News Flash

पडसाद : शाळेत सामाजीकरणाचे फायदेच!

१८ जुलैच्या अंकात ‘होम स्कूलिंग- मुलांचं शाळाबाह्य़ शिक्षण’ हा लेख वाचला. ‘होम स्कूलिंग’बाबत या लेखात चांगली माहिती दिली असली, तरी मुख्य प्रश्नांची उत्तरं  मिळत नाहीत.

पडसाद : शाळेत सामाजीकरणाचे फायदेच!
संग्रहित छायाचित्र

१८ जुलैच्या अंकात ‘होम स्कूलिंग- मुलांचं शाळाबाह्य़ शिक्षण’ हा लेख वाचला. ‘होम स्कूलिंग’बाबत या लेखात चांगली माहिती दिली असली, तरी मुख्य प्रश्नांची उत्तरं  मिळत नाहीत. अर्थपूर्ण शिकणं- ज्यामध्ये निसर्गात जाऊन शिकणं आहे, संस्था भेट आहे, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे, हे सर्व होम स्कूलिंगप्रमाणेच मुलं शाळेत जात असतील तरी होऊ शकतं. गरज असते ती मुलांच्या शिक्षणाबाबत दक्ष अशा पालकांची अथवा शिक्षकांची. शाळेत जाण्यामुळे इतर गोष्टींसाठी वेळ कमी मिळतो असंही नाही. वर्षांत २२० दिवस, रोज ८ तास चालणारी शाळा गृहीत धरली, तरी उपलब्ध वेळेच्या फक्त २० टक्के इतका वेळच शाळेत खर्च होतो. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक शिक्षण प्रक्रियेत शाळेचा अडथळा कसा हे स्पष्ट होत नाही.

सामाजीकरणाबद्दलदेखील मांडलेले विचार पटत नाहीत. होम स्कूलिंग करणारी मुलं ज्याप्रमाणे त्यांच्या इयत्तेबाहेरील मुलांशी मैत्री करू शकतात, ते शाळेत शिकणारी मुलंदेखील शाळेत, अथवा शाळेच्या बाहेर करू शकतात. सामाजीकरणामध्ये जे फायदे होम स्कूलिंगवाल्यांना मिळतात, ते फायदे शाळेत जाऊन शिक्षण घेणाऱ्यांना मिळतातच, पण त्यापलीकडे जाऊन त्यांना शाळेत होणाऱ्या सामाजीकरणाचे फायदेदेखील मिळतात. सामाजीकरणाच्या अनेक संधी शाळेत उपलब्ध असतात. उदा. एखाद्या प्रकल्पाची तयारी, स्नेहसंमेलनासाठी बसवलेलं एखादं नाटुकलं, खेळांच्या स्पर्धा, सहल, एकत्र डबा खाणं, मधल्या सुट्टीत लिहायचं पॅड घेऊन क्रिकेट खेळणं, वर्गात मिळालेली सामूहिक शिक्षा या सगळ्याच्या दर वर्षी घेतलेल्या अनुभवाचा एकत्रित परिणाम म्हणजेच शाळेतलं सामाजीकरण. याचा अनुभव होम स्कूलिंगवाल्या मुलांना मिळत नाही.  शाळेचा आणखी एक फायदा म्हणजे मुलांना नावडत्या गोष्टींना- म्हणजे नावडते शिक्षक, नावडते विषय, धडे, उपक्रम, वर्गमित्र या गोष्टींना तोंड कसं द्यायचं याचं शिक्षण मिळतं. त्याचबरोबर येणारं अपयश, कटू अनुभव आदी पचवायची वा त्यातून मार्ग काढायची तयारीदेखील होते. हे शिक्षणदेखील महत्त्वाचं. कारण सर्वच विषय फक्त आवडीचेच असतील असं होत नाही. मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक पालक दक्ष नसतात. अनेकदा पालकांना मुलांसाठी वेळ देता येत नाही. असं असेल,

तर होम स्कूलिंगपेक्षा शाळा केव्हाही चांगली. आणि पालक दक्ष असतील, मुलांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असेल, तरी वाढीव सामाजीकरणाच्या फायद्यामुळे शाळा केव्हाही चांगली.

– भालचंद्र गोंधळेकर, पुणे

‘विद्यार्थ्यांचा सक्षम आधार’मधून प्रश्नांची उत्तरं मिळाली 

माझ्या मुलानं दहावीची परीक्षा दिली. निकालापूर्वीच्या काळात माझ्या मनात असंख्य विपरीत प्रश्न होते. माधुरी ताम्हणे यांच्या ‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ या सदरातील ‘विद्यार्थ्यांचा सक्षम आधार’ या लेखात (२५ जुलै) त्या अव्यक्त प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि धीर आला. त्याबद्दल त्यांचे आभार.

– धनंजय गायकवाड, विरार

शाळेचा अडथळा कसा?

चेतन आणि प्रीती एरंडे या पालकांचा ‘होम स्कूलिंग- मुलांचं शाळाबाह्य़ शिक्षण’ हा लेख (१८ जुलै) वाचला. मुलांनी शाळाबाह्य़ शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाऊ नये, हे मत पटत नाही. मुलाला शाळेव्यतिरिक्त कोणत्याही शिकवणीला पाठवलं नाही, शाळाबाह्य़ संस्थांच्या परीक्षांना बसवलं नाही, शाळेत उत्तमच गुण मिळवण्याचा आटापिटा केला नाही, तर मुलाला शाळेव्यतिरिक्त भरपूर वेळ मिळतो. शिवाय शनिवार-रविवार धरून शाळेला बऱ्याच सुटय़ा असतात. त्याव्यतिरिक्त अगदी जरुरी असेल तेव्हा शाळेला एखाद्दोन दिवस सुटी घेता येते. घरात नुसता टीव्ही जरी बराच वेळ लावला नाही, तरी मुलांना बराच मोकळा वेळ मिळतो. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे.

एखाद्या कलेत प्रावीण्य मिळवण्याबरोबर बालवयात मुलांना शाळेच्या विश्वात रमणं तेवढंच महत्त्वाचं- जे आयुष्यात पुन्हा कधी मिळणार नाही. शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर जी सर्वागीण वाढ होते, ती होम स्कूलिंगनं मिळेल का? तुमच्या अंगात उपजत कलागुण असतील तर त्याचं सादरीकरण करताना शिक्षकांकडून मिळणारी दाद, कौतुक हे वेगळाच आनंद देतं. शाळांमधूनच स्पर्धा रूपानं कलागुणांना लहान वयात खरा वाव मिळतो. तेव्हा मुलांच्या कला शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये शाळेचा अडथळा होतो हे पटत नाही.

– श्रीनिवास डोंगरे, दादर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 2:50 am

Web Title: readers letter to editor chaturang 08082020 padsad dd70
Next Stories
1 माझ्या मित्रा!
2 मैत्री रिफ्रेश करताना…
3 जीवन विज्ञान : शिजवणं: एक विज्ञान
Just Now!
X