६ जुलैच्या पुरवणीमधील ‘चतुरंग मैफल’मधील ‘या जगण्यावर..’ हे सुप्रसिद्ध गायक अरूण दाते यांचे  संगीतक्षेत्रातील मनोगत वाचले. स्वत: प्रसिद्धीच्या एका उत्तुंग ठिकाणी पोहोचल्यानंतरही दाते यांनी अत्यंत मनमोकळेपणाने अगदी पारदर्शकतेने लिहलेले हे स्वगत वाचून मन भारावून गेलं. सच्चा कलावंताचा हाच खरा रत्नपैलू असतो. म्हणजे असे की दाते यांनी सर्वप्रथम हे अगदी प्रांजळपणाने कबूल केले की एखादे गाणे चिरंतन टिकायला सर्वप्रथम त्याची कविता अप्रतिम असावी लागते. त्याचे संगीत चांगले व श्रवणीय असावे लागते तेव्हाच ते गाणे वर्षांनुवर्ष श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवते, अमर होते.
काही वर्षांपूर्वी कै. वा. रा. कांत यांनी लिहिलेले, स्व. सुधीर फडके यांनी गायलेले व यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेले ‘त्या तरूतळी विसरले गीत’ या भावगीतांबद्दल लिहितांना मी ‘लोकसत्ते’तीलच एका लेखात लिहिले होते, मराठी गेय कविता अधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय झाली ती त्यातील भावप्रधान रचनेच्या सहजशैलीमुळे. एखादं भावगीत सर्वतोमुखी व लोकप्रिय होण्यासाठी त्यातील सहजगेयता, सरळ सोपी पण भावस्पर्शी शब्दरचना, अर्थवाही अभिव्यक्ती या गोष्टी जितक्या आवश्यक आहेत तितकेच महत्त्वाचे आहे भावगीत गायकाचे कसब, सुरेल आवाज, तरबेज गायकी अन् जोडीला मिळालेलं श्रवणमधूर संगीत. अशा गीतातील शब्द रसिकांच्या ओठावर सहजी येतात अन् मग हे लोकप्रिय गीत अजरामरपणे आपलं अमरत्त्व मोठय़ा प्रेमानं मिरवीत असतं. माझ्या वडिलांच्या ‘सखी शेजारिणी’ या भावगीताचाही मोठय़ा आदरभावानं मी उल्लेख केला आहे. १९४४ साली लिहिलेलं हे भावगीत संगीतकार कै. वसंत प्रभू यांच्या बरोबर अरुण दाते यांनी १९६७ साली एच. एम. व्ही.साठी गायलं होतं. शुक्रतारा प्रमाणेच ‘सखी शेजारिणी’ हे भावगीतही आज ४६ वर्षांनंतरही मराठी रसिकांच्या मनात हिंदोळत असतं. याचं सर्व श्रेय तिघांचं मिळून असलं तरी दाते यांनी मनाच्या मोठेपणानं ते श्रेय इतर दोघांना देऊ केले आहे. ऑक्टोबर २०१३ पर्यंत कै. वा. रा. कांत यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू आहे. या काळातच एका दिग्गज अन् तितकाच निर्मळ मनाच्या गायकानं त्यांच्या नावाचं स्मरण केलं ही त्यांनी वा.रा. कांतांना वाहिलेली एक आदरांजलीच आहे. अन् यासाठी मी अरूण दाते यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
-मु. वा. कांत, मालाड मुंबई

‘दर्जेदार शब्दमैफल’
नुकताच उत्तराखंड प्रांतात जो महाप्रलय झाला त्या भयानक परिस्थितीमध्येही एक तरुणी निश्चयाने उभी राहते व हजारो यात्रेकरूंना सर्व प्रकारचा आधार देते.
 या धाडसी तरुणीचे, (पुष्पा चौहान )आणि तिच्या शब्दाचा मान राखणारे संपूर्ण गाव (एक समजूतदार गाव- ६ जुलै) या सर्वाची कौतुकास्पद कामगिरी शब्दबद्ध करणारा आरती कदम यांचा लेख माणुसकी म्हणजे काय ते सांगणारा असून देशातील सर्वच गावांनी तो आदर्श मानून ध्यानात ठेवावा असाच आहे.
‘तेजस्वी शलाका’ येसूवहिनी सावरकर यांनी स्वातंत्र्यलढय़ात जे कार्य केले ते रोहिणी गवाणकर यांनी अधोरेखित केले. ज्यांना स्वातंत्र्यलढय़ात तुरुंगवास घडला ते स्वातंत्र्यसैनिक अशी जरी परिभाषा असली तरी तुरुंगात गेलेल्या स्वातंत्र्यलढय़ातील अनेक पुरुषांच्या माता, भगिनी, पत्नी यांनीही मूकपणे त्यांचे कार्य सुरू ठेवले होते व यामध्ये सावरकरांच्या कुटुंबातील व इतरही सर्व क्रांतिकारकांच्या घरातील स्त्रियांनी मोठे कार्य केले आहे- त्यांना विसरून चालणार नाही याची आठवण करून दिली आहे. पुरुष क्रांतिकारकांची नावे इतिहासात लिहिली गेली पण त्यांचे घरदार-संसार सांभाळणाऱ्या स्त्रिया मानसिक, सामाजिक, राजकीय त्रास सोसत होत्या- हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्याही स्वातंत्र्यलढय़ातील सहभागाचे कौतुक केलेच पाहिजे- त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. हा विषय सर्वानाच विचार करायला लावणारा आहे.
गायक अरुण दाते यांनी आपल्या सुरेल आवाजाने जग जिंकले आहे पण चतुरंगची त्यांची शब्दांची मैफल-आठवणींचा मागोवा घेणारा षड्ज-अतिशय छान व भावस्पर्शी आहे. त्यातही त्यांनी नाशिकच्या कार्यक्रमाची जी आठवण सांगितली आहे त्यावरून गाणे-संगीत हे व्यसनाधीन झालेल्या एखाद्या तरुणाला कसे व्यसनमुक्त करू शकते- जीवनावर-जगण्यावर शतदा प्रेम करायला लावते, कवीचे शब्दसामथ्र्य व संगीतकाराचे संगीत काय करू शकते याचे उत्तम उदाहरण आहे!
पुरवणीतील इतरही सर्व लेख उत्तम आहेत. यातून एक दर्जेदार शब्दमैफल सादर करण्याचा जो ध्यास आहे त्या प्रयत्नांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
– निळकंठ नामजोशी, पालघर.

असेही काही तृतीयपंथी
८ जूनच्या गीतांजली राणे यांच्या ‘एक टाळी..’च्या निमित्ताने हा पत्रप्रपंच. चर्चगेट स्टेशनला दुपारच्या वेळेस गाडी लागलेली असेल आणि आपण येऊन बसलो की लगेच झकपक साडय़ा नेसून नट्टापट्टा केलेले तृतीयपंथी येऊन आपल्या डोक्यावर हात ठेवून पैसे मागायला सुरुवात करतात. आपल्याला दुवा देत असतात.  बरेच जण त्यांच्या ‘दुवा’ चांगल्या असतात असे मानून त्यांना पैसे देतात. जे देत नाही त्यांना ‘बद्दुवा’ द्यायलादेखील ते कमी करत नाही. त्यामुळे प्रत्येकजणत्यांना घाबरून एकतर डोळे मिटून घेतात किंवा दुसरीकडे पाहायचा बहाणा करतात. पण यालादेखील काही अपवाद असतात, त्याचे हे अनुभव.
१. दुपापर्यंत चर्चगेटला ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी असते. तशीच मच्छिमार बायांचीदेखील लगबग चालू असते. कुलाब्यावरून आणलेली मासळी अंधेरी, वसई येथे नेऊन काही मच्छिवाल्या विकतात. त्यांच्या मोठय़ा मोठय़ा पाटय़ा हमालाकरवी विरार लोकलमध्ये ठेवायची त्यांची धांदल चालू असते. त्या वेळेस त्यांची बास्केट्स, त्यांनी घरी न्यायला घेतलेल्या वस्तू इ. सामान सांभाळायचे काम एक तृतीयपंथी करत असतो. त्यांच्या पाटय़ा व्यवस्थित ठेवल्या की नाही यावर लक्ष देणे, त्यांना तेवढय़ा वेळात स्टॉलवरून खाऊ आणि पाणी आणून देणे ही सर्व कामे तो चटचट करत असतो. सर्व मच्छिवाल्या मावशांचा ‘सुशीला’, ‘सुशीला’च्या नावाचा जप चालू असतो. काही मिनिटांची ही गडबड असते. पण अगदी नियमित जवळपास दररोज. शेवटी सगळ्यांच्या पाटय़ांना हात लावून तो ‘गूडलक’ करतो. त्या वेळेस मावश्या त्याला कधी मच्छी, कधी पैसे तर कधी खाऊ देतात. ते घेऊन तो आनंदाने धावत्या गाडीतून उतरतो. असे दुपापर्यंत त्याचे काम चालू असते. मुख्य म्हणजे इतरांसारखे तो पैसे मागत नाही.
२. वेस्टर्न रेल्वेच्या प्रवाशांना सेंट्रल रेल्वेचा प्रवास म्हणजे महादिव्य वाटतं. पण काही कामानिमित्त आम्हाला एकदा ठाण्याला जायची वेळ आली. जातानाचा प्रवास ठीक झाला येताना मात्र बऱ्यापैकी गर्दी होती. त्यामुळे दादर येण्याच्या दोन-तीन स्टेशने आधीच आम्ही बाहेर येऊन उभे राहिलो. नंतरच्या स्टेशनला गर्दीचा आणखी लोंढा आत आला आणि आम्हाला खूप जोराचा धक्का लागला. मी जरा रागानेच मागे पाहिले पण पाहताच माझे धाबे दणाणले. मागे एक धट्टाकट्टा तृतीयपंथी उभा होता. मी जरा घाबरतच म्हणाले, ‘आप धक्का मत मारो’ त्यावर उत्तर आले, ‘बहेनजी मैने धक्का नही मारा, पिछेसे प्रेशर आ रहा है, लेकीन आप डरो मत, अब धक्का नही आयेगा.’ त्यानंतर दोन स्टेशने आली गेली; गर्दी अजून वाढली, पण आम्हाला अजिबात धक्का लागला नाही. मी पाहिले तर त्यांने आपले दोन्ही हात दोन बाजूला पकडून मागचा गर्दीचा सगळा लोंढा आपल्या अंगावर घेतला होता. आम्हाला मात्र त्यांनी सुरक्षित ठेवले.  
-मॅटिल्डा डिसिल्वा, वसई

स्मृतींना उजाळा मिळाला
१३ जुलैच्या चतुरंग पुरवणीमधील इंदिरा संतांच्या आठवणीनिमित्त प्रकाश नारायण संतांचा लेख छापून आणण्याचे जे औचित्य साधले त्याबद्दल संपादकांना किती धन्यवाद द्यावेत?
आई व मुलामधील मुलायम संबंधाचे हळुवार वर्णन प्रस्तुत लेखात संतांनी केले आहे. या लेखाच्या निमित्ताने संतांच्या ‘पंखा, वनवास, शारदा संगीत व झुंबर’ या कथासंग्रहांची मराठी वाचकांना दिलेल्या अमूल्य भेटीची आठवण झाल्यावाचून राहत नाही. संतांनी आपल्या सहज-सोप्या, आशयगर्भ व प्रत्ययकारी लिखाणाने रसिक वाचकांवर असे काही गारूड केले आहे की ज्याचे नाव तेच.
संतांनी या चार ग्रंथांद्वारे मराठी साहित्यात एक अमूल्य भर घातली व वाचकांना श्रीमंत करून ठेवले. त्यांच्या पुढील पुस्तकांची वाचक आतुरतेने वाट पाहात असताना हा विलक्षण लेखक त्यांना कायमचे पोरके करून गेला व काहीतरी गमावल्याची हुरहुर निर्माण करून गेला. इंदिरा संत व प्रकाश नारायण संतांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!
– हेमचंद्र गोपाळ दांडेकर, नाशिक

विश्वास हाच नात्यांचा आधार
इच्छाशक्ती व चिकाटी या दोन गुणांच्या बळावरच माणसाची स्वप्ने साकार होतात हे सिद्ध करणारी ‘एक अटळ हळवा प्रवास’ ही माधुरी ताम्हणे लिखित कहाणी (चतुरंग १५ जून) एका आदर्शवत पिता-पुत्राच्या अमर्याद अंतर्मनाची साक्ष पटविणारी होती.
नुकतेच अंबरनाथ येथील ‘कमलधाम’ वृद्धाश्रमाला भेट देण्याचा योग आला. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी करताना प्रत्येकाने आपल्या जखमा उघडय़ा केल्या. प्रसिद्ध चित्रकार एम. आर. आचरेकर यांच्यासोबत कुंचल्यातून रंग उधळलेले, नोकरीनिमित्त सिंगापूर, मलेशिया, दुबई येथे वास्तव्य केलेले, पण पत्नीचे निधन झाले व लगेच दोनही डोळ्यांची नजर गेली म्हणून मुलगा असूनही या वृद्धाश्रमात येऊन पडलेल्या कुलकर्णीकाकांनी आपले अंतर्मन उघडले व ेबोलते झाले, ‘मला दु:ख आहे ते एकाच गोष्टीचे, पत्नीच्या रूपातील माझा खरा रंग पुसला गेला आणि जीवनच रंगहीन झाले.’
सचिवालयात त्या वेळी राजपत्रित अधिकारी म्हणून काम केलेले, चांगल्या पगाराची नोकरी असलेला मुलगा पदरी असलेले सावंतकाका पत्नीच्या निधनानंतर आजारी अवस्थेत येथे दाखल झाले. तीन महिने झालेत, मुलाने तोंड दाखवले नाही. जन्म-मृत्यूमधील प्रत्येकाचा प्रवास अखेर अटळ आहे. फक्त या प्रवासात एकमेकांना विश्वासात घेणारे सच्चिदानंद व निखिलसारखे पिता-पुत्र असतात तेव्हा तो प्रवास भले कितीही खडतर असो, जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे हे सिद्ध करणारा ठरतो.
-सूर्यकांत भोसले, मुलुंड

मार्गदर्शनपर लेख
२९ जून २०१३ ची ‘चतुरंग’ पुरवणी अप्रतिम व वाचनीय आहे. हातातून खाली ठेवू नये असेच वाटत होते. त्यातील लेख अगदी मनाला भिडणारे आहेत. ‘बळी असंवेदनशील व्यवस्थेचा’ हा अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर यांचा लेख वाचून बलात्कार झालेल्या स्त्रीला किती दिव्यातून जावे लागते ते समजले. ‘हे जीवन सुंदर आहे’ हा डॉ. अंजली पेंडसे यांचा लेखही विचार करावयास लावणारा आहे.
‘एक उलट, एक सुलट’ हा अमृता सुभाष यांचा लेख वाचनीय असतो. गौरी कानिटकर या ‘तिचं, त्याचं लाइफ’ या सदरातून भावी वर-वधूंना मार्गदर्शन करीत असतात. ‘डॉक्टरांच्या जगात’ हा डॉ. वर्षां दंडवते यांचा डॉक्टर्स डेनिमित्त लिहिलेला लेख वाचला. सर्वात शेवटी लेखाचा कळस म्हणजे ‘चतुरंग मैफल’मधील स्मिता तळवलकरांचे मनोगत आहे, असे वाटते.
 – माधवी जोशी, ठाणे</strong>