बलात्काराचा अर्थ शोधण्याकरिता पुरुषांच्या लेखणीतून उतरलेले चार लेख(१०ऑक्टोबर) ही मूळ संकल्पना, त्यावरील लेख आणि पुरुष लेखकांनी या समाज-दुखण्याची केलेली चिकित्सा हा संपूर्ण उपक्रम अतिशय सार्थक आणि आगळावेगळा आहे. लेखाबरोबर दिलेली चित्रेही अर्थवाही आहेत.

आवेशी प्रतिक्रियांमुळे फारसे काही साधत नसते. त्याऐवजी अशा उपक्रमांमुळे परिपक्व चिंतन, मंथन आणि प्रबोधन घडून व्यक्ती व समाज दोघेही पुढे जातात. हे पुढे जाणेसुद्धा पर्वतारोहण करताना होते तसे-पुढे जाता-जाता वरच्या पातळीवर जाणेही घडत असते.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

‘माझे पुरुषाचे तन’ हा डॉ. मोहन देस यांचा लेख अतिशय समयोचित, मुळात जाऊन विचार करणारा आणि तर्कसंगत मांडणी करणारा आहे. त्यामुळे तो सार्थकही आहे, कारण तो संवेदनशील असूनही भावुक नाही. मोहन देस हे या प्रश्नाबाबत लेखनासोबतच क्रियाशीलसुद्धा आहेत ही विशेष बाब आहे.

पुरुषांच्या हातून घडलेल्या किंवा त्यांनी केलेल्या लैंगिक अपराधाबद्दल फार दु:ख वाटावे, वेदना व्हाव्यात, या प्रवृत्तीची चीड यावी, येथपर्यंत वाटणे साहजिक आहे. हाथरस, उन्नाव, हिंगणघाट, दिल्लीची निर्भया किंवा रिंकू नावाच्या मुलीला परीक्षा हॉलमधे जाळून मारणे (आता याचा विसरही पडला असेल) अशा सर्व प्रकरणांनी मन सुन्न व्हावे, हादरून जावे, हेही स्वाभाविक आहे. किंबहुना अपरिहार्यपणे या प्रतिक्रिया संवेदनशील समाजात व्हायलाच पाहिजेत. पण अशा पुरुषांना भर चौकात

फाशी द्या, यांनाही जाळून मारा, यांचे लिंग कापून टाका अशी गर्जना करणाऱ्या व्यक्ती किंवा समुदाय क्रौर्याची प्रतिक्रिया देतात तेव्हा काळजी वाटते. तो तसा विकृत पुरुष, रोगग्रस्त मनाचा आहे, पण कुणा स्त्रीचाच मुलगा, भाऊ किंवा पती आहे आणि असा ‘बदला’ घेण्याच्या प्रतिक्रियांतून प्रश्नाकडे डोळसपणे, सखोलपणे, सुजाणपणे न पाहता वरवरची अशी प्रतिक्रिया प्रतिहिंसाच ठरेल.

बलात्कार हे केवळ लैंगिक अत्याचार नसून ते हिंस्त्र राजकारण आहे, या लेखात बालाजी सुतार यांनी त्याचे सत्ता-समीकरणात्मक गणित फार प्रभावीपणे उघड केले आहे. डॉ. तांबोळींनी याच्याशी संबंधित पौरुषाची विकृती आणि समाजाची दांभिकता या शरमेच्या बाबी असल्याचे भान करवून दिले.

मुळात जाऊन लैंगिक अत्याचार करण्याची पुरुषी प्रवृत्ती का व कशी निर्माण होते, त्याचे मूलग्राही विश्लेषण करून काही पैलू या मांडणीत आलेत. ही फार सकारात्मक आणि परिणामकारक दृष्टी आहे. अशा मांडणीतून प्रबोधन आणि खरे उपाययोजन घडण्यास मोलाची मदत होते. लेखकांचे व ‘लोकसत्ता-चतुरंग’चे अभिनंदन! या व अशा लेखांचे संकलित पुस्तक प्रकाशित व्हायला हवे. याचे स्थाई मूल्य आहे, दीर्घकाळ महत्व आहे.
-अशोक बंग, वर्धा</strong>

अपरिहार्य म्हणून ‘निरोगी विलगता’ स्वीकारावी 

‘सायक्रोस्कोप’ सदरामधील (‘निरोगी विलगता’- १७ ऑक्टोबर) मंथन विचार करायला लावणारे वाटले. पाल्यांनी पालकांना प्रेमप्रकरणाचा दोन वर्षांंपासून सुगावा लागू न देणे, ही बाब पालकांना क्लेशदायक वाटणे साहजिकच आहे. पण यात अहंभावातून उद्भवलेल्या मानहानीच्या भावनेचा प्रादुर्भावच जास्त वाटतो. कायम संपर्कात असणाऱ्या पाल्यात हा वयानुरूप होणारा बदल पालकांच्या लक्षात येऊ नये, हे पालकांचे अपयश समजावे लागेल. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीतील सूक्ष्म बदलांकडे डोळेझाक होत असेल तर आपली त्यांच्यात असलेली भावनिक गुंतवणूक तोकडी म्हणावी लागेल. एका ठरावीक वयानंतर प्रत्येक जण एका कोषातच वावरत असतो. स्वत:ला समजून घेणाऱ्यांना त्यात आपोआप सामावून घेतले जाते. त्यामुळे कित्येकदा मुलांनी आई किंवा वडील यातील त्यांच्या कोषात असलेल्या व्यक्तीजवळ सर्व भावना व्यक्त करण्याचीही उदाहरणे पाहायला मिळतात. आता प्रश्न निर्माण होतो तो भावनिक विलगतेचा. एका ठरावीक टप्प्यावर जर भावनिक विलगता सुरू केली तरच नंतर अपेक्षाभंगाचे दु:ख पातळ होऊ शकते. अन्यथा उपदेशाचे तत्त्वज्ञान कितीही दिशादर्शक असले आणि तत्त्वत: मान्य होणारे असले, तरी पूर्वीपासून बनलेल्या मानसिकतेत अचानक बदल होणे कठीण असते. पूर्वापार चालत आलेल्या वानप्रस्थाश्रमाच्या संकल्पनेतूनच सध्याची ही निरोगी विलगीकरणाची कल्पना आलेली असावी. त्यामुळे जसा एखाद्या व्याधीबरोबर सुरुवातीला प्रवास करताना त्रास होतो, तसा विलगीकरणात होणारच. पण काळानुसार सवयीने त्याची तीव्रता कमी होईल. दुसरे असे, की निरंतर प्रेमापोटी ही भावना झालेली असल्याने त्यातून दीर्घकालीन दुरावा निर्माण होण्याची शक्यता नसते. तरीही विलगतेतून आलेली अलिप्तवादाची फुंकर दिलासादायक ठरेल हे नक्की.

एका चाकोरीतून वर्षांनुवर्षे संस्थेचा कारभार यशस्वीपणे चालू शकतो, नाही असे नाही. परंतु नवीन पदाधिकाऱ्यांची नवी धोरणे अधिक परिणामकारक ठरू शकतात. म्हणून त्याच्याकडे कुतूहलाने पाहून त्याचे दीर्घकालीन परिणाम क्षितिजावर दिसेपर्यंत निरोगी विलगता दोघांना फायदेशीर ठरेल. नवीन मंडळींची नवी तडफ जास्त सोईची असू शकते, दूषित पूर्वग्रहानं त्याकडे पाहून अस्वस्थ होण्यापेक्षा लांब राहा, धीर धरा, काय घडते त्याच्याकडे काळजीपूर्वक नजर ठेवा, समोरच्यांना गरज भासली, त्यांनी मदतीसाठी हाक मारली तर मात्र  संगीत मानापमानचे नाटय़ न रंगवता पुढे व्हा. यास निरोगी विलगता म्हणावी लागेल.

भावनिक निकटतेचे चक्रव्यूह भेदून प्रत्येकाने घेतलेल्या मताचा आदर करणे शिकायला हवे. या दोन्ही उदाहरणांतील विलगता डोळस असावी असे वाटते. ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी’ अशी  मनोवृत्ती असेल तर के व्हाही या सुहृदांच्या अडचणीच्या हाकेला ‘ओ’ देण्याची तत्परता दाखवता येईल.
– नितीन गांगल, रसायनी.