाणी स्त्रिया आणि इतर समाजघटकांचा अवमान करणारी नसावीत याची दक्षता घ्यायला सांगितली. नवीन रचलेली गाणी जरी चांगल्या आशयाची असली तरी ती ऐकणाऱ्याला जुन्या मूळ गाण्यांचं स्मरणदेखील होतं, हा त्यामागचा विचार.

राजूच्या सर्जनशीलतेच्या वाटचालीत मोलाची भर पडली ती गेली दोन दशकं नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे यांच्याबरोबर अनेक वेळा काम करण्याची संधी मिळाल्यामुळे. पहिल्यांदा राजूचा पेठे यांच्याशी परिचय झाला तो २००१ मध्ये नंदुरबार येथील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात आदिवासी पाडा स्वयंसेवकांना मातामृत्यू दर आणि बालमृत्यू दर थांबवण्याबाबत प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमात. ‘दलपतसिंग येती गावा’ (माहितीच्या अधिकारावर आधारित), ‘समाजस्वास्थ्य’ (रघुनाथ धोंडो कर्वेच्या कार्यावर आधारित) आणि ‘सत्यशोधक’ (जोतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित) या अतुल पेठे दिग्दर्शित नाटकांच्या प्रस्तुती प्रक्रियेत राजूनं भरीव कार्य केलं. नटांसाठी आयोजित कार्यशाळांमध्ये नाटकातील सामाजिक, राजकीय विचार समजावण्याचं, गाणं रचण्याचं कौशल्य देण्याचं काम तो करायचा.

चार वर्षांपूर्वी पेठे यांच्याबरोबर साकारलेल्या ‘रिंगण नाटय़ा’द्वारे राजूच्या प्रयोगशीलतेला उभारी मिळाली. रिंगण ही वारकरी संप्रदायातील क्रिया. समविचारी व्यक्तीचे हात एकत्र असणं, त्यांच्यात रिंगण तयार व्हावं, यापासून बोध घेत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी रिंगण नाटय़ाची निर्मिती झाली. विवेकवादाची मशाल तेवत ठेवून ‘अंनिस’च्या कार्यकर्ते आणि कलाकारांना राजू आणि अतुल पेठे यांनी प्रशिक्षित केलं. त्यांच्या १६ गटांनी तयार केलेल्या रिंगण नाटय़ांचेही सुमारे एक हजार प्रयोग झाले. गेली तीन र्वष ‘परिवर्तन’ संस्थेबरोबर राजू तीव्र मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी कलात्मक संवाद करून त्यांना भक्कम आधार देत आहे.

राजूच्या व्यक्तिमत्त्वाची एक महत्त्वपूर्ण ओळख आहे, ती त्याची पत्नी आयेशाशी असलेला त्याचा भावबंध, प्रेम आणि निष्ठा. लग्न होऊन त्यांची मुलगी (आरजू) जन्मल्याच्या सहा महिन्यांनंतर आयेशाला तीव्र स्वरूपाच्या संधीवाताचा आजार झाला. निसगरेपचार आणि इतर शक्य ते सर्व उपाय करून झाले. गेल्या १४ वर्षांपासून ती व्हीलचेअरवर आहे. तिचं जगणं सुसह्य़ व्हावं यासाठी राजू सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तिच्या दीर्घ आजाराविषयी पहिल्यांदा कळल्यावर नातलगांपैकी अनेक जणांनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. त्या वेळेस ‘‘माझ्या बाबतीत असा दुर्धर आजार झाला असता तर आयेशाचं दुसरं लग्न करण्यासाठी तुम्ही तयार झाला असता का?’’ असं विचारून राजूनं त्या सर्वाना निरुत्तर केलं.

कुठल्याशा एका कार्यक्रमात सुमारे १३ वर्षांपूर्वी एका अनामिक कवीचं गीत राजूच्या कानी पडलं. त्यानं भारावून आपल्या आवाजात ते गीत गाऊन लोकप्रिय केलं. ध्वनिमुद्रित केलेलं ते गीत ‘यूटय़ूब’वर उपलब्ध असून त्या गीताच्या या ओळी राजूबाबत किती चपखल लागू होतात, नाही का?

‘आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो

वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो..’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 1:39 am

Web Title: raju inamdar jotibachi lek dd70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : स्वप्नांची ‘शोधयात्रा’!
2 साडीला ‘डिझायनर’ स्पर्श
3 घरकामाचे मोल
Just Now!
X