मी ३७ वर्षीय अभियांत्रिकी प्राध्यापक आहे.  गेल्या १३-१४ वर्षांत अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले.  त्यातला एखादा उत्तीर्ण होऊन गेलेला विद्यार्थी जेव्हा मला फोन करतो तेव्हा मला खूप आनंद होतो. मलाही वाटायचं की, आपल्या शिक्षकांना फोन करायला हवा; पण जमत नव्हतं. मात्र आता टाळेबंदीच्या दिवसांत मात्र मी ठरवून माझ्या सर्व शिक्षकांना (अगदी पहिली ते पीएच.डी.पर्यंत ज्यांचे मोबाईल नंबर मिळतील त्यांना) सविस्तर पत्र लिहायचं ठरवलं, अर्थात व्हॉट्सअ‍ॅपवर. यानिमित्तानं या शिक्षकांनी माझ्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांबद्दल त्यांचे मनापासून आभार मानायचे होते.  हे ठरवलं आणि ते प्रत्यक्षात आणलंही.  हे करत असताना काही शिक्षकांनी माझ्या पत्राला उत्तरे पाठवली आणि काहींनी फोनही केले. काहींच्या डोळ्यांत अक्षरश: आनंदाश्रू होते. त्यांच्याकडून मला उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आशीर्वाद मिळाले.  मी भरून पावलो..  याचबरोबर सध्या मी आणखीन एक काम करत आहे. माझ्या विद्यार्थ्यांना ‘फेसबुक’वर त्यांची चौकशी करणारे वैयक्तिक मेसेज पाठवतो, रोज दहा विद्यार्थ्यांना. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या शिक्षकांनी इतक्या वर्षांनंतर केलेला मेसेज पाहून त्यांनासुद्धा खूप आनंद होतो आणि मला वेगळं समाधान मिळतं.

– रवींद्र मुंजे

चैतन्याचे स्रोत

मला झाडांची विलक्षण आवड आहे; परंतु कामाच्या अतिव्यग्रतेमुळे त्याकडे म्हणावं  तसं लक्ष देता आलं नव्हतं. वर्षभरापूर्वी आम्ही मेघालय येथे गेलो होतो.  तिथे बांगलादेशाच्या सीमेजवळ जगातलं सगळ्यात स्वच्छ म्हणून ओळखलं जाणारं मावीलांग या गावी जाता आलं. तेथील लोकांचं पर्यावरणप्रेम काही वेगळंच आहे.  अनेकांनी आपापल्या घराभोवती ऑरकिड्सच्या वेगवेगळ्या  जाती जतन केल्या होत्या. परसात, अंगणात, कुंपणावर सर्वत्र पसरवल्या होत्या. तिथे फिरत असताना  त्याच्याच विविध जाती पाहायला मिळाल्या. गावातील लोकांनी त्याची अगदी प्रेमाने माहिती  दिली, तर काहींनी ऑरकिड्सची रोपं भेट म्हणून दिली. मी ती घरी आल्यावर शास्त्रीय पद्धतीनं  लावली; पण रोजच्या धकाधकीत म्हणावं तितकं लक्ष पुरवता आलं नव्हतं आणि अचानक ‘करोना’मुळे  वेळच वेळ मिळाला. रोज येणाऱ्या बातम्या अस्वस्थ करत असत.  काही सुचेनासं झालं होतं. या वेळी तिथून आणलेली ही आर्किड्स जवळची वाटली. पुरेशा देखभालीनं त्यांच्यात चैतन्य निर्माण झालं. ती  तरारली, बहरली. काहीशा दुर्मीळ असलेल्या टेरेटवांडाला देखणी फुलं आली.  त्याबरोबरीने गुण लागल्यासारखी इतरही रोपं बहरली. माझ्या छंदाला पूर्णत्व मिळालं. हा निसर्गाचा जणू संकेतच वाटला. कृत्रिम सुखाच्या मागे धावताना हे चैतन्याचे स्रोत दुर्लक्षित राहिले होते. आताच्या संकटाच्या काळात हीच फु ले आशा पल्लवित करत आहेत..

– किशोर केळकर