News Flash

सुजाण नागरिकांसाठी

बरं चांगले इंग्रजी बोलता येणे म्हणजे सुशिक्षित असणे हे आमच्या समाजाचे पूर्वग्रहदूषित आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘आशाकिरण’ हा रेणू दांडेकर यांचा लेख वाचला. आधुनिक भारतात शिक्षणाचे जे बाजारीकरण होत चालले आहे. (होत नसते ते आपण करत असतो) त्या वर्मावर बोट त्या ठेवणार, अशी आशा या लेखात दिसते. शिक्षण हे साध्य आहे साधन नव्हे हे सर्वाना ज्ञात असून का सगळे जण इंग्रजी शाळेकडे जातात हे मला आत्तापर्यंत समजलेच नाही. बरं चांगले इंग्रजी बोलता येणे म्हणजे सुशिक्षित असणे हे आमच्या समाजाचे पूर्वग्रहदूषित आहे. यावर अनेक चर्चासत्रे झाली की मुलांना शिक्षण कसले द्यायचे मूल्याधारित शिक्षण की गडगंज पैसा कमावणारे शिक्षण. यामध्येच भारताची शिक्षण व्यवस्था फरफटत चालली आहे. यावर उपाय भरपूर आहेत, पण अंमलबजावणी कोण करणार हा कळीचा मुद्दा. यात पालकांची चूक असते असे नाही यापेक्षा शिक्षकाची, राजकारण्यांची, समाजाची महत्त्वाची भूमिका आहे. आज ग्रामीण भागात अनेक पालकांची शिक्षणाची बाराखडी न गिरवलेल्या पालकांना कसे कळणार की मुलांना मूल्याधारित शिक्षण द्यावं. ग्रामीण भागातील पालक हे अनुकरणप्रिय आहेत. एखाद्या गावातील सुशिक्षित माणसाने आपल्या मुलाला कुठल्या शाळेत टाकलं ते पाहून त्याच इंग्रजी शाळेत टाकण्याचा अट्टहास करतात (यावरून हे दिसते की सुशिक्षितच अशिक्षितांसारखे वागतात.) आणि कोणी कष्ट करून, कोणी कर्ज काढून, कोणी जमिनी गहाण ठेवून त्या इंग्रजी शाळांना देतात. मला एवढेच म्हणायचे की समाजाच्या वृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शासनाने, शिक्षकाने, तुमच्यासारख्या सुशिक्षित नागरिकाने गावोगल्ली, वाडय़ावस्तीवर जाऊन पालकांचे समुपदेशन करावे की जीवन जगण्यासाठी मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा आहे. इंग्रजी शाळेमध्ये फक्त तिथेच मिळते असे नाही. एक चांगली व्यक्ती घडविण्यासाठी, एक सुजाण नागरिक घडण्यासाठी सर्व जण मिळून प्रयत्न करू, असे समुपदेशन करावे.

– योगेश शिवयोगी कोरे, सोलापूर

वृक्ष पुनर्रोपणाला उत्तेजन हवे

‘पर्यावरण रक्षणाचे आश्वासक प्रयत्न’ हा अर्चना जगदीश यांचा लेख (चतुरंग १२ जानेवारी) वाचला. अलीकडे नवीन इमारती बांधताना तसेच रस्त्याचे ४ पदरी ६ पदरी रुंदीकरण करताना अडथळे ठरणारी झाडे रीतसर परवानगी घेऊन तोडतात. परवानगी देणारे व घेणारे वृक्ष पुनर्रोपणचा विचार करत नाहीत. अलीकडे पुनर्रोपणाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. योग्य ठिकाणी ती स्थलांतर केल्यास पर्यावरण हानी नक्कीच टळेल. झाडे मानवजातीला किती प्राणवायू व वाटसरूंना सावली प्रदान करतात यावर ठिकठिकाणी चर्चासत्रे भरविल्यास सर्वदूर पसरलेल्या समाजात जागृती होऊन वृक्षपुनरेपण करण्याची लोकचळवळ सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

 सां.रा. वाठारकर, चिंचवड.

विंदांचा आदर्श

‘आभाळमाया’ सदराची सुरुवातच इरावतीबाई कर्वे यांच्यावरील सुंदर लेखाने झाली. दुसरा लेख विंदा करंदीकरांवरचा, त्यांच्या कन्येने लिहिलेला. कवी म्हणून श्रेष्ठ असलेले विंदा पालक म्हणूनही तेवढेच ग्रेट होते. सुजाण पालकत्व किंवा समुपदेशन हे शब्द माहीत नसण्याच्या काळात त्यांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मुलीला समजावून सांगितले व दमही दिला. पालकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही ओरडलो तरी असतो आणि १/२ फटके मारले असते. मुलीला शिकवलेले गणित व इंग्रजी पालक व शिक्षकांनाही आदर्श आहे. उक्ती आणि कृती एक असल्यामुळेच ५ वर्षांच्या मुलाला त्यांनी मांत्रिकाकडे न नेता त्याची भीती बालकवितांच्या माध्यमातून घालविली, हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. सामाजिक बांधिलकी जपणारी, देणाऱ्याने देत जावे हा त्यांचा वसा चालविणारी त्यांची कन्या जयश्री काळेही थोर आहेत.

– वासंती सिधये

माणूस म्हणून मोठे

जयश्रीताई, कवी विंदांच्या वैयक्तिक आयुष्यातील आपण जागविलेल्या आठवणी खरंच खूप छान आहेत. आपल्या मुलांवर सतत आरडाओरड करणारे आपण सर्व पालक कुठे आहोत? एकीकडे चंगळवादी बनलेले आपण व दुसरीकडे परोपकारी भावनेतून काव्यवाचनाचे मानधन सहर्ष परत करणारे, आपल्या मुलाची भीती नष्ट व्हावी म्हणून बालकविता करणारे हे बालकवितेतील महत्त्वाचा आदर्श ठरणारे, विलास सारंगाची नोकरी कायम व्हावी म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारे, आपल्याच दु:खांना कुरवाळत न बसता मधुमेह, कर्करोगासारख्या असाध्य व्याधींशी हसतमुखाने सामोरे जाऊनही नेत्रदान, देहदानाचा संकल्प सपत्नीक करणारे विंदा विरळेच.  सगळ्यात महत्त्वाचे, आपल्या मुलामुलींना आपला जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणारे, त्यांनी केलेल्या निवडीचा सानंद आदर करणारे, प्रसंगी योग्य मार्गदर्शन करून यथाशक्ती मदत करणारे विंदा व त्यांचे माणूस म्हणून असणारे मोठेपण जपून होते. हे आपण अधोरेखित केले. मला व्यक्तिश: हा चतुरंग पुरवणीतील लेख मनस्वी आवडला.

– प्रा. सखाराम बाबाराव कदम, परभणी

सवाल सुन्न करणारा

‘पवित्रच करत आहात तर ..’  ही मुक्ता गुंडी यांची कविता वाचली. वर्तमानकाळात स्त्रीस्वातंत्र्याविषयी त्यांनी केलेले भाष्य वास्तव आहे. आज शिक्षणाचा प्रसार होऊनही भारतीय महिलेला मिळणारी वागणूक विचार करायला लावते. जिच्या उदरात जीवकोंभ अंकुरला तिला पवित्र समजल्या जाणाऱ्या जागेत प्रवेश नसावा याचे शल्य कवितेने अधोरेखित केले आहे. तिच्या दुधातून तुला मिळालेला अणू काढता येणार नाही, मग तू का तिच्याशी भेदभाव करतोस? असा सरळ साधा सवाल मनाला सुन्न करणारा आहे. स्त्रीचे प्रश्न एक स्त्रीच संवेदनशीलपणे मांडते.

– विठ्ठल जाधव, शिरूरकासार, (बीड)

संवेदनशील कविता

‘पवित्रच करत आहात तर’ ही कविता वाचली. कोणत्याही स्त्रीच्या मनातील भावना अशीच असेल, पण ओठांवर येत नसेल. आज त्या प्रत्येकीला ही कविता वाचल्यावर नक्कीच समाधान मिळाले असेल. स्त्रीशरीरातील मासिक पाळी या अत्यंत महत्त्वाच्या बदलाकडे सदोष नि अपवित्र भावनेने पाहणे अतिशय  खेदजनक आहे, स्त्रीच जेव्हा या सगळ्याला विटाळ म्हणते तेव्हा अधिक वाईट वाटते.  तुम्ही वैज्ञानिक परिभाषा वापरलीत, या नाजूक आणि महत्त्वाच्या विषयावर खूप संवेदनशीलतेने लिहिलेत यासाठी एक रसिक व वाचक आणि एक स्त्री म्हणून तुमचे आभार आणि अभिनंदन.

– रोहिणी बेडेकर

प्रतिगामी विचारांना चपराक

..आपण खूपच वास्तववादी भूमिका कवितेतून मांडली आहे. भारतासारख्या लोकशाही देशात स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी आपण स्त्री-पुरुष समानता आणू शकलो नाही याची खंत आहे. आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्माचे आचरण, प्रचार, प्रसार करण्याचे स्वतंत्र्य दिले आहे तसेच लिंग, जात, धर्म यावर भेदभाव करण्यास बंदी घातली आहे. केरळमधीलच नव्हे तर भारतातील रूढीप्रिय व्यक्ती  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विरोध करीत आहेत. दोन महिलांनी क्रांतिकारी पाऊल उचलून मंदिरात प्रवेश केला.. त्यानंतर पुजाऱ्याने मंदिर शुद्धीकरण केले. या अशा विरोध करणाऱ्या व्यक्तींना स्वत:चे विचार व मने शुद्ध व ‘पवित्र’ करण्याची गरज आहे. स्त्रियांवर अन्याय करणारे सर्व अनुचित प्रकार बंद झालेच पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने स्त्री सक्षम बनेल व स्त्री-पुरुष समानता येईल. आपल्या लिखाणाने प्रतिगामी विचारांना चपराक बसली आहे. ..आपली कविता विचार करायला भाग पाडते, अंतर्मुख करते.

 – विक्रम चव्हाण, सातारा

लोकजीवनाचा इतिहास 

‘लोकसंस्कृतीचा गहिवर’ हा डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त प्रा.मिलिंद जोशी यांचा लेख (चतुरंग, १२ जानेवारी) अत्यंत माहितीपूर्ण. लोकसाहित्य परंपरा लोकजीवन यांचे चित्रण करणारे साहित्य आणि ‘रानजाई’ मालिकेने या साहित्याचे संवर्धन झाले, पण आता याबद्दल काय परिस्थिती आहे? आधुनिकतेत वर्षांनुवर्षे संभाळलेले हे लोकसंचित टिकणार का? नव्या पिढीला यात आस्था आहे का? जुन्या पिढीबरोबरच हे साहित्य लयाला जाणार का? हे साहित्य म्हणजे लोकजीवनाचा इतिहास आहे तेव्हा सुखदु:खे अनुभव व्यक्त करणारे साहित्य वाचनात आणि अभ्यासात हवे आणि नवीन पिढीला याची ओळख करून देणे आवश्यक आहे.

– प्र.मु.काळे, नाशिक

पत्र लिहिणाऱ्यांसाठी

वाचकहो, चतुरंग पुरवणीतील लेखांवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया पाठवत असता त्याबद्दल धन्यवाद. ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत यासाठी काही सूचना-

पत्र मराठीतून (देवनागरी) असतील तरच ती प्रसिद्ध केली जातील. केवळ लेख छान आहे, आवडला, पटला, अशी एका शब्दांची, वाक्यांची पत्रे प्रसिद्ध केली जाणार नाहीत. एखाद्या लेखावर मत मांडणारी, चर्चा घडवून आणणारी पत्रे आम्हाला निश्चितच प्रसिद्ध करायला आवडतील. इमेलवरील पत्रं पीडीएफ तसेच ओपन, आरटीएफ किंवा डॉक्स फाईल्स मध्ये असावा हस्तलिखित पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे,

नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com यावर लेख पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:27 am

Web Title: readers reaction on chaturang article 5
Next Stories
1 जुगाराचं व्यसन
2 एक कप..!
3 रचनात्मक सकारात्मकता
Just Now!
X