‘फिटे.. नैराश्य कृष्णमेघी’ या १४ जूनच्या ‘फादर्स डे’निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली. हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक भागांतून फोन आले कारण आम्हीही रामकृष्ण मरकडेय यांच्याच नावेत बसलेले आहोत. त्यांच्या वेदना, त्यांचे दु:ख, त्यांच्या यातना साऱ्या आमच्याच आहेत, असे हा लेख वाचताना पदोपदी जाणवत होते.
रामकृष्ण यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी जी हिम्मत दाखवली ती निश्चितच अन्य पालकांना प्रेरणादायी आहे. मतिमंद पाल्य जन्माला आले की त्याच्या आई-वडिलांची होणारी कुचंबणा आम्ही अनुभवली आहे, अजूनही अनुभवत आहोत. समाजव्यवस्था अशा मुलांना नीटपणे जगू देत नाही. आई-वडील असेपर्यंत थोडा तरी निभाव लागतो, पण त्यानंतर मात्र सारे परमेश्वराच्या हाती सोपवावे लागते.
एक मतिमंद मूल सांभाळताना, आईवडील मेटाकुटीला येतात. आपल्या सबंध आयुष्याचे गणित चुकले म्हणून आयुष्यभर रडत बसतात. आपल्या पश्चात मुलांचे काय होणार या काळजीने ते अहोरात्र जळत असतात. या पाश्र्वभूमीवर रामचंद्र यांची तर तीनही मुले सौम्य डाऊन सिंड्रोमची. त्यांनी त्यांना सक्षम बनवले, जगण्यालायक केले, हे अर्थातच त्या कुटुंबाचे धाडस म्हणायला हवे. त्याबद्दल त्यांना श्रेय द्यावेच लागेल.
किंबहुना अन्य पालकांना हे प्रेरणादायी उदाहरण म्हणून ठसठशीतपणे दाखवणे गरजेचे आहे. या लेखामुळे आमच्यासारख्या पालकांना एक नवा आदर्श घालून दिला आहे. भविष्याच्या उदरात काय दडलेले आहे हे कुणालाच माहीत नसते. पण सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल कदाचित उद्यासाठी येणाऱ्या एखाद्या संधीचे दार उघडू शकते, हे रामकृष्ण मरकडेय यांनी सिद्ध केले आहे. प्रत्येक ओळ, त्यातील शब्द वाचताना, अंत:करणात ज्या वेदना होत होत्या त्या शब्दांत व्यक्त करता येणे कठीण आहे. ‘फादर्स डे’निमित्ताने अनेक लेख छापून आले, पण या लेखाने एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. मरकडेय यांच्या धाडसाला मी सलाम करतो. परमेश्वर त्यांच्या मुलांना नेहमी निरोगी व आनंददायी ठेवो, अशी विनम्रपणे प्रार्थना करतो.
माझाही मुलगा त्याच अवस्थेतून गेला आहे. आज तो २५ वर्षांचा असून, नववीपर्यंतचे शिक्षण असूनही एका मोठय़ा टेक्सटाइल अभियांत्रिकी महाविद्यालयात साहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. ही मुले स्टिरिओटाइप कामे चांगली करतात, हे जाणून आम्ही त्याला संगणकाचे शिक्षण दिले.
आज संपूर्ण ताकदीनिशी तो आपले काम सांभाळतो. याची दखल घेऊन २००९ साली भारत सरकारने त्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान केला. २०१२ साली आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ग्रंथालय क्षेत्रात काम करणारा जगातील तो एकमेव मतिमंद मुलगा ठरला. आम्हाला त्याचा आज अभिमान वाटतो.

आधुनिक ऋषीमुनी
२१ जून रोजी ‘झाली फुले कळ्यांची’ या सदरात आलेली डॉ. रवी कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांची मुलाखत खूपच आवडली. विशेष म्हणजे एका कामानिमित्ताने आम्ही मागील वर्षी त्यांच्या घरी गेलो होतो त्या वेळच्या आठवणी ताज्या झाल्या. खरोखरच हे दाम्पत्य अगदी साधेपणाने राहते. गावातील घर म्हणजे कौलारू व शेणाने सारवलेले आहे. अजूनही चुलीवर स्वैंपाक होतो. पायात टायरच्या बनवलेल्या रबरी चपला! स्मिताताईंच्या अंगावर अक्षरश: एकही दागिना नाही. आम्ही खरे म्हणजे त्यांना काही मदत करता येईल का या दृष्टीने गेलो होतो, पण कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत तर त्यांनी नाकारलीच; पण तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन, इथे राहून कामात मदत करू शकता असे सुचवले. अर्थात आमचा फुगा फुटला हे सांगायला नकोच. देवळात जाऊन पैसे टाकून दानधर्म केल्यासारखी समाजसेवा करता येत नाही हेही उमजले. पण त्यांचे खूप कौतुक वाटले. इतक्या लांब आपल्या लोकांपासून इतके दूर, दळणवळणाची काही साधने नसताना, राहण्याच्या काही सुखसोयी नसताना राहणे सोपे नाही. तेही नेहमीसाठी व यापूर्वी पूर्णपणे शहरी आयुष्य जगलेले असताना. विशेष म्हणजे त्यांची मुलेदेखील त्याच वातावरणात वाढली आहेत. हे लोक म्हणजे आधुनिक ऋषिमुनीच. त्यांच्याकडे पाहून आपल्याला आपल्या जीवनशैलीविषयी पुनर्विचार करावासा वाटतो व आत्मपरीक्षण करण्याची इच्छा बळावते.
राधा कठाळे, नागपूर</strong>

सामाजिक बांधीलकी
 ७ जूनच्या अंकातील ‘वळसा वयाला’ हा संपदा वागळे लिखित लेख मनाला खूप भावला. स्मिता जोशींसारख्या व्यक्तींचे कार्य वाचून आपण किती सामान्यातले सामान्य आहोत याची जाणीव होते. हा लेख वाचून लगेचच भारावलेल्या अवस्थेत एक चेक ‘बांधीलकी’च्या पत्त्यावर पाठवला. माझ्याप्रमाणेच अनेक जणांची अशी अवस्था झाल्याचे समजले.
वीणा कुलकर्णी