काही वर्षांपूर्वी मी ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’वरची  एक कथा वाचली होती. एक जोडपे एकमेकांवर प्रेम करत असतात. लग्न करून परदेशी जातात. त्यांचे करियर तिथे सुरू होते. त्यातल्या तिला प्रकर्षांने जाणीव होते की आपले करियर इथे नाही भारतातच सुरू होऊ  शकते. दोघेही समजूतदारपणे वेगळे व्हायचा निर्णय घेतात. ती भारतात परतते, परंतु काही महिन्यांतच दोघांनाही कळते की आपण जीवनसाथी म्हणून तिसऱ्या व्यक्तीचा विचारच करू शकत नाही, पण करियरही सोडू शकत नाही. मग ते  चर्चा करून ‘लॉँग डिस्टन्स रिलेशनशिप’चा पर्याय स्वीकारतात. तेव्हा मला प्रश्न पडला होता, की असे होऊ शकते का?  पण ३० जानेवारीच्या ‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ या सदरातील ‘उत्तरायणाचे गहिरे रंग’ या लेखातील  तारक काटे आणि मोनिका बुलिटा या जोडीकडे पाहिले अन् वाटले, होय, असे होऊ शकते. त्यासाठी जात, देश, वय कशाचेही बंधन येऊ शकत नाही. फक्त एकमेकांची ओढ, विश्वास, प्रामाणिकपणा अन् समजूतदारपणा काफी है, हा विश्वास हे जोडपे देते.  कारण दोघे गेली दहा वर्षे हे नाते टिकून आहेत. खरं आहे, उत्तर आयुष्यात कुठल्याही कारणामुळे  एकटे राहण्याची वेळ आली तर लिव्ह इन् रिलेशिनशिपमध्ये राहणे अधिक सोयीचे आहे हे अनुभवाचे बोल पटतात. विशेष म्हणजे मुलांनी पुढाकार घेणे  हेही छान वाटले.  या विषयावर सदर सुरू केले व एका प्रश्नाला विचार करायला वाचकांना उद्युक्त केले यात शंका नाही. एरवी ज्येष्ठ नागरिकांचा विचार  फारसा केला जात नाही. मी तर म्हणेन, एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठांची संसारातील लुडबुड थांबावी किंवा लांब राहत असतील तर त्यांची सोय व्हावी म्हणून तरी सर्वांनीच या गोष्टीचा विचार करायला हवा. तरीही हे प्रमाण वाढले पाहिजे. यामुळे बरेच प्रश्न  सुटू शकतात.

– उमा मोकाशी, पुणे</strong>

स्त्रियांना सक्षमीकरणासाठी आणखी वाव द्यावा

नीलम गोऱ्हे यांचा ‘दशकाचा सामाजिक लेखाजोखा’ (३० जानेवारी) लेख वाचला. लेख अतिशय आवडला, कारण त्यात त्यांनी अतिशय मोजक्या शब्दांत दशकातील स्त्रियांच्या बाबतीत सकारात्मक आणि नकारात्मक घडलेल्या गोष्टींचा लेखाजोखा मांडलेला आहे. या जागतिकीकरणाच्या युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रातच आपला वेगळा ठसा उमटवताना दिसत आहेत. गेल्या दशकात स्त्रियांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात आर्थिक साक्षरता वाढली, स्त्रियांचा खूप मोठा वर्ग हा सरकारच्या वित्तीय समावेशनाच्या प्रयत्नांतून आर्थिक प्रक्रियेत सहभागी झाला आहे हे कळते. येणाऱ्या काळात शाश्वत विकास साधायचा असेल तर यामध्ये ‘स्त्री’या घटकाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण स्वीकारलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमधून प्रतीत होते. स्त्रियांची निवडणुकीतील भूमिका, निर्णयप्रक्रियेतील सहभाग, मंदिर प्रवेशाबद्दलची आंदोलने आणि इतर असेच उपक्रम या सगळ्यावरून समजते, की स्त्री खूप सक्षम होत चालली आहे. सक्षमीकरणाची ही वाटचाल अशीच निरंतर राहो यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होऊन स्त्रियांना आणखी वाव दिला पाहिजे .

– इंद्रजीत ढेंगे, बीड

‘महात्मा’ जाणलेल्या बालीच्या लेकी

‘बालीच्या बालिका’ हा ‘वसुंधरेच्या लेकी’ सदरातील सिद्धी महाजन यांचा लेख (३० जानेवारी) वाचला. आजपर्यंत प्लास्टिक ही समस्या फक्त भारतात असेल असे वाटत होते. संपूर्ण जगभरच ती असेल असे वाटत नव्हते. बाली बेटावर मात्र मेलाती आणि इसाबेल या मुलींनी आपल्या देशात जर ही मानवी आपत्ती येत असेल तर ती नष्ट करण्याची जबाबदारी न कळत्या वयात स्वीकारली, तीही एका महात्म्याच्या प्रेरणेतून! केवळ एकदा साबरमतीला भेट दिलेल्या या मुलीं, जर महात्मा गांधींसारखे उपोषण करून आपले इप्सित साध्य करत असतील तर आपण का मागे राहायचे?, सत्याग्रह करून काय घडू शकते?, हे या मुलींनी जाणले. बालीच्या लेकींनी उचललेला प्लास्टिकमुक्तीचा विडा के वळ इंडोनेशियासाठीच नाही, तर भारतीयांनाही प्रेरणादायी आहे. ७० वर्षांत आपल्या देशात ज्यांनी या महात्म्याला ओळखले नाही, त्याच देशाच्या महात्म्याला या दोन लेकींनी जाणले हे महत्त्वाचे.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

‘पडसाद’ तुमच्यासाठी

नवीन वर्ष सुरु झालं म्हणता म्हणता जानेवारी महिना संपलाही. ‘चतुरंग’ ने यंदाही तुमच्यासाठी वाचनाचा भरघोस ठेवा आणला आहे. विविध कंगोरे मांडणारे वेगवेगळे विषय, नामवंतांचे अनुभव, त्यांच्या मुलाखती या सगळ्यांमुळे तुमच्याही विचारांत, अनुभवांत नक्कीच भर पडत असेलच. काय आहे तुमचा अनुभव या सदरांविषयी आणि पान १ वरच्या लेखांविषयी. आम्हाला नक्की कळवत राहा. ‘पडसाद’ हे सदर याच साठी आहे. तुम्ही मोकळेपणाने आम्हाला कळवू शकता तुमची मते. अगदी मतभेदही मुक्तपणे नोंदवा. ठोस विचार मांडणारी पत्रे नक्कीच प्रसिद्ध केली जातील. फक्त आणि फक्त मराठीमध्ये पाठवलेलीच  पत्र प्रसिद्ध केली जातील. इमेल करताना सब्जेक्ट मध्ये ‘चतुरंग पडसाद’ असा उल्लेख करावा.

– आमचा पत्ता ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com