२७ मार्चचा ‘ट्रॅजेडी क्वीन’ हा अरुणा अन्तरकर यांचा मीनाकुमारीविषयीचा लेख उत्तम! तिच्या सौंदर्याचे एक एक पदर उलगडताना तिच्या उभ्या आयुष्यात झिरपलेल्या दु:खाची, वेदनेची अत्यंत आपुलकीनं दखल घेतली आहे. जिनं दु:खालाच अंतरीचा ठेवा म्हणून जपलं होतं तिला सुखाचा हेवा तो काय वाटणार! तिच्या एकाकीपणाची व्याप्तीच इतकी विशाल आणि घनदाट, की कणभर सुखाला तिथं जागा नसावी असं वास्तव ती जगली. वयाच्या  ३९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या मीनाकुमारीचा आवाज वेदनेनं, कारुण्याच्या ओलाव्यानं ओतप्रोत भरलेला आणि थेट काळजाला भिडणारा होता. निर्भेळ प्रेमासाठी तिनं खूप तडजोड केली. खोटी सहानुभूती दाखवून स्वार्थ साधून माणसं निघून गेली. तिला जे हवं होतं ते मात्र कधीही मिळू न देण्यातच नियतीनं धन्यता मानली!

हेमंतकुमार मेस्त्री, वसई रोड

मीनाकु मारीविषयीचे लेख वाचनीय

२७ मार्चची चतुरंग पुरवणी वाचनीय आणि माहितीत भर घालणारी होती. अरुणा अन्तरकर आणि संगीता जोशी या दोन्ही लेखिकांनी अभिनेत्री मीनाकुमारीच्या व्यक्तिमत्त्वाला पुरेपूर न्याय दिला असं मनापासून वाटतं. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरून स्वभावाचे कंगोरे उलगडू शकते, हे प्रकर्षांनं जाणवलं. समर्पक शब्दरचना, विषयाचा फापटपसारा नाही, तिच्या शेरोशायरीतील दर्द तिच्याच शब्दात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या लेखांमधून झालं. दोघींचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन.

–  मुक्ताबाई सीताराम कुलकर्णी

शमसुद्दीन तांबोळींचे पुरुष हृदयपारदर्शक!

‘पुरुष हृदय’मधील शमसुद्दीन तांबोळी यांचा लेख वाचला. आजवरच्या लेखांत त्यांच्यासारखे पारदर्शक कोणतेच पुरुष वाटले नव्हते. आभारी आहे तांबोळींचा, की त्यांनी ‘बाई हृदयी’ हे शब्द उच्चारण्याचं धाडस दाखवलं. संपूर्ण लेख मी न थांबता वाचला आणि हे सदर जर असे विचार मांडणार असेल तर आपला प्रबोधनहेतू साध्य झाला असं म्हणावं लागेल. मी आज वयाच्या संध्याकाळी धर्म या मानवी संस्कृतीपासून दूर गेलो आहे. आदिमानव हा असा कोणत्याच चौकटीत नव्हता आणि मला तो आज जास्त प्रगती केलेला वाटतो. आपला उलटा विकास होण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ जे निरागस आणि पारदर्शक होतं, त्या सुंदर आदिम अवस्थेतून आम्ही बालकांनादेखील बाहेर खेचत ते आनंदी चैतन्य नष्ट करत आहोत. धन्यवाद पुन्हा या सदराकडे वाचक म्हणून आणलंत.

– रंजन र. इं. जोशी, ठाणे</strong>