News Flash

पडसाद : उर्मिला पवार यांचेही योगदान महत्त्वपूर्ण

लेखिकेने अथैय्या यांना तत्कालीन दलित समाजातील लोकांची व विशेषत: स्त्रियांची परिस्थिती समजावून सांगितली.

(संग्रहित छायाचित्र)

ज्येष्ठ साहित्यिक उर्मिला पवार यांचा ‘अथक होमवर्कचं फळ’ (२४ ऑक्टोबर) हा ‘ऑस्कर’ पुरस्कारप्राप्त वेशभूषाकार भानू अथैय्या यांची एकूणच ओळख करून देणारा लेख वाचला, अतिशय आवडला. भानू अथैय्या यांनी डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून घेतलेली मेहनत लेखिके ने अतिशय ओघवत्या भाषेत शब्दबद्ध केली आहे. मितभाषी असलेल्या अथैय्या यांनी आपली चित्रकला जोपासलीच, पण वेशभूषाकार म्हणून त्या आपले काम कशा प्रकारे ‘होमवर्क’ करून निष्ठेने पूर्ण करीत, हेही नेमकेपणाने मांडले आहे. अथैय्या यांना तत्कालीन परिस्थितीनुरूप वेशभूषा साकार करण्यासाठी प्रस्तुत लेखिका उर्मिला पवार यांचीही कशी मदत झाली, हेही समजले. लेखिकेने अथैय्या यांना तत्कालीन दलित समाजातील लोकांची व विशेषत: स्त्रियांची परिस्थिती समजावून सांगितली. त्यानुसार त्यांचे कपडे, ते नेसण्याची पद्धत, जातीचिन्हे, गंडे-दोरे इत्यादी बारकावे लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे लेखिकेने साडय़ांचे मोठे दोन बॉक्स मिळवले, मण्यांच्या गळसऱ्या, मण्यांचे जाडसर मंगळसूत्र, नथ, कुडी, बुगडय़ा, असे विविध दागिने बाजारातून निवडून आणले, नात्यातल्या बायकांकडून कथलाचे गोट, नाकातले चाप, दंडातली वाकी अशा वस्तू मिळवल्या. शिवाय अथैय्या यांना सोबत घेऊन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळच्या लोकांकडून तत्कालीन फोटो मिळवण्यापासून ते राजगृहातील बाबासाहेबांच्या फोटोंचे प्रदर्शन दाखवणे, आदी प्रसंगांतून लेखिकेचेही या चित्रपटासाठी लाभलेले योगदान अधोरेखित होते. याच चित्रपटाच्या सेटवर घडलेला ‘भीमबाबा’चा विनोदी प्रसंग लेखिकेने अतिशय परिणामकारक चितारला आहे.
– प्रा. उत्तम भगत, भाईंदर (ठाणे)

मनस्वी भावलेली कथा
‘मनातलं कागदावर’ या सदरात उज्वला रानडे यांचा ‘बेबी बंप’ (१७ ऑक्टोबर) ही कथा वाचली. गर्भवती असणे हा स्त्री जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण मानला जातो, पण वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक स्थितीतल्या दोन स्त्रिया आणि त्या दोघींच्या जगण्यातील महदंतर लक्षणीय पद्धतीने आणि प्रकर्षांने लेखातून आलेले दिसते. एका स्त्रीच्या दुसऱ्या बाळंतपणाची बातमी करण्यासाठी धडपडणारे वृत्तवाहिनीचे मालक आणि आपण गरोदर आहोत हे इतरांना कळले तर नोकरी जाईल ही टाळेबंदीच्या काळातील पत्रकारिता क्षेत्रातील विवंचना, नोकरी गेली तर घर कसे चालवावे, हा प्रश्न नजरेसमोर ठेवून गर्भाला सैलसर टॉपमध्ये दडवू पाहणारी नेहा. एका ‘बेबी बंप’ला कॅमेऱ्यात कैद करण्याची धडपड, तर दुसरीकडे आपला ‘बेबी बंप’ किती दिवस आणि कसा लपवता येईल याची काळजी, असे विरोधाभासी वास्तव येथे आढळले.  नेहाच्या करिअरमधील चढ-उताराला समर्थ साथ देणारा तिचा नवरा विक्रम हा अतिशय ‘मॅच्युअर’ वाटला. दुसरीकडे अभिनेत्री उर्वशीच्या चार्टड फ्लाइटला एक तास उशीर झाल्यामुळे नेहाच्या मैत्रिणीबरोबरच्या गप्पांमधून पत्रकारिता क्षेत्रातील नोकरीची अनिश्चितता, बेभरवशाचा मोबदला अन् सतत कॅमेऱ्याच्या झगमगाटात राहूनही अंतर्मनात दडलेली दुखरी सल- जी कधीही प्रेक्षक रसिकांना दिसत नाही, ती सहजपणाने उघडी करून दाखवणारी ही कथा मनस्वी भावली.
– प्रा. सखाराम कदम, परभणी

शासनाने दखल घ्यावी
निशा अनुराधा लक्ष्मीराणी  यांचा ‘ जावे महिला पोलिसांच्या वंशा’ हा १७ ऑक्टोबरचा लेख वाचला. लेखात महिला पोलिसांचे कार्यक्षेत्र जवळ किंवा २०० किलोमीटर परिसरातील असावे, असे मत व्यक्त केले आहे.  सरकारी नोकरीतील नवरा बायको यांना ही सवलत दिली जाते, पण खासगी अथवा शेतकरी/ स्वयं उद्योजक यांच्या पत्नीला ही सवलत वरिष्ठ अधिकारी नियमावर बोट ठेवून नाकारतात, ही गोष्ट चुकीची आहे. एक तर संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली पाहिजे कारण महिला पोलिसांना अन्य विवाहित महिलांप्रमाणे नोकरी व घर सांभाळावे लागते.  लेखात नमूद केल्याप्रमाणे महिला पोलिसांचे कार्यक्षेत्र दूर असल्याने त्यांची मानसिक अवस्था द्विधा राहाते  व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम  होतो. माझ्या मते या लेखाची दखल घेऊन शासनाने/ पोलिसांच्या कार्मिक विभागाने यात महिला पोलिसांचे बदली धोरण सुधारावे.
– श्रीकांत सातपुते

निरोगी विलगीकरण हवेच
‘सायक्रोस्कोप’ या सदरातील  ‘निरोगी विलगता’ हा लेख वाचला, कळत्या वयापासून स्वत: आत्मसात करावी अशी ही प्रक्रिया आहे. हे काम फार सोपे तर नाहीच नाही. मात्र, जीवन जगताना निरोगी विलगीकरण असले तर आयुष्य नक्कीच निरोगी होणार हे शंभर टक्के खरे. विपशना या ध्यान साधनेतही असेच अलिप्तता भाव संस्कारित करण्यास शिकविले जाते. एखाद्या व्यक्तीत, वस्तूत असलेली लिप्तता, प्रेम, मोह काहीही असणे जितके सोपे, तेवढेच अलिप्तता, विलगीकरण कठीण जाते. लेखात सांगितलेले उपाय चांगले आहेत. मात्र  भावनिक यातना किंवा मोह आवरणे हे जरा कठीण जाते. सजगता, साक्षीभाव येत गेला की विलगीकरण थोडे थोडे का होईना सोपे होत जाते. अशा कठीण विषयावर सध्याच्या प्रचलित शब्दात निरोगी विलगीकरण हा लेख भावला.
– अंजु निमसरकर , नवी दिल्ली

महिला पोलिसांचा विचार व्हावा
‘जावे महिला पोलिसांच्या वंशा’हा लेख वाचला. त्यात महिला पोलिसांच्या अडचणी दिलेल्या आहेत. आणि त्या अडचणी खऱ्या आहेत. सरकारी खात्यात प्रशासकीय कारणांमुळे बदली होण्यापूर्वी, बदली होण्यास पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तीन शहरांची/गावांची नावे विचारली जातात. पण त्या विकल्पानुसार सर्वाना बदली मिळतेच असे नाही. आणि बदलीच्या आदेशानुसार बदली झालेल्या ठिकाणी जाणे कर्मचाऱ्याला अडचणीचे असले तरी त्याबाबत बदलीला स्थगिती मिळत नाही, तर आधी आदेशात दर्शविलेल्या ठिकाणी रुजू होण्यास व नंतर विनंती अर्ज करण्यास सांगितले जाते. पण त्यानंतर त्या विनंती अर्जाबाबतची कार्यवाही कधीही प्राधान्याने होईलच असे नाही. लेख वाचल्यानंतर असे वाटते, की फक्त पोलीस प्रमुख महिला होण्यापेक्षा महिलांचेच स्वतंत्र पोलीस खाते निर्माण झाले तर? काही फरक पडेल का? याचाही विचार व्हावा. त्यासाठी प्रथम महिला गृहमंत्री झाली पाहिजे.
– मनोहर तारे ,पुणे

‘प्री-नॅप अ‍ॅग्रीमेंट’ला भारतात मान्यता नाही
वृद्धांच्या सहजीवनाबद्दलचा डॉ. राधिका टिपरे यांचा ‘नवे बंध अनुबंध’ (३१ ऑक्टोबर) हा लेख वाचला. सुरुवातीला अशा जाणकार लेखाबद्दल अभिनंदन. हा एक नवीन, महत्त्वाचा विचार आहे, जो समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य नक्कीच उन्नत करेल. त्याचे मी खरोखर कौतुक करते. परंतु गेली ३० वर्षे वकिली पेशात असल्याने हे सांगू इच्छिते की, या लेखात उल्लेख के ल्याप्रमाणे भारतीय कायद्यात ‘विवाहपूर्व करार अर्थात प्री-नॅपच्युअल अ‍ॅग्रीमेंट’, म्हणजेच लग्नानंतर घटस्फोट झाल्यास एकमेकांच्या संपत्तीवर अथवा वडिलोपार्जित संपत्तीवर कोणताही हक्क सांगता येणार नाही, यासंबंधीच्या कराराची  संकल्पना नाही आणि ती  बेकायदेशीर समजली जाते. मी कौटुंबिक न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असल्याने वाचकांसाठी ‘प्री-नॅप’ कराराबाबतचा पैलू आवर्जून स्पष्ट करावासा वाटला म्हणून हा पत्रप्रपंच.
– अ‍ॅड. भावना जाधव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:39 am

Web Title: readers letters to editor chaturang 07112020 dd70
Next Stories
1 उत्तरायणातले सहजीवन
2 नवे बंध अनुबंध
3 गर्जा मराठीचा जयजयकार : पारंपरिक मराठी शाळांचे प्रयोग
Just Now!
X